Manachya vaatevarti Avyakt to an mi - 1 books and stories free download online pdf in Marathi

मनाच्या वाटेवरती... अव्यक्त तो अन मी... - 1

आयुष्य म्हणजे नेमकं काय असावं??? कोणी म्हणतं जीवन आणि मृत्यू यांच्यातील द्वंद म्हणजे आयुष्य...!! कोणी बोलतं, अपूर्ण असलेल्या स्वप्नांचा मागोवा घेऊन त्यांना पूर्णत्वास घेऊन जाणं म्हणजे आयुष्य तर कोणाचं हे मत आहे की अपेक्षा भंग झाला असूनही ज्याला सुख आणि समाधान मिळवता येतं ते आयुष्य....!!! प्रत्येकाची व्याख्या वेगळी...ज्याला जो अनुभव आला, जी समज आली, त्याने तसं रूप दिलं आयुष्याला.... पण मला काय वाटतं माहीत आहे??? मला वाटतं आयुष्य म्हणजे एक पुस्तक, एक कादंबरीच....त्या कादंबरीचं एक एक पान उलटत जावं आणि तसा तसा एक एक धडा समोर यावा अन तसे आयुष्यातले दिवस पालटत जातात....आता ह्या कादंबरीत बऱ्याच ओळी, बरेच पात्र असे असतात जे अधोरेखित होतात...काही मागची पानं अशी असतात की आपण पुढे जात असताना सुद्धा त्यांचा आशय आपला पिछा सोडत नाही...

सहज सगळं विसरावं अशी सहज नसतात ना मागची पानं....आणि सहज नसतात त्या पानांवरची ती पात्र ज्यांना मागे सोडून आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करतो...ते पात्र असे काही खास होऊन जातात की आपण कितीही पुढे निघून आलो तरी त्यांच आपल्या आयुष्यातील वलय कमी होत नाही...त्यांच्यासाठी भलेही आपल्या भावना कितीही प्रामाणिक किंवा परिपक्व असल्या तरी काही कारणास्तव 'अव्यक्त' राहून जातात आणि आपण आयुष्यभरासाठी ती सल सतत आपल्या मनाला टोचत राहते...सगळ्यांच्या आयुष्याच्या कादंबरीत असं एक विशेष पात्र नक्की असते ज्यांच्यासाठी आपल्या भावनांना शब्दांच्या रुपात जन्म घेताच येत नाही...मी पण दुर्भाग्याने त्या भावना मनात घेऊन फिरत आहे गेली कित्येक वर्षे...पण ज्याच्यासाठी त्या भावना होत्या, किंबहुना आजही आहेत तोच आयुष्यात नाही तर त्यांना बाहेर तरी का पडू द्यावं असं वाटते...पण आज आता जरी तो आयुष्यात नव्हता, तरी भविष्यात काय होईल याची कल्पना कोणाला असते???

भावनांच्या आणि 'त्याच्या' विचारांच्या गर्तेत कुठेतरी हरवलेली असताना टाळ्यांचा गडगडाट झाला आणि झोपेतून जागी व्हावी तशी मी भानावर आली...आज ट्रेनिंग चा शेवटचा दिवस होता आणि उरली सुरली औपचारिकता ही झाली होती, त्यामुळे मी सुटकेचा निःश्वास टाकला....दोन वर्ष झाले झाले होते ट्रान्समिशन मध्ये काम करून आणि त्या दोन वर्षातलं हे सहावं ट्रेनिंग संपलं होतं...लगेच झोनल ऑफिस ला जाऊन सुट्टीचा अर्ज दाखल करायचा होता, त्यात नवा डेप्युटी इंजिनिअर आला होता, त्याच्या समोर सुट्टीचा अर्ज द्यायचा होता...पण मी आठवडाभराच्या ट्रेनिंग ला असल्याने त्याची व माझी अजून भेट झाली नव्हती... दोन आठवड्यांची सुट्टी म्हटल्यावर तो कटकट करेल ही चिंता वेगळी आणि आता तर मला या ट्रेनिंग सेंटर वरून निघायलाच पाच वाजले होते, तो ऑफिस मध्ये भेटणार की नाही याची शाश्वती नव्हती तरीही सुसाट वाऱ्याप्रमाणे मी माझ्या स्कुटीवरून धावत सुटली...अगदी दहा मिनिटांत ऑफिस गाठलं आणि धापा टाकत जाऊन पोहोचली सरांच्या कॅबिन मध्ये...सर मला पाठमोरे उभे होते आणि काहीतरी फाईल बघण्यात बिझी होते...

