Ramayan - Chapter 6 - Part 73 books and stories free download online pdf in Marathi

रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 73

अध्याय 73

श्रीरामांचे पुष्पक विमानांत आरोहण –

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

पुढें ठेवोनि विमान । विश्वकर्मा आणि बिभीषण ।
लोटांगण घालोनि पूर्ण । संमुख रघुनंदनु राहिले ॥ १ ॥
कर जोडोनिर्यां देख । विमानेंसहित सेवक ।
पुढें देखतां रघुकुळटिळक । अनत सुखा पावला ॥ २ ॥

तत्पुष्पकं कामगमं विमानमुपस्थितं प्रेक्ष्य हि दिव्यरूपम् ।
गम: प्रहष्ट: सह लहमणेन पुरा यथा वृत्रवथे महेंद्र ॥ १ ॥

श्रीरामांची तेजस्विता :

दिव्य तेजांचिया कोटी । अनंतसूर्य कोट्यनुकोटी ।
पडतां श्रीरामाची दृष्टी । प्रकाश उठी विमान ॥ ३ ॥
दिव्यतेजें देदीप्यमान । लखलखीत अवघें गगन ।
देखतांचि रघुनदन । सुखसंपन्न पै झाला ॥ ४ ॥
आच्छादोनि निजप्रकाशासी । विमानद्वारा तो प्रकाशी ।
स्वयें देखोनि तयासी । अति संतोषी होतसे ॥ ५ ॥
बोलतां जयाचा प्रकाशमहिमा । वेद पावला उपरमा ।
कोण वर्णी तयाची सीमा । निरूपमता रामाची ॥ ६ ॥
देखता जयाचे प्रकाशासी । अनंत सूर्याचिया राशी ।
बुडोनियां जाती निजतेजेंसीं । कोणे देशीं नाढळती ॥ ७ ॥
जयातें देखतांचि दृष्टीं । सचंद्र नक्षत्रांचिया कोटी ।
करपोनि जाती उठाउठीं । तें वैखरीसाठीं केंवी वर्णवे ॥ ८ ॥
जेथें परेसीं सौरस नसे । पश्यंती मध्यमा कोण पुसे ।
बापुडी वैखरी ते कायसे । स्वरूपांश वर्णावया ॥ ९ ॥
एवढा प्रकाशाचा उमाळा । स्वयें आच्छादोनि स्वलीळा ।
विमान देखतां सावळा । संतोषला अति प्रीतीं ॥ १० ॥

श्रीराम कसे शोभले ? :

देखोनियां विमानस्थिती । सौमित्र आणि रघुपती ।
अत्यंत संतोषले चित्तीं । जेंवी सुरपति वृत्रजयें ॥ ११ ॥
वधोनियां वृत्रासुर । मरुद्‌गणेंसीं अमरेंद्र ।
विजयश्री मनोहर । अति सुंदर शोभत ॥ १२ ॥
तेंवी वधोनियां दशशिर । सहितवानरनिशाचर ।
अति सुंदर मनोहर । स्वयें रघुवीर शो भत ॥ १३ ॥
वानरीं निशाचरीं वहिला । श्रीराम सौमित्र परिवारला ।
पुढें बिभीषण देखिला । पाचारिला समीप ॥ १४ ॥
अति प्रीती करोनि जाणा । सुग्रीव आणि बिभीषणा ।
सांगता झाला रामराणा । वानरसेना पुढें लावीं ॥ १५ ॥

अनजुजाजामि व: सर्वान्यथेष्टं गम्यतामिति ।
तेनैव सेतुना तीर्त्वा वाजग मकरालयमू ॥ २ ॥
सुग्रीवश्व मया सार्धं विमानेनागमिष्यति ।
समेतो युवराजेन तथा मुख्यैश्च वानरैः ॥ ३ ॥
इत्युक्तास्ते महाकाया वानराः कारूपिणः ।
प्रदक्षिणमवर्तंत प्रहष्टाः सहलक्ष्मणम् ॥ ४ ॥
सुग्रीवमंगदं चैव राजानं च बिभीषणम् ।
प्रणम्य च शिरोभिश्त्ते जिर्गता हरियूथपाः ॥ ५ ॥
यथोत्साहं यथाप्रील्या यथागतिमरिंदम ।
करतालान्विमुंचंतः सिंहनादांश्व पुष्कालान् ॥ ६ ॥

