Pimpalya books and stories free download online pdf in Marathi

पिंपळ्या !

'जिंदगीमे क्या खाना तो -दम -खाना, और क्या करना तो -आराम -करना' हे नागूचे लाडके तत्व. कामाचा प्रचंड कंटाळा. खाऊन झोपणे. झोपेतून उठून पुन्हा खाणे. याच साठी तो जन्माला होता! नाग्या म्हणजे साक्षात आळस ! पण यालाही एक कारण होते.

नागूच्या घराण्याचा मूळ पुरुष खूप कर्तबगार होता. त्याच्या शौर्यावर खुश होऊन, कोण्या तरी राजाने त्याला पाच गावे ईनाम दिली होती. त्या मूळ पुरुषाने इतकी कर्तबगारी दाखवली कि, 'कर्तबगारीचा ' सगळा कोटा एकाच फटक्यात संपवून टाकला! मग नाईलाजाने, नन्तरच्या पिढ्यानी 'बसून खाल्ले '. ते हि काही पिढ्या चालून गेले. नव्या पिढ्या अधिक चतुर निपजल्या, त्यांनी 'विकून खायला' सुरवात केली! नागूच्या वडिलांनी नागूच्या 'रोटी ,कपड्या ' साठी पाच एकरचा तुकडा आणि 'मकान ' म्हणून एक दुमजली वाडा राखून ठेवला होता.' पाच गावे ते ओसाड पाच एकर! ' हि प्रगती अनोखी होती! इतक्या पिढ्यांचा आळस, नागूच्या जीन्स मध्ये उतरलेले होता. मग तो कसला कामधंदा करतोय? तरी मागच्या आळीतली वनमाला त्याच्यावर जीव टाकायची. 'नाग्या, शेती कर. आपण लग्न करू! सुखात राहू! म्हणायची'. तिच्या या प्रस्तावाला 'बघू कस काय जमतंय ते !' म्हणून तरुण नाग्या टाळायचा.
०००
गावाच्या दक्षिण बाजूला एक छोटासा डोंगर,डोंगर कसला एक मोठे पठार होते. लोक त्याला 'मेरूपर्वत! ' म्हणायचे. या मेरू पर्वताच्या मागच्या बाजूला, पायथ्याशी कसली तरी काळ्या डोम दगडाची उग्र मूर्ती, एका कातळाला टेकून ठेवलेली होती. हे ठिकाण 'वेताळाच ठाण ' म्हणून प्रसिद्ध (!) होते. नाग्या फावल्या वेळात, येथ असलेल्या पिंपळाच्या झाड खाली बिड्या पीत बसायचा. आत्ता हि तो, असाच निवांत उतरत्या उन्हात पिंपळा खाली बसला होता. आळशी लोकात एक अद्भुत क्रिएटीव्हीटी असते. हे लोक कायम शॉर्ट कट शोधात असतात आणि तो त्यांना बरेचदा मिळतोही! नाग्यात पण 'शॉर्ट कट ' इंस्टींगट होता. त्याचा प्रॉब्लेम होता, बिन कष्टाचे दोनवेळच्या जेवणाची सोय. ती वनमाला पण करू शकत होती पण, 'काय तरी कामधंदा कर' हि अट त्याला कशी पेलणार? पोपटवाला, नंदीबैल, पत्रिका, खड्याच्या अंगठ्या, गंडे -दोरे, देवाला नवस- सायास सगळे करून झालं. 'बिन हातपाय हलवता, पैसा ' कोणीच देईना! आता देवच देईना तर, काय भुताला मागावं? या विचारापाशी गणोबा थबकले. हातातली बिडी गाळून पडली. समोरच तर वेताळाच ठाण आहे. 'वेताळ ' म्हणजे भुतांचा राजा! त्यालाच साकडं घातलं तर?. तो ताड्कन उठला अन वेताळाच्या मूर्ती समोर जाऊन बसला. मेणचट दगडी दिव्यात अंगठ्या एव्हड्या जाडीची वात तेवत होती. तिची काजळी नाग्याने कपाळाला लावली. आजचा मुहूर्तपण झकास होता. शनी अमोश्या! नाग्याने डोळे झाकले. आणि वेताळाची प्रार्थना मनातल्या मनात सुरु केली.
"हे, समग्र भुतांच्या नरेशा! वेताळा! हे, सर्व प्रेतम्याच्या अधिपती! वेताळबाबा! माझ्या कामाचा कंटाळा काही आपल्या पासून लपून राहिलेला नाही! तेव्हा काहीही कष्ट न करता खाण्या -पिण्यासाठी, कपड्या -लत्या साठी मला पैसा मिळत राहील किंवा कोणीतरी मला कमवून देईल असा वर द्या!"