"एक्सक्युस मी सर...." मी दरवाजा उघडताच आत जाण्यासाठी बोलली,

"हम्म..." एवढाच आवाज करून त्यांनी त्यांच्या डाव्या हाताने मला आत येण्याचा इशारा करताच मी आतमध्ये शिरली...मी जाऊन उभी होती पण ते अजूनही त्याच फाईल मध्ये डोकं खुपसून बसले होते, मला घरी जायची घाई होती त्यामुळे मीच कंटाळुन बोलली,

"सर...मी असिस्टंट इंजिनिअर...प्रकाश सरीताला पोस्टिंग आहे....मला सुट्टी हवीये...दोन आठवड्यांची...अर्ज घेऊन आलीये..."
आणि माझ्या असं बोलल्या वर ते मागे वळले....आणि.... त्यांना बघून माझ्या पाय जागेवरच अडखळले...स्वतःचा तोल सावरायला मी लगेच दोन्ही हाताने खुर्ची पकडली.....कित्येक वर्षांनंतर आज पुन्हा आमचे रस्ते एकमेकांना छेदत होते, हा चेहरा पाहिल्यावर क्षणार्धात कितीतरी आठवणी माझ्या डोळ्यासमोर तरळल्या आणि मी पापण्या मिटताच, माझ्या गालांवरून घळकन टपोरे थेंब ओघळून गेले...आम्ही एकमेकांना डोळेभरून बघत होतो... माहीत नाही किती दिवसांची तहान होती जी आज भागवायची होती...पण माझ्या फोनच्या आवाजाने मी भानावर आली, आणि हातातला अर्ज तसाच टेबल वर ठेवून, डोळे पुसत, काही न बोलता ऑफिसच्या बाहेर धाव घेतली....

त्याच्यातून सावरण्यात कित्येक दिवस मी घालवले होते आणि त्याने आज असं अचानक समोर येऊन मला जबरदस्त धक्का दिला होता...मी घरी जायची घाई करत होती, पण जेव्हा स्कुटी सुरू करण्याचे प्रयत्न केले तेंव्हा स्कुटीने ही माझी साथ सोडली होती... मी ऑफिस च्या पार्किंगमध्ये स्कुटी लावली आणि ऑटोसाठी वाट पाहत बसली...पण आज देवाने वेगळाच विचार केला होता कदाचित माझ्यासाठी... एकही ऑटो थांबायला तयार नव्हता, त्यात बिन मौसम बरसात सुरू झाली...फेब्रुवारीच्या महिन्यात पाण्याचे टपोरे थेंब पडायला लागले... हे....हे असंच व्हायचं नेहमी...जेंव्हा जेंव्हा आम्ही समोरासमोर आलो देवाने पाऊस पाडला...ज्या अग्नीत आम्ही होरपळत होतो ते शांत करण्यासाठी या पावसाने काहीच होणार नव्हतं...पण काय मज्जा येत असावी देवाला काय माहीत??? मी अर्ध्या भिजलेल्या अवस्थेत ऑटो थांबवण्याचा निरर्थक प्रयत्न करत होती आणि तेवढ्यात एक कार माझ्या समोर येऊन उभी राहिली... 'तोच' होता...मी बसत नाहीये हे पाहून दोन वेळा हॉर्न वाजवले, पण मी मात्र मान वळवली आणि पुढे चालायला लागली...आता त्याने कार माझ्यामागे आणली आणि पुन्हा एकदा हॉर्न देऊन कारच्या विंडोतून बोलला,

"बडे हसीन पल बिताये थे साथ मे,
हमे अपना मानकर,
आज चेहरा देखकर नियत पे शक करो,
क्या इतने गैर है हम?"

एवढं सगळं बदललं होतं, पण त्याचातला हा शायराणा अंदाज मात्र तसाच होता....माझे अश्रू पावसाच्या पाण्यात मिसळत होते तरीही त्याने त्या दोन पाण्यातला फरक ओळखलाच आणि पुन्हा बोलला,

"दोन पाऊलं सोबत चालूही शकत नाही आपण, एवढा अपरिचीत, एवढं अनोळखी करून टाकलंस का मला..??"

