स्वराज्यसूर्य शिवराय - 15

स्वराज्यसूर्य शिवराय

भाग पंधरावा

ती एक जिजाऊ होती..

शिवराय सुरतेवरून निघाले ते औरंगजेबाला आर्थिक बाबतीत फार मोठा धडा शिकवून. औरंगजेबाच्या मामाने स्वराज्याची जी लुट केली होती त्याचा बदला घेऊन शिवराय निघाले. मनात एक आनंद होता, समाधान होते. ही बातमी केव्हा एकदा माँसाहेबाना सांगावी, सोबतचा सारा ऐवज त्यांच्यापुढे कधी ठेवावा, सारी कथा त्यांना कधी ऐकवावी अशा एका वेगळ्याच अवस्थेत शिवराय राजगडाच्या दिशेने दौडत होते. परंतु येताना जो जोश, जो आवेश मावळ्यांमध्ये होता तो जाणवत नव्हता कदाचित लागोपाठ घडत असलेला प्रवास, सुरत शहरात अविश्रांत केलेली कामगिरी किंवा वाहनांच्या पाठीवरील वाढलेले 'धनाचे' ओझे...... तिकडे राजगडही आतुर झाला होता, उतावीळ झाला होता. शिवरायांची वाट पाहात होता. खुद्द जिजाऊही प्रचंड उत्साहाने शिवरायांची आणि त्यांच्या बहादूर साथीदारांची प्रतिक्षा करीत होत्या. तितक्यात एक अत्यंत दुःखदायक बातमी पोहोचली. शिवरायांच्या महापराक्रमी विजयाची वाट पाहणाऱ्या जिजाऊंच्या कानावर ती बातमी आली आणि जिजाऊ जणू गतप्राण झाल्या. त्यांचं सर्वस्व हरवल. एखाद्या प्रचंड उंच कड्यावरून कुणीतरी ढकलून द्यावे अशी त्यांची परिस्थिती झाली. काय झाले असे? का घडले ? कोणत्याही संकटसमयी घाबरणाऱ्या, इतरांना मायेच्या ममतेने सावरणाऱ्या, भक्कम आधार देणाऱ्या जिजाऊंच्या जीवनात असे कोणते संकट आले?.…

