Fobiya books and stories free download online pdf in Marathi

फोबिया - (कथा )

फोबिया - (कथा )

-अरुण वि.देशपांडे -पुणे.

----------------------------

माणसाच्या स्वभावातील खाचाखोचा कळणे ", म्हणजे एखादा माणूस आपल्याला समजू लागलाय असे वाटणे. पण, ही समजूत अतिशय फसवी ठरू शकते. हातातील पुस्तकच्या पानातील मजकूर वाचून संगीताला वाटले - " खरेच आहे की हे...! . पती-पत्नीच्या सहजीवनाला सुरुवात होते त्या दिवसापासून त्यांच्यात परस्परांना समजावून घेण्याची -सामावून घेण्याची भावनिक -प्रक्रिया सुरु झालेली असते .

" स्वतःला समजून घेतले पाहिजे", ही अपेक्षा नाण्याची एक बाजू आहे "असे गृहीत धरले तर दुसरी बाजू म्हणजे " इतरांना समजून घेतले पाहिजे " असे आहे का नाही ? हाच प्रश्न आत्ता संगीताने स्वतःला विचारून पाहिला.तेव्न्हा या प्रश्नाचे उत्तर तटस्थपणे देता येणे जमणार नाही. " हे जाणवून नातेबंध सांभाळणे कठीण आहे "हे तिला जाणवत होते .नात्यातील संबंधांचा गोफ गुंफणे हे सोपे नसून ते एक अवघड आणि कुशलतेने करावयाचे काम आहे " ही गोष्ट संगीता स्वतःशीच काबुल करीत होती.

संगीता आणि अजयच्या वैवाहिक -जीवनास आरंभ होऊन नुकतीच २ वर्ष झाली होती .याचा अर्थ परस्परांना समजून घेण्याची मनोवस्था अगदी प्राथमिक स्तरावर आहे " याची कल्पना दोघांना नक्कीच होती.
विवाहा नंतरच्या बदलत्या जीवनमानात प्रत्येकाचे प्राधान्य -क्रम बदलले जातात .वैयक्तिक जीवनातील आवडी-निवडी या जोडीदाराच्या आवडी-निवडीशी सुसंगत आहेत की विसंगत ? याचे उत्तर मिळवण्यासाठी आपसात संवाद असणे अपेक्षित असते . "वैवाहिक जीवनास आरंभ "- हा शब्द कुतूहल वाढवण्यापेक्षा मानसिक गोंधळ " जास्त वाढवणारा आहे " असे वाटावे असे जड-गभीर तत्वज्ञान संगीता गेल्या अनेक दिवसापासून घरातील माणसांकडून ऐकत होती.

नोकरीच्या निमिताने अजय आयटी-क्षेत्रात होता. वर्तमानातील परिस्थितीत त्याच्यासाठी "नोकरी ही सर्वात महत्वाची , नंतर पारिवारिक जीवन , सार्वजनिक बांधिलकी वगेरे बद्दल विचार करण्यास वेळ नव्हता . संगीताच्या अपेक्षांना तडे जाण्यास इथूनच सुरुवात झाली ." शब्दांनी बोलून दुखावले नाही - म्हणजे आपण मन सांभाळतो ", असा समज अजयने करून घेत नंतर "संवाद साधण्याचे कष्ट पण घेतले नाहीत . या जाणीवेने संगीताचे मन उदासवाण्या भावनेने झाकोळून येऊ लागले .

