Sorab ni rustam - 4 books and stories free download online pdf in Marathi

सोराब नि रुस्तुम - 4

सोराब नि रुस्तुम

पांडुरंग सदाशिव साने

४. सोराब नि रुस्तुम

इराण देशाच्या इतिहासातील ही करुणगंभीर कथा आहे. या कथेवर महाकवींनी महाकाव्ये लिहिली आहेत. करुण व वीर रसाने भरलेली ही कथा. रुस्तुम इराणच्या राजाच्या पदरी होता. रुस्तुम हा महान योद्धा होता. त्याच्यासारखआ वीर झाला नाही. तो बलभीम होता. लोक कौतुकाने म्हणायचे, ‘रुस्तुम मुठीने पर्वताचे चूर्ण करील, रविचंद्र धरून आणील.’ खरोखरच त्याची शक्ती अचाट होती. सिंहाला तो धरून ठेवी. एक थप्पड मारून त्याची गोगलगाय बनवी. माजलेल्या हत्तीला तो ची ची करीत पळवून लावी. रुस्तुम इराणचे भूषण होता.

तो धिप्पाड पहाडासारखा दिसे. त्याचे ते मांसल खांदे, रुंद छाती, पीळदार दंड, भरदार मांड्या पाहून जणू हा मूर्तिमंत सामर्थ्य आहे असे वाटे. द्वंद्वयुद्धात त्याच्यासमोर कोणी टिकत नसे. सूर्यासमोर का काजवा टिकेल? सागरापुढे का थिल्लर गर्जेल? हंसाबरोबर का कावळा उडेल?

असा हा बलभीम रुस्तुम राजाचा आवडता होता. त्याला काही कमी नव्हते; परंतु रुस्तुम सुखी नव्हता. कोणते होते त्याला दु:ख, कोणती होती चिंता? रुस्तुम मुलगा नव्हता. आपणाला मुलगा व्हावे असे त्याला फार वाटे. आपल्याला मुलगा झाला तर त्यालाही बलभीम करायचे, अजिंक्य वीर बनवायचे असे तो म्हणे.

ब-याच वर्षांनी रुस्तुमची चिंता दूर झाली. तो आनंदी दिसू लागला. त्याच्या पत्नीला काही दिवस गेले; परंतु मुलगा होणार की मुलगी? देवाला माहीत. रुस्तुमची पत्नी बाळंतपणासाठी माहेरी जाणार होती. पतीपत्नी बोलत होती.

‘तुला मुलगा झाला तरच परत ये. मुलगी झाली तर मला तोंड दाखवायला येऊ नकोस. मला मुलगा पाहिजे आहे. माझी परंपरा पुढे चालवणारा मुलगा घेऊन ये. मी त्याला अद्वितीय वीर करीन. महान योद्धा करीन. मुलगा झाला म्हणजे त्याच्या दंडात हा ताईत बांध. पित्याच्या प्रेमाची खूण. समजलीस ना? तुझी मी वाट पाहात बसतो. न आलीस तर समजेन की मुलगीच झाली. मग मीही घरीत राहणार नाही. मी रानावनात निघून जाईन.’

‘परंतु मुलगी झाली म्हणून काय झाले? मुलीचा जन्म का वाईट? मुलीच माता होतात. वीरांना जन्म देतात. मुलगी का कमी योग्यतेची?’ पत्नीने विचारले. ‘मला वाद करायचा नाही. मला पुत्र हवा आहे. माझ्या मांडीवर मुलगा दे. माझ्या मांडीवर मुलगी नको. समजलीस?’

असे म्हणून रुस्तुम उठून गेला. पत्नी माहेरी गेली. जरा उतारवयात बाळंतपण आलेले. चिंता वाढत होती. आईबाप मुलीची काळजी घेत होते. एके दिवशी पहाटे रुस्तुमची पत्नी प्रसूत झाली. तिकडे सूर्य वर आला आणि इकडे बाळ जन्माला आले. या बाळाची कीर्ती का सर्वत्र पसरेल? सूर्याचे किरण सर्वत्र आनंद देत जातात तसे या बाळाचे नाव का जगभर सर्वांना आनंद देत जाईल?

मुलगा झाला होता. मातेला अपार आनंद झाला होता. पतीची इच्छा आपण पूर्ण केली असे तिला वाटत होते. तिने त्या बालकाच्या कोवळ्या दंडाला तो ताईत बांधला व ‘उदंड आयुष्याचा हो’ असा आशीर्वाद दिला.

तिचे आईबाप मुलगा झाला म्हणून रुस्तुमला निरोप पाठवणार होते; परंतु मुलाच्या आईच्या मनात निराळेच विचार आले. ती आपल्या आईबापांस म्हणाली, ‘नका कळवू मुलगा झाला म्हणून. रुस्तुम कठोर आहे. उग्र आहे. तो मुलाला माझ्या जवळून नेईल. आपला मुलगा मोठा वीर व्हावा अशी त्याची इच्छा आहे. तो त्याला लहानपणापासून युद्धकला शिकवू लागेल. मुलाने काटक व्हावे म्हणून तो प्रयत्न करील. मला भय वाटते. रुस्तुमची महत्त्वाकांक्षा, परंतु मुलाचे प्राण जायचे एखादेवेळेस. त्याला तो रानावनात नेईल. सिंहवाघाजवळ लढायला लावील. त्याला तरवार, भाला, गदा, तोमर वगैरे शिकवू लागेल. मला भय वाटते. रुस्तुमला काहीच कळवू नका. तो समजेल मुलगी झाली म्हणून. माझा बाळ इकडे वाढू दे. एके दिवशी तो पित्याला मग भेटेल.’