सिंदखेडच्या लखुजीराव जाधवांची ती एक जिजाऊ होती. तीन वर्षे वय असणारी ती एक जिजाऊ होती. काहीही समजणारी, लग्न ही परंपरा उमजणारी ती एक जिजाऊ होती. तिसऱ्या वर्षी आपले लग्न ठरले हे ऐकणारी ती एक जिजाऊ होती. लग्न ठरले म्हणजे काय झाले ते पुरतं समजताच ते आपल्याच आईच्या हट्टामुळे मोडले केवळ एवढेच कानात साठवणारी ती एक जिजाऊ होती. काही काळ लोटतो लोटतो तोच पुन्हा त्याच घरी लग्न ठरले हेही ऐकणारी ती एक जिजाऊ होती. मालोजी भोसल्यांच्या घरात त्यांची सून म्हणून आनंदाने प्रवेश करणारी ती एक जिजाऊ होती. उमाबाई भोसल्यांची स्नुषा असणारी ती एक जिजाऊ होती. शहाजी राजे भोसले या पराक्रमी शूरवीराची पत्नी असणारी ती एक जिजाऊ होती. लहानपणापासूनच स्वराज्याची स्वप्ने पाहणारी ती एक जिजाऊ होती. शिवबासारख्या अतिशय पराक्रमी, चतुर, धाडसी, स्वराज्य प्रेमी पुत्राला जन्म देणारी ती एक जिजाऊ होती. उदरात एका तेजस्वी तान्ह्याची चाहूल लागल्यानंतर शिवनेरी गडावर जाणारी ती एक जिजाऊ होती. चिडलेल्या शत्रूने पुणे जहागीरीत घातलेला हैदोस उघड्या डोळ्यांनी पाहणारी ती एक जिजाऊ होती. स्वतःचे स्वप्न आपला पुत्र पूर्ण करील असा आत्मविश्वास असणारी ती एक जिजाऊ होती. शिवबाला पराक्रमी वीरांच्या गोष्टी सांगून त्याच्यामध्ये पराक्रमाची बीजे पेरणारी ती एक जिजाऊ होती. ओठावरचे दूध सुकलेला, ओठांवर मिसुरड फुटलेला लाडका शिवबा मोजक्या सहकाऱ्यांना घेऊन रानोमाळ फिरताना स्वराज्य स्थापन करण्याची प्रतिज्ञा घेत असताना त्याचे मोठ्या धारिष्ट्याने, अभिमानाने कौतुक करणारी एक जिजाऊ होती. जवळ मोजकेच मावळे, शस्त्रास्त्रे नाहीत, दारूगोळा नाही, किल्ला नाही, तोफा नाहीत तरीही परकियांचा गड ताब्यात घेऊन स्वराज्याचे तोरण बांधणाऱ्या मुलाचे पोट भरून कौतुक करणारी ती एक जिजाऊ होती. पती शहाजी राजे कायम लढाई, स्वारी यामध्ये अडकून पडलेले असताना कौटुंबिक आणि स्वराज्याची सारी जबाबदारी नेटाने पेलणारी ती एक जिजाऊ होती. हत्तीचे पिसाळणे तशी साधी घटना परंतु त्या घटनेने जिजाऊंच्या दिराने जिजाऊंच्या भावाचा बळी घेतला. ते पाहून जिजाऊंच्या चिडलेल्या पिताजीने जिजाऊंच्या दिराला यमसदनी पाठवले. कपाळीचे कुंकू बळकट, नशीब बलवत्तर म्हणून जाधवांच्या तलवारीच्या फटक्यातून शहाजी राजे वाचले. दीर आणि भाऊ यांच्या मृत्यूने दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना त्या धुमश्चक्रीत आपल्या वडिलांच्या हातून आपला पती वाचला हे समाधान मानणारी ती एक जिजाऊ होती. शिवनेरीहून पुणे येथे परतल्यावर पुण्याचा झालेला विध्वंस पाहून दुःखी कष्टी झालेली परंतु हिंमत हारता तिथल्या प्रजेमध्ये आत्मविश्वासाचे स्फुल्लिंग चेतवणारी ती एक जिजाऊ होती. जिथे दुश्मनाने गाढवाचा नांगर फिरवला होता तिथे सोन्याचा नांगर फिरवून जहागीरीचे नंदनवन करणारी ती एक जिजाऊ होती. शिवबा उभारत असलेली चळवळ पाहून त्याला शरण आणण्यासाठी आदिलशाहीने कपटाने, धोक्याने शहाजीराजांना कैदेत टाकले तेव्हा अश्रूंचे घोट पिऊन शिवरायांच्या पाठीमागे ठामपणे उभी राहणारी ती एक जिजाऊ होती. कुंकू संकटात सापडले असताना ती जखम ह्रदयात घेऊन स्वराज्याची काळजी वाहणारी, स्वराज्यातील हजारो स्त्रियांच्या कुंकवाची चिंता करणारी ती एक जिजाऊ होती. मोठ्या हिकमतीने, धाडसाने, चातुर्याने पित्याची आदिलशाहीच्या कैदेतून सुटका करणाऱ्या शिवरायांच्या पाठीवरून हात फिरवणारी ती एक जिजाऊ होती. स्वतः आखलेल्या मोहिमेत आघाडीवर राहून विजय मिळविणाऱ्या शिवरायांना बळ देणारी माता ती एक जिजाऊ होती. अफजलखान! स्वराज्यावर चालून आलेला एक यमदूत! प्रचंड ताकदीने चालून येत असताना, देवतांना इजा पोहोचविणारे त्याचे कृत्य संयमाने सहन करणारी ती एक जिजाऊ होती. कपटी अफजलखानाच्या भेटीला जाणाऱ्या शिवबाला मोठ्या कष्टी मनाने, अंतःकरणाने आशिष देणारी आई ती एक जिजाऊ होती. पोटचा शूर सुत पन्हाळा गडावर अडकलेला असताना, सिद्दी जौहरसारख्या हटवादी सरदाराने त्याला वेढलेले असताना, कोणताही स्वकीय सरदार मदतीला जाऊ शकत नसताना, दुसरीकडे शाईस्तेखानासारख्या विषारी अजगराचा विळखा स्वराज्याला पडलेला असताना स्वतःची भीती, दुःख, चिंता ओठावर, चेहऱ्यावर येऊ देता रणरागिणीचे रूप घेणारी, सिद्दीच्या वेढ्यावर चालून जाण्याचा क्रांतिकारी विचार करणारी ती एक जिजाऊ होती. प्रत्येक संकटावर यशस्वी मात करणाऱ्या मुलाची, सरदारांची, सैनिकांची आस्थेने चौकशी करणारी धीरोदात्त माऊली ती एक जिजाऊ होती. युद्धसमयी जायबंदी झालेल्या वीरांचे कौतुक करणारी, प्रसंगी स्वराज्यासाठी बलिदान करणाऱ्या शूरवीर मावळ्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी उभी राहणारी ती एक जिजाऊ होती...…

