Reunion Part 14 in Marathi Short Stories by Vrishali Gotkhindikar books and stories PDF | पुनर्भेट भाग १४

पुनर्भेट भाग १४

पुनर्भेट भाग १३

दुसऱ्या दिवशीपासून दोघींचे नेहेमीचे रुटीन चालू झाले .
दिवस गडबडीत जात असल्याने सतीशचा विषय थोडा मागे पडला मनातून .
दोन तीन दिवसांनी रमाच्या लक्षात आले
अजुन मोहनचा काहीच फोन आला नाही सतीशसंबंधात .
करावा का फोन मोहनला ?
विचारावे का त्याला काय झाले असे ?
विचार जरी मनात आला तरी तिला मात्र स्वतः फोन करायचे धाडस होईना
असेच एक दिवस संध्याकाळ होत आली होती .
दुकानातले काम आवरून सुजाता थोडा वेळापूर्वीच घरी गेली होती
आता आपण पण आवरून कुलूप लावावे अशा विचारात असताना रमाचा फोन वाजला .
मोहनचा असेल अशा विचाराने ती थोडी धास्तावली .
फोन वाजत होता ..
रमाने फोन उचलला ..
नंबर तर अनोळखी दिसत होता ..
तरी पण तिने उचलला ..
हेलो ...
एक खोल आवाज तिकडून आला ..
हेलो ..रमा म्हणाली
आपण रमा बोलता आहात का ..?
रमाने हो म्हणताच ..
तिकडून आवाज आला..
रमा अग मी सतीश बोलतोय ..तुझा नवरा ..
रमाने सतीशचा आवाज ओळखला ...एक क्षणभर तिच्या हृदयात धडधड सुरु झाली .
आज इतक्या वर्षांनी त्याचा आवाज ऐकुन तिचा हातापायाला घाम फुटला .
बोल ना ग ..रमा ओळखले नाहीस का ?
मी तुझा नवरा सतीश ..
त्या आवाजात असलेली सतीशच्या मग्रूरपणाची झलक तिने ओळखली .
पण त्यात आता थोडी अगतिकता पण वाटली तिला
“होय मी रमाच बोलते आहे ..असे म्हणल्यावर
सतीश पाण्याचा बांध फुटल्यासारखा भडभडा बोलु लागला ..
“किती दिवस शोधतो आहे तुम्हा दोघींना ..
आपल्या घरात तु सापडली नाहीस ..
काकांच्या वाड्यात पण तुमचा पत्ता लागला नाही .
मोठ्या मुश्किलीने तुझा हा नंबर मिळवला कसातरी ..
आणि आधी तुला फोन केला ..
तूच फोनवर आहेस पाहून अगदी हायसे वाटले बघ ..
कुठे आहात कुठे तुम्ही दोघी ?
मला भेटायचे आहे तुम्हाला ..”
आता रमा त्याला उत्तर द्यायला सरसावली ..
“तु कुठे होतास इतकी वर्षे ?
आणि काय करीत होतास ?
आम्ही पण तुला किती हुडकले
पोलीसात पण तु हरवल्याची तक्रार केली तरीही तु सापडला नाहीस ..
आणखी कुठे कुठे कर्जे करून ठेवली होतीस आणि ती फेडता येईनात म्हणून पळालास
का आमच्यापासून तोंड लपवायला पळून गेलास ?”
नकळत रमाच्या बोलण्यात त्रागा आणि कडवटपणा डोकावला ..
“रमा अग आज इतक्या वर्षांनी मी तुला फोन करतोय
इतकी वर्षे तु कुठे होतास
काय खातपीत होतास ?कसे जगलास ?
हे सगळे विचारायचे सोडुन माझी उलटतपासणी कशी काय करू शकतेस तु ?”
सतीशच्या स्वरात हताशपणा डोकावत होता ..
“मग काय करू ?
इतक्या वर्षात तु तरी कुठे विचारलेस तुम्ही दोघी कशा जगता आहात ?
आपली एकुलती एक मुलगी मेघना
तिला तु कसे मोठे केलेस ?
काय काय भोगायला लागले माझ्यामागे तुम्हाला ?
केलीस का याची चौकशी तु ?
रमा ताडताड बोलु लागली
“मला माफ कर ग रमा
माझ्या तोंडून काही वेडेवाकडे गेले असेल तर .
पण खरेच ग माझे मलाच माहित इतकी वर्षे माझी काय अवस्था होती ती
पण एक दिवस सुद्धा असा गेला नाही की तुझी आणि मेघनाची आठवण नाही आली
खुप वेळा वाटायचे तुम्हाला फोन करावा
बोलावे तुमच्याशी ..पण धाडस नव्हते होत ग ..
आणि आता समोरासमोर भेटून तुमची माफी मागावी म्हणले तर
तुम्ही दोघीच गावात नव्हताच ..”
रमा थोडी शांत झाली ..
‘बर सांग आता काय काय घडले तुझ्या बाबतीत ..”
रमा म्हणाली
“नुसते फोन वरच बोलत ठेवणार आहेस मला ..