सर्वांनाच विमानातून जाता येणार नाही म्हणून
काय उपाय योजावा असा रामांचा वानरांनाच प्रश्न :

लक्षोनियां वानरसैन्य । बोलता झाला रघुनंदन ।
दुर्जय करोनियां रण । वैरी रावण निवटिला ॥ १६ ॥
युद्धीं बहुसाल कष्टलेती । केली राक्षसांची शांती ।
आतां पावावया विश्रांती । निजनगराप्रती चलावें ॥ १७ ॥
सकळ वानराचिया श्रेणी । बैसतां न येती विमानीं ।
बिभीषण करितो विनवणी । बेसा विमानीं म्हणवोनी ॥ १८ ॥
ऐसियासी काय युक्ती । ते सांगावी मजप्रती ।
बिभीषणाची चित्तवृत्ती । संतोषस्थिती जेणें पावे ॥ १९ ॥
ऐसें करोनि विवंचन । मज सांगावें आपण ।
ऐकतां श्रीरामाचें वचन । वानरगण तटस्थ ॥ २० ॥

तुझ्या कृपेने सर्व काही साधेल असे
वानरांचे उत्तर ऐकून रामांना संतोष :

ऐकें स्वामी रधूत्तमा । तूं विश्वाचा विश्वात्मा ।
मान देतोसी प्लवंगमां । स्वभक्तमहिमा वाढवूनी ॥ २१ ॥
मर्कटां विमानें कायसी । स्मरतां तुझिया नामासी ।
वानरां गति आकाशीं । वेदशास्त्री आकळिती ॥ २२ ॥
सैरा उडती गोळागुळें । ते विमानीं कोंडले ।
ऐसें न म्हणावें राय! । रामबळें अनिवार ॥ २३ ॥
ऐकोनितां वानरवचन । संतोषला रघुनंदन ।
एकलें बैसतां नये जाण । करी विवंचन आरूढावया ॥ २४ ॥

विमानातून आपल्यासह फक्त दहा सेनापतीं यावे अशी रामांची सूचना :

सुग्रीवराजा वानरनाथ । युवराजा अंगदासहित ।
सेनापती सवें अमात्य । संख्या नियत पैं दहा ॥ २५ ॥

दहा सेनापतींची नांवे, त्यांच्या शौर्याचे वर्णन :

मुख्य नीळ सेनापती । प्रधान जांबवंत महामती ।
दुसरा प्रधान प्रखरयुक्ती । वीर निश्चितीं पै नळ ॥ २६ ॥
सुषेण वैद्यराज सुबुद्धी । जेणें वांचविली वानरमांदी ।
प्रथानांमाजि तीक्ष्णबुद्धी । दारुण युद्धीं महावीर ॥ २७ ॥
उग्रकर्मा दधिमुख । संग्रामी चपळ अति दक्ष ।
तैसाचि गधमादन देख । अति आवश्यक रामाचा ॥ २८ ॥
ज्याच्या देखोनि सुगंधासी । कुंभकर्णे निजांगासी ।
मर्दिला अति प्रीतीसीं । केलें अस्थींसीं पैं चूर्ण ॥ २९ ॥
अस्थिमांस त्वचेसहित । अशुद्ध तेंही सुवासित ।
पीठ करोनियां तेथ । अंगी मर्दित कुंभकर्ण ॥ ३० ॥
तेथें कृपाळू श्रीरघुनाथ । लाघव करोनि अद्‌भुत ।
निःशेष झालें जें अव्यक्त पे । तें आणिलें निश्चित व्यक्तीसीं ॥ ३१ ॥
पृथ्वीने उभारिले पार्थिव । आपें अशुद्धादि रस सर्व ।
तेजें रेतादिक भाव । दृष्टिगौरव नेंत्रांसी ॥ ३२ ॥
वायूनें चेतविला प्राण । नभें अवकाश दिल्हा पूर्ण ।
हदयाकाश सुप्रसन्न । रघुनंदननिजकृपा ॥ ३३ ॥
इंद्रियाधिष्ठाते देव । राक्षसधाकें स्वयमेव ।
पळाले होते पै सर्व । तिहीं निजावयव अंगीकारिले ॥ ३४ ॥
ब्रह्मा विष्णु आणि शंकर । बुद्धि चित्त अहंकार ।
तेथें प्रवेशले सत्वर । श्रीरधुवीरनिजकृपा ॥ ३५ ॥
मृत्यू तेथें धांवोनी । आला गतायुष्य घेवोनी ।
नवल श्रीरामाची करणी । विस्मित मनी सुरसिद्ध ॥ ३६ ॥
श्रीरामप्रभावेंकरून । स्वयें रचला गंधमादन ।
तोही स्वयें निघे आपण । आरूढोन विमाना ॥ ३७ ॥
नरवीर अति बळियाढा । संग्रामीं शूर निधडा ।
परसैन्य देखोनि पुढां । करी धडमुंडांकित धरणी ॥ ३८ ॥
तैसाचि तरळही जाण । निधडी जयाची आंगवण ।
गवय गवाक्ष दोघे जण । वीर दारुण अति योद्धे ॥ ३९ ॥
दशेंद्रियांचे अधिपती । जेंवी दहाही देव निश्चितीं ।
तैसे दहाही सेनापती । विमानस्थितीं चालावे ॥ ४० ॥

