jaswandi books and stories free download online pdf in Marathi

जास्वंदी

जास्वंदी
नारायण नावाचा एक लाकुडतोड्या होता. पहाटे तो जंगलात जायचा शोधून वाळलेली लाकडे तोडायचा त्यांच्या मोळ्या बांधून विकायचा. मिळालेल्या पैशात तो आणि त्याची बायको इंद्रायणी आनंदाने राहायची. त्यांना राजस नावाचा एक मुलगा होता.एकदा नारायण जंगलात गेला.
वाळलेले लाकड तोडू लागला.तो आपल्या कामात मग्न होता.
" बाबा , जरा जपून. मला लागेल."
नारायण घाबरला.कोण बोलतोय? आसरा, हडळ की आणखी कोण?
" बाबा, घाबरू नका. मी इथे आहे.मला बाहेर काढा."
नारायणाने इकडे तिकडे बघितल...आवाज बाजूच्या जास्वंदीच्या झुडपातून येत होता.तो तिथे गेला. जास्वंदीच्या लालभडक फुलांमध्ये एक गोरीपान छोटी मुलगी हसत होती.नारायण चकित झाला.या जंगलात ही सुंदर मुलगी कुठून आली? ती बोलू कशी शकते? असे प्रश्न त्याला पडले.त्याने त्या मुलीला अलगद बाहेर काढले.
" कुणी आहे का इथ? कुणाची मुलगी आहे ही?"
पण सारा परीसर शांत होता.ती मुलगी गालातल्या गालात खुद्कन हसली.नारायणाने मुलीला छातीशी कवटाळले. तिला घेवून तो धावतच घरी गेला.
" इंद्रायणी, हे बघ ..देवाने आपल्याला मुलगी दिली." नारायण उत्तेजित होवून म्हणाला.
इंद्रायणीने मुलीला कुशीत घेतलं.
" किती गोड आहे ही."
" ही जास्वंदीच्या बनात मिळाली. आपण हिचे नाव जास्वंदी ठेवूया ." नारायण म्हणाला.
बघता-बघता दिवस भराभरा निघून गेले.राजस व जास्वंदी
मोठे झाले . बहिण- भाऊ एकमेकांशी खेळत....कधी कधी लटकेच भांडत. पण दोघांना एकमेकाविना करमत नसे.
नारायण व इंद्रायणीला दोघांचं खूपच कौतुक ! जास्वंदी सोळा वर्षांची झाली.परीसरात तिच्याएवडी सुंदर...सुशील व आनंदी मुलगी कुणीच नव्हती.तिच्या सौंदर्याची किर्ती दूरवर पोहचली. त्या देशाचा राजा मानसिंग अतिशय क्रूर व कपटी होता.तो म्हातारपणाकडे झुकला होता.जास्वंदीला आपली राणी करावी अस ठरवून त्याने नारायणला दरबारात घेवून येण्यासाठी शिपायांना पाठवले. नारायण घाबरला. पण जास्वंदी म्हणाली..
" बाबा, तुम्ही घाबरु नका.... दरबारात जा."
नारायण शिपायांसह दरबारात गेला.राजा म्हणाला..
" मला तुझ्या मुलीशी लग्न करायचे आहे."
" नाही, हे शक्य नाही. " नारायण धीर करून म्हणाला.
" ठिक आहे, तर मग माझी समुद्रात पडलेली रत्नजडीत अंगठी शोधून आण.नाहीतर तुझं डोक उडवून..जास्वंदीला घेवून येईन." राजाने धमकावले.
बिचारा नारायण घरी आला व आपल्या नशिबाला दोष देत रडत बसला. एवड्यात जास्वंदी आपल्या मैत्रिणी नंदा, मंदा व चंदाशी खेळून घरी आली.
" बाबा, रडता कशाला?" तिने विचारले.
" आपल नशीब फुटले...राजाने समुद्रात पडलेली अंगठी शोधायला सांगितले आहे.ते जमलं नाही तर तो माझ डोक उडवणार व तूला घेवून जाणार. अंगठी शोधणे कस शक्य आहे ?"
जास्वंदी हसत म्हणाली.." सार शक्य आहे.फक्त आपण निर्मळ असावं.चला समुद्राकडे जाऊ."
दोघ किनार्यांवर गेले. जास्वंदीने तीन वेळा टाळ्या मारल्या. एक वितभर लांबीचा सोनेरी मासा पाण्यावर आला.
" जास्वंदीताई काय काम आहे?"
" सोनेरी मासुल्या...राजाची पाण्यात पडलेली अंगठी शोधायची आहे. जमेल?"
" हे तर सोपं काम आहे.मी माझ्या मित्रांना बोलावतो. "
अस म्हणत सोनेरी माश्याने तीन वेळा शेपटी पाण्यावर आपटली.क्षणात पाण्यावर असंख्य रंगी-'बेरंगी मासे तरंगताना दिसले. निळे..हिरवे..लाल..पिवळे..चंदेरी अशा नाना रंगाचे व नाना आकाराचे मासे दिसत होते.
सोनेरी माश्याने त्यांना अंगठी शोधायला सांगितले. सारे मासे पाण्याखाली गडप झाले. काही वेळातच एक निळा मासा अंगठी तोंडात पकडून घेवून आला. त्याने ती अंगठी सोनेरी माश्याजवळ दिली. सोनेरी माश्याने ती जास्वंदीजवळ दिली. जास्वंदीने ती अंगठी बाबांना दिली.
" ही घ्या...राजाला नेऊन द्या."
नारायण ती अंगठी घेऊन दरबारात गेला. अंगठी बघून राजा चमकला.पण पुन्हा म्हणाला...
"माझ्या वाड्यातून राजउद्यानात जाणार भुयार एका रात्रीत खोदून दे नाही तर तूझा डोक उडवेन व जास्वंदीला माझी राणी करीन. "
नारायण घाबरला एका रात्रीत भुयार कोण खोदेल? हे शक्य नाही. तो घरी येवून आपल्या दैवाला दोष देत रडत बसला.एवड्यात जास्वंदी चंदा..मंदा व नंदा बरोबर खेळून घरी आली.
"बाबा...तुम्ही का रडता?"
" अग यावेळी राजाने खूपच कठीण काम सांगितले आहे. एका रात्रीत भुयार खोदायचे आहे. " नारायण म्हणाला.
" हे काम पण होईल. फक्त देवावर विश्वास हवा. चला आपण उद्यानात जाऊया."
दोघंही राजउद्यानात गेली.अंधार झाला होता.जास्वंदीने तीन टाळ्या मारल्या.तसा एक लिंबाच्या आकाराचा भुंगा तिथे आला.
" काय काम आहे... जास्वंदीताई?" भुंग्याने विचारले.
" इथून राजाच्या वाड्यापर्यंत एका रात्रीत भुयार खोदायचे आहे....जमेल?"
"हे तर सोपं काम आहे.मी माझ्या मित्रांना बोलावतो."
भुंग्याने मोठ्याने तीन वेळा गुणगुण केली....क्षणात हजारो काळे व तपकिरी रंगाचे भुंगे तिथे आले.
" मित्रांनो आपल्याला एक भुयार एका रात्रीत खोदायचे आहे.चला....सुरू करूया."
बघता- बघता हजारो भुंगे जमीन पोखरायला लागले.जमीन पोखरत भुंगे बागेकडून वाड्याकडे सरकू लागले.पहाटेचा कोंबडा आरवण्यापूर्वी भुंगे राजाच्या शयनकक्षांपर्यत पोहचले.तोपर्यंत नारायण झोपला होता.मोठ्या भुंग्याने जास्वंदीला भुयार तयार झाल्याचे सांगितले. जास्वंदीने नारायणला उठवून भुयार तयार झाल्याचे सांगितले. नारायण चकित झाला.
" बाबा, भुयारातूनच जा आणि राजाला भुयार तयार झाल्याचे सांगा."
नारायण राजाच्या शयनकक्षात गेला.नारायणला भल्या पहाटे आपल्या शयनकक्षात बघून राजा थक्क झाला.
" महाराज भुयार तयार झाले." नारायण म्हणाला.
" अं....अं..ठिक आहे. आता शेवटची अट ऐक आपल राज्याच्या सीमेपलिकडे पलिकडे एक जंगल आहे.त्या जंगलात एक दरी आहे तिला सैतानाची दरी म्हणतात.या दरीत अनेक महाभयंकर साप आहेत....त्यांचा प्रमुख निलकांत साप आहे.त्याच्या डोक्यावर एक निलमणी आहे मला तो तिन दिवसात आणून दे नाहीतर मी तूझं डोक उडवेन व जास्वंदीला माझ्या महालात आणिन. "
खर म्हणजे राजा घाबरला होता.नारायण अशी अवघड काम पूर्ण करतो म्हणजे त्याला एखाद पिशाच्च वश असावं किंवा त्याला मंत्र तंत्र अवगत असावेत असे त्याला वाटल.
नारायण घरी आला व नशिबाला दोष देत रडत बसला.
एवड्यात जास्वंदी चंदा, मंदा व नंदा बरोबर खेळून घरी आली.
" बाबा काय झाल? दुष्ट राजाने कोणती मागणी केली?"
"अग आता तर मरणच ओढवल...राजाला सापाच्या फणावरचा निलमणी हवाय. अस म्हणतात की तो साप एक माडभर लांब आहे....नुसत्या शेपटीच्या तडाख्याने भले मोठे वृक्ष जमीनदोस्त करतो. "
" सगळं होईल.....स्वतः वर विश्वास हवा. "
तिने तीन वेळा टाळ्या मारल्या. एक फूटभर लांबीचा बुटका माणूस तिथे प्रकट झाला.
" काय काम आहे जास्वंदीताई ..?"
" ऐक....निलकांत सापाकडून निलमणी मागून आणायचा आहे.....त्याला कदंबवृक्षावरचा मध आवडतो तो त्याला दे."
एवड्यात राजस तिथे आला.
" जास्वंदी मी पण या बुटक्याच्या सोबत सर्पाच्या दरीत जातो."
