You are with me...! - 10 books and stories free download online pdf in Marathi

तू माझा सांगाती...! - 10

"काय झालं बाबा? तुम्ही इतके अस्वस्थ का आहात?" विक्टरने चिंतेने विचारले.
"क... काही नाही..." जनार्दन सारंग यांनी विषय टाळण्याचा प्रयत्न केला.
"तुम्ही खोटं बोलताय हे मला समजतंय. खरं सांगा काय झालंय?" विक्टरने जनार्दन सारंग यांना सांगण्यासाठी फोर्स केलं.
तसं जनार्दन सारंग यांनी विक्टरकडे पाहिलं. खूप वेळ अडवून ठेवला बांध फोडून त्यांच्या डोळ्यांतून आसवं ढळू लागली...
हे पाहून विक्टर पुढं झाला आणि बाजूला बसत त्याने जनार्दन सारंग यांना सावरण्याचा प्रयत्न केला.
"बाबा... शांत व्हा..." तो म्हणाला.
पण काही केल्या जनार्दन सारंग यांच्यातील शोक शांत होत नव्हता. विक्टरने मग त्यांना शांत करण्याचा अट्टहास सोडून मनसोक्त त्यांना रडू दिलं.
थोड्यावेळाने जनार्दन सारंग यांचे रडणे तर बंद झाले, पण कसला तरी ठाम निर्धार त्यांच्या चेहऱ्यावर विक्टरला दिसत होता.
"माझी बायको गेली!" जनार्दन सारंग विक्टरला म्हणाला.
विक्टर एक रोबोट असून चक्रावला. त्याला आज पर्यंत हेच माहीत होतं, की जनार्दन सारंग हे एकटेच राहत होते. मग त्यांची बायको कोठून आली?
त्याच्या चेहऱ्यावरचा तो गोंधळला भाव जनार्दन सारंग यांच्या लक्षात आला. मग त्यांनी विक्टर पासून लपवून राहिलेल्या काही गोष्टी उलगडण्यास सुरवात केली...
"मला मूल नको होतं. माझ्या विरुद्ध प्रणिशाला मुलांचा खूप लळा. पण मी माझ्या निर्णयावरून हटलो नाही. शेवटी ती नाराज होऊन निघून गेली. मी तिला मनवण्याचा खूप प्रयत्न केला, पण तिने माझं काही ऐकलं नाही. मग माझाही नाईलाज झाला. तिच्या निर्णयाचा मान राखण्याचं मी ठरवलं. शेवटी आम्ही वेगळे झालो.
"वेगळे झालो, पण ना तिने दुसऱ्या कोणाशी नंतर लग्न केलं, ना मी माझ्या आयुष्यात इतर कोणत्या स्त्रीला स्थान दिलं... दोघे एकमेकांसाठीच राहिलो, तरी एकमेकांपासून खूप दूर...
"मी हेकेखोरपणा केला, असं वाटेल तुला. पण लग्नाआधीच मी तिला माझा विचार क्लीअर केला होता. त्याला ती मान्य ही होती, पण नंतर तिला वाटू लागलं, की आमचं एखादं तरी अपत्य असावं. मला ते मान्य नव्हतं. का ते तुला मी सांगितलं आहेच.
"तू म्हणशील वेगळं होण्याचा त्यांचा निर्णय मी मान्य केला, त्यापेक्षा मुलाचा त्यांचा हट्ट मान्य केला असता, तर आम्ही एक राहिलो असतो. मग निर्णयाचा मानच राखायचा, तर त्यांच्या मुलाच्या निर्णयाचा मी मान का राखला नाही? हो ना?"
या प्रश्नाचे विक्टरने काहीच उत्तर दिलं नाही. त्याने उत्तर द्यावे यासाठी तो प्रश्न नव्हताच. विक्टर गंभीर बसून होता, जनार्दन सारंग यांना आधार देत...
"पण हे लक्षात घे, की आमचं वेगळं होणं, याचा परिणाम फक्त आमच्या आयुष्यावर झाला, पण जर आम्ही मूल जन्माला घातलं असतं, तर त्याचा परिणाम या समाजावर झाला असता. म्हणून मी तिचं ते म्हणणं मान्य केलं नाही. तुला अजूनही हे अतिशयोक्तीचं वाटत असेल, पण आपल्या पर्यावरणाची काळजी घेणं ही आपलीच जबाबदारी आहे हे अगदीच खरंय. माझ्या इच्छा-अपेक्षा पूर्तीसाठी मी एखाद्या जीवाला जन्म द्यावा हे माझ्या बुद्धीला पटत नाही. आणि आमचं त्यावर आमच्या लग्नाआधी बोलणंही झालं होतं. तरी तिने हट्ट धरला..."