मुलीचे बोलणे आईबापांना पसंत पडले. रुस्तुम वाट पाहात होता. बरेच दिवस झाले. पत्नी मुलाला घेऊन आली नाही यावरून मुलगा नाही झाला आसे त्याने ताडले. तो खिन्न झाला. तो आपली सर्व शस्त्रविद्या आपल्या मुलाला देणार होता; परंतु आता कोणाला देणार? कोणाला शिकवणार? संसारातील त्याचे लक्ष उडाले. त्याला कशात रस वाटेना. वनात जाऊन राहावे असे त्याने ठरविले.

एके दिवशी तो राजाकडे गेला व म्हणाला, ‘राजा, आजप्रयंत तुझी सेवा केली, देशाची कीर्ती जगभर नेली. अजिंक्य वीर म्हणून तुझ्या दरबारात मी राहिलो; परंतु अत:पर मला सर्व गोष्टींचा वीट आला आहे. सर्वसंगपरित्याग करून रानावनात जाऊन राहावे असे वाटत आहे. मला परवानगी दे.’

राजा म्हणाला, ‘रुस्तुम, तू जात आहेस याचे वाईट वाटते; परंतु तुझ्या इच्छेविरुद्ध तुला ठेवणे बरे नव्हे. त्याचा उपयोगही नाही. मन प्रसन्न असेल तर आपल्या सर्व शक्तींचा उपयोग होतो. जा. रुस्तुम, तू देशाचे नाव सर्वत्र नेलेस. तू स्वत:चे पवित्र जीवन धन्य केलेस. जा. परंतु देशाला विसरू नकोस. कधी कठीण काळ आला तर धावून ये.’ रुस्तुम म्हणाला, ‘राजा, देशावर संकट आलेच तर मला कळव. मी येईन. देशाचे ऋण सदैव शिरावर असते.’

राजधानी सोडून रुस्तुम निघाला. सर्वांना वाईट वाटले. रुस्तुम ऐका पहाडात जाऊन राहिला. गुहा हे त्याचे घर. तो एखाद्या सिंहासारखा वनात संचार करी राही. झ-यांचे पाणी पिई. झाडांची फळे खाई.

आणि इकडे रुस्तुमचा मुलगा वाढू लागला. त्याचे नाव सोराब असे होते. सर्वांचा तो आवडता होता. आजीआजोबा त्याचे लाड करीत. आई त्याला प्रेमाने जवळ घेई. सोराब भराभर वाढू लागला. सिंहाचा तो छावा होता. मुलांचा तो म्होरक्या होई. सर्वांचा तो पराजय करी. कुस्तीत सर्वांना तो चीत करी. तो पोहण्यात पटाईत झाला. झाडांवर चढण्यात तो तरबेज झाला. हळुहळू तो सर्व मल्लविद्या, युद्धविद्या शिकू लागला. रुस्तुमचे सामर्थ्य पुत्रात उतरले होते. तो अशी तलवार खेळे ही जणू वीज नाचावी. तो अचूक भाला मारी. गदायुद्धातही तो प्रवीण झाला आणि घोड्यावर बसण्यात तर त्याचा कोणीच होत धरू शकत नव्हता. केवढाही मस्तवाला घोडा आणा. सोराब त्याला रेशमासारखा मऊ करी. त्याची मांड अढळ होती. पन्नास-साठ मैल तो घोड्यावरून रपेट करून यायचा. सोराब अभिनव असा तेजस्वी वीर दिसू लागला.

तो अद्याप कोवळा होता. ओठांवर मिसरूड अद्याप फुटायची होती; परंतु हाडपेर मोठे होते. कसा राजबिंडा दिसे. त्याचे डोळे मोठे होते. भिवया कमानदार होत्या. नाक जरा लांबट व मोठे होते. त्याच्या केसांची झुलपे फारच शोभत. सुंदर पोषाख करून तलवार कमरेस लटकवून जेव्हा तो आईसमोर उभा राही तेव्हा त्याची दृष्ट काढावी असे त्या माउलीला वाटे.

एकदा सोराब तरुणमंडळात बसला होता. त्यांची बोलणी चालली होती. बोलता बोलता निराळ्याच गोष्टी निघाल्या.

‘सोराब, तू रे कोणाचा मुलगा? कोठे आहेत तुझे बाबा? तुझी आई व तू येथेच का राहाता? काय आहे गौडबंगाल?’ एकाने विचारले.

‘माझे बाबा मी पाहिले नाहीत परंतु त्यांची खूण माझ्या दंडावर आहे. त्यांनी दिलेला ताईत दंडावर आहे. कोठे तरी माझे बाबा आहेत. हो, असलेच पाहिजेत.’ सोराब म्हणाला.

‘मग का नाही जात बापाला भेटायला? लोक नाना शंका घेतात. जा. पित्याचा शोध कर. आईला त्यांची भेट करव. खरा पुत्र असशील तर पुत्रधर्म पाळ.’ मित्र म्हणाले.

