Manachya vaatevarti Avyakt to an mi - 2 in Marathi Fiction Stories by अनु... books and stories PDF | मनाच्या वाटेवरती... अव्यक्त तो अन मी... - 2

मनाच्या वाटेवरती... अव्यक्त तो अन मी... - 2

पुढे....

माझ्या मनातली उलथापालथ मी कुण्णाला काय कुण्णालाच सांगू शकत नव्हती...एक तर ते वय असं होतं की कुणी समजून घेईल याची शाश्वती नव्हती...ताईला किंवा घरी सांगणं तर अशक्यच..!! आणि मैत्रिणींना सांगणं म्हणजे या ' आ बैल मुझे मार ' ही गत झाली असती...त्यांनी चिडवून चिडवूनच जीव घेतला असता...आणि ज्याला सांगावं वाटत होतं त्याला सांगायची हिम्मत होत नव्हती... सांगणं तर दूर त्या प्रसंगानंतर माझी अतुल कडे बघायची हिम्मत होत नव्हती...शेवटपर्यंत त्याला जे सांगायचं होतं ते बोलूच शकली नाही..हां, तो मात्र शेवटच्या भेटीला असं काही बोलून गेला की ते बाणासारखं टोचलं मला...काय बोलला होता तो..अम्म्मम.. हां.. आठवलं...

बिछड के फिर मिलेंगे कितना यकीन था।
बेनाम ही सही पर गजब का रिश्ता था।

हेच.... जेंव्हा तो बोलला की 'रिश्ता था' त्याक्षणी माझ्या सगळ्या आशा मरून गेल्या...पण मग मी एकटीच होती का त्या नात्यात??? तो नव्हताच का कधी??? त्यालाच माहीत...पण जर तो नसता तर त्याच्या डोळ्यांत मला का नेहमी माझंच चित्र दिसायचं...???

त्यादिवशी त्याच्या घरून आल्यावर मी कितीतरी वेळ माझ्या हाताला पकडून बसली होती...वारंवार माझ्या डाव्या हाताच्या मनगटाला स्पर्श करत होती आणि लगेच माझ्या हृदयाचे ठोके वाढायचे...अरे!! असं काय होतंय मला, स्वतःशीस विचार यायचा...बास्सस...आता सहन होत नव्हतं...त्यामुळे विचार केला आता जितके दिवस ताईकडे आहे, मी, ना त्याच्याकडे जाणार, ना त्याच्याकडे बघणार...आणि हीच खूणगाठ बांधून मी त्याच्यासमोर येण्याचं टाळत होती...

दोनतीन वेळा तो ताईकडे येऊन गेला, पण मी मात्र बाहेर निघाली नाही...एकदा तर तो आणि रश्मी खेळत होते तेंव्हा त्याने गुपचूप रशूला विचारलं ही की तुझी माऊ कुठे गेली... मी दरवाज्या आडून सगळं ऐकत होती..आनंद ही झाला की तो मला शोधत आहे पण एक अनामिक भीती ही वाटून गेली की का त्यालाही मी त्याच्या डोळ्यांसमोर हवीये....??

आठवडा झाला होता त्या प्रसंगानंतर जे आम्ही एकमेकांना पाहिलं नव्हतं... उन्हाळ्याचे दिवस होते, त्यामुळे भरदुपारी सगळे आपापल्या खोलीत आराम करायचे...ताई सुध्दा तिच्या रूम मध्ये आराम करत होती, पण रश्मी माझ्याच रूममध्ये असायची...त्यादिवशी आम्ही दोघीही आमरस खाऊन पेंगायला लागलो होतो...मी चादर अंगावर घेतली आणि तोंडावर उशी ठेवून मला झोप कधी लागली काही कळलं नाही...तो पर्यंत रश्मी मॅडम तिच्या आईकडे पसार झाल्या होत्या मला न सांगता...अचानक कोणीतरी येऊन माझ्या उजव्या हाताला चिमटा काढला आणि बोलला,

"ये...लाडू बाई किती झोपशील उठ ना...चल मस्ती करू.."

हा आवाज अतुल चा होता, त्याला वाटलं रश्मी आहे पण त्याच्या चिमट्याने मी घाबरून तोंडावरची उशी बाजूला फेकली आणि घाबरून ताडकन उठली, तिथून धाव घेणार तोच चादरीत माझा पाय अडकला, मला पडताना वाचवण्यासाठी अतुल ने हात दिला तर त्याचाही तोल गेला आणि आम्ही दोघेही धपकन पलंगावर आदळलो...वेगळ्याच मनस्थितीत अडकलो होतो दोघेही.. माझ्यावर त्याने एक नजर टाकली आणि मला त्याच्या डोळ्यांत मीच दिसली...पण त्याने लगेच नजर वळवली आणि एका सेकंदात उठून उभा राहिला...मला तर घामच सुटला होता...त्याने आता माझ्याकडे एकदाही नजर न टाकता बोलला...