" नागोबा, तुझ्या स्तुतीने मी प्रसन्न झालोय! पण गधड्या, ' वर ' देव देतात! वेताळ नाही!" वेताळाने नाग्याच्या मनाशी संधान बांधले!
"मग, माझी समस्या कशी सुटणार?"
"माझे ऐक, शेतीचा तुकडा कसायला घे. त्या वनमाले बरोबर लग्न कर. सुखी होशील! त्या पोरीच्या पायात लक्ष्मी आहे! माझ्या नादी लागू नकोस! "
" मला नाय करायची, ती पावसा पाण्याची शेती! ते काय नाही! तुम्हीच माझी सोय करा!" प्रसन्न झालेल्या वेताळाची नाग्या पाठ सोडायला तयार नव्हता.
" ठीक! मला डायरेकट वर देता येत नाही! एखाद भूत तुझ्या मदतीला पाठवीन! पण परिणाची जवाबदारी तुझी राहील!" वेताळाने शब्द देऊन सम्पर्क तोडून टाकला. नाग्याने डोळे उघडले. रात्र झाली होती. दगडी दिवा विझला होता. नाग्या घरी जाऊन झोपी गेला.
०००
वेताळाच्या गोष्टीला दोन चार दिवस उलटून गेले होते, आणि नाग्या 'मनाचा खेळ ' समजून, ते विसरूनही गेला होता. सकाळी उठून नाग्या वाड्यासमोरच्या वसरीवर, दाताला मिश्री लावत बसला होता. तेव्हड्यात कुठूनतरी, येऊन एक काळ कुत्र त्यांचा समोरच्या पायरीवर ताठ बसलं. योगासन शिकवणारा दाडीवालाबाबा जसा 'विरासनात ' बसतो तस!
"मी ' पिंपळ्या '! मी एक भूत आहे! वेताळाने तुझ्या साठी पैसे कमवायला, मला डेप्युटेशनवर पाठवले आहे! " ते कुत्र बोलूलागलं! बापरे, म्हणजे वेताळबाबान आपला शब्द खरा केला तर?
"च्याआयला, मग दोन दिवस कुठं होतास?" नाग्याने विचारले .
"एक तर शिवी द्यायची नाही! वापस जाईल! दुसरं,' कुठं होतास काय? ' रिलिव्हर भुताला चार्ज दिल्या शिवाय माझी सुटका कशी होणार?! ते उशिरा आलं. तू जॉईन करून घेणार नसशील तर जातो परत! "
या भुताला पण राग येतो तर! हे सरकारी भूत दिलाय, त्यांचीच कारकुनी भाषा बोलतंय!
"आर, असं नको करुस! तो वेताळबाबा कसा बसा पावलाय! तू आपलं काम सुरु कर. "
"काम सुरु कर? हे तुमचं जग माणसाचं! इथं माणूस झाल्या शिवाय, मला पैसे कशें कमावता येणार? मला एक देह द्या! मग पैसे कमवायचं बघू!"
"ऑ! हे काय भलतंच! अन पैशे कमवायला देह कशाला? चार दोन किलो सोन, मोती, पोवळे आण कि!"
" एक तर' पैशे कमवायचे' हे कलम आहे! ते हि पोटा पुरते ! सोन, मोती, हिरे नाही! अन सोन, हिरे, मोती कशे आणणार? त्याला हात पाय पाहिजेतच कि!"
"मला पत्ता सांग मी आणतो! "
"डोकं आहे का? हिमालयात सोन आहे, आफ्रिकेत हिरे, समुद्राच्या तळाला मोती! कस आणणार तु ?अन समजा आणलंच तर, ते तू विकून पैसे करणार! तू असा बिनकामाचा. उद्या सरकारनं सोर्स ऑफ इन्कम विचारल्यावर काय सांगणार? अजून आधारकार्डाचा पत्या नाही, आणि म्हणं चार किलो सोन पाहिजे! "
"बापरे! हे माझ्या लक्षातच आलं नाही! "
"पैसा कमवायला जेजे लागत तेते तुझ्याकडून घेईन! आहे का कबूल?"