"हो बाबा हो. शांत व्हा..."
थोडा वेळ गेल्यावर काही आठवल्यासारखं जनार्दन सारंग सनक आल्यासारखं ते विक्टरला बोलले,
"ती सोबत नाही, पण तिचं अस्तित्व होतं. म्हणून मीही जगत होतो. चिंतामुक्त, मनासारखं... पण आता तीच नाही. जगू कुणासाठी?"
"म... माझ्यासाठी!" विक्टर भावूक होऊन म्हणाला. इतका वेळ शांत ऐकून घेणार विक्टर क्षणाचाही विलंब न लावता म्हणाला.
"तू प्रिय आहेसच रे, पण... पण... आता जगणे शक्य नाही... अजिबात नाही..."
"असं का बोलताय बाबा... का?" विक्टर आवेगाने विचारत होता.
पण जनार्दन सारंग आपला विचार बदलायला तयार झाले नाहीत,
"ती परतेल या आशेवर मी जगत होतो. तिला मुलं हवं होतं. म्हणून मी तुझी निर्मिती करण्यासाठी ऑर्डर दिली. पण तिला... तिला जिवंत, हाडामांसाचंच मूल हवं आहे. जे आमचं असेल. आमच्या दोघांचं... तू आल्यावर मी तुझ्याबद्दल तिला कळवलं. वाटलं, ती परत येईल. पण नाही आली. आलं; ते तिचं उत्तर! की त्या लोखंडाला मी माझा मुलगा कसा मानू?
"माफ कर. तुला दुखवायचं नाही. पण हेच तिचं उत्तर होतं... तिचं ही बरोबरच आहे म्हणा..."
"म... म्हणजे?" विकटरच्या आवाजात थरथर होती...
विक्टरच्या प्रश्नावर जनार्दन सारंग यांनी त्याचा हात हातात घेतला.
"माझा स्पर्श जाणवतोय?" त्यांनी त्याला विचारलं.
"हो!"
"मलाही तुझा स्पर्श जाणवतोय. पण हा स्पर्श मानवी नाही!"
जनार्दन सारंग उठले. ते विक्टरला बाहेर त्यांनी लावलेल्या झाडांसमोर घेऊन आले.
जनार्दन सारंग व विक्टर दोघांनी मिळून वाढवलेल्या वनराईत दोघे उभे होते. त्यांनी विक्टरचा हात काही दीड-दोन वर्षांपूर्वी त्यांनी लावलेल्या आंब्याच्या झाडावर ठेवला. आणि स्वतःही ते झाड कुरवाळू लागले.
"माझा एकटेपणा सजीव जीवांच्या सानिध्यात जावा म्हणून मी झाडं लावली. पण विडंबन हे आहे, की झाडांचा, त्यावरील सजीव जीवांचा सजीव स्पर्श तर आहे, पण ते माझ्याशी बोलू शकत नाहीत. तू बोलू शकतोस, पण तुझा स्पर्श निर्जीव... दोन्हीची सांगड मी नाही घालू शकतो. मला वाटलं होतं, की मी हे करू शकेन... पण... पण नाही! आणि आता जगण्यासाठीची शेवटची प्रेरणाही संपली!"
म्हणत त्यांनी एका झटक्यात जवळील फावडे उचलले आणि एक जोरदार फटका त्यांनी विक्टरला मारला. आणि आवेशाने ते मग विक्टरवर एकावर एक वार करतच राहिले...
"बाबा... असं करू नका बाबा... दुखतंय... खूप वेदना होतायत बाबा..." विक्टर खाली पडून कळवळत होता....
पण जनार्दन सारंग काही थांबायला तयार नव्हते. ते चिडून विक्टरवर वार करतच राहिले...
एका अतिउच क्षणावर विक्टरला ही मग ते सर्व अनावर झालं आणि त्यानं गवतात पडलेला विळा घेऊन जनार्दन सारंग यांच्यावर वार केला. आणि तो पहिलाच वार नेमका त्याच्या जिव्हारी लागला. जनार्दन सारंग यांचा गळा चिरला गेला होता. आणि रक्त थांबता थांबत नव्हते...
अतीव वेदनांनी, पण कोणताही आवाज न करता तडफडत शांत होणार जनार्दन सारंग यांचा देह पाहत सुन्न होऊन विक्टर तेथेच उभा होता...
त्यालाही माहीत नाही किती वेळ...

.
.
.