त्याचे ते शब्द ऐकून मी रागारागात कारमध्ये बसली पण अजूनही मी एक नजर टाकून त्याला पाहिलं नाही...त्याची नजर माझ्यावरच खिळली होती....खरं तर आज इतक्या वर्षाने तो एवढा जवळ होता, पण तरीही खूप अंतर जाणवत होतं मधात...खूप इच्छा होती त्याला मनभरून पहावं, त्याची सोबत अनुभवावी, त्याचा हात हातात घेऊन त्याचा उबदार स्पर्श अनुभवावा पण असं काहीच केलं नाही...हिम्मतच झाली नाही....त्याची नजर अजूनही माझ्यावरच टिकून आहे हे जाणवत होतं, शब्द ओठांवरती होते पण डोळेच जास्त बोलत होते, जसे नेहमी बोलायचे...तसही शब्द होते कुठे आमच्या मधात??? मौनाची आणि नजरेचीच भाषा अवगत होती आम्हाला...त्याने कार सुरू केली पण त्याचं सगळं लक्ष माझ्यावरच होतं, मी मात्र पलटून त्याच्याकडे पाहिलं नाही...मी कार मधून बाहेर बघत असताना त्याच्याच विचारात होती आणि त्याचे विचार मला माझ्या आयुष्यातील सगळ्यांत सुंदर भुतकाळात घेऊन गेले.....

*****************

तशी त्याची आणि माझी ओळख अगदी लहानपणापासूनची...माझ्या मावस बहिणीचा चुलत दिर...माझी मावस बहीण मला सख्ख्या बहीणीपेक्षाही जास्त जवळची...पण माझ्यापेक्षा वयाने पंधरा वर्षे मोठी....तिचं एकत्र कुटुंब, खूप मोठा गोतावळा... मला सुट्ट्या असल्या की हमखास तिच्याकडे घालवायच्या हे ठरलेलं असायचं...तिचं लग्न झालं तेंव्हा मी सहा वर्षांची असेल तेंव्हा त्याची आणि माझी पहिली ओळख झाली...अर्थात तिच्या लग्नातचं...तो माझ्यापेक्षा दोन वर्ष मोठा...तेंव्हाच आमच्या दोघांचा सोबत नाचतानाचा फोटो अजूनही जपून ठेवलाय मी...त्या अल्लड वयात हे माहीत नव्हतं की ही ओळख एक अनामिक पण खूप पक्कं नातं जोडून जाईल....

त्यानंतर कधी कधी जाणं येणं व्हायचं ताईकडे पण त्याची आणि माझी भेट कधी झाली नाही...वर्षामागे वर्ष निघून गेले, त्याचं नाव तेवढं लक्षात राहिलं, भेट मात्र झाली नाही...पण नुकतीच मी दहावीची परीक्षा दिली होती, भरपूर सुट्ट्या होत्या आणि यावेळी ताईने मला तिच्याकडे नेण्याचा हट्ट केला... आई बाबानी लगेच होकार भरला...ताईचं घर म्हणजे भला मोठा वाडाचं होता..खुप प्रशस्त...तिच्या घरापासून 'त्याच' घर अर्ध्या किलोमीटरवर असेल... मी जाऊन दोन दिवस झाले होते ताईकडे पण त्याचं काही दर्शन घडलं नव्हतं, म्हणजे मला तेंव्हा काही ओढ ही नव्हती...

ताईची मुलगी रश्मी खूप मस्ती करायची माझ्याबरोबर...उगाच खोड्या करायची...एक दिवस घराच्या गच्चीवर पावसात भिजताना तिच्या मागे पळता पळता माझा पाय घसरला आणि मी अचानक कोणाला तरी धडकली...त्या धडकेने मी पडणार म्हणून त्याने एक हात माझ्या कमरेत घातला आणि एका हाताने माझ्या हाताला पकडलं तशी मी भांबावली...डोळे उघडून बघते तर समोर 'तोच' होता...काही क्षणांसाठी आम्ही एकमेकांत हरवून गेलो...माझं ह्रदय इतक्या वेगाने पळत होतं की मला वाटलं माझे स्पंदनं त्यालाही ऐकू जात असतील... दोघेही चिंब झालो होतो पावसात...थंडाव्याने शरीरं अकडत होतं पण त्याच्या स्पर्शाच्या उबेने मात्र शरीरात अनेक लहिरी उमटत होत्या....त्याचीही अवस्था तीच होती...त्याच्या डोळ्यात दिसत होतं की तोही असाच चलबिचल मनस्थितीत असावा...तेवढ्यात कोणच्या तरी येण्याची चाहूल झाली आणि मी त्याला जोरात धक्का देऊन बाजूला झाली...रश्मीने ताईला बोलावून आणलं होतं...त्याला बघून ताई मला बोलली,

