Baji - A blood war - 7 books and stories free download online pdf in Marathi

वेदना - भाग-७

भाग ७ - वेदना

(प्रस्तुत ऐतिहासिक कथा शिवरायांच्या अन त्यांच्या वीर मावळ्यांच्या पराक्रमांवर आणि इतिहासातील सत्य घटनांना कल्पनेची जोड देऊन लिहिलेली आहे. काही चुका अथवा आक्षेपार्ह आढळल्यास निदर्शनास आणून द्यावे आणि अभिप्राय कळवावे हि विनंती.)

रात्रीचा पहिला प्रहर. सगळीकडे काळोख पसरला होता. पाऊसही थांबला होता. गार वारा सुटलेला होता. गडावर ठीक ठिकाणी असलेल्या मशाली फुरफुरत होत्या. सतत सात प्रहरांची पळापळ अन लढून दमलेले मावळे विश्राम गृहांमध्ये आराम घेत होते. राजेही त्यांच्या दालनात विश्राम करत होते. डोळ्यांची उघडझाप चालू होती, झोप मात्र येत नव्हती. बाजींच्या दालनात बाजी आपल्या पलंगावर तक्क्या गिरद्यांना रेलून बसले होते. पलंगाच्या डावीकडे असलेल्या झरोक्यातून येणाऱ्या वाऱ्यामुळे त्यांच्या दालनातील समयी डुलत होत्या, एखादी मधूनच विझून जायची अन दुसऱ्या क्षणी पेट घ्यायची. डोक्यात नाना तऱ्हेचे विचार चालू होते. फुलाजी अन त्याच्या मावळ्यांची अजूनही काही खबर नव्हती. मधूनच डोळ्यांच्या कडा अश्रूंच्या गर्दीनं भरून जायच्या अन पापण्या मिटल्या कि ते गालांवर ओघळायचे. थकलेलं शरीर कधी झोपेच्या अधीन झालं कळलंच नाही.

दिवसाचा दुसरा प्रहर. आकाश ढगाळलेलं होतं. अजूनही गडावर तुरळक ठिकाणी धुकं पसरलेलं दिसत होतं. मावळे आळोखेपिळोखे देत हालचाल करत होते. गडावर असलेल्या तलावाजवळ दहा पंधरा मोठमोठ्या भांड्यांमध्ये पाणी उकळत होतं. गरमागरम पाण्यानं अंघोळ करण्यासाठी अन थकलेल्या शरीराला आराम मिळण्यासाठी मावळ्यांची लगबग चालू होती. महाद्वाराच्या बुरुंजांवर मावळ्यांची गर्दी दाटली होती. काहीच वेळात राजे अन बाजीही तिथे पोहोचले. गडाखाली सिद्दी मसूदने सुर्वे अन दळवी यांच्या उरलेल्या हजार सैन्यासह गडाला वेढा घातला होता. यायच्या जायच्या सगळ्या वाटा बंद करून टाकल्या होत्या. पाच हजारांच्या आसपास शत्रू सेना असेल. आकाराने विशाल, बेलाग, दुर्गम, आजूबाजूला घनदाट अरण्य अन दऱ्या खोऱ्यांनी वेढलेल्या अशा अजिंक्य विशालगडाला वेढा घालणं सोपं नव्हतं. त्यामुळे संपूर्ण गड वेढणे अशक्यच. तरीही सिद्दी मसुदने चिकाटीने गडाला मोर्चे लावले होते. राजे, बाजी अन किल्लेदार तटबंदीवरून शत्रू सैन्याचे ठीक ठिकाणी पडलेले तळ पाहत होते.
राजे किल्लेदारांना उद्देशून म्हणाले, "गडावरून तोफा कधी डागल्या आहेत का?"
"न्हाय जी... कवा परसंगच न्हाई आला. आन, तुम्ही येणार म्हून खबर मिळाली, मंग तर काय सवालच नव्हता."
राजांनी दिर्घ श्वास घेतला अन, "हम्" म्हणाले.
तटबंदीवरून खाली चाललेली सगळी हालचाल स्पष्ट दिसत होती. राजांनी एकदा सगळा परिसर नजरेखालून घातला. सिद्दी मसुदने गडाला टाकलेला वेढा संपूर्णपणे तोफांच्या टप्प्यात होता.
राजांनी बाजींकडे पाहत विचारले, "बाजी, तुम्हाला काय वाटतं? उडवावेत काय तोफांचे बार.?"
"व्हय राज, म्या तर म्हणतो एकदमच द्या बत्ती सगळ्या तोफांना."
राजांनी काही विचार करून "हम्" म्हटलं.