सोराब अस्वस्थ झाला. तो एकटाच दूर हिंडत गेला. कोठे असतील माझे बाबा? खरेच, कोठे असतील? कोठे त्यांना शोधू? जाऊ का जगभर हिंडत? परंतु आईला वाईट वाटेल; परंतु आईची अब्रू निष्कलंक राहावी, कोणी शंका घेऊ नये म्हणून मला गेले पाहिजे. बाबांना घेऊन आले पाहिजे. कोठे तरी भेटतील. माझे बाबा भेटतील. खरी तळमळ असेल तर का इच्छा पूर्ण होणार नाही?

तो आज उशीरा घरी आला. आई चिंतातुर होती.

‘सोराब, आज एकटाच कोठे हिंडत गेलास? लवकर का नाही घरी आलास? तू माझी आशा, तू माझे प्राण. जरा डोळ्यांआड झालास तर प्राण कासावीस होतात. आज असा रे का तुझा चेहरा? हसरा, गोड चेहरा का रे काळवंडला? कसली चिंता, कसले दु:ख?’

‘आई, माझे बाबा कोठे आहेत?’

‘मला नाही माहीत. तू आपला माझ्याजवळ राहा.’

‘नाही आई. बाबांना भेटायला मी तहानलेलो आहे. कोठे आहेत माझे बाबा? लहानपणापासून मी पाहिले नाहीत. कधीसुद्धा पाहिले नाहीत. मला बाबांनी कधी मांडीवर घेतले नाही, मला खेळवले नाही, माझे मुके घेतले नाहीत. नेहमी तूच घेत असस, कुरवाळत असस. नाही तर आजी आजोबा घ्यायची; परंतु आज बाबांची तहान मला लागली आहे. अत:पर बाबांचे दर्शन झाल्याशिवाय मी हसणार नाही. आई, मला जाऊ दे. माझ्या जन्मदात्याला शोधू दे. मी बाबांना शोधून आणीन. मला ते भेटतील. हृदयाची खरी इच्छा का अपूर्ण राहील?’

‘सोराब, तुझ्या आईला का तू सोडून जाणार? आजी आजोबा म्हातारी झाली. उद्या ती मेली तर मी कोणाच्या आधारावर राहू? कोणाच्या तोंडाकडे पाहू? तू पित्याच्या शोधार्थ जात आहेस आणि आईची नाही का तुला काळजी? तुझ्या पित्याला तुझी जरूर नाही. नाही तर ते येते, तुला भेटते, नको जाऊ. आता तू वयात आलास. तू लग्न कर. थोरामोठ्यांच्या मुली सांगून येत आहेत. तुझे रूपसौदर्य पाहून, तुझा पराक्रम पाहून सारे खूष आहेत. लग्न कर. सुखाचा संसार कर. आईला आनंद दे. सोराब, माझे ऐक.’

‘नाही आई. मी जाणार. माझे बाबा मला भेटल्याशिवाय मला चैन पडणार नाही. तू रडू नको. संसारात इतक्यात पडण्याची मला इच्छा नाही. बाबांना भेटेन. मग संसार. बाबाच माझे लग्न लावतील. बाबा दूर असता का लग्न लावू? पिता परागंदा असता का सुखोपभोगात राहू? आई, काय हे बोलतेस? मी जाणार, जाणार. माझी तलवार व भाला घेऊन जाणार. माझा घोडा घेऊन जाणार. त्रिभुवन मी शोधणार. बाबांना भेटणार. त्यांना घेऊन येणार. तुझी त्यांची भेट घडवणार. आई, नको मला रोधू, नको निराळे बोधू; मला निरोप दे, आशीर्वाद दे.’

‘नसशील ऐकत तर जा; परंतु तुझा पिता तू कसा ओळखशील? दंडावरचा ताईत दाखव, म्हणजे तो तुला ओळखील. हो आईचे नाही ना ऐकत? मी दुर्दैवीच आहे. पतीने त्याग केला नि पुत्रही आता सोडून जाणार.’ असे म्हमून ती रडू लागली. सोराबने तिचे समाधान केले.

एके दिवशी आपल्या आवडत्या घोड्यावर बसून सोराब पित्याच्या शोधार्थ निघाला. आपला पिता मोठा पराक्रमी आहे असे त्याने ऐकले होते; परंतु कोठे भेटणार? कोठेही शोध लागेना. पत्ता कळेना. राजधानीतील लोक म्हणत, ‘पुष्कळ वर्षांपूर्वी तो निघून गेला. त्याचे दर्शन त्यानंतर झाले नाही.’

सोराब इराण देशभर भटक भटक भटकला. त्याने सारी शहरे पाहिली. सर्वत्र शोध केला; परंतु पित्याची माहिती कळेना. आता काय करावे? सोराब सचिंत झाला. त्याने स्वदेश सोडला. इराण सोडून जवळच्या एका राजाकडे तो गेला. त्या राजाच्या पदरी तो राहिला. सोराबची कीर्ती वाढू लागली. तो शूर व पराक्रमी होता. त्याच्याबरोबर द्वंद्वयुद्धात कोणी टिकत नसे. तो अजिंक्य झाला. सोराबची कीर्ती इराणच्या राजाच्या कानावर गेली. दरबारात गोष्टी होऊ लागल्या. पूर्वी रुस्तुम होता, त्याने इराणचे नाव राखले होते; परंतु या सोराबला कोण तोंड देणार? हा सोराब नवजवान आहे म्हणतात. विशीपंचविशीचे वय. अशा तेजस्वी तरुणाशी कोण सामना देणार? उद्या आव्हान द्यावे तर ते कोण घेणार? इराणी दरबारात अशी चर्चा चाले व चिंता वाटे.