"अरे किती भिजले तुम्ही?? लहानपण गेलं नाही वाटते अजून?? आणि भेट झाली का तुमची?? ओळखलंस का याला??? लहानपणी किती मस्ती केली होती तुम्हा दोघांनी माझ्या लग्नात... हाच आहे तो...'अतुल'...."

खरंच अतुल्य होता तो माझ्यासाठी, ज्याची तुलना जगातल्या कोणाशीही करू शकत नाही...अजूनही माझ्या आयुष्यातले सगळे सुखं एकीकडे आणि त्याचं माझ्या आयुष्यातील स्थान एकीकडे...काय होतं आमच्यात माहीत नाही, पण एकमेकांची सोबत आम्हाला हवीहवीशी ही वाटत होती पण समोरासमोर आल्यावर शब्दही सुचत नव्हते...आणि त्यादिवसानंतर तर मला त्याच्याशी नजर मिळवण्याचीही हिम्मत होत नव्हती...तो समोर आला की नुसती धडधड व्हायला लागायची...त्याच्यासमोर तोंडातले शब्द तोंडातच राहायचे...मला वाटत होतं हे फक्त माझ्यासोबतच घडतंय पण त्याच्या मनाची अवस्थाही काहीशी माझ्यासारखीच होती...

एके दिवशी ताईने बेसनाचे लाडू बनवले, त्याला खूप आवडायचे...रश्मी सतत त्याच्याकडे खेळायला जात असे, एकदा तिने मलाही सोबत न्यायचा हट्ट केला...आणि तिचा तो हट्ट ताईने लगेच मान्य केला आणि माझ्यावर आदेश सोडला की मी अतुल ला लाडू देऊन यावे...माझ्यासाठी तर एवढा पेच होता, सांगू ही शकत नव्हती काही...आणि सांगणार तरी काय होती?? मला स्वतःलाही कळत नव्हतं मला काय होतंय?? का अतुल समोर आला की सगळं जग थांबल्यासारखं होत आणि तो मात्र थंड हवेची झुळूक बनून माझ्या मनाला मोरपिसासारखं हलकं करून जायचा...पण आता मात्र मला ते लाडू त्याच्यापर्यंत पोहचवल्याशिवाय सुटका नव्हती...

खूप हिम्मत करून मी गेली... घरात कोणीही दिसत नव्हतं आणि रश्मीची मस्ती काही केल्या कमी होत नव्हती..तिच्यामागे धावता धावता पाय अचानक जागेवरचं थांबले...अतुल अगदी समोरच उभा होता...पुन्हा आमचे डोळेच बोलत होते...आणि मागून येऊन रश्मीने मला पुन्हा धक्का दिला..हातातला डब्बा सांभाळावा की स्वतःचा तोल आवरावा याच विचारात असताना पुन्हा एकदा अतुलने येऊन माझ्या उजव्या दंडाला पकडलं...माझे हातपाय थंडगार पडले, गळा कोरडा पडला तरी कसेबसे माझ्या तोंडातून काहीच शब्द बाहेर पडले...

"हे...ला..लाडू..ताईने...तुझ्यासाठी....." आणि मी लगेच मागे फिरली....तर त्याने माझा डावा मनगट पकडला आणि बोलला,

"थँक्स...अम्म्म...ते मला ही बोलायचं आ..."

आणि बोलता बोलता तो अचानक थांबला आणि माझा हात लगेच सोडला....मागे वळून पाहिलं तर त्याचे आजोबा आले होते... त्यांनी खूप प्रेमाने माझी विचारपुस केली..थोडावेळ त्यांच्याशी गप्पा मारल्या पण विचारचक्र हेच सुरू होतं की अतुल ला काय सांगायचं असेल...

********************

क्रमश: