Palkatva in Marathi Moral Stories by संदिप खुरुद books and stories PDF | पालकत्व

पालकत्व

ही गोष्ट आहे दोन मित्रांची अगदी तुमच्या माझ्यासारखी. धीरेन व प्रताप दोघेही अगदी लहाणपणापासून एकत्र वाढलेले, एकत्र शिकलेले. दोघांचीही गाढ मैत्री होती. दोघांचेही लग्न दोन महिण्यांच्या अंतराने झाली. दोघांनीही भागीदारीमध्ये कपडयाचा व्यवसाय चालू केला. धीरेन महत्त्वकांक्षी होता. फक्त पैसा कमावणे हाच त्याचा उद्देश होता. तर प्रताप पैसे कमावण्यासह माणुसकी जपण्याचा उद्देश ठेवून वागणारा होता. व्यवसायापुढे धीरेन आपल्या स्वत:च्या कुटुंबालाही वेळ देत नसे. तर प्रताप व्यवसायासह आपल्या कुटुंबालाही वेळ देत असे. आता धीरेन व प्रताप या दोघांनाही मुले झाली होती. आपल्या मुलासाठी पैसे कमावण्याच्या प्रयत्नात धीरेन आपल्या मुलालाही वेळ देत नव्हता. तर प्रताप आपल्या मुलांसोबत रमण्यात आनंद मानत होता. आपल्या बाळाच्या बाळलीला पाहून त्याचा आनंद गगनात मावत नव्हता.

            भागीदारीमध्ये व्यवसाय असताना मी एकटाच जास्त कष्ट करत आहे. प्रताप आपल्या व्यवसायाला हवा ‍तितका वेळ देत नाही. असा विचार मनात येवून  धीरेनने आपल्या मनातील खदखद प्रतापला बोलून दाखवली. प्रतापनेही कुटुंबाला वेळ देणेही आवश्यक असल्याचे स्पष्ट सांगीतले. त्यावर धीरेनने त्याला स्वत:चा वेगळा व्यवसाय करावा लागेल असे सांगीतले व त्या दिवसापासून त्या दोघांनी आपापला वेगळा व्यवसाय चालू केला.

            आता या घटनेला जवळपास पंचवीस वर्ष झाली होती. धीरेनने आपल्या व्यवसायाची प्रचंड भरभराट केली होती. त्याचे कापड उद्योगासह इतरही बरेच व्यवसाय होते. सर्वच ठिकाणी त्याने कामगार ठेवले होते. आपल्या व्यवसायाचे नियोजन करण्यामुळे त्याला क्षणभरही विश्रांती मिळत नव्हती. त्याचा मुलगा यश आता इंजिनिअरींग करत होता.तर त्याची मुलगी इंदु बारावीत शिकत होती.त्याची पत्नीही आपल्या पतीच्या व्यवसायात त्याला मदत करत होती. त्यामुळे त्या दोघांनाही आपल्या मुलांकडे लक्ष देण्यास क्षणभरही वेळ नव्हता. त्यांची मुले लहाणपणापासून नोकरांकडे होती. त्यांना शाळेत ने-आण करण्यापासून त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यासाठी नोकर ठेवण्यात आले होते. त्यांना हवी असणारी गोष्ट त्यांनी मागणी करण्यापुर्वीच त्यांना मिळत होती. त्यांच्याकडे पैशांची कमतरता नव्हती. त्यामुळे त्यांना पैशांची किंमत नव्हती. आई-वडील कामात व्यस्त असल्यामुळे आई-वडील असूनही ती मुले त्यांच्या प्रेमाला पारखी झाली होती. धीरेनने आपल्या मुलांसाठी अमाप पैसा कमावला होता. धीरेनकडे अमाप पैसा असतानाही तो सारखा अस्वस्थ राहत असे. आपल्या कुटुंबाला व नातेवाईकांना वेळ देत नसे. त्याच्याजवळ पैसा असल्यामुळे तो इतरांना कमी लेखत असे. त्यामुळे नातेवाईकही फारसे त्याच्याकडे येत नसत.