सोराब ज्या राजाच्या पदरी होता, त्याला इराणी राजाचे वैषम्य वाटत होते. इराणी राजाचा पराजय करता न आला तरी नक्षा उतरवावा असे त्याने ठरवले. त्याने आपल्या मुत्सद्यांजवळ बोलणे केले. त्यांनी एक कारस्थान रचले. राजाने सोराबची एके दिवशी खास मुलाखत घेतली.

‘सोराब, तुम्हाला एखादी गोष्ट करायला सांगितली तर कराल?’ राजाने विचारले.

‘असे का विचारता? प्राणांची मला पर्वा नाही. हे प्राण पित्याच्या भेटीसाठी आहेत. पित्याची भेट होत नसेल तर हे करंटे प्राण राखून तरी काय फायदा? सांगा कोणते कर्म करू?’

‘इराणवर स्वारी करावी असे आम्ही ठरवित आहोत.’

‘इराणवर? माझ्या मातृभूमीवर? माझे देशबंधू का मी ठार करू? इराण सोडून कोठेही मला लढायला पाठवा.’

‘सोराब, लढाई नाही करायची. कत्तली नाही करायच्या. आपण आक्रमणासाठी म्हणून फौज घोऊन जाऊ; परंतु इराणी राजाला निरोप पाठवू की, ‘राजा, लाखोंचा संहार कशाला करायचा? तुझ्याकडील एक वीर पाठव. आमच्याकडील एक वीर येईल. द्वंद्वयुद्ध होऊ दे. ज्याच्या बाजूचा वीर पडेल त्याचा पराजय झाल असे समजावे.’ सोराब, चांगली आहे की नाही योजना? आणि तुमचेही काम होईल. रुस्तुम असलाच तर तो अशा वेळेस लढायला कदाचित येईल. देशाच्या संकटकाळी तो जिवंत असेल तर धावत आल्याशिवाय राहाणार नाही. रुस्तुम आला तर तो तुला भेटेल. पितापुत्रांची भेट होईल. खरे की नाही?’

‘होय महाराज. चांगली आहे युक्ती.’

आणि त्याप्रमाणे ठरले. इराणच्या राजावर स्वारी करण्याचे निश्चित झाले. फौजा तयार झाल्या. तलवारी खणखणू लागल्या. भाले सरसावले. तंबू, डेरे, राहुट्या सारे सामान निघाले. मोठ्या ईर्षेने ते प्रचंड सैन्य इराणच्या हद्दीकडे निघाले.

इराणच्या राजाला ही गोष्ट कळली. त्यानेही कूच करण्याचे नगारे केले. फौजा सिद्ध झाल्या. मारणमरणाची लढाई करण्यास वीर निघाले. ढाली सरसावल्या. भाले चमकले. देशासाठी लढाई होती. प्रत्येकजण घराबाहेर पडला.

दोन्ही फौजांचे समोरासमोर तळ पडले. एका बाजूला नदी पाहात होती. दोन्ही फौजांच्या मध्ये प्रचंड वाळवंट होते. जिकडेतिकडे डेरे, तंबू, राहुट्या, पाले दिसत होती. घोडे खिंकाळत होते. उंट दिसत होते. वीर केव्हा युद्ध सुरू होते याची वाट पाहात होते. तलवारी रक्तासाठी तहानलेल्या होत्या. भाले घुसण्यासाठी शिवशिवले होते.

कोणीच आधी हल्ला करीना. असे किती दिवस चालणार? शेवटी आक्रमण करून येणा-या राजाने एक जासूद पाठविला. त्याच्या बरोबर एक पत्र होते. काय होते त्या पत्रात? त्या पत्रात द्वंद्वयुद्धाची मागणी होती. आमच्याकडील वीर तयार आहे असे त्यात लिहिलेले होते. पत्र देऊन जासूद परतला. इराणच्या राजाने बैठक बोलावली. विचार होऊ लागला.

‘लाखो लोक मरण्यापेक्षा द्वंद्वयुद्धाने निकाल लागावा हे बरे नाही का?’ राजाने विचारले.

‘परंतु आपल्याकडे असा अद्वितीय योद्धा आज कोण आहे? रुस्तुम होता परंतु तो कोठे गेला त्याचा पत्ता नाही. वीस वर्षे होऊन गेली. तो असता तर अब्रू सांभाळता. शत्रूकडे सोराब म्हणून एक अद्वितीय योद्धा आहे. नवजवान आहे. तोच येणार द्वंद्वयुद्धाला. त्याच्याशी कोण भिडेल? एका सोराबच्या जोरावर शत्रू लढाई जिंकू पाहात आहे. आपण शत्रूची ही योजना पसंत करू नये.’ सेनापती म्हणाला.

‘परंतु त्यात कमीपणा आहे. इराणात वीरपुरुष नाही अशी कबुली देण्यासारखे आहे. अजिंक्यपत्र शत्रूला देण्यासारखे आहे. सैन्यात सोराबशी सामना देऊ शकेल व विजयश्री आणील असा कोणीच नाही का? इराण का निर्वीर्य झाला? जा, शोधा, तपास करा.’ राजाने रागाने सांगितले.