बाकीच्या सर्व वानरांनी पायी निघावे ही आज्ञा
वानरांना मान्य, त्यांच्याकडून रामाचा जयजयकार :

वरकड वानरवीर पाहीं । सेतुबंधे लवलाहीं ।
पायवाटे चालावे तिहीं । ऐकतां सर्वही सुखमय ॥ ४१ ॥
माथा धरोनि आज्ञापन । लोटांगणीं रघुनंदन ।
नमूनियां सकळ जन । केलें गर्जन रामनामें ॥ ४२ ॥
अति प्रीतीचेनि पडिभरें । हरिखें नाचती वानरें ।
सिंहंनाद दीर्घस्वरें । एक भुभुःकारें गर्जती ॥ ४३ ॥
परस्परें वाजविती टाळी । क्षेमालिंगन प्रीतिकल्लोळी ।
रावण वधोनि महाबळी । मेळविला धुळी श्रीरामें ॥ ४४ ॥
सोडवोनि जनकात्मजा । अयोध्येसी रघुराजा ।
निघाला गजरें वोजा । वानरफौजा चालती ॥ ४५ ॥
सोडविली देवांची बांधवडी । तोडिली नवग्रहांची बेडी ।
सीता सोडविली तांतडीं । वानरकोडी नाचती ॥ ४६ ॥
होवोनियां आनंदभरित । येवोनि नमिला रघुनाथ ।
स्वामी बैसल्या विमानांत । होती गगनस्थ वानरें ॥ ४७ ॥

आरुरोह ततो रामो विमाजमभिपूजयन् ।
अंकेजावाय वैदेही श्रियं जागयणो यथा ॥ ७ ॥
तथारुरोह तं राजा सुग्रीव: सह मंत्रिभि: ।
लक्ष्मणश्व महाबाहुर्युवगजो5गदस्तथा ॥ ८ ॥

कैकसी, त्रिजटादि वडील मंडळींना वंदन व
विमानपूजा करून रामांचे विमानात आरोहण :

आदिकरोनि कैकसी । त्रिजटेसहित लंकानिवासी ।
आला पुसोनि सकळांसी । विमानापासीं राम आले ॥ ४८ ॥
विधियुक्त पूजोनि विमान । करोनि प्रदक्षिणा नमन ।
आरोहण करिता रघुनंदन । तेजें त्रिभुवन उजळले ॥ ४९ ॥
विमानीं बैसतां रघुवीर । त्रैलोक्य आनंदनिर्भर ।
स्वर्गी आनंदले सुरवर । सुमनसंभार वर्षले ॥ ५० ॥

स्वर्गस्थ देवांनी व भूमंडलावरील वानरांनी मंगलगान सुरू केले :

यक्षगणादि किन्नर । नभीं सिद्धांचा जयजयकार ।
कवी करिती मंत्रस्वर । नादें अंबर दुमदुमित ॥ ५१ ॥
सुमंगल वेदध्वनी । मंगल आदरिलें वानरगणीं ।
मंगल आरंभिलें ब्राह्मणीं । नामेंकरोनी गर्जत ॥ ५२ ॥
श्रीरामाचे मांडीवरी । शोभे जानकी सुंदरी ।
जेंवी गिरिजात्रिपुरारी । तैशापरी शोभत ॥ ५३ ॥
अनुपम शोभाशोभित । सत्यलोकीं लोकनाथ ।
सावित्रीसहित शोभत । तेंवी रघुनाथजानकी ॥ ५४ ॥
जेंवी लक्ष्मी नारायणीं । शोभे वैकुंठभुवनीं ।
तेंवी सीता जनकनंदिनी । रघुनंदनीं शोभत ॥ ५५ ॥
श्रीराम सीता बाह्म जगीं । सीता रामाच्या अंगसंगीं ।
सष्टी शोभत इहीं दोघीं । न दिसे जगीं तीसरें ॥ ५६ ॥
धनुर्थारीदीक्षागुरु । विमानीं बैसलासे सौमित्र ।
आनंदला वानरभार । जयजयकार पै केला ॥ ५७ ॥
आज्ञा देवोनि इतरांसी । सेनापती आणि प्रधानांसी ।
सुग्रीवासहितं अंगदेंसीं । श्रीराम आज्ञेंसीं बैसलें ॥ ५८ ॥

उवाच चैन काकुत्स्थ: प्रियं मे राक्षसेश्वर ।
स त्वमेव गुणी विद्वान्कार्यं निश्वित्य तत्ववित् ॥ ९ ॥
क्षिप्रमारोहतु भवान्सामात्य: सपुरोहितः ।
पुरे प्रतिनिधिं कृत्वा कर्तव्यमिति मे मतिः ॥ १० ॥
ततो बिभीषणो राजा विधाय नगरे विधिम् ।
आज्ञाप्य मातरं धीमालांदिश्य च समुद्विजन् ॥ ११ ॥

श्रीरामकृत बिभीषणाचा गुणगौरव:

अत्यंत जिवलग आप्त । विरक्त अनुरक्त भावार्थ ।
गुणी असोनि गुणातीत । श्रीरधुनाथनिजभजनें ॥ ५९ ॥
जीवनीं जन्मे मुक्ताफळ । तें उपजतांचि आटे जळ ।
तथापि परीक्षक कुशळ । म्हणती अतिढाळ पाणी आहे ॥ ६० ॥
तैसें श्रीरामभजन करितां । गुणविकारी वर्ततां ।
बिभीषण भोगी गुणातीतता । श्रीरघुनाथाचे निजभजनें ॥ ६१ ॥
अति सात्विक बुद्धि करून । निष्कर्मे सेवितां रघुनंदन ।
यालागीं सत्वगुणीं संपन्न । स्वयें रघुनंदन पाचारी ॥ ६२ ॥
विरोधें हाणितां लाता । सर्वथा विषाद नाहीं चित्ता ।
अमर्याद शांति तत्वतां । विद्वान् या अर्था म्हणे राम ॥ ६३ ॥

माता, सरमा व त्रिजटा यांना सैन्यासह लंकेत
पाठवून विमानात बसण्याची बिभीषणाला रामाची आज्ञा :

तत्वज्ञाने संपन्ना । ऐक सत्वमूर्ति बिभीषणा ।
नगरस्थांची संभावना । करोनि विमाना बैसावें ॥ ६४ ॥
प्रतिनिधि करोनि नगरासीं । सवें देवोनि मातेसी ।
पाठवावे निजधामासी । निजगजरेंसीं अति प्रीतीं ॥ ६५ ॥
त्रिजटा आणि सरमेसीं । निरवावे कैकसीसी ।
सुखी करावें तियेसी । सख्यत्वेंसीं त्रिजटेच्या ॥ ६६ ॥
त्या दोघींसीं अति प्रीतीं । कृपा करावी निश्चितीं ।
बहुडवावे सेनापती । सैन्यसंपत्तीसमवेत ॥ ६७ ॥

त्याप्रमाणे करून बिभीषण विमानात बसला :

ऐकोनि रामाचें वचन । मातेसीं करोनि नमन ।
प्रतिनिधि करोनि आपण । निजनगरा जाण बोळविलें ॥ ६८ ॥
सवें देवोनि त्रिजटेसी । बोळविली कैकसी ।
आशा पुसोनि सकळांसी । श्रीरामापासी स्वयें आला ॥ ६९ ॥
रामआज्ञें करून । चौघे प्रधान घेऊन ।
राजा बिभीषण आपण । स्वयें विमान आरूढला ॥ ७० ॥

