Ambani's cock books and stories free download online pdf in Marathi

अंबानीचा कोंबडा

'कु-कु----कुकूचकू ----'
पहाटे-पहाटे शेजारच्या कोंबड्याने जोरदार बांग दिली .तंगड्या ताणून पालथा झोपलेला दत्तू धडपडून जागा झाला.झोपल्या जागी अंग धनुष्यासारख ताणत आळस देत बोलला--"'आये,च्या टाक ना वाईच."
चूलीजवळ भाकर्या भाजत असलेली सुभद्रा भूत बघितल्यासारखी दत्तू कडे पाहत राहिली.तिचा आपल्या डोळ्यांवर विश्वास बसेना.
"आर----कुणी झपाटलं की काय तूला?--पार सूर्व्या डोईवर येईस्तवर लोळत असतो अन् आज असा पहाटेचा उठला ह्वय."
"अग ,आजच्याला पेडगावला कोंबड्यांच्या झुंजी हायती."
"कर्म मेल,कोंबड्याच्या झुंजीपायी हे कोंबड तुरा फडफडवत उठल व्हय. मेल्या, सुक्काळीच्या --- , ऊसाला पाणी कोण देणार?"
"आल्यावर देईन की " मिश्री लावत दत्तू बोलला.
दत्तूला कोंबड्यांच्या झुंजीच भलतच वेड. पंचक्रोशीत जिथं -जिथं कोंबड्यांची झुंज असायची तिथ दत्तू पोहचायचा. तहानभूक कामधंदा विसरून तासनतास झुंजीत रमायचा.
त्याची आई,सूभद्रेला त्याच हे वेड माहिती होत.
चहा घेवून पांढरा सदरा व लेंगा घालून दत्तू आपल्या सायकलवरून पेडगावला निघाला. तासाभराने तो पेडगावला जांभळीच्या मळ्यावर पोहचला.
या मळ्यावर झुंजीची दंगल होणार होती. मळ्याच्या मध्यभागी चुन्याच वर्तुळ आखले होते. समोर छान मंडप घातला होता.मंडपात बेंजो ,लाऊडस्पीकर व खुर्च्या मांडल्या होत्या. समालोचक स्थानापन्न झाले होते.झुंजीसाठी कोंबडे घेवून आलेले व हौशी बघे यांची झुंबड उडाली होती. सगळीकडे कलकलाट चालला होता.बेंजो वाजायला लागला. त्या तालावर सहा-सात पोर व चार पाच दारूडे नाचू लागले.या गदारोळात नवेगावचे ढेकणे पाटील आले. फटाक्यांचा आतषबाजी सुरू झाली.ढेकणे पाटलांच्या हस्ते कोंबडे रिंगणात सोडून पहिली झुंज सुरू झाली.
"आर,----हाण---हाण की लेका."
"जबरदस्त!----दे ---दे टक्कर--"
"छट----अरर---गेला---गेला---लेकाचा."
"मार लेका---चोच मार---हां--हा--अशीच. "
"वार, मर्दा--बघ--बघ कशी उडाली पिसं हुरेरे---!"
तिकडे समालोचक बोंबलत होता तर बघे बेधुंद होत हातवारे करत ओरडत पुढे घुसत होते.दत्तू हवेत ठोसे लगावत ओरडून कोंबड्याना चेतवत होता.
ज्यांचे कोंबडे हरत होते ते कपाळ बडवून घेत हरलेल्या कोंबड्याना स्वस्तात विकत होते. खवय्यै याचा फायदा ऊठवून कमी भावात कोंबडे खरेदी करत होते. जिकंलेले आपले कोंबडे हवेत उडवत नाचत होते.गुलाल उडवत होते.
हातवारे करून दमलेला दत्तू लघुशंकेसाठी माळाच्या कोपर्याकडे गेला. त्याच अंग घामाने चिंब भिजले होते. केस चवताळलेल्या कोंबड्याच्या पिसावाणी पिंजारले होते. दत्तू परत येण्यासाठी वळला तेवढ्यात एकजण कोंबडा घेवून आला आणि त्याची पिसं ओढत ओरडला---"आता जित्ता सोडत न्हाय तूला. ह्या दगूडावरच आपटतो बघ."
त्यानं कोबंडयाची मान पकडली अन दगडावर आपटायला गेला.दत्तूने त्याचा हात पकडला.
"आर ,कशापायी जीव घेतो त्याचा."
"जीव घेवू नको तर काय!वरीसभर---छान--छान खाऊ घालून--झुंजीसाठी तैयार केला. साध पंख पण फडफडवले नाही. पहिल्याच टक्करीत पालथा पडला---सुक्काळीचा !"
"जाऊ द्या ना राव "
"जाऊ द्या ? ऑ ---एकडाव तरी टक्कर द्याची.पण नाय! --जसा अंबानीचा कोंबडा ---नाय सोडत याला जित्ता आता."
."अवं कशापायी मारता त्याला ;त्या परीस म्या घेवून जातो---चाललं?"
"हा ---घ्या--घेवून जा हा अवलक्षणी कोंबडा.'
दत्तूने तो गुबगुबीत कोंबडा घाई-घाईत ओडूनच घेतला.
त्या कोंबड्याच्या उबदार स्पर्शाने दत्तू सुखावला. कोंबडा नव्हे ; भल मोठ धबाड हाती लागल्यागत तो पिसाटला.
'जसा अंबानीचा कोंबडा ' हे वाक्य त्याच्या डोक्यात रुंजी घालू लागल.
कोंबडा घेवून दत्तू घराच्या दिशेने निघाला.वाटेत गोसाव्या कडून सोनेरी किनार असलेला जरीचा दोरा त्याने खरेदी केला.वाटेतच कोंबड्याच्या पायांभोवती आणि मानेभोवती जरीचा घागा व्यवस्थित बांधला.कोंबड्याची