‘महाराज, सोराबची कीर्ती का आपल्या कानांवर आली नाही? चारी पाय धरून तो हत्तीला उचलतो. तो सिंहाचा जबडा उघडून त्याचे दात मोजतो. वाघाला एका थपडेने त्याने ठार केले. हाताच्या मुठीने तो पाषाणाचा चुरा करतो. झाडाला दंडाची धडक देतो व झाड पाडतो. सोराब! त्याचे नाव ऐकताच सारे मागे जातात. आपल्यातील कोणीही त्याच्याशी द्वंद्वयुद्धात टिकणार नाही. रुस्तुम कोठे असेल तर बोलवा, त्याचा पत्ता कोणाला माहीत आहे का विचारा.’ सेनापती म्हणाला.

‘रुस्तुमशिवाय नाही का कोणी?’

‘कोणी नाही. रुस्तुमच लाज राखील. देशाचे नाव राखील. त्याला बोलावणे पाठवा.’

‘रुस्तुमचा पत्ता फक्त मला माहीत आहे. आणीबाणीच्या वेळेस त्याला बेलावता यावे म्हणून त्याचा पत्ता मी मिळवून ठेवलेला आहे.’

‘जाऊ दे तर रुस्तुमकडे दूत. मी पत्र देतो. देशासाठी ये, असे लिहितो.’

‘वा, छान. रुस्तुम आला तर विजय आपला आहे. रुस्तुम अजिंक्य आहे. इराणचे नाव राहाणार.’

एक जासूद वायुवेगाने निघाला. घोड्यावर बसून तीराप्रमाणे निघाला. पहाडात रुस्तुमची गुहा शोधीत तो जासूद हिंडत होता. रुस्तुम वनात परिभ्रमण करीत होता. शेवटी जासुदची व त्याची गाठ पडली.

‘प्रणाम, रुस्तुम, प्रणाम.’

‘काय आहे काम?’

‘राजाचे काम. देशाचे काम. हे घ्या पत्र. लवकर निघा. इराणची अब्रू वाचवायला निघा.’ रुस्तुमने पत्र वाचले.

‘निघता ना रुस्तुम?’

‘मी येऊन आता काय उपयोग? मी आता वृद्ध झालो. मला मुलगा असता तर इराणसाठी आज उभा राहाता. देशाचे नाव राखता. मी येऊन काय करू? केस पाहा पिंगट झाले. पांढरे झाले. दंड पाहा बारीक झाले. मी कमावलेले नाव गमवू? अजिंक्य रुस्तुमची कीर्ती का कलंकित करू? नाही. मी येणार नाही. जा.’

‘रुस्तुम, असे करू नका. तुम्ही वृद्ध असलेत म्हणून काय झाले? सिंह वृद्ध झाला तरी हत्तींना मारील, त्यांची गंडस्थळे फोडील. तुमचे दंड म्हणजे लोखंडी आहेत. निघा. इराणची अब्रू धोक्यात आहे. राजाने आग्रहपूर्वक तुम्हाला बोलावले आहे.’

‘राजाला आज माझी आठवण झाली. गेल्या वीस वर्षांत हा रुस्तुम जिवंत आहे की मेला याची चौकशीही राजाने केली नाही. कृतघ्न आहे हा राजा. आज कामाच्या वेळी तुला पाठवले. स्वत: का नाही आला? इराणचे नाव तू राख म्हणावे. जा, मी नाही येत. रुस्तुम मेला म्हणावे.’

‘रुस्तुम, तुम्हा थोर आहात. तुम्हाला मी सांगावे असे नाही. राजाची चूक झाली; परंतु राजाच्या चुकीमुळे तुम्ही देशाची मान खाली करणार का? आणि राजाला तुम्हीच नव्हते का सांगितले की फक्त संकटाच्या वेळेस मला हाक मारा असे? रुस्तुम, ही रागावण्याची वेळ नाही. निघा. शत्रूने आव्हान दिले आहे, ते स्वीकारलेच पाहिजे. ते पाहा तुमच्या डोळ्यांत पुन्हा तेज येत आहे. ते पाहा तुमचे दंड प्रस्फुरू लागले. ती पाहा तुमची छाती रुंदावली. उठा. रुस्तुम, उठा. वीर पुरुष तुम्ही. वीराला पाहून वीराला स्फुरण चढते. शत्रूकडे सोराब म्हणून एक धिप्पाड नवयुवक आहे. सिंहाहून तो शूर आहे. तोच बहुधा तुमच्याबरोबर लढायला येईल. चला, अशी जोड सा-या जन्मात तुम्हाला मिळाली नसेल. ह्या नववीराबरोबर लढा. इराणी वृद्ध झाला तरीही अजिंक्य असतो असे दाखवा. चला. निघा. सारे वाट पाहात आहेत. सर्वांची तोंडे उतरली आहेत. राजा सचिंत आहे. तुम्ही आलेत तर सर्वांमध्ये चैतन्य येईल. सर्वांना हुशारी वाटेल. स्वदेशाची तुम्हाला दया नाही येत? मातृभुमीचा अभिमान नाही तुम्हाला वाटत? रानावनात राहून तुमचे हृदय का दगडासारखे झाले? भावनांचे झरे का सारे सुकले? सारी उदात्तता का गेली? रुस्तुम उठा, स्वदेश हाक मारीत आहे.’