हनुमंताची स्तुती करून त्याला विमानात बसण्याची अनुज्ञा :

श्रीराम म्हणे हनुमंता । संपादिली सकळ व्यवस्था ।
विमानारोहण करीं आतां । सकळ वृथा तुजविण ॥ ७१ ॥
जैसें प्राणेवीण शरीर । तेंवी तुजवीण आम्ही समग्र ।
तुवां बैसोनि सत्वर । गमनसेचार संपादीं ॥ ७२ ॥
आम्हां सकळांचा चाळक । सत्य साचार तूं एक ।
तुझेनि मंडित सकळिक । वेगीं पुष्पक अंगीकारी ॥ ७३ ॥
ऐकतां श्रीरामाज्ञापन । हनुमान घाली लोटांगण ।
वंदूनि श्रीरामचरण । केलें आरोहण विमानीं ॥ ७४ ॥

नंतर विश्वकर्म्याला आलिंगन व वरदान :

विश्वकर्मा येवानि पुढें । श्रीराम नमिला वाडेंकोडें ।
अति प्रेमाचेनि सुरवाडे । पडिलें झांपडे नेत्रासीं ॥ ७५ ॥
अर्धोन्मीलित झाली दृष्टी । बाष्प दाटलें पै कंठीं ।
श्वास दाटला असे पोटीं । नये वाक्पुटीं पै शब्द ॥ ७६ ॥
अति प्रेमें देखोनि त्यासी । कृपा उपजली राघवासीं ।
स्वयें उचलोनि वेगेंसीं । निजहदयासीं आलिंगिलें ॥ ७७ ॥
कृपेनें आलिंगितां रघुपती । त्रिविध तापा झाली शांती ।
पावला परम विश्रांती । झाली निर्मुक्ति भवश्रमा ॥ ७८ ॥
प्रेम देखोनि अद्‌भुत । आणि विमानाचें कुशळित ।
तेणें भजनें रघुनाथ । स्वयें वदत वरदासी ॥ ७९ ॥
निजकर्म आचरतां व्युत्पती । तुझी मलिन नव्हे वृत्ती ।
अकर्तात्मक बोधस्थिती । सुखसंस्फूर्ति स्वानंदें ॥ ८० ॥
सकळ सुष्टीचें संपादन । करितां न बाधी अभिमान ।
सहजस्थिती समाधान । सच्चिदानंदघनस्वरूप ॥ ८१ ॥
कुलाल भाडे निपजवित । परी गगन न करी घटाकृत ।
तें जेंवी करणीरहित । तेंवी अलिप्त निजकर्मे ॥ ८२ ॥
ऐसेंदेतां आशीर्वचन । विश्वकर्मा सुखसंपन्न ।
छेदोनि त्रिपुटीचें भान । कर्मबंधन छेदिलें ॥ ८३ ॥
कर्मामाजी निष्कर्मता । सर्व कर्मीं श्रीरघुनाथा ।
स्वयें झाला देखता । स्वयें वर्ततां निजकर्मीं ॥ ८४ ॥
आज्ञा पुसोनि सकळासी । विमान न्यावया मोक्षपुरीसी ।
अति त्वरा राघवासी । करी सकळासी पैं वेग ॥ ८५ ॥

धर्मार्थ कुशलैवीरैरारूढं तद्यथाविथि ।
तेष्यारूढेषु सर्वेषु श्नुखासीनेषु भाअश: १२ ॥
राघवेणाभ्यनुज्ञातं विमाजं दिवमुत्पतत् ।
खेचरेण विमानेन प्रदीप्तेन विराजता ॥ १३ ॥

नामगजरात त्वरेने विमान अयोध्येला निघाले :

