Toch chandrama - 2 books and stories free download online pdf in Marathi

तोच चंद्रमा.. - 2

मामाच्या गावाला!

आमचे साॅफ्ट लँडिंग झाले ते इंडिया मून स्टेशन होते.. गांधीनिवास नावाचे.. इंडिया मून म्हणायचे कारण असे पाच सहा देश अजून आहेत ज्यांची अशी अवकाश स्थानके आहेत. ती त्या त्या देशाच्या नावे ओळखली जातात. म्हणजे चीनचे 'चायना मून' तर युएसएचे 'मून अमेरिका' .. जपानी 'मून जापान' वगैरे. सुरक्षा व्यवस्था अगदी कडक आहे इथे. कुणी कुठल्याही देशात जाण्यासाठी स्पेस व्हिसा अाहे. पण तो इकडे चंद्रावर आल्यावर. तिकडून डायरेक्ट इतर देशात जायला परवानगी नाही. अर्थात पृथ्वीप्रमाणे भरमसाट देश नाहीत इथे हे खरे. लोकवस्ती हल्ली वाढलीय पण पृथ्वीइतकी नाही. फक्त चंद्रावर कित्येक खनिजे इतकी मुबलक नि स्वस्तात नि जास्त कुठल्या देशांशी स्पर्धा न करता मिळाल्याने चंद्रावर आपल्या वसाहती स्थापन करण्याची नवनवीन देशांत पृथ्वीवर अहमहमिका चालते. तरीही इथल्या वातावरणात काही थोडेच देश तग धरून आहेत इकडे. त्यांनी इकडे आपल्या वसाहती वसवल्या आहेत. मग त्यात सरकारी नि खाजगी आॅफिसेस आली नि त्यामागोमाग लोकवस्ती आली. विविध देश आहेत इकडे आणि ते एकमेकांशी सहकार्य करत असले तरी लोक जिथून तिथून सारखेच. कारण हल्लीच मून अमेरिका आणि चायना मून मध्ये चकमकीच्या झाल्याच्या बातम्या आलेल्यात म्हणे इथे! कुठेही जा लोक भांडणं काही सोडत नाहीत! आता बातम्या म्हटले मी म्हणजे इथे वृत्तपत्रे आली.. टीव्ही स्टेशन आले.. सारे आले इथे. शेवटी काय कर्ता करविता तोच माणूस .. पृथ्वीवरूनच तर आलेला. कुठल्याही ग्रहाला पृथ्वीसारखाच करेल नाही तर काय? आणि असेही चंद्र उपग्रहच आहे पृथ्वीचा.. त्यामुळे तर अजूनच! तर इथे पृथ्वीवरचे सारे आले आहे. फक्त ते गुरूत्वाकर्षण सोडून. मला खात्री आहे, कमी गुरूत्वाकर्षणाचा अडथळा दूर करून व्यवस्थित चालण्यासाठी काहीतरी उपाय निघेलच काही वर्षांत.. मग तेव्हा लोक म्हणतील, विश्वास बसत नाही आपण असे तरंगत चालायचो तेव्हा!

गांधीनिवास स्टेशनवर आई नि बाबा हजर होते घ्यायला. दोघांच्याही अंगात तोच स्पेस सूट. बाबा बिचारे यान स्वतः चालवत आलेले.. हो यानच! गाडी चारचाकी झटकन चालत नाही इथे. तो यानाचा भाग त्याच्या अंगभूत वेगाने लँड झाला म्हणून चालतो, तसे काही बाकी गाड्यांना नाही शक्य होत. तेथे यानच उडवावे लागते. बाबांनी स्वतः शिकून घेतलेले ते.

त्यांना इथे येऊन चार वर्षे झाली. सरकारी नोकरी. बदलीची. इथे आले तेव्हा खास चंद्र रहिवास भत्ता मिळायला लागला त्यांना. तीन एक वर्षे राहून मागच्या वर्षी आलेले घरी. म्हणजे पृथ्वीवर. आज वर्षानंतर त्यांना भेटत होतो त्यांना मी.. तशी नोकरी चांगली होती, फक्त चंद्रावर अजून पर्यंत तितकीशी वस्ती नसल्यामुळे थोडे एकटेपण जाणवायचे त्यांना. म्हणून मग मध्ये आई इकडेच येऊन सेटल झालेली. रोज रात्री मला सॅटेलाईट फोन यायचा त्यांचा. हल्ली हल्ली तर व्हिडिओ काॅल पण. आणि आज मी प्रत्यक्ष येऊन पोहोचलो होतो इथे. गाडी चालत नाही त्यावर उपाय म्हणून हे लोकल यान चालवतात सारे इथे. लवकरच चांद्रभारत सरकार तिथे सरकारी याने सुरू करणार होते, पब्लिक ट्रान्सपोर्ट म्हणून. पण तोवर फक्त ही खाजगी याने चालताहेत.