की मला भेटायची इच्छाच नाहीय तुझी .?
आणि इतक्या वर्षाचा यातनामय प्रवास फोनवर असा दहा पंधरा
मिनिटात थोडाच सांगता येईल ..?
सतीश इतके बोलेपर्यंत अचानक फोन कट झाला .
रमाने फोनकडे पाहिले ..
आणि परत तो फोन नंबर रीकॉल केला .
आउट ऑफ नेटवर्क कव्हरेज असा मेसेज येत होता .
रमाला वाटले तरी बरे झाले सुजाता नुकतीच निघून गेली होती .
नाहीतर हे फोनवरचे बोलणे तिला समजल्यावाचून राहिले नसते .
रमा शांतपणे परत त्याचा फोन येईल अशी वाट पाहत राहिली .
विचारांची आवर्तने तर चालूच होती...
सतीशला भेटायची, त्याची अवस्था जाणून घ्यायची इच्छा तर होतीच .
कितीही रागाने बोलली तरीही सतीश नवरा होता तिचा
आणि तिच्या मुलीचा बाबा ...!
पण आता मेघनाला काय सांगायचे त्याच्या बाबतीत
ती कशी काय स्वीकारेल या गोष्टीला ?
आताचे मेघनाचे वय अजाण होते .
खुप नाजूकपणे ही गोष्ट हाताळायला लागणार होती .
यात मोहनचे सहकार्य ही आवश्याक होते .
त्याला तर हे सगळे सांगायला लागणारच होते .
आत्ताच करावा फोन त्याला ..असा विचार करून तिने मोहनचा
फोन फिरवला ..पण तोही नेटवर्कच्या बाहेर लागत होता ..
अजुन अर्धा तास होऊन गेला तरीही सतीशचा फोन परत येईना.
संध्याकाळ व्हायला लागली होती .
मेघना पण वाट पाहत असणार .
घरी गेल्यावर सतीशचा फोन आला तर मेघनासमोर बोलता येणार नव्हते .
थोडा वेळ इथेच वाट पहायची असे ठरवून तिने मेघनाला फोन करून उशीर होईल असे सांगितले .
जवळजवळ तास दीड तास झाला तरी त्याचा फोन येईना
आणि केला तर लागतही नव्हता .
काय करावे अशा द्विधा मनस्थितीत रमा बसून राहिली .
अखेर परत फोन आला ..
“रमा अग फोनचा BALANCE संपला होता
रिचार्ज करायला इतका वेळ गेला बघ ...
आता मला नवीन कोणतेही प्रश्न विचारू नकोस .
जे काय बोलायचे ते आपण आता भेटूनच बोलूया ..
मला भेटायचे आहे ग तुला आणि माझ्या प्रिन्सेस ला ..
होईल ना ग माझी “पुनर्भेट “तुझ्याशी आणि माझ्या मेघनाशी ?
मी सगळे सांगेन काय काय घडले इतक्या वर्षात
मला जी काही दुषणे द्यायची आहेत ती तु त्यावेळीच दे
माझी तयारी आहे ..
मला मंजूर आहे माझ्याकडून खुप मोठी चुक झाली आहे
त्याबद्दल देशील ती शिक्षा भोगेन मी
पण आता मोठ्या मनाने माझा स्वीकार कर ग “
फोन वर आता त्याचा स्वर अगदीच अगतिक होता .
रमाला अगदी भरून आले ...
“ठीक आहे ये तु घरी ..कधी येतोस ?
असे विचारल्यावर सतीश म्हणाला ..
“तुम्ही दोघी कुठे राहताय हे कुठे मला माहित आहे
सांग न कुठे आहात तुम्ही
गाव सोडुन कुठे गेलात राहायला ... ?
हा प्रश्न ऐकल्यावर रमा म्हणाली .
आम्ही तर आता पुण्याजवळच्या एका उपनगरात रहात आहोत
तुला पत्ता मेसेज मध्ये पाठवू का ?
पण तु कुठे आहेस आता ?
“तुमचा शोध घेत घेत मी असाच भटकतो आहे बघ
माझा काही ठावठिकाणाच नाहीये ग ..
पण तु पत्ता कर मला मेसेज ,मी रात्रीच गाडीत नसून उद्या सकाळ पर्यंत तिथे पोचतो.”
बोलताना मात्र त्याने त्याचा पत्ता सांगितलाच नाही ..
पण आता उगाच कशाला सगळ्याला फाटे फोडत बसायचे म्हणून
रमाने आणखी काहीच विचारले नाही .
“ठीक आहे मी पाठवते पत्ता ,सकाळी पोचलास इथे की फोन कर “
असे म्हणून तिने फोन बंद केला .
आणि तिचा पत्ता त्याला मेसेज मध्ये पाठवला .
मग तिने दुकान बंद केले.
रात्रीचे नऊ वाजायला आले होते .
आता बसची फ्रिक्वेन्सी पण कमी झाली होती .
तिने जवळच्या रिक्षा थांब्याजवळ जाऊन एक रिक्षा पकडली
आणि ती घरी निघाली .

क्रमशः