रुस्तुम विरघळला. तो धिप्पाड पुरुष निघाला. रानावनात राहिल्यामुळे त्याचा चेहरा राकट व उग्र दिसत होता. जासुदाबरोबर तो निघाला. राजाचे दूत वाटच पाहात होते. त्यांनी वार्ता आणिली की रुस्तुम येत आहे. राजा सामोरा गेला. रुस्तुमला त्याने आदराने आणले.

‘रुस्तुम, देशाचे नाव राखा. वृद्धावस्थेत तुमच्यावर ही जबाबदारी टाकायला आम्हाला संकोच वाटतो, पण उपाय नाही.’ राजा म्हणाला.

‘मला मुलगा असता तर इराणचे नाव राखता. शत्रूकडील तरुणाशी लढायला इराणमध्ये तरुण असू नयेत ही लाजिरवाणी गोष्ट आहे.’

‘परंतु आपण उलट असे दाखवू या की, इराणमधील वृद्धही शत्रूकडील ताज्या दमाच्या तरुणास लोळवतात. रुस्तुम, ही चर्चेची वेळ नाही. शत्रूला कळवू ना की आमची तयारी आहे म्हणून?’

‘परंतु माझी एक अट आहे. माझे नाव कळवू नका. मी पडलो तर माझ्या नावाची अपकीर्ती नको! मी वृद्ध आहे. रुस्तुमच्या नावाला अपयशाचा डाग नाही लागता कामाचा. आमच्याकडचा कोणी एक अनामिक वीर युद्धास येईल असे कळवा.’

‘ठीक.’

शत्रूकडे त्याप्रमाणे कळविण्यात आले आणि सामन्याची तारीख ठरली. दोन्ही बाजूंची सैन्ये तो अद्वितीय समरप्रसंग पाहायला उभी राहिली. असे द्वंद्व पुन्हा कधी पाहायला मिळणार?

सोराब उठला त्याने आपल्या घोड्याला थोपटले. घोड्यावर त्याचे फार प्रेम होते. घोड्याचे नाव ‘रुक्ष’ असे होते.

‘रुक्ष, आज मी विजयी होऊन येईन का? विजयी होऊन आलो तर तुला पुन्हा भेटेन. पडलो तर शेवटची भेट. रुक्ष तुला मी बाबांना शोधण्यासाठी फार श्रमवले, खरे ना? क्षमा कर. पित्याला भेटायच्या उत्कंठतेमुळे तसे हातून घडले असेल. रुक्ष, जर मी विजयी होऊन आलो तर पुन्हा निघू बाबांना शोधायला. हो. कारण या विजयाचा मला काय आनंद? मला एकाच गोष्टीचा आनंद आहे. एकच गोष्ट मला हवी आहे. माझे बाबा. मला धन नको, कीर्ती नको, मानसन्मान नको, राज्य नको. माझे बाबा मला हवे आहेत. खरे ना रुक्ष? तू माझे हृदय जाणतोस, माझ्या भावना ओळखतोस. मी जिवंत परत आलो तर तू आपल्या पाठीवरून पुन्हा मला वायुवेगाने सर्वत्र ने. जातो हं.’

रुक्षचा निरोप घेताना सोराबच्या डोळ्यांत पाणी आले. सोराब कोवळा तरुण होता. उदार व दिलदार होता. त्याचे मन अद्याप घट्ट नव्हते झाले. हृदय निष्ठुर नव्हते झाले. त्याचे उदार व उदात्त शौर्य होते. त्याच्या पराक्रमातही कोवळीक होती. शौर्यात दिलदारी होता.

तलवार, भाला, गदा, तोमर घेऊन सोराब निघाला. सर्व शस्त्रांनी सज्ज होऊन निघाला. ढाल घेऊन निघाला. त्याच्या राजाने त्याला आशीर्वाद दिला. हजारो सैनिकांनी जयघोष केले. नगारा वाजू लागला. शिंगे वाजली. निघाला महावीर द्वंद्वयुद्धाला.

आणि तो पाहा प्रचंड रुस्तुम तिकडून येत आहे. तो पाहा त्याचा उग्र, भीषण राकट चेहरा. त्याच्या जीवनातील सारी कोमलता जणू सुकून गेली आहे. पुत्र नाही या भावनेमुळे त्याचे वात्सल्य जणू वाळून गेले आहे. निष्ठुर, कठोर रुस्तुम. इराणच्या राजाने त्याला निरोप दिला. इराणी सैन्याने प्रचंड जयघोष केला. वाद्ये वाजू लागली. रणवाद्ये.

दोघे समोरासमोर आले. एकमेकांनी एकमेकांस पाहिले. सोराबच्या चेह-यावर मृदू हास्य शोभत होते. उग्रता नव्हती. सोराबने आपल्या प्रतिस्पर्ध्यास मधुर वाणीने विचारले, ‘कोण आपण, आपले नाव काय?’

‘नाव गाव काय विचारतोस? का माझी मुलगी मागायची आहे? लग्नाला आलास की लढाईला? चल, तयार हो. चावटपणा बंद कर.’ आणि रुस्तुम धावून आला. सोराबही सरसावला. तलवारींची खणाखणी होत होती. ते आपापल्या ढालींवर वार झेलीत होते. एकमेकांना प्रहार करू पाहात होते. कंठस्नान घालू पाहात होते. हत्ती व हत्तीचा छावा यांचे जणू ते युद्ध होते. रुस्तुमची शक्ती इचाट होती; परंतु सोराब चपळ होता. विजेप्रमाणे तो चपळाई दाखवीत होता.