मला पाहताच आई म्हणाली, "किती वाळलास रे!" वाळलो वगैरे काही नव्हतो मी, पण हे हृदय कसे आईचे, आणि काय! असेही माझा स्पेस सूट म्हणजे अंगापेक्षा बोंगा मोठा! त्यात मी वाळलेला कसा दिसलो असेन? एक शक्य आहे.. चंद्रावर वजन एक षष्ठ्यांश कमी भरते म्हणे.. त्यामुळे असेल कदाचित! बाबा म्हणाले, "अरे पोहोचलास नीट. फक्त तो प्रवासाचा आठवडा म्हणजे कंटाळा येतो. बाहेर काहीच दिसत नाही. तरी हल्ली बरोबर काही प्रवासी तरी असतात, मी आलो प्रथम तेव्हा एकटाच.. तेही एक महिना लागलेला तेव्हा. वेड लागायची पाळी येते. पण इथे आल्यावर बरे वाटते एकदम!"

मला आमच्या अंबरनाथच्या मोठ्या घराची आठवण झाली. जाता येता ट्रेन मध्ये पिट्ट्या पडायचा आमचा.. पण एकदा पोहोचलो की सगळी हिरवाई, सुंदर रस्ते नि अगदी कृत्रिम तळी त्यातल्या खऱ्या

खुऱ्या बदकांसकट! आलो की प्रवास विसरायला व्हायचा तसेच हे सारे! चंद्रावर आलो की शीण गायब! अंधार होता, त्यामुळे नीट दिसत नव्हते आजूबाजूला. पण इथे येण्याचा आनंदच मोठा होता. यानात बसून निघालो आम्ही. सवयीप्रमाणे असावे, बाबा म्हणाले, "अंबर, पट्टा बांध रे.. इट्स मँडेटरी!" मी बाहेर ट्रॅफिक पोलिस आहे का पाहात होतो, बाबांना कळले असावे, म्हणाले, "पोलिस नाही रे.. पण अरे पट्टा बांधल्याशिवाय हे यान सुरूच नाही होत! आपल्याकडेही हे करता येईल पण मग नियम मोडल्याबद्दल दंड कसा करणार नि त्याबदल्यात मांडवली कशी करणार?"

पट्टा बांधण्याबद्दल बाबांनी तोंडाचा पट्टा सोडलेला अगदी! बहुधा सगळीकडे उलट असते, आई बोल बोल बोलते नि वडील मितभाषी असतात.. आमच्याकडे अगदी उलट! बाबांच्यापेक्षा आईचा वर्ड आऊटपुट पंचवीस टक्के असावा!

बाबा बोलत होते.. यानाला अाॅटो पायलट मोडवर टाकून. यानात पत्ता टाकला की ते आपोआप तिथे पोहोचते. फक्त सुरू करणे नि बंद करणे इतकेच काम पायलटला. त्यामुळे बाबा बोलत होते नि मी ऐकत होतो.

"इथे सारे काही आहे बघ. आता तर आपले लोकही आलेत. टीव्ही आहे, सॅटेलाईट रेडिओ नि फोन आहेत. फक्त रहाण्याची पद्धत वेगळी. बाहेर असताना हा सूट फक्त स्पेशल बाथरूममध्येच उतरवायचा. नाहीतर घराच्या अात."

मला ऐकून माहिती असलेलेच बाबा ऐकवत होते. त्यांची सरकारी वसाहत थोडी दूर असावी. कारण बऱ्यापैकी वेळ लागला यानाला.

"इतके दूर आहे घर बाबा?"

"अरे, स्पेस स्टेशन वस्तीपासून दूरच असते. किमान दहा किलोमीटर. पोहोचूच आपण. सरकारी वसाहत आहे. ती अजूनच लांब आहे. तशा प्रायव्हेट वसाहती होताहेत इथे. आपल्याकडचे लोढा नि गुंदेचा यांच्या प्रायव्हेट वसाहतींची कामे चाललीयेत इथे.."

बाबा बोलत होते..

चंद्राबद्दल काय काय ऐकलेले. लहानपणी चंदामामा म्हणायचो त्या मामाच्या गावाला प्रत्यक्षात मी पोहोचलेलो.. म्हणजे आईच्या माहेरीस की! म्हणून असेल गेल्यावर्षी अाई इथे यायला तयार झाली की काय सहज?

आणि आज मी इथे? माझाच माझ्यावर विश्वास बसत नव्हता.