" हे आणि आता काय नवं? किती अटी घालणार आहेस? "
"हा, हे असच असत! तुमच्या साठी पैसा कमवायचा तर, साधन तुमचीच लागतील कि? पोळेवाली बाई लाटण घरून आणत नाही, पोळपाट लाटण तुमचं असत, तसेच हे हि! "
" सगळं कबूल! फक्त ते 'देहाचं ' तुझी तू मॅनेज कर! "
हे भूत माझं घेऊन घेऊन काय घेणार? वाड्यात थैमान घालील. घालू देत. भांडी कुंडी रात्री बेरात्री वाजविला, वाजवू दे. शेतात भुताटकी सुरु करेल. करुदेत. असा विचार नाग्याच्या मनात येऊन गेला.
"आता कस. सगळं कायदेशीर झाला! आत्ता पासून तु माझा मालक आणि मी तुमचा लिमिटेड नौकर! "
"लिमिटेड नौकर? हि काय नवी भानगड! "
"भानगड काही नाही. तुला पैसा दिला कि माझी बांधिलकी संपली! मग इतर वेळा मी कुठे जातो? काय करतो? याच्याशी तुला काही देणं घेणं असणार नाही! "
"बास आता! पळ! तो काय, तो 'देह ', तो मिळवं आणि कामाला लाग! नमनालाच घडाभर रक्त आटवलं !"नाग्या वैतागला होता.
"ठीक! बघतो कुठं मुडदा पडलाय का ते! चांगला ताजा पाहून घ्यावा लागेल! जून, वातड काय कामाचा ?"
तोंड खंगलायला आणलेल्या लोटक्यातल्यापाण्यासकट, नाग्याने लोटा फेकून मारला, तस तो काळा 'पिंपळ्या ' पळून गेला.
०००
अचानक एके दिवशी नाग्याचे दार वाजले. दारात जीन पॅन्ट, भडक हिरव्या रंगाचा टी शर्ट घातलेला उंचा पुरा तरुण उभा होता. त्याच्या हातात ट्रॅव्हल बॅग आणि डोळ्यावर गॉगल होता.
" कोण पाहिजे?"नाग्याने आश्चर्याने विचारले.
"कोण नाही! मी 'पिंपळ्या '! तुझा लिमिटेड नौकर! नवी बॉडी घेऊन आलोय! अचानक मेल हे कार्ट! मुजोर अन बदफैली होत, पण देह एकदम टणाटण! मेड इन पंजाब! "
नाग्या तोंडात बोट घालून पहातच राहिला. हे भूत? कोण विश्वास ठेवणार? तोवर पिंपळ्या घरात घुसला.
"आता मी येथेच रहाणार. वरच्या मजल्यावर! तू रहा खाली. तुला पायऱ्या चढायचा त्रासही होणार नाही. "
तो तरातरा वर निघून गेला.
०००
दुसरे दिवशी पिंपळ्या पैसे आणणार म्हणून नाग्या वाटच पहात होता. पिंपळ्याने मोजून साडे सदोतीस रुपये नाग्याच्या पुढ्यात टाकले!
" हे काय? इतकेच ?"नाग्याने विचाले .
" सरकारच्या मते एका जीवाला इतकेच पैसे लागतात! "
"करार कुणाशी झालाय? माझ्याशी कि सरकारशी! मला हवे तेव्हडे पैसे दे! "
"किती हवेत तुला?"पिंपळ्याने विचारले.
" मला महिना पाच हजार, नाहीतर दहा हज्जार दे, नको पन्नास हज्जार दे! " नाग्याने त्याला माहित असलेला मोठ्ठा आकडा सांगितला.
"पन्नास हजार महिन्याला बस!? "
"आता तरी बस! ज्यादा लागले तर सांगीन !"
"तस नाय जमायचं! आत्ताच सांग!"
"मग एक लाख दे, साल! रोज लखपती होईल!"
"ठीक पुढल्या महिन्या पासून तुझ्या बँक खात्यात लाख भर रुपये, दर महा जमा होत रहातील!"
पिंपळ्या निघून गेला.
०००
येणार जाणार 'पाहुणा ' कोण म्हणून नाग्याला विचारू लागला.
"चुलत भाऊ आहे. "
"पर तुमचं कुणी असलं असं वाटत नाही! तेचि उंची, रंग, वागणं वेगळंच दिसतंय! "
"असणारच ना! काय आमचा एक चुलता, लहानपणीची एका पंजाब्यांच्या वंटीत दत्तक गेलता! त्याचा हा पोरगा आहे!" नाग्याने दडपून सांगून टाकले. वनमालेने पण एकदा विचारले होते! दिवसे दिवस 'पिंगळ्या'ची कर्तबगारी बसल्याजागी नाग्याला ऐकू येऊ लागली. आज काय शेतात बोर घेतला. शेतात 'ग्रीन हाऊस 'ची तयारी सुरु झाली. काय तर बांधकाम चालु झालाय. आज जाऊ उद्या जाऊ करत नाग्याला काही जमेना. पिंपळ्याला विचारले तर 'तू फक्त महिना लाखाचा धनी, बाकी तुझा काही संबंध नाही!' हे ऐकवायचा!
०००
ठरल्या प्रमाणे पैसे खात्यात जमा होत होते. दिवसेन दिवस ते वाढतच होते! नाग्याला काहीच कष्ट पडत नव्हते.
तरी तो उदासच होता! का?
त्याच काय झालं कि एक दिवस सकाळी नाग्याला अंथरुणातून अगदीच उठावेना. अंग मोडून आलं होत. हाता -पायाला गोळे आले होते. गुडघे आखडले होते! तेव्हड्यात धाड -धाड जिना उतरत वनमाला वरच्या मजल्यावरून अली आणि बाहेर पळून गेली! नाग्या बेचैन झाला! वनमाला अन पिंपळ्या? तो कसाबसा उठून बसला. कमरेतून चमक निघाली. तसाच कमरेत वाकून तो जुन्या बिल्लोरी आरशा समोर उभा राहिला. त्याने आरशात पहिले आणि ----आणि त्याच्या पायाखालची जमीन हादरली! कसाबसा तोल सावरून, त्याने पुन्हा आरशात पहिले. तीनतीनदा पाहून खात्री करून घेतली. हो ते आरशातले प्रतिबिंब एका जख्खड म्हाताऱ्याचं होते! आणि ते त्याचेच होते! हि त्या हलकट भुताची करणी होती!
"पिंपळ्या!" तो कसा बसा ओरडला.
माडीवरून पिंपळ्या सावकाश खाली उतरला.
"तू मला हे काय केलंस?" रागाने नाग्याने विचारले.
"त्याच काय, मी आणलेल्या देहच आयुष्य संपलेलं होत. म्हणूनच तर मला तो मिळाला होता! सुरवातीला काही दिवस, तुझ्याच आयुष्याचे घेतले होते! आता कुठं रोज थोडे थोडे दिवस घायचे म्हणून आज मी तुझ्या वयाची फक्त पस्तीस वर्ष घेतलीत! साहजिकच तू पासष्टीत आलास!"थंड गार आवाजात पिंपळ्या म्हणाला. नाग्याच्या अंगावर सरसरून काटा आला.
"पण हे असलं काही ठरलं नव्हतं? हरामखोरा, तू माझं सगळं तारुण्याचं घेऊन टाकलास!"
"ठरलं कस नव्हतं? मला जे हवं ते घेईन, हि अट तू कबूल केली होतीस! आणि तसाही तुला तारुण्याचा काय उपयोग होता? ते ज्या साठी असत, त्यालाच तू तिलांजली दिलीस! तारुण्यात धमक असते ती वापरून 'श्रीमंती ', सन्मान कमवायचा असतो. या काळात श्रमाला, कष्टाला प्रतिष्ठा मिळत असते. इतरांना मदत करण्यासाठी तारुण्य झिजवायचं असते! अन तुला स्वतः साठी सुद्धा जागच हलायला तयार नव्हतास! तुला बसून खायचं आहे! असं बसून खाणाऱ्याजवळ तारुण्य टिकत नसत! आता तुला सांगतो, मी तुझा, तो 'पूर्वज 'आहे, ज्याने आपल्या कर्तबगारीवर पाच गाव ईनाम मिळवली होती! तुम्ही माझे वंशज नालायक निघालात! आज तुझ्याकडे खूप पैसे आहेत. जिवंत राहशील तोवर ते मिळतच राहतील! पण त्याचा उपभोग घेता येणार नाही! माणसानं 'श्रीमंत ' जगावं, तू -- तू 'श्रीमंत' मरणार! मी आता परतलोय, या माझ्या घराण्याला माझ्या कर्तबगारीने पुन्हा प्रतिष्ठा मिळवून देणार! मी आणि वनमाला लवकरच लग्न करणार आहोत, आणि शेतात बांधलेल्या फार्म हाऊस वर राहायला जाणार आहोत! तू बस या वाड्यात पैसे मोजत! एकटाच! भुतासारखा! मी भूत असून राहीन माणसा सारखा! "
०००
पिंपळ्या निघून गेला.
महिन्याला एक लाख रुपये मिळताहेत.
पण नाग्या मोजतोय ते, पैसे नाही, तर दिवस!
हताश पणे मरणाची वाट पहातोय!


सु र कुलकर्णी , आपल्या प्रतिक्रियांची वाट पहातोय . पुन्हा भेटूच . Bye !

Share

NEW REALESED