            प्रतापनेही आपल्या व्यवसायात हळूहळू वृद्धी केली होती.त्याचाही मुलगा आता एम.बी.ए करत होता. मुलगी आपल्या आईला घरकामात मदत करत इंनिअरींगचे शिक्षण पूर्ण करत होती. त्याची पत्नी योगीताही आपल्या पतीला व्यवसायात मदत करुन आपल्या मुलांकडेही लक्ष देत होती. तिने स्वत: आपल्या लहान मुलांचा सांभाळ केला. त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था ती स्वत: करायची. त्यांना आवश्यक असणारी गोष्टच

 

 

त्यांना द्यायची. त्यांच्या आवश्यकतेनुसारच प्रताप त्यांना पैसे द्यायचा. त्यामुळे त्या मुलांना पैशांचं मूल्य  माहित होतं. आपले आई-वडील किती कष्टाने पैसा मिळवतात हे त्यांना दिसत होतं. त्यामुळे पैसा काटकसरीने वापरायला पाहिजे याची त्यांना जाण होती. प्रतापकडे आपल्या गरजा भागण्यापुरता पैसा होता. आपल्या मुलांच्या भावी शिक्षणासाठी त्यांच्या भविष्यासाठी त्याने आवश्यक तितका पैसा कमावला होता. त्याला आता कशाचीच चिंता नव्हती.

            प्रतापची मुलगी मायासाठी पाहुणे आले होते. मुलगा निर्व्यसनी असून स्वत:चा हॉटेल व्यवसाय असल्याने प्रतापने आपल्या मुलीचे लग्न त्याच्याशी लावून ‍दिले. नेमके त्याच हप्त्यामध्ये धीरेनची मुलगी एका मुलासोबत पळून गेली. त्या धक्क्याने धीरेन पुरता कोसळला. त्याची मानसिकता खराब झाली. त्याचे व त्याच्या पत्नीचेही व्यवसायात लक्ष लागेना. बहीण पळून गेल्याच्या तणावामुळे यशही घरी दारु पिऊन येऊ लागला. तसे तर त्याला पुर्वीपासूनच व्यसन जडले होते. तो ड्रग्सच्याही आहारी गेला होता. पण वडीलांच्या भीतीमुळे तो घरी पिवून येत नव्हता. पण आता त्याला चांगले कारण सापडले होते. त्यामुळे तो आता बिनधास्त घरी पिवून येऊ लागला. त्यामुळे तर धीरेनला आता खूपच ताण आला होता.

            प्रतापचा मुलगा राजने एम.बी.ए. पूर्ण केले व तो आपल्या वडीलांना व्यवसायात मदत करु लागला. राज निर्व्यसनी होता. त्याच्यावर त्याच्या आई-वडीलांनी चांगले संस्कार केले होते. लवकरच त्याने आपल्या व्यवसायात प्रगती केली. आपल्या मनमिळाऊ स्वभावाने त्याने हाताखालील कामगारांची मने जिंकली. त्याच्या हाताखालील लोकही मन लावून काम करु लागले. तो दुकानामध्ये  नसला तरी त्याचा व्यवसाय छान चालू लागला. मुलगा व्यवसायामध्ये चांगला रमल्याचे पाहून प्रतापने पाहुण्यातील एक सुंदर मुलगी पाहून त्याचे लग्नही लावून दिले. उद्योगामध्ये त्याने घेतलेली भरारी पाहून त्याला त्यांच्या शहरातील त्या वर्षीचा 'उत्कृष्ट युवा उद्योजक' पुरस्कार मिळाला.त्याच दिवशी धीरेनचा मुलगा यश ड्रग्स प्रकरणात पोलीसांच्या हाती लागला. ते प्रकरण धीरेनने मोठया मुश्कीलीने मिटवले.