"आपण एकटे पडत आहोत "- संवादा अभावी आपली घुसमट होते आहे " ही भावना दिवसागणिक बळावते आहे अशी भीती संगीताला वाटत होती. पण , हे कुणाशी कधी आणि कसे शेअर करायचे ? कारण -,
लौकिक -अर्थाने तिच्या -अजयच्या घरात सुखाची सगळी साधने उपलब्ध असतांना ..संगीता दु:खी आहे ", हे मान्य करण्यास कुणीच तयार असणार नाही , हे तिला जाणवत होते.
या न त्या कारणामुळे तिला ऐकवले जात असे की -
"सुख उपभोगता आले पाहिजे ", भरल्या घरात गळा काढीत बसणाऱ्याला "फुटक्या नशिबाचा आहेस " असे म्हणतात .तक्रारीचा सूर लावणे -असा स्वभाव संगीताचा नव्हता ,अजयच्या घरातल्या माणसांच्या स्वभावातील कोरडेपणा पाहून तिला नवल वाटायचे .त्यांना दिवसभर असे वावरतांना पाहून तिला वाटायचे - नात्यातील जिव्हाळा , ओलावा इथे अजिबातच जाणवत नाहीये
.

सहवास म्हणजे सोबतचे रहाणे असते ,सानिध्यात असले तरच नाते फुलून येते.पण तसे होत नव्हते. अजयच्या घरात सगळ्या गोष्टी अगदी आखीव आणि रेखीव पद्धतीने होत असत.,अगदी सराईत यंत्राप्रमाणे .त्यामुळेच संगीताला वाटायचे की - ही माणसे मनापासून काहीच करत नाही , केवळ गरज आहे म्हणून एकेक गोष्ट उरकून टाकले की बस ..!
सकाळ झाली ना -उठा आता , - नाश्ता करावा लागतो करून घ्या , ऑफिसची वेळ झाली , अजयच्या दिमतीला हजर रहा . तो आफिसात गेला की - दुपारचे जेवण , नंतरचा आराम , संध्याकाळ , नंतर रात्रीचे जेवण .आणि वेळेवर झोपणे ..अगदी एका मागून एक नुसते उरकणे ...! आपल्या दोघातला "एकांत " देखील एक उरकणे ", होऊन गेला तर ? भीतीने संगीताचे मन अधिकच निराश होऊन बसायची .

आफिस आणि घर - दोन वेग-वेगळी ठिकाणं असतात आणि ती तशीच असावीत , हे इच्छा आणि अपेक्षा आता कालबाह्य ठरण्याचे दिवस सुरु होऊन या गोष्टीची सवय घरातील सर्वांनाच झाली होती . आपल्या आणि अजयच्या संसारात आता त्याच्या ऑफिसचे -ऑफिसच्या कामाचे , तास-न-तास चालणारे फोन कॉल "अशा स्वरूपात घरातही होणारे अतिक्रमण थोपवणे आपल्या हातातली गोष्ट नाहीये ", ही गोष्ट कबूल करण्याची वेळ संगीतावर आली होती.. आफिसात- आफिस इतक्या पुरते न रहाता घरात आलेला अजय फोनवर सतत आफिसच्या कामात गुंतलेला दिसू लागला .आणि हळू हळू संगीताला दुरून हे पाहण्याची सवय लागली ती लागलीच .

हे कसे झाले आपल्या बाबतीत ? सुरुवात जर अशी असेल तर ?, पुढचे आयुष्य असेच असणार ? , बाप रे ...!
आपण या चक्रात स्वतहाला गुरफटून घ्यावे का ?.की यातून नोकरी करण्याच्या निमित्ताने बाहेर पडावे ? नोकरीच्या आकर्षक पिंजऱ्यात एकदा कोंडून घेतले की पुन्हा त्यातून सुटका नाही .नोकरी केलीच तर त्यातून येणाऱ्या पगाराचा पैसा -नवनवीन सुखांना निमंत्रण देण्यास सक्षम असणार होताच ..त्यात विशेष म्हणजे "मी नोकरी करू का ?, संगीताच्या विचारण्याला विरोध न होता सर्वांनी पाठींबा दिला असता कारण घरातल्या वातावरणात सदा न कदा पडेल चेहेऱ्याने वावरणारी संगीता "नोकरीच्या वातावरणात तरी हिरमुसत्या चेहेऱ्याने वावरणार नाही ", घरातील माणसांचा हा अंदाज चूक ठरेल असा नव्हता .