सप्तपुरींमाझारीं । पहिली मोक्षाची अयोध्यापुरी ।
विमान न्यावया तेथवरी । कळवळा भारी श्रीराम ॥ ८६ ॥
सुंदर कामग विमान । संकल्पमात्रें करी गमन ।
पावावया मोक्षभुवन । अधिकारिया पूर्ण आज्ञापी ॥ ८७ ॥
श्रीरामाज्ञेकरून । स्वधर्मनिष्ठा हरिगण ।
स्वाधिकारेंकरोन । स्वस्थानीं पूर्ण बैसले ॥ ८८ ॥
श्रीरामाज्ञें स्वस्थ । स्वाधिकारें नेमस्त ।
निजासनीं बैसलें समस्त । श्रीरघुनाथ सुखमय ॥ ८९ ॥
श्रीराम बैसतां विमानीं । आनंद कोंदला त्रिभुवनीं ।
लागल्या वाजंत्रांच्या ध्वनी । विचित्र स्तवनी त्यांमाजी ॥ ९० ॥
विचित्र नादांचा उपक्रम । ऐकतो मन पावे उपरम ।
सामगायन मनोरम । बहुत्साम रथंतर ॥ ९१ ॥
वानरांचा भुभःकार । रामनामाचा गजर ।
सुरवरांचा जयजयकार । नभीं खेचर गर्जती ॥ ९२ ॥
रामनामाचा गंभीर ध्वनी । गेला सत्यलोक भेदूनी ।
दिशांच्या पोकळी भरोनी । श्रीरामध्वनी कोंदला ॥ ९३ ॥
नाम भरतांचि गगनीं । वोसर चालिला तेथोनी ।
वर्षो लागला अमृतकणीं । तेणें अवनी तिंबली ॥ ९४ ॥

रामनामसिचनामुळे धरणी मृदू झाली :

अमृतसिंचन धरेसीं । तेणें विसरली कठिनत्वासी ।
स्वयें मृदु झाली कैसी । नवनीतासी लाजवी ॥ ९५ ॥
श्रीरामें सुखावली धरा । दुभों लागली ऋषीश्वरां ।
फळमूळधान्यद्वारा । सुखी द्विजवरां करीतसे ॥ ९६ ॥
नामें भेदलें पाताळ । जाळित पन्नगांची गरळ ।
निर्विष झाले व्याळ । नामबळ अनिवार ॥ ९७ ॥
श्रीरामनामाचा गजर । करीत त्रैलोक्याचा उद्धार ।
स्वयें चालिला रघुवीर । निजनगरप्रवेशा ॥ ९८ ॥
विमान उसळता गगनीं । तळीं दिसे सकळ अवनी ।
तेणें संतोष रघुनंदनीं । सीतेलागूनी वृत्त सांगे ॥ ९९ ॥

अब्रवीन्मैथिलीं सीता शमश्वंद्रजिभाननाम् ।
कैलासशिखशकारे त्रिकूटशिखरे स्थिताम् ॥ १४ ॥
अवेहि लंका वैदेहि निर्मितां विश्वकर्मणा ।
एतदायोधनं पश्य मांसशोणीतकर्दमम् ॥ १५ ॥

आकाशातून विमान जाऊ लागल्यावर खाली
दिसणार्‍या घटनांची माहिती श्रीराम सीतेला सांगू लागले :

चंद्रवदना गोरटी । अंकीं बैसवी जगजेठी ।
हातीं धरोनि हनुवटी । श्रीराम गोष्टी सांगत ॥ १०० ॥
सावध ऐकें सीतासुंदरी । तुजकारणें वानरीं ।
ख्याति केली त्रिकूटशिखरी । महामारी राक्षसां ॥ १०१ ॥
अमरावतीसमान । रावणाचें लंकाभुवन ।
विश्वकर्म्याने आपण । रचिलें अनेक कुसरीं ॥ १०२ ॥
क्षणमात्रें तिचें दहन । हनुमंतें केलेंसे आपण ।
तेचि सुवर्णमय ओतिली जाण । प्रताप पूर्ण हनुम्याचा ॥ १०३ ॥
तये लंकेचे चौबारां । मारिल्या थोर थोर धुरा ।
नद्या रुधिराच्या अपारा । कर्दम थोर मांसाचा ॥ १०४ ॥
वीरां वानरां झोंटधरणी । रणनदी वाहविली रणीं ।
वानर दुधड घायेंकरोनी । पुच्छें कवळोनि मिसकळती ॥ १०५ ॥
मारिले रावण कुंभकर्ण । इंद्रजित अखयापुत्र दारुण ।
मारिले सेनानी प्रधान । सकळ सैन्य निर्दळिले ॥ १०६ ॥
तुझेनि कैवारें सुंदरी । रांडा झाल्या कोटिवरी ।
शंखस्फुरण घरोघरीं । शस्त्राधारीं झोडिले ॥ १०७ ॥
राज्य देवोनि बिभीषणासी । तुज सोडविले परियेसी ।
इतकें सांगतो राघवासी । विमान वेगेंसीं चालिलें ॥ १०८ ॥