तलवारींची लढाई संपली. दोघांच्या तलवारी तुटल्या. आता रुस्तुमने गदा घेतली हातात. अगडबंब गदा. ती गदा होती की रुस्तुमने प्रचंड वृक्षच उपटून हाती घेतला होता? केवढी गदा! ती डोक्यावर पडली तर सोराब का वाचेल? आला. प्रचंडकाय रुस्तुम धावून आला.

‘थांब पोरा. तुझा चेंदामेंदा करतो.’ रुस्तुम गर्जला. सर्व शक्ती एकवटून त्याने गदा वर उचलली व हाणली; परंतु हे काय? सोराब कोठे आहे? विजेच्या चपळाईने तो एकदम बाजूला सरकला होता. त्याने घाव चुकवला आणि रुस्तुमच गदेसह खाली पडला. वाळूत पडला. ती वेळ होती रुस्तुमला मारण्याची; परंतु सोराब त्याच्याकडे पाहातच राहिला. प्रेमाने व करुणेने पाहात राहिला. सोराबच्या डोळ्यांत शत्रुता नव्हती. तेथे प्रेम होते.

‘ऊठ, महावीरा! ऊठ. तू पडलेला असताना तुझ्यावर घाव मी घालणार नाही. पुन्हा गदा नीट सरसावून ये. माझ्या मस्तकाचा चेंदामेंदा कर. जोराने घाव घाल. मला तुझ्यावर जोराने घाव घालता येत नाही. हात धजत नाही. का बरे असे होते? हे महापुरुषा, तू कोण, कोठला? तुझे नाव काय? कोणाशी मी लढत आहे?’

‘चावट, वात्रट पोरा. तू गप्पा मारायला आला आहेस की मारणमरणाला? नावे गावे काय विचारतोस? म्हणे हात धजत नाही. आलास कशाला भ्याडा? वीरांची गाठ घेण्याऐवजी बायकांत जाऊन बस. तेथे नाय, खेळ, मौज कर. घाव चुकविण्यासाठी नाचतोस काय? तू वीर नाही दिसत. नाच्या पो-या दिसतोस. सावध राहा आता. हा भाला घेऊन येतो आता. हा भाला तुझ्या हृदयातून आरपार जाईल. नाच-या पोरा, बघू किती नाचतोस, किती चुकवतोस ते.’

असे म्हणून रुस्तुम तो प्रचंड तेजस्वी भाला घेऊन धावला. सोराबही जरा संतापला; परंतु काय असेल ते असो. आयत्या वेळेस त्याचा हात थरथरे, शक्ती जणू निघून जाई.

आणि हे पाहा एकाएकी वादळ आले. वारे सुटले. आकाशात मेघ जमले. सूर्य झाकाळला गेला. का बरे? सूर्यनारायणाला पिता-पुत्रांचे ते अस्वाभाविक युद्ध पाहावत नव्हते? त्याने का तोंड झाकून घेतले? वाळूचे लोट वर उडाले. क्षणभर काही दिसेना.

परंतु वारे थांबले. वाळू उडायची थांबली. आकाशात ढग मात्र जमतच होते. रुस्तुमने सोराबला पेटलेल्या डोळ्यांनी पाहिले आणि त्याने तो भाला मारला. लागला भाला. सोराबच्या छातीत तो घुसला. पडला. तरुण कोमल वीर पडला. रुस्तुम तुच्छतेने त्याच्याजवळ आला.

‘नाच्या पो-या, पडलास धुळीत? आहे का उठायची पुन्हा छाती? ऊठ, माझा सूड घे. कर मला प्रहार. तुला बडबड करायला येते. प्रहार मात्र करता येत नाही. त्या वेळेस कचरतोस.’ रुस्तुम उपहासाने बोलत होता.

‘माझ्या मरणाचा सूड रुस्तुम घेईल!’

‘कोण घेईल?’

‘रुस्तुम. अजिंक्य महान योद्धा रुस्तुम. रुस्तुमला हे कळले ती त्याचा मुलगा मारला गेला, तर तो खवळेल व पुत्राचा वध करणा-याचा तो सूड घेईल.’

‘तुला काय माहीत रुस्तुम?’

‘मला माहीत आहे. तो माझा जन्मदाता आहे.’

‘रुस्तुमला मुलबाळ नाही. मरताना खोटे नको बोलूस. असलीच तर रुस्तुमला मुलगी असेल. रुस्तुमला मुलगा नाही.’