"स...सॉरी..मला वाटलं तू रशु...म्हणजे ते मी....सॉरी...."

आणि तो पटकन निघून गेला, पण त्याचे अडखळलेले शब्द सांगत होतो की त्याची अवस्था माझ्यापेक्षा वेगळी नाही...एक तर आधीच मी त्याला टाळण्याचा प्रयत्न करत होती आणि त्यात पुन्हा आज हे असं घडलं...मी तर डोक्यालाच हात मारून घेतला...मला इतकं अवघडल्यासारखं होत होतं, आता मी अतुलला तर काय स्वतःचा चेहरा ही आरशात बघताना लाज वाटायची...अरे देवा..!! हे काय होतंय माझ्यासोबत...मग स्वतःलाच सावरायची की काही नाही झालं, सगळं ठीक आहे....

आता दोन दिवस झाले होते मी काही रूममधून जास्त बाहेर निघाली नव्हती... सतत कंटाळा येतोय, बरं वाटत नाहीये असे उगीचेच खोटे बहाने मी करायला लागली...पण एकदा ताई मला जबरदस्ती करून बाहेर घेऊनच गेली, मला माहित होतं की ताई बाहेर कुठे गेली म्हणजे रस्त्यात एक चक्कर तिची अतुलच्या घरी नक्की होणार...पण आता माझे खोटे बहाने ही तिने ओळखले होते, त्यामुळे उगाच तिला काही संशय यायला नको म्हणून मी तिच्यासोबत जाण्यास तयार झाली...आणि अपेक्षेप्रमाणे ताई अतुलकडेच गेली... आता बायकांच्या गप्पा सुरु झाल्या तर साक्षात परमेश्वर ही त्यात आडकाठी आणू शकत नाही, तर माझी काही हिम्मत...!!! मला तिथे फार बोर व्हायला लागलं होतं पण कुठे जाऊही शकत नव्हती... आता संध्याकाळी खूप उशीर झाल्यावर आमच्या ताईसाहेबांना आठवलं की तिने भाज्या घेतल्याच नाही...त्यावर तिने लगेच एका कागदावर लिस्ट बनवली आणि माझ्या हातात दिली...मला बाहेर जाण्याची संधी मिळाली आणि मला आनंद झाला की यांच्या गप्पांमधून मला सुटका मिळाली...मी ताडकन उठून उभी झाली जाण्यासाठी तर लगेच अतुलच्या आईने बॉम्ब टाकला की एकटी मुलगी कुठे जाईल?? कोणीतरी सोबत जायला हवं आणि सोबतही कोणाची तर अतुलची..!! व्वा...!! म्हणजे मी जाच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत होती ते काही केल्या माझ्यापासून दूर होण्याच्या तयारीत नव्हतं..अतुलच्या आईने त्याला आवाज दिला आणि त्याला जेंव्हा हे सांगितलं, त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बघण्यासारखे होते...तो भांबावलेल्या अवस्थेत बोलला,

"कक्क..काय?? म..मम्मी...?? पण मला काम आहे जरा.. मी नाही जा..."

"जास्त नखरे नको करू रे...जा गुपचूप...ती एकटी जाईल का बिचारी?? काय अडचण आहे तुला???"
आणि अतुलच्या आईने त्याचं वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच फर्मान सोडला आणि आईचा आदेश म्हणजे सुप्रीम कोर्टचा अंतिम निर्णय...!! आता त्यांना कोण सांगणार की अडचण आम्हाला नाही आमच्या आतमध्ये असलेल्या मनाची आहे...त्यामुळे आम्ही निमुटपणे निघालो... तसं मार्केट काही जास्त लांब नव्हतं घरापासून, त्यामुळे पायीच निघालो...भाज्या घेऊन झाल्या पण आम्ही एकमेकांशी एक शब्दही बोललो नव्हतो...परत येताना तो पुढे आणि मी त्याच्या दोन पाऊलं मागे होती...माझं सगळं लक्ष त्याच्यावरच होतं, एक मन बोलत होतं की त्याच्यावरून नजरच हटवू नये, असंच बघत बसावं तर एकीकडे भीती ही वाटायची आणि याच विचारात रस्त्यातले खड्डे न बघता मी माझा पाय मुरगाळून घेतला...इतक्या तीव्र वेदना झाल्या...लगेच अतुलने माझा हात पकडून रस्त्याच्या बाजूला एक बेंचवर बसवलं आणि अतिशय काळजीने बोलला,

"अग... लक्ष कुठे होतं तुझं??? जास्त दुखतंय का??? अशी कशी ग तू?? जरा बघून चालायचं ना..."

त्याची इतक्या काळजीने चौकशी करणं मला अजूनच त्याच्यात गुंतवत होतं, तो बोलत होता आणि मी भान हरवून त्याला बघण्यात गुंग होती...त्याला काय सांगू कुठे लक्ष होतं माझं?? काय सांगू त्याला की तुझ्याशिवाय मला आजूबाजूला काहीच दिसत नाही, तर तो खड्डा मेला कुठून दिसणार... आणि जेंव्हा त्याने एक चुटकी वाजवली तेंव्हा मला माझ्याच मुर्खपणावर राग आला...

