पुनर्भेट भाग १५ in Marathi Short Stories by Vrishali Gotkhindikar books and stories Free | पुनर्भेट भाग १५

पुनर्भेट भाग १५

पुनर्भेट भाग १४

रिक्षात बसताच तिने रिक्षावाल्याला पत्ता सांगितला आणि मेघनाला
फोन करून दुकानातून निघाले आहे असे सांगितले .
आता उद्या सकाळी सतीश येऊन दाखल होईल ..
कसे कसे करायचे सगळे .?
मुख्य प्रश्न मेघनाचा होता तिला काय आणि कसे सांगायचे .
त्यात मोहनचा फोन लागत नव्हता .
काहीही करून त्याला रात्रीतून इकडे बोलावून घ्यायला हवे
परिस्थिती तोच आटोक्यात ठेवू शकेल .
घर जवळ येताच रमाने पैसे दिले आणि ती खाली उतरली .
काहीतरी कारण काढुन घराबाहेर जाउनच मोहनशी बोलायला फोन करायला लागणार आता
असा विचार करते तोच फोन वाजला .
फोन मोहनचा होता ..बघताच तिला हायसे वाटले !!
“वहिनी का फोन केला होतात .
मी एका मिटिंग मध्ये होतो फोन नाही घेऊ शकलो “
“मोहन अहो मला सतीशचा फोन आला होता ..
असे सांगुन सतीशचे सर्व फोन वरचे बोलणे तिने मोहनला सांगितले .
ते ऐकताच मोहन म्हणाला ..
“वहिनी तो आहे कुठ आत्ता ..
“अहो ते कुठे सांगितले त्याने ?
आज रात्री निघून उद्या पोचतो इतकेच बोलला .
विचारायचे न नक्की कुठे आहात ते ..
“मी विचारले हो पण त्याची सांगायची तयारीच नव्हती ..
आता विषय कुठे वाढवा म्हणून नाही जास्त बोलले .
तुम्ही येताय न उद्या सकाळपर्यंत इकडे ?”
“वहिनी मी मुंबईत आहे आत्ता...
 उद्या पण माझी एक महत्वाची मिटिंग आहे .
त्यामुळे मला मुंबई नाही सोडता येणार .
पण परवा संध्याकाळपर्यंत मात्र मी येईन तिकडे .”
मोहन इतक्या लांब आहे आणि उद्या येऊ शकणार नाही
हे ऐकताच रमाच्या जणु पायाखालची वाळुच सरकली ..
“मोहन तुम्ही नाही आलात तर मी एकटी काय करू ?
सतीश आला तर कसे काय मला जमेल बोलायला ?
आणि मुख्य प्रश्न आहे मेघनाचा ..
तिला काय सांगू तिच्या वडिलांबद्दल ?
आणि कशी तिची समजुत पटवू
फारच अवघड प्रसंग आहे हा ..”
फोन वर तिचा हताश स्वर ऐकुन मोहनला पण काही सुचेना
खरेच काय सांगायचे मेघनाला सतीशबद्दल ?
इतक्या वर्षात पोरीने बाबाचे नाव पण काढले नाहीय
सतीशची बाजु ऐकुन पुढे काय करायचे ते ठरवता येईल
पण सध्या हा प्रश्न सोडवायला लागेल .
मग अचानक त्याला एक उपाय सुचला .
“वहिनी असे करा सध्या तुम्ही मेघनाला सांगा ..
मोहनमामा मुंबईला गेलाय पण नेमका त्याचा एक मित्र इथे आलाय
त्याला एक दिवस आपल्या घरी ठेवून घ्या असे सांगितले आहे .
एकदोन दिवसात मोहनमामा परत येईल
तोपर्यंत त्याचे मित्र थांबतील आपल्या घरी  .
आपले घर लहान आहे ,पण एक दिवस तरी सोय करावी लागेल त्यांची”
मला चुकून माकून तिने काही विचारायला फोन केलाच तर मीही हेच सांगेन
सध्या तरी हाच मार्ग दिसतो आहे मग मी आल्यावर बघूया  “
हे ऐकुन रमा हो म्हणाली ..काही इलाज नव्हता
या परिस्थितीत हाच मार्ग सुचत होता त्याला .
रमाचा होकार आल्यावर मोहनने मग फोन बंद केला .
रमा घरात शिरली .
मेघना काहीतरी वाचत बसली होती .
स्वयंपाकघरातुन खिचडी आणि तळलेल्या पापडाचा वास येत होता .
हातपाय धुवुन येताच मेघना म्हणाली ,
“आई आज इतका का ग उशीर झाला ?
दुकान तर कधीच बंद झाले असेल ना ..?
त्या भागात संध्याकाळी सातनंतर कोणतेच दुकान चालू नसते हे
मेघनाला माहित होते .
आणि आईचे रोजचे रुटीन पण तिला माहित होते .
आज प्रथमच आई इतक्या उशिरा घरी आली होती .
आता या प्रश्नांची सुचतील तशी उत्तरे देणे भाग होते .
“एक कस्टमर येऊन उधार राहिलेले बिल देतो म्हणले होते .
त्यांची वाट पाहत होते म्हणून उशीर झाला ग “
“मिळाले का मग पैसे ...पण तु तर कुणाला उधार देत नाहीस
मग हे कोण असे खास कस्टमर होते .”?