" ठिक आहे. पण सावधगिरी बाळग." जास्वंदी म्हणाली.
राजस अठरा वर्षांचा झाला होता.त्याच शरीर बलदंड होत. तो शूर व हुषार होता. तलवारबाजी...घोडेस्वारी त्याला येत होती.एका उमद्या घोड्यावर स्वार होऊन राजस व तो बुटका अनेक संकटे पार करून सैतानाच्या दरीजवळ पोहचले. वाटेत कंदब वृक्षावर चढून राजसने मध काढला बुटक्याने मध बुधल्यामध्ये भरला.विषारी साप ....क्रूर प्राणी...बुटक्याला बघून आपोआप दूर झाले .अखेर ते दोघं दरीच्या सर्वात खोल
भागात पोहचले .रात्र झाली होती पण तिथे एक अदभुत निळसर प्रकाश पसरला होता. हा प्रकाश त्या निलमणीचा होता. चाहूल लागताच निलकांतने आपली शेपटी जमिनीवर आपटली. त्या आघाताने जमिन हादरली. निलकांतने फुत्कार काढत फणा उंचावली.एखाद्या छत्रीसारखी भलीमोठी फणा त्यावरच्या निलमण्यामुळे चकाकत होती. तेवढ्यात बुटक्याने चतुराईने मधाचा बुधला त्याच्या समोर ठेवला. मध बनून तो शांत झाला.
" हे महान सर्पराजा जास्वंदीने आपल्यासाठी हा मध दिलाय. आपण प्रसन्न होउन आपला निलमणी काही काळासाठी द्या अशी तिने विनंती केलीय."
प्रसन्न होऊन निलकांत म्हणाला...
" खर म्हणजे ह्या निलमण्याचेच दर्शन मानवासाठी दुर्लभ आहे.पण जास्वंदी माझ्या मुलीसारखी आहे.हा निलमणी मी देतोय तो चंदन पेटीतून घेउन जा." निलकांतने मणी शेपटीने काढत बुटक्याच्या हाती दिला.बुटक्याने तो चंदनी पेटीत ठेवला. पहाटेला राजस व बुटका सैतानाच्या दरीतून बाहेर पडले.बुटक्याने ती चंदन पेटी जास्वंदीकडे दिली.जास्वंदीने ती आपल्या बाबांकडे दिली.
तिसर्या दिवशी जास्वंदी आपल्या आई, वडील व भावा सोबत राजदरबारी गेली. तिचे सौंदर्य बघून सार्यांचे डोळे दिपले.नारायणाने निलमणी असलेली ती पेटी राजाजवळ दिली. राजाने पेटी उघडण्यासाठी पेटीला हात लावला त्याक्षणी एक भयंकर फुत्कार ऐकू आला. भिंती हलू लागल्या.दरबारतले सारे भयाने थरथर कापू लागले. राजा भितीने बेशुद्ध पडला. जास्वंदीने पुढे होत ती पेटी आपल्या हाती घेतली. भेदरलेल्या लोकांना उद्देशून ती म्हणाली.
" लोकहो या जुलमी राजामुळे सारे राज्य रसातळाला गेले आहे. हा दुसर्यांच्या पोरीबाळींना जबरदस्तीने पळवतो.याला शिक्षा झालीच पाहिजे. याला अंधार कोठडीत टाकून नवा कर्तव्यदक्ष व प्रजेचा हित पाहणारा राजा निवडा."
सार्या लोकांनी आनंदाने हात हलवत संमती दिली.ते जास्वंदीचा जयजयकार करू लागले. लोकांनी राजबिंड्या व शूर अश्या राजसला नवा राजा म्हणून निवडले.
सारे आनंदी झाले पण जास्वंदी म्हणाली...
" आई-बाबा माझ काम झाल मी सर्वांचा निरोप घेते."
नारायण व इंद्रायणी रडू लागली. त्यांना थांबवत जास्वंदी म्हणाली.
" मी एक परी होते. एका छोट्या पक्षाला मी गंमतीने काटा टोचला. त्या नाजूक पक्ष्याचे रक्त सांडलं. मला वाईट वाटल पण वनराणीने मला शाप दिला की मी मनुष्य योनीत जन्म घेईन. चांगलं काम केल्यावर मी पुन्हा वनात येवू शकेन अस वनराणीने मला उःशाप दिला होता.आज या दुष्ट राजापासून प्रजेचा वाचविल्यामुळे माझा शाप संपला."
" पण तू गेल्यावर आमचं कस होईल?" इंद्रायणीने विचारले.
" पण मी आज गेले नाही तर माणूस म्हणूनच मला अखेरपर्यंत राहव लागेल...ठिक आहे मी पण तुमच्याशिवाय राहू शकणार नाही. त्यापेक्षा मी माणूस म्हणूनच राहीन." जास्वंदी म्हणाली.
आता जास्वंदी परी राहिली नव्हती.नंतर दूर देशीच्या एका सुंदर राजकुमाराशी तिचा विवाह झाला. सारे सुखाने नांदू लागले.
------------*-----------*---------------*-------------*-----
समाप्त