Toch chandrama.. - 1 books and stories free download online pdf in Marathi

 तोच चंद्रमा.. - 1

तोच चंद्रमा..

मी आणि मोनामी दोघे आमच्या जायंट टेलिस्कोपमागे होतो.

"मोनू, ती बघ पृथ्वी.. अाणि आपले जुने घर.."

"बघू दे

. दिसतेय ना शाळा.."

"परत बघू माला.. हे माला .. तिते राह्यचा तू बाबा..?"

"हो. आणि त्या रस्ताच्या बाजूला बिल्डिंग आहे ना ती माझी शाळा.."

"मंजे, तू शाळेत पण जायचा.. मंजे तुला शंबरपर्यंत आकडे पण येतात बाबा?"

"हो गं मोनुली.. सोनुली रे काय बाबा..?"

"काय झाले.. अगं ते घर माझे.."

"तू टेलिस्कोप हलवलायस बाबा.. हा चांदोबा आहे..

आणि तितले एक घर दिसते माला.."

"हो गं छकुली.. "

"मंजे तू तिते पण राह्यचा.."

"हो गं मोनुली.. चांदोबा वरचे घर आहे ते.. दहा वर्षांपूर्वीचे.."

"पण मी नाही पाहिली ते? मी कदीच तिते नाही गेली?"

"नाही गं, मोनू, तू तेव्हा नव्हतीसच ना.. मग कशी जाणार?"

"तू असाच आहेस बाबा.. आईला घेऊन गेला पण मला नाही .. मी कट्टी आहे तुझ्याशी बाबा..पण मला घेऊन जाशील तिकडे.. पुथ्वीवर नि चंद्रावर .. आपल्या घरी? नाहीतर कट्टी मी.."

ती कट्टी घेत फुरंगटून बसली..

.. मी तिला काय सांगणार होतो?

*****

चंद्रावर ..

२५ डिसेंबर २१०१.

'मूनलाईट स्पेस सर्विसेसचे चांद्रयान एके ५१२१ चे कॅप्टन आणि क्रू आपले आभार मानत आहोत. लवकरच अापण गांधीनिवास चंद्रस्थानकावर उतरणार आहोत. आपल्या यानखुर्चीच्या पट्ट्या बांधून ठेवा. साॅफ्टलँडिंगच्या वेळी सर्वांनी खुर्चीवर बसून रहावे. कोणीही आपल्या सॅटेलाईट फोनवर पुढील सूचना मिळेपर्यंत बोलू नये. आशा आहे आपली यात्रा सुखद झाली असावी. पुढील चांद्रयात्रेसाठी आम्हाला संधी मिळावी अशी प्रार्थना आहे.'

मूनलाईट स्पेस सर्विसेस.. भारतातल्या अनेक चंद्र ते पृथ्वी यान सर्विसपैकी एक. म्हणजे गेली पंधरा वीस वर्षे रेग्युलर सेवा सुरू आहेत त्यांच्या. अनेक जण त्यानंतर अाले. आता रहदारी वाढलीय तशी. काही पर्यटन म्हणून जातात तर काही कामानिमित्त. भारतातल्या रियल इस्टेट किंमती परवडत नाहीशा झाल्या नि काही काॅर्पोरेट्सनी आपली आॅफिसेस चंद्रावर शिफ्ट केली. जाणे येणे पकडले वर्षातून एकदा तरी स्वस्त पडते ते. त्यात आता इंटरनेटचे जाळे अवकाशात पण उपलब्ध असल्याने फार कुठे जायची गरज नाही. अगदी क्षणार्धात कुठेही संपर्क .. आॅडिओ आणि व्हिडिओ देखील. इतका संपर्क तर पृथ्वीवरही नीट होत नाही. अवकाशात असल्याने अडथळे नाहीत. थोडा दिवसरात्रीचा गोंधळ सोडला तर चंद्रावरचे आॅफिस सगळ्यांना सोयीचे.

खूप वर्षांपूर्वी म्हणे असे चंद्रावर कुणी जात येत नसत. मध्ये एक जुना पेपर वाचला .. त्यात तर भारताचे चांद्रयान उतरता उतरता हरवले असले काही लिहिलेले त्यात. वर आम्ही हिंमत न हरता आमचे प्रयत्न सुरूच ठेवू असे कुणी शास्त्रज्ञ म्हणाला म्हणे! वाचावे ते नवलच. आता तर पृथ्वी नि चंद्रावर नियमित सेवा देणारी उड्डाण याने आहेत. मी आलो ते 'मूनलाईट ट्रॅव्हल्स' त्यात नंबर वन. बाकीपण आहेत काही. अगदी सरकारी 'स्पेस इंडिया' पण. मागे 'एअर इंडिया' नावाची सरकारी विमान कंपनी होती तशी. ती डुबली कधीच. आता स्पेस इंडिया शेवटच्या घटका मोजतेय म्हणे!

गमंत बघा ना.