शिवराय सुरत मोहिम यशस्वीपणे राबवून परत येणार म्हणून डोळ्यात तेल घालून त्यांची वाट पाहणारी ती एक जिजाऊ होती. पण झाले उलटेच. बातमी घेऊन एक स्वार दौडत आला. सर्वांना वाटले तो सुरतेची आनंदी बातमी घेऊन आलाय पण हे काय? त्याचा चेहरा असा काळवंडून का आलाय? त्याचा चेहरा उदास का आहे? आनंदी बातमी देणार ना? मग मान खाली का घालतोय? काय झाले? शेवटी त्या स्वाराने भीत भीत तोंड उघडले,

".. बातमी ........ वाईट आहे..."

"काss ? वाईट बातमी ? काय घडले? कुठे घडले? कुणाची बातमी आहे? कुठून आलास? कुणी पाठवले? सांग. लवकर सांग..." एक ना अनेक प्रश्न निर्माण झाले. काळ बनून पुढे उभे होते. त्या वादळी प्रश्नांची उत्तरे केवळ त्या स्वाराजवळ होती परंतु तो खचला होता, घाबरला होता. हजारो टन दुःखाचे ओझे वाहून आणताना थकला होता.परंतु त्याने काय ते सांगणे आवश्यक होते,तोंड उघडणे भाग होते.

"......मला एकोजीराजांनी पाठवले आहे..." ते ऐकताच जिजाऊंच्या कपाळीचे कुंकू जणू अश्रू गाळू लागले. जिजाऊंच्या काळजात चर्रर्र झाले. भीतीने अंग कापत होते. आवडता राजगड गरगर फिरत असल्याचा भास होत होता. डोळ्यात आसवांची गर्दी झाली. पुन्हा त्या दुतावर प्रश्नांची सरबत्ती झाली. अडखळत तो म्हणाला,

"बातमी मोठ्या राजेंसाहेबांची आहे...."

"का ss शहाजी राजेंबाबत ? काय झाले? कुठे आहेत ते ? आजारी आहेत का?"

शेवटी त्या दुताने भीतभीत, मनावर फार मोठा दगड ठेवून सांगायला सुरुवात केली....

शहाजी राजे यांना शिकार करण्याचा छंद होता. नेहमीप्रमाणे ते त्यादिवशी शिकारीसाठी एका जंगलात गेले. एक सावज टप्प्यात आले. राजांनी त्याचा पाठलाग सुरू केला. काही अंतर पाठलाग होत नाही तोच राजांचे दुर्दैव आड आले. त्या जनावराच्या मागे धावणाऱ्या शहाजींच्या घोड्याचा पाय जंगलातील एका रानवेलीला अडकला. घोडा एका क्षणात खाली कोसळला. घोड्यावर स्वार असलेले शहाजी राजे दूर फेकल्या गेले आणि दुर्दैवाने तिथेच त्यांचे प्राणोत्क्रमण झाले. केवढी मोठी वाईट, दुःखद बातमी होती ती. ऐकताच जिजाऊंच्या हातापायातील त्राण गेले. आसवांचा महापूर आला. दुःखाची लाट एवढी प्रचंड होती की, त्यामुळे जिजाऊ निःशब्द झाल्या. असे काही घडू शकते, अप्रिय असे काही घडले आहे यावर त्यांचा विश्वास बसतच नव्हता. ह्रदयात गच्च दाबून ठेवलेला जीव निघून जावा अशीच अवस्था जिजाऊंची झाली. सर्वांना सांभाळणारी, धीर देणारी ती एक जिजाऊ होती. त्या जिजाऊंना धीर कुणी द्यावा. दुःखाच्या महासागरात गरगरणारी ती एक जिजाऊ होती. तिला आधार देणारा, तिचे अश्रू पुसणारा शिवबा सुरतेहून परत निघाला होता. जिजाऊंचे दुःख कुणीही पाहू शकत नव्हते. सर्वांनाच, अख्ख्या राजगडाला अतोनात दुःख झाले