उस्कटलेली पिसं व्यवस्थित केली.
"बेन ,आता लई झ्याक दिसतय."
कोंबडा पिशवीत कोंबून त्यानं सायकलला टांग मारली.गाण गुणगुणत तो गावात शिरला. समोरून बबन्या येत होता.बबन्या म्हणजे गावातल चालत- फिरत वर्तमानपत्र.
" दत्तू,गड्या भलताच खुशीत दिसतोस? काय लाटरी बीटरी लागली काय?"
"बबन्या ,लाॅटरीच काय? अंबानीचा अख्खा कोंबडा गावलाय."
"ऑ---"बबन्याच तोंड उघडच राहिल.
"हां---हां तोच रं जिओवाला"
" पण ;---"
"शेतावर ये ,दावतो तूला ."
दत्तूला खात्री होती.आता सार्या गावात अंबानीच्या कोंबड्याची बातमी पोहचणार.
घरी पोहचताच सुभद्रेने सायकलला लावलेली पिशवी बघितली. पिशवीत कुणीतरी डुगूडुगू हलत होत.
"काय आणलस र?"
" अग, अंबानीचा कोंबडा !"
" कोंबडा त्यो कळला,पण हा अंबानी कोण रं?"
"अग,त्यो ---त्यो मुंबैवाला,ज्याचा कुत्रा बी विमानातून फिरतूया--!"
"अ र्--र्--खरच का--र? आन हा कोंबडा बी विमानातून फिरत होता काय?"
"मग----! अग सोन्याचे दाण खायचा हा."
एव्हाना अंबानीचा कौतुकाचा कोंबडा बघायला घरी गावातल्या बाया,बाप्पे व पोरटोर जमा झाली. दत्तूने शक्कल लढवली. प्रत्येकी दोन रूपये फी त्याने बसवली. एका टोपलीत तो ऐदी कोंबडा ऐटीत उभा ठेवला.
"आर, कोंबडा हाय का इंद्राचा ऐरावत.!"
"साधा सुधा कोंबडा हाय व्हय?अंबानीचा कोंबडा हाय कोंबडा !"
" आपल भाग्य फळफळल बग लेका. अंबानीचा कोंबडा बघाया मिळाला."
"लकी कोंबडा हाय बा---हा कोंबडा आला नी अंबानी टू जी पासून फोर जी कड गेला.
बघता-बघता कोंबड्या भोवती अफवांचा धुरळा उठला. दत्तू ने कंडी पिकवली की अंबानीची बंद पडलेली गाडी त्यानं चालू करून दिली तेव्हा साक्षात अंबानीच्या ड्रायव्हरने खूष होऊन त्याला हा कोंबडा भेट दिला.
दोन दिवसांनी दत्तूने गावातल्या गुरूजींकडून खडू आणला.
एका फळकुटावर बोर्ड लिहिला----
लिलाव---लिलाव---लिलाव
' अंबानीच्या लकी कोंबड्याचा लिलाव '
ठिकाण- येडगाव-धामणमळा
वेळ-उद्या दुपारच्याला.
दुसर्या दिवशी धामणमळा माणसांनी फुलला. अंबानीचा मानाचा कोंबडा कोणाचा होतो याची सार्यांना उत्सुकता होती. आसपासच्या गावातले बडे असामी लिलावासाठी हजर होते. लकी कोंबडा घेवून नवा अंबानी बनण्याची स्वप्नं बाळगून काहीजण आले होते.
दत्तू ने कोंबडा पिंपळाच्या पारावरती ठेवला.मस्तवाल कोंबडा आपला लाल तुरा हालवत आपला नवा मालक कोण असेल याचा अंदाज बांधत होता.लाल पिवळ्या पिसांचा व फराटेदार नारिंगी -निळ्या शेपटीचा डौलदार कोंबडा बघून सारे खूष झाले.
' पंधरा हजार ---एक डाव----' दत्तूने लिलाव सुरू केला.
" विस हजार." पिपंळगावचे शेंडे पाटील गरजले.
" विस हजार एक---विस हजार दोन डाव---"दत्तू खूष होत बोलला.
" पंचवीस हजार " बोरगावचे सरपंच दादू शिंदेनी आवाज दिला.
"पंचविस हजार एक--" दत्तूचे डोळे तेवढे बाहेर यायचे राहिले.
"पन्नास हजार ---!यापुढे कुणीही बोलायच नाय. ममद्या काढ पैका." चोरवाडीचे पैलवान बापू जंगले गरजले.
सारे गप्प झाले.पैलवांनाच्या पुढे बोलून नसती आफत कुणालाच ओढून घ्यायची नव्हती. पण अंबानीचा कोंबडा हातचा जातोय म्हणून सर्वांच्या चेहर्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती.
"कुकूच----कू--" कोंबड्या ने बांग दिली. बापू पैलवानाने दत्तूच्या हाती पन्नास हजार रूपये ठेवले व कोंबडा उचलला.एवडा पैसा बघून दत्तू फक्त बेशुद्ध पडायचा तेवढा राहिला होता.
तिकडं पैलवानाने वाजत गाजत कोंबडा नेला. दत्तूने तडक घर गाठले.
"आये, उद्याच्याला हिरीवर इंज्यान बसवूया---पाणी शेंदून शेंदून हात दुखाया आल. "
" दत्त्या---लेका तो खरच अंबानीचा कोंबडा हुता? " सुभद्रेने विचारल.
दत्तू फक्त गोड हसला. त्याच्यासाठी तो लकी कोंबडा होता हे तरी खरच होत.

बाळकृष्ण सखाराम राणे