Safar Vijaynagar Samrajyachi - 5 books and stories free download online pdf in Marathi

सफर विजयनगर साम्राज्याची... - भाग ५

विठ्ठल मंदिर पाहता पाहता दुपार होत आली.. बरीच पायपीट केल्याने सगळ्यांच्या पोटात कावळे ओरडायला लागले होते. हंपी बघताना तुम्हाला चालण्याची तयारी ठेवावी लागते.. तरच तुम्ही मनापासून एन्जॉय करू शकता. अन् त्यासाठी वेळेवर अन्न आणि पाणी घेतलंच पाहिजे..

आमच्या गाईडने आम्हाला तिथल्या एका स्थानिक खानावळीत नेलं. टेबल खुर्ची तर होत्याच पण त्याबरोबरच जमिनीवर गाद्या टाकून समोर बसक्या पद्धतीची जेवण ठेवण्यासाठी अशी टेबल साध्या भाषेत सांगयचं तर आपली भारतीय बैठक !! केळीच्या पानावर चपात्या, दोन तीन प्रकारच्या भाज्या, चटणी त्यावर तूप, भात, रस्सम आणि खास कर्नाटकी पद्धतीची गोड खीर.. एकंदरीत काय, पुन्हा माझी सकाळ सारखी स्थिती झाली.. अजिबात कशाची वाट न बघता मी जेवणावर तुटून पडले.😂😂

तृप्त मन आणि पोट घेऊन तिथून बाहेर पडलो.. आता आम्हाला "रॉयल एनक्लोजर" हा शाही कॉम्प्लेक्स बघायचा होता..
त्याची सुरवात आम्ही क्वीन्स बाथ ( राण्यांचे स्नानगृह) या वास्तूपासून केली.जाण्यासाठी मातीचा रस्ता आणि दोन्ही बाजूला हिरवागार बगीचा त्यात ही इंडो-इस्लामिक वास्तुकला शैलीचा वापर करून बांधलेली वास्तू..
क्वीन्स बाथ बाहेरून साधं वाटत असलं तरी आतील बाजू अतिशय कलात्मक रीतीने बांधलेली आहे.

हम्पीमध्ये पुरातन काळात इमारती, टाक्या, स्नानगृहे आणि मंदिरे यांना पाणी पुरवण्यासाठी बांधण्यात आलेले जलवाहिनी आणि कालवे यांचे भव्य जाळे आहे. हम्पीमधील इतर सार्वजनिक स्नानगृहांप्रमाणेच राणीचे स्नान देखील ताजे पाणी पुरवठ्यासाठी जलवाहिनीशी जोडलेले आहे. इमारतीला चारही बाजूंनी खंदक आहे.
ताजे आणि स्वच्छ पाणी आत आणण्याची त्यावेळची रचना पाहून थक्क व्हायला होतं..

इथला व्हरांडा, खिडक्या बघण्यासारखं आहेत. स्नानगृहात उतरण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत.. स्नानगृहाला छत नसून वरती मोकळं निळशार आकाश दिसेल अशी सुंदर रचना!

स्नानगृह सुगंधी पाणी आणि त्यात सोडलेली सुगंधी फुले यांनी भरून जात असेल..
"नीले गगन के तले" प्रिय आणि सुंदर राण्यांसोबत , राजा जलक्रीडा करत आहे. बाजूच्या व्हरांड्यात दासी सेवेसाठी तत्पर आहेत.मधुर संगीतासोबत नर्तिका आपली कला सादर करत आहेत ..अहाहा!! काय मनमोहक दृश्य असेल ते!!
आजकाल असं दृश्य ऐतिहासिक सिनेमामध्येच पाहायला मिळते..

आतील प्रत्येक घुमटाकडे पहात फक्त व्हरांड्यात फिरा, कारण ते अद्वितीय वास्तू शैलीचा उत्तम नमुना आहे..
प्रवेश विनामूल्य आहे आणि फोटोग्राफीला परवानगी आहे.