एषो हि दृश्यते देवि समुद्र: सरितां पतिः ।
पूर्वजो ज्ञातिरस्माकं येन सख्य कृतं मया ॥ १६ ॥

सागराने सख्य करून सेतुबंधन कसे झाले ते सांगतात :

पुढें देखोनि सागर । सांगता झाला रघुवीर ।
हा आमचा परम मित्र । कृतोपकार आम्हां याचा ॥ १०९ ॥
आमुच्या पूर्वजीं स्थापिला । तो उपकार स्मरोनि वहिला ।
सेतुबंधाचा विचार भला । सागरे वहिला सांगितला ॥ ११० ॥
सुग्रीवाचा सेनापती । त्यानळाचेनि पाषाण तरती ।
सेतु बांधोनि त्याचे हातीं । लंकेप्रती सुखें जावें ॥ १११ ॥
ऐकोनि सुमित्रानंदन । स्वयें झाला हास्यवदन ।
श्रीराम आपुलें महिमान । गौण करोन सांगत ॥ ११२ ॥
ऐकें जानकियें माते । उतरावया वानरांतें ।
मार्ग मागता सागरातें । श्रीरामातें भेटेना ॥ ११३ ॥
तेणें क्षोभला रघुनंदन । शोधावया सागरजीवन ।
सीतीं सज्जिला अग्निबाण । अपांपति तेणें भयभीत ॥ ११४ ॥
स्त्रीपुत्रांसमवेत । श्रीरामा झाला शरणागत ।
पूजोपचार अद्‌भुत । घेवोनि त्वरित पुढें आला ॥ ११५ ॥
विचित्राकृति वचन । स्वयें करोनि आपण ।
सुप्रसन्न रघुनंदन । सागरे जाण पै केला ॥ ११६ ॥

शरणागत सागरावर सोडावयाचा बाण मरुदैत्यावर
मारवाडात सोडल्यामुळे तो प्रदेश ओसाड झाल्याचे सांगतात :

अति संकट पडिलें तेथ । मारू नये शरणागत ।
सत्यप्रतिज्ञ रघुनाथ । बाण निश्चित परतेना ॥ ११७ ॥
ऐसें संकट पडिलें भारी । बाण घालूं कोणावरी ।
तंव आठवलें झडकरी । मरुदैत्यावरी सोडावा ॥ ११८ ॥
मरुदैत्य मारवाडांत । प्रजा पीडित समस्त ।
बाण सोडोनियां त्वरित । केला घात पै त्याचा ॥ ११९ ॥
वधूनियां तयासी । बाण भेदला भूमीसीं ।
अग्निबाणाची आगी कैसी । जळ ते देशीं तुटलें ॥ १२० ॥
तेथेंही केलें विंदान । अग्निच वोळला संपूर्ण ।
गाई दुभती गहन । तृष्णा जाण निमाली ॥ १२१ ॥
उदक मागों येती अतीत । त्यांसी क्षीरपान करवित ।
कृपा वोळला रघुनाथ । केला अद्‌मुत पवाडा ॥ १२२ ॥

सागर ओलांडून रामांचे विमान
बिभीषण भेटीच्या ठिकाणी आले :

ऐसें सांगतां जानकीसी । तंव लंघिलें सागरासी ।
जेथें भेटी-बिभीषणास । त्या ठायासीं पैं आलें ॥ १२३ ॥
सीतेतुजलागी जाण। बहु कष्टला बिभीषण ।
नानापरी रावण । शिकवितां जाण नायके ॥ १२४ ॥
निग्रहोनि सांगतां त्यासी । लत्ताघातें बिभीषणासी ।
हाणितां अति आवेशीं । आला श्रीरामासी पै शरण ॥ १२५ ॥
तेणेंचि काळें रघुनाथें । अभिषेकिलें बिभीषणातें ।
निवटोनि रावणातें । मग तूतें सोडविलें ॥ १२६ ॥
तुजलागीं सेतुबंधन । केलें तें अक्षयी पूर्ण ।
मिनलिया सुरसिद्धगण । अन्यथा कोण करूं शके ॥ १२७ ॥