‘मी जन्मात खोटे बोललो नाही. रुस्तुमच माझा पिता. मला अभिमान वाटतो. पित्याला शोधण्यासाठी मी त्रिभुवन हिंडलो; परंतु तो सापडेना. द्वंद्वयुद्धाच्या वेळेस कदाचित पिता येईल व भेटेल असे वाटत होते; परंतु तुम्ही आलेत. तुम्ही कोण आहात रुस्तुमचे का दोस्त य़ तुमच्यावर खरेच मला प्रहार करवेना. तुम्हाला पाहताच तुम्हाला मिठी मारावी असे मला वाटले. म्हणून मी तुमचे नाव विचारले. कोण आहात तुम्ही? रुस्तुमचे मित्र असाल तर त्याला सांगा की तुझा मुलगा तुझा शोध करीत होता. तुझे चिंतन करीत तो मेला. हे काय, तुम्ही असे कावरेबावरे का दिसता? तुम्ही वार आहात. मला पाडलेत. मला मरणाचे भय नाही. वीर मरणाचे स्वागत करतो आणि जगून तरी मला काय करायचे होते? पित्याशिवाय मी कसा जगू? मी द्वंद्वयुद्धाला आलो तो कीर्तीसाठी नाही. माझे बाबा कदाचित भेटतील म्हणून; परंतु नाही आले बाबा. तुम्ही आलेत. तुम्ही कोण? खरेच, कोण? रडू नका. रुस्तुमला तुम्ही जाणता? ओळखता? मला भेटायला तेही का तडफडत आहेत? त्यांना आता काय सांगावे म्हणून तुम्हाला वाईट वाटत आहे? रडू नको वीरा. रुस्तुमला सांगा की त्याचा पुत्र सोराब शूराप्रमाणे लढून मेला. मी रुस्तुमला शोभेसा नाही का, तुम्हीच सांगा.’

‘तू रुस्तुमचा मुलगा? तुझ्याजवळ खूण आहे काही? आईने दंडात काही बांधले आहे?’

‘हो. या दंडात ताईत आहे. तुम्ही जवळ येऊन पाहा.’

आणि रुस्तुम सोराबच्या जवळ गेला. त्याने हलक्या हाताने दंडावरचे कपडे दूर करून पाहिले, तो ती खूण! त्याने पत्नीजवळ दिलेला तो ताईत! आणि रुस्तुम एकदम दु:खाने रडू लागला. पहाड पाझरू लागला. मीच पुत्राला मारले. अरेरे, मुलगा व्हावा म्हणून कोण मला उत्कंठा होती! परंतु तिने मला कळविले नाही. सोराब, पाळ! अरेरे! कसा रे घाव मी घातला! कसा भाला मारला! बाळ, खरेच, तू पित्याला शोभणारा आहेस. खरेच हो तुझा हात चालत नव्हता. तुझे निर्मळ पवित्र हृदय. त्या हृदयाने आतडे ओळखले होते. जन्मदात्याला ओळखले होते; परंतु मी पुत्राला ओळखले नाही. बाळ, तू शूराहून शूर आहेस; परंतु आता काय? अरेरे, असे कसे झाले! सोराब सोराब! असे म्हणून रुस्तुम विलाप करू लागला.

‘बाबा, रडू नका. माझे डोके तुमच्या मांडीवर घ्या. या भाल्याच्या वेदना सहन नाही होत; परंतु छातीतून तो काढण्यापूर्वी मला पित्याच्या भेटीचे सुख अनुभवू दे. आयुष्याचा शेवटचा क्षण गोड होऊ दे. कृतार्थ होऊ दे. घ्या माझे डोके मांडीवर. माझ्या तोंडावरून हात फिरवा. माझा मुका घ्या. प्रेमाने म्हणा, ‘सोराब, बाळ सोराब.’ रडू नका बाबा. पितृप्रेमाचा आनंद मला चाखवा. तो आनंद शेवटच्या क्षणी तरी मला द्या. पोटभर द्या. वेळ थोडा राहिला आहे. माझ्या आयुष्याच्या वाळूचे कण संपत आले आहेत. घटका भरत आली आहे. जग सोडून मी चाललो. या जगात विजेसारखा आलो. वा-यासारखा चाललो. ऐन तारुण्यात चाललो; परंतु जायला हवे. एक दिवस मरण आहेच. तुम्ही भेटलेत माझी आशा सफळ झाली. हृदयाची तळमळ शांत झाली. जे शोधीत होतो ते शेवटच्या क्षणाला मिळाले. बाबा, आता मला समाधान आहे. आईला भेटा. माझा घोडा रुक्ष याची काळजी घ्या. थोपटा ना मला.आणि रुस्तुमने सोराबचे डोके मांडीवर घेतले. त्याचे केस झाडले. त्याच्या तोंडावरून आपला तो राकट दणकट परंतु आता वात्सल्याने थबथबलेला असा हात फिरवला. त्याने सोराबचा मुका घेतला. मस्तकाचे अवघ्राण केले. पित्याच्या डोळ्यांतील अश्रू पुत्राच्या मुखकमलावर पडले. सोराबच्या मुखावर मंदमधुर स्मित होते. कृतार्थतेचे, धन्यतेचे ते स्मित होते. ‘बाबा, काढा आता भाला. वेदना लहन नाही करवत. तुम्ही भेटलेत. तुमच्या मांडीवर मरण आले. आनंद!’ असे सोराब म्हणाला. रुस्तुमने तो भाला काढला आणि एकदम रक्ताचा पूर उसळला. त्या रक्ताबरोबर सोराबचे प्राणही बाहेर पडले.

आणि आता अंधार पडला. पाऊसही पडू लागला. सैन्ये आपापल्या तळावर गेली. नदीला पूर आला. अपरंपार पूर. आकाशात कडाडत होते. मेघ गर्जत होते. पंचमहाभूते प्रक्षुब्ध झाली होती.

आणि रुस्तुम तेथे होता. मांडीवर सोराब मरून पडला होता. प्रेमळ, शूर, उदार, दिलदार असा सोराब!

***