मेघनाचे पुढले प्रश्न तयार होते ....
“एकदा अडचण होती त्यांची म्हणून पार्टीचे पैसे उधार ठेवले होते
कॉलेज मधले एक प्रोफेसर आहेत ते “
असे म्हणून आता नवीन प्रश्न नको म्हणून
रमा म्हणाली ..,”वा खिचडीचा वास तर मस्त सुटलाय ,भूक पण लागलीय
चल जेवायला बसुया “
हो चल बसुया.तुला उशीर होणार म्हणलीस इतका उशीर होईल
असे वाटले नव्हते ..मग मीच मगाशी खिचडी टाकली .
“शहाणी ग माझी बायो ती ..आईची कीती काळजी घेते “
असे रमाने म्हणताच मेघना हसली .
रमाच्या मनात आले साधे दुकानातून यायला एक दिवस उशिर झाला तर ही
छ्प्पन प्रश्न विचारते .
त्यांना उत्तरे देताना आपल्याला पुरेवाट होते .
मग सतीश विषयी किती आणि कायकाय विचारेल ..?
कशी उत्तरे द्यायची आणि होईल का समाधान हीचे ?
सगळेच कठीण वाटू लागले रमाला .
दोघी जेवायला बसल्या .
गरम खिचडी, तूप, पापड, लोणचे खाताच
रमाचे डोके जरा शांत झाले .
जेवताना मेघना बरेच काही इकडचे तिकडचे सांगत होती .
रमाच्या डोक्यात काहीच शिरत नव्हते
ती फक्त हं हं ..हो का असे काहीतरी बोलत होती
रोज दोघींचा शिरस्ता असे एकमेकींच्या गोष्टी शेअर करायच्या.
आज मात्र आई काहीच न बोलता नुसतीच हुंकार टाकत होती म्हणून
मेघना म्हणाली,”आई अग कुठे लक्ष आहे तुझे ..
नुसती हं हं काय करते आहेस ?”
रमा एकदम दचकली ..लगेच तिला लक्षात आले की मोहनच्या प्लान प्रमाणे सतीशच्या
येण्याची बातमी सांगायची हीच वेळ आहे .
धाडस करून ती म्हणाले ,
“मेघु अग मगाशी मोहन मामाचा फोन आला होता मला
त्याचा एक मित्र येतोय आपल्याकडे ..उद्या “
“कोण मोहनमामाचा मित्र ?
आणि आपल्याकडे का येतोय तो ?
मेघनाचे प्रश्न सुरु झाले ..
“हे बघ मोहनमामा गेलाय मुंबईला
त्याच्या अनुपस्थितीत तो मित्र अचानक येतोय ना ..
त्याची अजुन राहायची सोय कुठे नाहीये ग
म्हणून आपल्या घरी ठेवून घ्या एक दिवस असे मोहनमामा म्हणाला “
रमाने त्यातल्यात्यात सारवासारव केली ..
पण एवढ्यात संपले नव्हते .
या घराला कित्येक वर्षात पुरुष माणसाची अजिबात सवय नव्हती
कधी मोहन जरी आला तरी काम झाले की परत जात असे
असे राहायला म्हणून
इतक्या छोट्या घरात कधीच कोण आले नव्हते
त्यात हा कोणीतरी अनोळखी माणूस
मेघना अस्वस्थ झालेली दिसत होती  ...
“आई मोहनमामाला सांग ना आमच्या घरी नको पाठवू त्याला .
कसा राहील तो आपल्यासोबत या छोट्या घरात ..?”
आता विषय आवरता घ्यायला हवा होता
नाहीतर मेघनाच्या या भडीमारातुन रमाची सुटका नव्हती
मग रमाने वेगळाच पवित्र घेतला ..
ती थोडीशी रागावून म्हणाली ,
मेघु काय हे तुझे बोलणे ..
घरी येण्याऱ्या पाहुण्याविषयी असे बोलतात का ?
आणि तुझ्या लाडक्या मामाचाच मित्र आहे ना तो ?
इतर वेळेस मामाकडून हक्काने हवे ते मागत असतेस
आणि आता एक दिवस त्याच्या मित्राचे आपल्याकडे स्वागत करायचे तर
असे सांगायचे होय त्याला ?
बरे दिसते का असे बोलणे ?
रमा मनातून जरा बिचकतच हे बोलली होती
आईचा असा रागाचा स्वर ऐकुन मात्र मेघना वरमली
तिचा चेहेरा थोडा पडला ..
आई कधीच असे आपल्याशी बोलत नाही...
 रागावत तर कधीच नाही
मग आज अशी काय वागत असेल बरे ...
खरेतर मेघनाला अजूनही मोह्नमामाच्या मित्राच्या येण्याची गोष्ट पटली नव्हती .
पण आईशी ती कधीच वाद घालत नसे त्यामुळे ती गप्प बसली .
आणि झोपण्यासाठी अंथरूण घालायच्या तयारीला लागली.
थोड्याच वेळात लाईट बंद करून दोघी झोपल्या .

क्रमशः      


Rate & Review

Milan

Milan 9 months ago

Sonali Nikam

Sonali Nikam 10 months ago

Rajan Bhagat

Rajan Bhagat 10 months ago

Shivali Pimple

Shivali Pimple 10 months ago

Manali Sawant

Manali Sawant 10 months ago