दीडेकशे वर्षांपूर्वी म्हणे भारतातून अमेरिकेत पोहोचायला काही महिने लागायचे म्हणे ..बोटीत बसून. मग विमाने आली. तरी चोवीस तास लागायचे म्हणे अमेरीकेत जायला. आता सात आठ तासात अमेरिका.. वेग वाढला विमानांचा. झाले एवढेच की घर्षणामुळे विमानास होणारा अवरोध कमी केला म्हणे शास्त्रज्ञांनी. आजूबाजूस निर्वात पोकळी.. त्यातून वाट काढणारे विमान. त्यामुळे वेग वाढला म्हणे. हे फक्त ऐकून मी. शास्त्र नि माझा संबंध दूरदूरचा. मी थोडासा म्युझिशियन. गिटार वाजवणारा. आणि बाकी काॅमर्सचा विद्यार्थी मी. शास्त्रीय गोष्टी शिरत नाहीत डोक्यात लगेच. तर ते असू देत. सांगत त्या चांद्रयानाच्या वेगाबद्दल होतो. अगदी सुरूवातीला चांद्रयान म्हणे काही महिने घ्यायचे चंद्रावर पोहोचायला. पृथ्वीचे गुरूत्वाकर्षण भेदायलाच खूप वेळ लागायचा यानाला. मग अवकाशात झेप.. चाळीस लाख किलोमीटरचे अंतर. पुढे यातही प्रगती झाली. अवकाशात अवरोध नसल्याचा फायदा लक्षात आला शास्त्रज्ञांना. त्यामुळे सुपर ल्युमिनरी स्पीड मध्ये यान जास्तीत जास्त आठवड्यात चंद्रावर. हल्ली तर चार दिवस ही खूप काही यानांसाठी. मी आलो त्या यानाला मात्र सात दिवस लागले. तेवढया वेळेसाठी सारे प्रवासी एका ठिकाणी बसून होते. प्रत्येकाला दिवसात तीन चार वेळा दहा मिनिटे चालायला मिळायची. मग त्यात देहधर्म उरकून घ्या.. चालून घ्या.. नाहीतर पायाच्या रक्तवाहिन्यांत रक्ताच्या गुठळ्या होतात म्हणे. म्हणून तसे सारे आळीपाळीने उठत नि सांगितलेला व्यायाम करत. मी ही केला. अवकाशात त्या यानात जेवणही मोजकेच मिळायचे. ते पोटातला काही भाग भरायला उपयोगी पडले तरी भूक मी म्हणायची. पण इलाज नव्हताच. आठवडाभर जेमतेम पुरेल इतक्याच खाद्याचे वजन पेलवले त्या यानाला. कारण ही इकाॅनाॅमी सहल. एका राॅयल सहलीत पोटभर जेवण, एका यानात सहा किंवा आठ यात्री.. पण भाडे चौपट! त्या भाड्याहून हे अर्धपोटी राहणे परवडले.

शेवटचे साॅफ्ट लँडिंग तर भारी होते. आमच्या यानातून एक भाग सुटा झाला.. ज्यात आम्ही सारे होतो.. हलकेच तो भाग गाडी चालावी तसा चार चाकांवर उतरला. आणि समोरच्या रनवे वर हळूहळू उतरत थांबला. फार पूर्वी म्हणे हाच भाग जमायचा नाही शास्त्रज्ञांना. पण आता हे रूटिन झाले असावे. कारण आम्ही उतरलो तर पोटातील पाणीही नाही हलले. पाणी म्हटले मी, कारण पोटात खरोखर फक्त पाणीच होते!

आम्ही सारे प्रवासी घडीचे उतरलो. ते 'इंडिया मून स्पेस स्टेशन' होते. आजूबाजूला कडक थंडी. यानाच्या सुट्या भागातून बाहेर पडल्यावर गुरूत्वाकर्षणाच्या अभावाने चालणे थोडे कठीण. पृथ्वीवर चंद्रावर चालणे शिकवण्याचे सिम्युलेशन क्लासेस सुरू होऊनही आता दहा वर्षे झालीत. तीन महिन्याचे कम्पलसरी ट्रेनिंग. काही त्यात चालूबाजी करून खोटे सर्टिफिकेट मिळवतात आपल्या देशाला शोभेल असे.. पण मी मात्र तो कोर्स सीरियसली केलेला. शिकलेलो ते आठवले नि तरंगत चालू लागलो. स्पेस स्टेशनपासून काही अंतरावर पार्किंग मध्ये आई बाबा आलेले.

चंद्रावर उतरल्याने अंग शहारले होते. 'चांदोबा चांदोबा भागलास का..' नि 'चंद्र होता साक्षीला' असली गाणी गुणगुणत निघालो. तरंगत! हिंदी सिनेमात अशा वेळी हीरो ला कुणी तरूणी भेटते.. मग चंद्र होता साक्षीला म्हणत त्यांची स्टोरी घडते.. वा घडवली जाते!

मला कुणी इथे भेटेल का?

वयाच्या पंचविशीत तसे काही वाटणे स्वाभाविकच होते! अर्थात तसे काही घडणे या चंद्रभूमीवर अशक्यच होते म्हणा!