माणसाच्या मनावर "वास्तवाचे दडपण असते तितकेच दडपण काल्पनिक आणि अनामिक भीतीचे सुद्धा असते. .हे ओझे मनावरती बाळगत जगायचे -सहन करीत जगायचे - हा मानिसक ओझ्याचा "फोबिया ".यातून सुटका कशी करून घ्यावी ?

स्वतहाच -स्वतःला मदत करून या घुसमट संपवावी निदान यामुळे निराशेचे दुष्टचक्र तरी भेदले जाईल. शेवटी आनंद काय नी दु:ख काय , मनाच्या मानण्यावर असते. दु:खाला आनंदाचे आवरण लावण्याचे कसब साधले तर गोष्टी सोप्या होतील.
सकारात्मक जगणे, आयुष्य सुखकारक वाटावे असे प्रयत्न करणे म्हणजेच स्वतःला उभारी देण्या सारखेच आहे."हा विचार मनात आला त्यासरशी खूप दिवसांनी आज आपल्याला खूप हलके- हलके आणि छान वाटते आहे ",ही भावना संगीताला उल्हासित करीत होती." एकाएकी आकाश भरून यावे आणि धुव्वाधार पाउस कोसळावा ,तो थांबला की आजू-बाजूस पहावे -सगळा निचरा होऊन गेलेला असतो , परिसर स्वच्छ आणि निर्मल दिसायला लागतो. आपल्या मनात असेच लक्ख आणि निर्मल झाले आहे.
संगीताने ठरवले - घरातील वातावरण तर बदलणार नाहीये , माणसे तशीच रहाणारआहेत . "

आपल्या घरातील या माणसांना ,त्यात ही आपल्या नवऱ्याला अजयला सुद्धा -आहे त्यात त्यांना भरभरून सुख आणि आनंद मिळतोय " तर , मी मलाच बदलून घेणे आणि आनंद मिळवणेयात काही वावगे ठरावे असे काहीच नाही . निदान आपल्या घरातील माणसांच्या वागण्याशी हे सुसंगत असेच आहे ".या विचाराने खूप फरक वाटतो आहे असे तिला वाटू लागले इतके दिवस तिच्या मनावर जो ", निराशेचा-आणि एकाकीपणाचा जो
फोबिया " दाटून आलेला होता , तो आता मात्र पार विरून गेला होता . संगीताच्या मनाचे आकाश -"निरभ्र आणि नितळ झाले होते.

प्रसन्न मनाने संगीता विचार करू लागली - खरच, आपण जसे माझ्यातील मी "बद्दल विचार करू शकले , दुसर्यांच्या नजरेतून मी कशी दिसते ?या प्रश्नाचे उत्तर , मला आज मिळाले ..की - जो तो ",फक्त स्वतःच्या उबदार आणि सुरक्षित जगण्याची धडपड करीत असतो, हे करीत असतांना ,अशी माणसे "भावनिक -लढाईत अजिबातच गुंतून पडत नाही ", याची प्रखर जाणीव झाली ती ..आपल्याच माणसांच्या तटस्थ वागण्यामुळे , आम्ही जसे आहोत -सुखी आहोत ", तुला कसे राहायचे ? तुझे तू ठरव ..असचे जणू सांगितला सर्वांनी सुचवले , खरच ,आपल्या सारख्या भावनाशील मनाच्या व्यक्तीला - मन कोरडे ठेवून ..स्वतःला सुखी ठेवणे ..असा धडा जणू दिलाय .

एक अर्थाने बरेच झाले ..माझ्या माणसांना काय वाटेल ? या भावनेचा "फोबिया " तर दूर झाला . खूप छान वाटत होते आज सांगितला .

---------------------------------------------------------------------------------------------------------------------

फोबिया -कथा

-अरुण वि.देशपांडे -पुणे.

9850177342

---------------------------------------------------------------------------------------------------------------------
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------