तितक्यात 'आले...आले शिवराय आले....' अशी कुजबूज सुरू झाली. शिवराय राजगडावर पोहोचले पण हे काय नेहमीप्रमाणे आनंदाने, हर्षोल्हासाने स्वागत करणाऱ्या माँसाहेब कुठे आहेत? आम्हाला ओवाळायला का आल्या नाहीत? आजारी तर नाहीत? पण हे वातावरण गंभीर कसे? सुतकी चेहऱ्याने लोक का उभे आहेत? डोळे आसवांनी का भरलेले आहेत? कुणी बोलत का नाही? नजरेस नजर का कुणी भिडवत नाहीत? हे आवाज कशाचे? हे हुंदके कोण देत आहे? आक्रोश का करत आहेत? नाही. नाही. वातावरण चांगले नाही. काहीतरी निश्चितच घडले आहे? शिवरायांना हे प्रश्न स्वस्थ बसू देत नव्हते. त्यांनी ताडकन घोड्यावरून उडी मारली. ते धावत सुटले. वाऱ्याच्या वेगाने त्यांनी माँसाहेबाचे दालन गाठले. त्यांना आपोआप रस्ता मिळत गेला. रडण्याने, आक्रोशाने परिसीमा गाठली होती. शिवरायांचे लक्ष माँसाहेबाकडे गेले. मातेचे लक्ष पुत्राकडे गेले. नजरेला नजर भिडताच काय घडले असावे ते शिवरायांनी ताडले. शिवबाला पाहताच जिजाऊंचा संयम हरला. अश्रूंचा बांध फुटला. विजेच्या वेगाने त्या उठल्या. शरीरात त्राण नसताना शिवबाकडे धावल्या. शिवरायांनी मातेला धरले. दोघांच्याही डोळ्यातून आसवे गळत असताना दोघांनी एकमेकांना कवटाळले. कुणी बोलावे? कुणाला समजावून सांगावे? धीर तरी काय द्यावा? त्यासाठी शब्दांनी साथ द्यायला हवी. परंतु दोघांच्याही आसवांनी एकमेकांशी संवाद साधला. मातेच्या आसवांनी सांगितले की, शिवबा आपण पोरके झालो. तुझे बाबा, आपले महाराज आपल्याला सोडून गेले रे..… आदिलशाही, मुघल, निजामशाही यांना घाबरणाऱ्या त्या मातापुत्रांना यमराजाने हरवले होते. जिजाऊंनी ठरवले, आता सारे संपले. ज्याच्यासाठी जगायचे तो प्राणप्रिय पतीच सोडून गेला तर जगायचे कुणासाठी आणि का? ठरले. आता शेवटचा प्रवास सुरु करायचा. शिवरायांच्या विशाल छातीवर मान ठेवून रडणाऱ्या जिजाऊंनी निर्णय घेतला. आता संपवायचे जीवन हे. शहाजीराजांच्या मागोमाग जायचे. त्यांना एकटे पाठवायचे नाही. त्या शिवरायांपासून बाजूला झाल्या. अश्रू स्वतःच पुसले. चेहरा करारी झाला. चेहऱ्यावर एक कठोरता, दृढनिश्चय दिसत होता. डोळ्यांमध्ये एक आगळेवेगळे तेज भरलेल्या अवस्थेत त्या म्हणाल्या,

"शिवबा, आम्ही जाणार...." शिवरायांना वाटले माँसाहेब कर्नाटकात जायचं म्हणत आहेत. ते म्हणाले,

"माँसाहेब, जाऊन तरी काय करणार? महाराजसाहेब आपणास नाही भेटणार. एकोजीराजांनी..."

शिवरायांना पुरते बोलू देता माँसाहेब म्हणाल्या,

"आम्ही तिकडे जायचे नाही म्हणत. आम्ही महाराजांना भेटायला जाणार...."

"काss? माँसाहेब, म्हणजे आपण....."