"काय??? काय विचारात आहेस??? जायचं का घरी???"

मला तर काही सुचतच नव्हतं बोलायला, तोंडातून फक्त 'हम्म' निघालं...त्याने मला हात दिला आणि हळूहळू आम्ही घरी पोहोचलो... मला नीट चालता येत नाही म्हणून सगळेच्या सगळे आम्हाला विचारपूस करायला लागले की हे कसं झालं वैगरे...पण उत्तर दोघांकडेही नव्हतं आणि अतुल ला तर बिचाऱ्याला उगाच बोलणे खावे लागले की त्याने लक्ष दिलं नाही माझ्याकडे...पण ते बोलणं त्याच्याही कानापर्यंत पोचत नसावं कारण त्याचं तर सगळं लक्ष माझ्याकडे होतं...
******************
दुसऱ्या दिवशी चेतन आला...चेतन..ताईचा सख्ख्या दिर आणि अतुलचा चुलत भाऊ...तो मेडिकल च्या फर्स्ट इयर ला होता... त्याचं नेहमी आमच्या कडे येणं व्हायचं त्यामुळे तो माझा खूप चांगला मित्र ही बनला होता...काही अडचण असेल किंवा अभ्यासात मी कुठे कमी पडत असेल तर समजून सांगायचा अगदी मोठ्या भावाप्रमाणे... तो आल्यावर मलाही खूप चांगलं वाटलं...

आता चेतन आल्यापासून तर तो मी अन रश्मी म्हणजे फुल्ल थ्री धम्माल होती...दोन दिवसांनंतर माझा पाय बरा होता आता...त्यादिवशी घरी येताना अतुलने माझ्या जवळ येऊन विचारालं होतं मला कसं वाटतंय म्हणून, पण ताई लगेच आली आणि माझ्या चेहऱ्यावर तिला कोणतेही अपरिचीत भाव दिसू नये म्हणून मी अतुलला काहीही उत्तर न देता, त्याला साफ दुर्लक्षित करून आली होती...पण त्याला वाईट वाटलं असेल का या विचाराने मला मात्र झोप नव्हती...दोन दिवस झाले होते तो पण ताईकडे आला नव्हता...त्यादिवशी चेतन मला चिडवत होता आणि मी त्याला मारायला त्याच्या मागे घरभर धावत होती...आणि अचानक अतुल आला समोरून...त्याला बघून मला काय झालं काय माहीत पण लगेच 'सावधान' अवस्थेत गेली आणि एकदम शांतपणे उभी राहिली...पण चेतनचं मला चिडवणं, माझी वेणी ओढणं काही बंद होत नव्हतं.... अतुलच्या चेहऱ्यावर मात्र गंभीर भाव होते...असं वाटत होतं की कदाचित त्याला माझी आणि चेतनची ही जवळीक बरी वाटत नाही...मला कळत नव्हतं त्याला अचानक काय झालं...चेतनचं लक्ष त्याच्याकडे गेलं, तो बोलला,

"अरे..अतुल..तू कधी आलास??"

"जेंव्हा तुम्ही एकमेकांमध्ये गुंग होतात...अम्म्म म्हणजे, रशु अन तू मस्ती करत होते वाटते..."
माझ्यावर एक तिरकस नजर टाकत बोलला तो...मला मात्र त्याचं वागणं भरपूर काही सांगून गेलं...आम्ही एकमेकांनाच बघत होतो, तेवढ्यात चेतन माझ्याकडे हात दाखवत बोलला पुन्हा बोलला,

"रशु कुठे...हीच आहे तिच्यापेक्षा लहान...बाईसाहेबांचा पाय मुरगळला होता म्हणे, वाटतं का हिला पाहून..हाहाहा..." आणि तो हसायला लागला...

"हो, तू आल्यावर पाय बराच झाला..म्हणजे तू डॉक्टर होणार आहेस ना...ठीक आहे, चालू द्या तुमचं..मी येतो.."

"अरे, आताच तर आलास.. आणि निघालास ही?? काय झालं???"

"अरे, काही नाही, एक काम आठवलं...." आणि असं बोलून अतुल निघून गेला...

"याला काय झालं अचानक??" चेतन माझ्याकडे बघून बोलला, पण त्याला काय झालं हे आता मलाही अनाकलनीय होतं..आणि आमच्यात काय सुरुये हे सहन ही होतं नव्हतं आणि कोणाला सांगता ही येत नव्हतं...
आमच्यातला ह्या नजरे नजरेतल्या खेळाला मात्र आता चांगलाच बहर चढत होता...
*******************

क्रमशः


Rate & Review

Aishwarya Gosavi

Aishwarya Gosavi 9 months ago

Samir Ahire

Samir Ahire 1 year ago

Vaishali Kamble
Arati

Arati 1 year ago

Share