दुसऱ्या दिवशी राजांनी जखम दरबारामध्ये मावळ्यांचा यथोचित सन्मान केला. सावजीला राजांनी स्वतः सोन्याचं कडं घातलं. बाजींना मानाची वस्त्र अन तलवार राजांनी स्वतः बहाल केली. मात्र, बाजी वेगळ्याच विचारत होते. राजांच्या चाणाक्ष नजरेनं हे केव्हाच ताडलं होतं.

फुलाजी घोडखिंडीत पडल्याची खबर रात्री उशिरा गडावर कळाली. गडावर शोककळा पसरली होती. घोडखिंडीतून वाचलेल्या काही मावळ्यांनी गजापूर गावात आसरा घेतला होता. त्यांनीच नंतर घोडखिंडीतून फुलाजींच्या देहाला गजापूर गावमध्ये आणुन अंत्यसंस्कार केला. राजांना अन बाजींना अतीव दुःख वेदना झाल्या.

राजे गडावर येऊन आता आठवडा उलटला होता. मावळ्यांच्या जखमा भरल्या होत्या. वैद्यांचे नियमित उपचार अन आराम करून आता मावळे तंदुरुस्त झाले होते. सदरेवर मसलती झडत होत्या. गडाला वेढा घालून बसलेल्या शत्रूवर कसा वार करायचा? योजना आखल्या जात होत्या. राजे, बाजी, किल्लेदार अन काही सरदार यांची चर्चा चालू होती. सदरेच्या मध्यभागी बाजी हात वरच्या दिशेने उगारून त्वेषाने राजांशी बोलत होते. राजे त्यांच्या आसनावर धीरगंभीर मुद्रा करून बसलेले होते. बाकीचे सरदार दोघांचं बोलणं चकित होऊन ऐकत होते. राजांनी त्यांचा उजवा हात कपाळाजवळ आणत बाजींचा दिशेने फेकत हलकेच हाताला झटका दिला. अन जरा त्रस्त स्वरात म्हणाले,
"बाजी... कशाला हे वेड धाडस? गडावर मुबलक दारुगोळा आहे. तोफांना बत्ती द्यायला अवकाश, तो मसूद दे माय धरणी ठाय करत बसेल."
बाजी मात्र हट्टालाच पेटलेले होते.
"न्हाय राजं... ह्या मसुदच्या नरडीचा घोट घेतल्याबिगर माझा आत्मा थंड न्हाय व्हनार."
काही केल्या बाजी ऐकेनात. शेवटी राजांना त्यांच्या मोठेपणाचा मान ठेवावा लागला.
"ठीक आहे बाजी. पण सांभाळून. जीव राखावा."
अन बाजींच्या या धाडसी योजनेला राजांना परवानगी द्यावी लागली.
"जी राजं... तुम्ही बिनघोर असा. आज त्या मसुदच मुंडकं उडवल्याबिगर राहणार न्हाय..", बाजींनी राजांना मुजरा केला अन राजांचा निरोप घेऊन सदरेवरून चालते झाले.

क्रमश:

"जय जिजाऊ"
"जय शिवराय"

(माहिती - वाचकांनी नोंद घ्यावी. ही कथा, निनाद बेडेकर यांच्या युट्यूब वरील शिवचरित्रातील बाजी प्रभू देशपांडे यांच्या प्रसंगावर लिहिलेली आहे. काही प्रसंग काल्पनिक आहेत. अधिक माहितीसाठी त्यांचे युट्युब वरील व्याख्यान ऐकावे ही नम्र विनंती. लिंक : https://youtu.be/_jEj6YYAOJQ)