            एके दिवशी प्रताप,राज व प्रतापची पत्नी योगीता आपल्या दुकानात असताना अचानक तेथे धीरेन व त्याची पत्नी मोनिका आले. त्या दोघांच्याही चेहऱ्यावर दु:ख स्पष्ट दिसत होते. आपला मित्र इतक्या दिवसांतून आज पहिल्यांदाच आपल्या दुकानात आल्यामुळे प्रतापला खूप आनंद झाला. त्याने आपल्या नोकरांना त्या दोघांनाही पाणी व चहा द्यायला सांगीतले.

            प्रताप," धीरेन बोल कसं येणं केलंस ?"

            धीरेन बोलू लागला,

            "प्रताप, ज्यावेळी आपण व्यवसाय चालू केला होता त्यावेळी तू तुझ्या कुटुंबाला वेळ देण्यासाठी आपल्या व्यवसायामधून बाजूला झालास.आपल्या कुटुंबाला वेळ देत तू व्यवसायही चांगला सांभाळलास. तुझ्या पत्नीनेही आपल्या मुलांचा सांभाळ करत तुला व्यवसायात चांगली मदत केली. याउलट आम्ही दोघांनीही व्यवसायापुढे व पैसा कमावण्याच्या भानगडीत मुलांकडे दुर्लक्ष केले. आज माझी मुलगी आपल्या आई-बापाचा विचार न करता एका मुलासोबत पळून गेली. माझा मुलगा व्यसनाच्या आहारी गेला. मी त्यांच्यासाठी पैसा तर कमावला पण त्यांना संस्कार देण्यात कमी पडलो. याउलट तू तुझ्या मुलांना संस्कार दिले. त्यामुळे तुझी दोन्ही मुले सुखात आहेत. म्हातारपणात माणसाला काय हवं असतं? फक्त आपली मुले चांगल्या मार्गाला लागलेली असावीत. त्यांनी आपले नाव खराब करु नये? त्यांच्यामुळे आपले नाव मोठे व्हावे. पण माझं उलटंच झालं. माझ्या गर्विष्ठ स्वभावामुळे माझे नातेवाईकही माझ्यापासून दुरावले आहेत. आता माझ्याजवळ पैसा तर आहे पण मनातलं सांगायला हक्काचं माणूस नाही. मुलेही मनाने दुरावली. त्यावेळी मला तुझी आठवण आली. आता मला तुझ्या साथीची खूप आवश्यकता आहे.

            धीरेनचे शब्द ऐकून प्रतापच्या डोळयात पाणी आलं. तो म्हणाला, "वेडया, एक मित्रच असतो ज्याच्याबरोबर आपण मनातलं बोलू शकतो. मी तुला सोडलं नव्हतं तूच माझ्यापासून बाजूला झालास. आता झालं ते जाऊ दे. मुलगी पळून गेली. ती आता परत येणार नाही. जे सत्य आहे ते स्वीकारणं हाच दु:ख कमी करण्याचा मार्ग आहे. तिलाही मोठया मनानं माफ कर व आता मुलाकडे लक्ष दे. सर्वस्व संपलेलं नाही. आपण यशला चांगल्या मार्गावर आणण्याचा पुरेपूर प्रयत्न करु. आता ताण घेऊ नकोस. उर्वरीत आयुष्य मुलांसोबत आनंदाने जग."

            प्रतापला बोलल्यामुळे व प्रतापच्या धीर देणाऱ्या शब्दांमुळे धीरेनचं मन मोकळं झालं. त्याच्या मनावर असलेलं काळजीचं ओझं आपोआप कमी झालं. आपल्या मुलांच्याच भविष्याच्या विचाराने आपण तणावात आहोत हे त्याला उमगलं.

            तो म्हणाला,

            "ज्यावेळी मी तुझ्यासोबत व्यवसायातील भागीदारी सोडली होती. त्यावेळी मी तुला म्हणालो होते. तुझी लायकी नाही व्यवसाय करण्याची. तू आपल्या बायका मुलांनाच सांभाळत बस. तू माझी बरोबरी कधीच करु शकत नाहीस त्यावेळी तू मला काहीच बोलला नव्हतास फक्त हसला होतास. मी तुला कमी समजलं होतं. पण आता मला कळतंय खरंच मी तुझी बरोबरी करु शकत नाही. तू आपल्या मुलांना चांगले संस्कार देण्यास यशस्वी ठरलास पण मी संस्कार न दिल्यामुळे आज त्यांच्यापासून दुरावलो आहे. यामध्ये त्यांची चूक नाही. मीच त्यांना संस्कार द्यायला कमी पडलो.माणसाला पैसा आवश्यक आहे. पण तो पैसा कमावण्याच्या नादात आपली माणसंच दुरावता कामा नये याची माणसाने जाण ठेवली पाहिजे. आता तू म्हणतोस तसंच करणार. यापुढील उर्वरीत आयुष्य माझ्या मुलांसोबत, आप्तांसोबत आनंदाने जगणार. बाप होवून मला आता चोवीस वर्ष झाली पण खरं पालकत्व काय असतं हे आज मला समजलं आहे."

            एवढे बोलून धीरेन व मोनिका यांनी प्रतापच्या कुटुंबियांचा निरोप घेतला. ते गेल्यानंतर राज आपल्या वडीलांना म्हणाला,

            "पप्पा, आज मला कळलं आपण मला जास्त पैसे का देत नव्हता ते. त्यामुळेच आज मला पैशांची किंमत चांगल्या रीतीने कळाली."

            प्रताप म्हणाला,

            "माणसानं आपल्या लेकरांसाठी पैसा जरूर कमवावा. परंतु तो कमावताना संस्कार द्यायला विसरु नये. तेच खरं पालकत्व आहे."

            प्रतापची पत्नी योगीता म्हणाली, " ते खरं आहे पण आता यश सुधरेल का?"

            प्रताप म्हणाला, "मी माझ्या मित्राला चांगला ओळखतो. त्याने एखादी गोष्ट मनावर घेतली की, तो ती पुर्णत्वास नेतो. आता तो दाखवून देईल यशला. पालकत्व काय असतं ते ? आजपर्यंत त्याने फक्त पैसा कमावण्याचं स्वप्न मनाशी बाळगलं होतं.त्याने अमाप पैसा कमावला आहे. आपल्यापेक्षा तो दहापटीने श्रीमंत आहे.आता तो आपल्या मुलाची चुकीच्या वळणावर गेलेली गाडी लवकरच सरळ रस्त्याला घेवून येईल यात शंकाच नाही."

            आपल्या वडीलांचं बोलणं ऐकून राजला आपल्याच बापाचा अभिमान वाटला. कारण एवढा धनाढय माणूस जवळपास चोवीस वर्षानं आपल्या मित्राला भेटतो व आपल्यापेक्षा कमी पैशावाल्या मित्राचा सल्ला घेतो. याचा अर्थ पैसा तर माणसाला आवश्यकच आहे. पण संस्कार नसतील तर त्या पैशांना काहीच किंमत नाही. त्याच दिवशी त्याला त्याच्या पत्नीकडून ती प्रेग्नंट असल्याची गोड बातमी मिळाली. त्या आनंदात तो आपल्या बाळाचा जन्म होण्यापुर्वीच चांगला पालक होण्यासाठी आपल्या होणाऱ्या बाळावर चांगले संस्कार करावे लागतील या विचारात हरवून बसला.

           

Rate & Review

Shweta Patil

Shweta Patil 7 months ago

Sakshi More

Sakshi More 9 months ago

मुलांना चांगले संस्कार लावले पाहिजे हे वर्णन आहे

Varsha

Varsha 8 months ago

संदिप खुरुद
शारदा जाधव