"होय. आम्ही सती जात आहोत. आमचा निर्णय झाला. आमच्या जाण्याची तयारी करा..." "नाही. मातोश्री, नाही. हा अविचार करु नका. आम्ही पाया पडतो..." शिवरायांच्या विनवणीचा जिजाऊंवर काहीही परिणाम झाला नाही. त्या ठाम होत्या. त्यांच्या दृष्टीने आता संसारात राम शिल्लक नव्हता. त्यांचा रामच त्यांना एकटीला सोडून गेला असताना कशाचीही माया, कोणताही मोह,कसलेही बंधन काहीही शिल्लक राहिले नव्हते. एकच इच्छा होती, सती जाण्याची!

शिवरायांची अवस्था अत्यंत बिकट झाली होती. पित्याच्या मृत्यूचे दुःख करावे की, ते गिळून जन्मदात्रीला तिच्या निर्णयापासून परावृत्त करावे? स्वतःची आई,सर्वांच्या डोळ्यासमोर चितेवर उडी घेऊन स्वतःला संपवून टाकणार ही कल्पनाच शिवराय करु शकत नव्हते. एखाद्या बालकाप्रमाणे आसवं गाळीत आईला विनवणी करीत होते. त्यांचे पाहून सारा राजगड माँसाहेबांना विनवीत होता"आईसाहेब, माँसाहेब, आम्हाला सोडून जाऊ नका. आमच्यासाठी नाही तर शिवरायांसाठी हा विचार सोडा. थांबा. थांबा जाऊ नका, माते जाऊ नकोस. स्वराज्य स्थापन करण्याचे तू घेतलेले व्रत, पाहिलेले स्वप्न असे अर्धवट सोडून जाऊ नको..." 

पण कुणाचेही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हती ती एक जिजाऊ होती. जिजाऊ जिथे बसल्या होत्या तिथे शिवराय गेले. त्यांनी सरळ स्वतःचे डोके माँसाहेबाच्या मांडीवर ठेवले. तो शूरवीर, महापराक्रमी, शत्रुच्या ह्रदयात धडकी भरवणारा शिवबा एखाद्या बालकाप्रमाणे आसवे गाळत, हात जोडून म्हणाला, "माँसाहेब, ऐका आमचे. एकदा ऐका. पिताश्री तर सोडून गेले. आता तुम्ही आम्हाला पोरके करु नका. आमचे कौतुक कोण करणार? शाबासकी कोण देणार? नाही. आईसाहेब, आम्ही तुम्हाला जाऊ देणार नाही. मुळीच नाही. माँ, तुम्ही मेणाहूनी मऊ असताना अशा वज्राहूनी कठीण कशा काय होऊ शकता?...." शिवरायांच्या अशा विनवणीचा काहीही परिणाम होत नाही हे पाहून शिवराय शेवटी म्हणाले,

"माँसाहेब, आमची शपथ आहे तुम्हाला. तुमचा निर्णय मागे घ्या. आम्हाला सोडून जाऊ नका." हे वाक्य मात्र माँसाहेबाच्या ह्रदयाला साद घालते झाले, जिजाऊंचे ह्रदय परिवर्तन करणारे ठरले. त्यांचे मन विरघळले. काही क्षणांपूर्वी कठोर वाटणाऱ्या जिजाऊंचे प्रेम उफाळून आले. त्यांनी स्वतःचा निर्णय बदलला. शिवराय जिंकले..... पुत्राने मातेसाठी केलेले आर्जव जिंकले...... स्वराज्यावरील काळे ढग पळून गेले. सर्वत्र शहाजी राजांच्या मृत्यूनंतर पसरलेले दुःख ताजे असले तरीही जिजाऊंच्या निर्णयामुळे ते दुःख काही प्रमाणात निश्चितच कमी झाले.... पतीच्या निधनाने व्याकूळ होणारी, सैरभैर होणारी, प्रथम सती जाण्याचा निर्णय घेणारी ती एक जिजाऊ होती आणि नंतर शिवरायांची करुण विनवणी ऐकून तो निर्णय मागे घेणारी ती एक जिजाऊ होती!

नागेश सू. शेवाळकर.

***

Rate & Review

harihar gothwad 6 months ago

Sambhaji Thete 6 months ago

Kaivalya Hagawane 6 months ago

Vaishali Katkar 6 months ago

Surekha 6 months ago