हम्पीमधील "रॉयल एन्क्लोजर" हा प्रचंड तटबंदी असलेला परिसर एकेकाळी विजयनगर साम्राज्याचे केंद्र होता. रॉयल एन्क्लोजर, नावाप्रमाणेच, विजयनगर साम्राज्याचा राजा जिथे राहत होता आणि राज्य करत असे ते ठिकाण होते.

यानंतर आपण या भागातील सर्वात आकर्षक रचना म्हणजे "दसरा प्लॅटफॉर्म" किंवा ‘विजय घर’ ला भेट देतो..
हा एक पिरॅमिडल प्लॅटफॉर्म आहे जो विजयनगर साम्राज्यादरम्यान साजरा होणाऱ्या दसरा उत्सवासाठी महत्त्वपूर्ण होता. उंच व्यासपीठाचे मुख्य आकर्षण म्हणजे हत्ती, घोडे, सैनिक आणि भव्य मिरवणुकांचे सजावटीचे कोरीवकाम.

रॉयल एन्क्लोजरचा विस्तार बघितला की आपल्या लक्षात येईल की हे एक छोटेसे नगरच असावे. आता, परिसरात अनेक राजवाड्यांचे अवशेष, पाण्याच्या टाक्या, मंदिर, सुशोभित व्यासपीठ, जलवाहिनी आणि कालवे, उत्कृष्ट नक्षीकाम केलेले दरवाजे, सैनिकांना ताकदवर बनविण्यासाठी ज्या दगडी थाळ्यामधून अन्न खायला द्यायचे त्या थाळ्या आणि इतर अनेक संरचना आहेत.

रॉयल एन्क्लोजरमध्ये विजयनगर काळातील काही सर्वात आश्चर्यकारक वास्तूंचा समावेश होता. त्या काळातील इतर वास्तूंप्रमाणेच या बांधकामांमध्येही दगड आणि त्यावरील कलाकृतींचा मुबलक वापर दिसून येतो. हम्पीमधील अशा भागांपैकी एक परिसर होता ज्याने सर्वाधिक विनाश पाहिला आहे. काही राजवाडे आणि इतर वास्तूंचे फक्त अवशेष त्यांच्या तळाच्या रूपात शिल्लक आहेत, तर संपूर्ण वास्तू मानव आणि निसर्गाने उद्ध्वस्त केल्या आहेत. तरीही, विजयनगर घराण्याच्या राजघराण्यातील वैभवाची झलक दाखविण्यात तटबंदीतील अवशेष यशस्वी होतात.

राजदरबार,भली मोठी आणि खूप साऱ्या पायऱ्या असलेली पुष्करणी, राजाला गुप्त खलबते करण्यासाठी जमिनीच्या खाली गुप्त कक्ष.. अशा अनेक इमारतींनी युक्त असा हे रॉयल एन्क्लोजर.

इथले 'हजाराराम मंदिर" हे एकमेव मंदिर आहे जे रॉयल एन्क्लोजरमध्ये आहे. राजा रोज सकाळी अगोदर देवाची पूजा करून मग राजदरबारात येत असे.
मंदिराच्या भिंतींवरती कोरलेले अवशेष हे मंदिराचे मुख्य आकर्षण आहे. हे अवशेष रामायणाची कथा चित्रित करतात. या अवशेषांमध्ये त्या काळातील दसरा सणाच्या मिरवणुकीत भाग घेणार्‍या सैनिक, हत्ती, घोडे, परिचारक आणि नृत्य करणाऱ्या महिला चित्रित केल्या आहेत.
हम्पी येथील रॉयल एन्क्लोजरचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. इतिहासातील अवशेषांसह विखुरलेले खुले हवेचे संग्रहालय. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने काही इमारतींचे नूतनीकरण केले आहे परंतु त्यांच्या उध्वस्त स्वरूपातही हे हम्पीमधील सर्वात मनोरंजक ठिकाणांपैकी एक आहे.
वेळ : आठवड्यातील सर्व दिवस सकाळी 8:00 ते संध्याकाळी 6:00.
प्रवेश शुल्क: प्रवेश शुल्क आवश्यक नाही..

आता आपण वळतो ते रॉयल एन्क्लोजरमधील अजूनही बऱ्यापैकी सुस्थितीत असलेल्या आणि शेवटचा भाग म्हणजे राणीवसा. त्यातील कमल महल आणि त्याला लागून असलेली गजशाळा.
विजयनगर साम्राज्याला शोभतील अशी मंदिरे, इमारती बाजारपेठा जशा इथ बांधल्या गेल्या तसचं या बल्याढ राजघराण्यातील स्त्रियांसाठी राणीवसाही तेवढाच तोलामोलाचा हवा, हा विचार डोक्यात ठेऊनच बांधला गेला असावा..

राणीवसा मजबूत तटबंदीने बंदिस्त केलेला आहे आणि राण्यांच्या सुरक्षेची पूर्ण हमी घेतली होती हे जाणवते..

इथ प्रवेश केल्यावर एक चौकोनी पाण्याचा तलाव दिसतो. सध्या तो कोरडा आहे. त्याच्या मधोमध एक दगडी चौथरा असून त्यावर एक छोटा वाडा राजाने आपल्या संगीतप्रेमी राणीसाठी बांधला होता असं गाईडने सांगितलं.

यानंतर आपलं लक्ष वेधून घेते ती समोरचं गेरू रंगाची, कमळाच्या आकाराची इमारत.. त्यालाच "कमल महल" म्हणतात.
याचेही बांधकाम इंडो इस्लामिक वास्तूशैली , विटा आणि चुना यांचा वापर करून केलं आहे.
दोन मजल्यांची ही वास्तू राण्यांना आरामात गप्पा मारता याव्यात, मुक्तपणे बसता यावं यासाठी बांधली होती..
याच्या कमानी अतिशय देखण्या आणि आकर्षक असून खाबांवर पाने फुले पक्षी यांचे नक्षीकाम केलेले आहे.
लांबून पाहिले तर याच्या शिखराचा आकार पिरॅमिड सारखा दिसतो.

कमल महलला लागूनच "गजशाळा" आहे.. दसरा महोत्सवाच्या वेळी जे खास हत्ती मिरवणुकीसाठी आणले जात त्यांच्यासाठी बांधलेली ही भव्य वास्तू..
अकरा तबेले असलेली ही जागा ऐसपैस आहे.. असं म्हणतात इकडे पाच आणि तिकडे पाच हत्ती आणि मधल्या तबेल्यात शाही हत्ती.
म्हैसूरच्या दसरा महोत्सवापाठोपाठ इथला दसरा महोत्सव त्याकाळी खूप प्रसिद्ध होता.
इथेच बाजूला अजून एक इमारत आहे. ही इमारत म्हणजे माहूत किंवा सैनिकांना राहण्याची सोय असावी असं सांगितलं जातं.

असे हे भव्य दिव्य रॉयल एन्क्लोजर पाहता पाहता संध्याकाळ झाली.. आता गाईड घाई करू लागला कारण आम्हाला सूर्यास्त बघण्यासाठी हेमकूट टेकडी गाठायची होती.

हेमकूट पोहचण्याअगोदर गाईडने एका मंदिरापाशी उतरविले..
"भूमिगत शिव मंदिर"पाण्याखाली असलेले हे मंदिर.

या प्राचीन मंदिराचा मध्य भाग नेहमी पाण्यात बुडलेला असतो. स्थानिक मान्यतेनुसार, ही तुंगभद्रा नदी आहे जी या मंदिराच्या आतील भागातून कालव्यांद्वारे वाहते.

मुख्य सभामंडप, अंगण, सर्वात आतल्या गाभार्‍याकडे जाणारा एक छोटा सभामंडप आहे. मंदिराच्या आजूबाजूला हिरवीगार हिरवळ आहे जिथे तुम्ही काही वेळ बसून आराम करू शकता.

आम्ही तिथं जास्त वेळ न दवडता हेमकूट टेकडीकडे रवाना झालो..


क्रमशः