देवदैत्यमनुष्येषु नैतद्न्यः करिष्यति ।
पश्य सागरमक्षोभ्यं वैदेहि वरुणालयम् ॥ १७ ॥

सर्वथैव अशक्य असूनही मारुतीने अर्धा सेतू बांधून पूर्ण केल्याचे सांगतात :

अति अक्षोभ्य सागरीं । नाना श्वापदांचिया थोरी ।
जो न कल्पवे मनेंकरीं । तो क्षणाभीतरी बांधिला ॥ १२८ ॥
देवदैत्यादि दानव । पन्नग आणि मानव ।
मिळाल्या त्रैलोक्य सर्व । न करवे स्वयमेव अन्यथा ॥ १२९ ॥
एकल्या हनुमंतें पूर्ण । सप्त पर्वत आणोनि जाण ।
एक उणें पन्नास योजन । सेतुबंधन संपविलें ॥ १३० ॥
इतर वानरीं समस्तीं । अर्थ बांधिला अपांपती ।
अर्थ उरला तो मारुतीं। सेतुसमाप्ती पैं केली ॥ १३१ ॥
ते हे सेतुबंधनख्याती । अगाध श्रीरामाची कीर्ती ।
युगायुगीं वाखाणिती । जड उद्धरिती श्रीरामचरित्रें ॥ १३२ ॥

रामेश्वर क्षेत्राचे महिमान :

ऐसें सांगतां चरित्र । पुढें देखिला रामेश्वर ।
तेथील माहात्म्य अपार । वदावया वक्त मज कैंचें ॥ १३३ ॥
ब्रह्महत्याचिया कोटी । दर्शनीं जळती उठाउठीं ।
त्याच्या महात्म्याची गोष्टी । केंवी वाक्पुटीं बोलवे १३४ ॥
परी कृपाळू जनार्दन । जो अवतरला रघुनंदन ।
तो मनामाजी प्रवेशोन । चरित्र पूर्ण वदवीतसे ॥ १३५ ॥
राममनाचें अमन मन । राम चित्ताचें निजचिंतन ।
बुद्धिबोधाचा निश्चियो पूर्ण । स्वयें आपण श्रीराम ॥ १३६ ॥
श्रीराम अभिमानाचा अभिमान । स्वयें सोडूं सिद्ध करून ।
दांडोरा पिटी चरित्रकथन । आपुलें आपण करीतसे ॥ १३७ ॥
न लिही म्हणता हें चरित्र । श्रीराम हृदयी हदयस्थ ।
तो राहूं नेदी निवांत । अंतरीं करित महामार ॥ १३८ ॥
देहगेहाची आवडी । सांडवोनि स्त्रीपुत्रांची गोडी ।
निजचरित्र अतिआवडीं । निजनिर्वडीं चालवित ॥ १३९ ॥
जेथें जेथें ममता जात । तेथें तेथें पावोनि रघुनाथ ।
समूळ ममतेचा निःपात । तत्काळ करीत श्रीराम ॥ १४० ॥
लोभें जाय ममता द्वारीं । तंव राम स्मरोनि झडकरी ।
समूळ त्याची करोनि बोहरी । वदवी निर्धारीं रामकथा ॥ १४१ ॥

गावबाची सद्‌गुरु एकनाथांना विनंती :

शरण एकी एकनाथा । जनार्दना सर्वगता ।
माझें काही न चले आतां । कर्ता करविता तूं स्वामी ॥ १४२ ॥
एका जनार्दना शरण । दांडोरा पिटी ग्रंथकथना ।
चालवी एका जनार्दन । रामेश्वरकथन अवधारा ॥ १४३ ॥
स्वस्तिश्रीभावार्थरामायणे युद्धकांडे एकाकारटीकायां
पुष्पकारूढगमनं नाम त्रिसप्ततितमोऽध्यायः ॥ ७३ ॥
॥ ओंव्या १४३ ॥ श्लोक १७ ॥ एवं १६० ॥