bali - 24 in Marathi Novel Episodes by Amita a. Salvi books and stories PDF | बळी - २४

बळी - २४

बळी -- २४
बंद कपाटातून पैसे आणि दागिने कोणा अज्ञात व्यक्तीने पळवले आणि चोरीचा आळ मात्र आपल्यावर आला; हे ऐकून केदारचे डोळे संतापाने लाल झाले होते. आपल्या पाठीमागे आपली एवढी मोठी बदनामी झाली -- या विचारानेच त्याला स्वतःचीच लाज वाटत होती. एवढा मोठा कालावधी गेल्यानंतर तो स्वतःला निरपराध सिद्ध कसा करू शकणार होता?
"बंद कपाटातला ऐवज कोण घेऊ शकतो?" --- तो स्वतःशीच बडबडत होता.
" तुझा शोध घेण्याचा प्रयत्न कोणी करू नये, म्हणून रंजनाने ही लबाडी केली असेल; ह्या सगळ्या कारस्थानात तिचा सहभाग असू शकतो; असं नाही वाटत तुला?" केदारच्या सरळ स्वभावाची इन्सपेक्टरना आता कीव येत होती.
"इनस्पेक्टर साहेब! ती आडगावात रहाणारी अर्धशिक्षित मुलगी! मला नाही वाटत; की ती एवढं मोठं कारस्थान रचू शकेल! तिचा काहीतरी गैरसमज झाला असेल! ती मुद्दाम असं नाही करणार! --- पण मला अजूनही कळत नाही --- मला गुंडांनी किडनॅप केलं -- मारण्याचा प्रयत्न केला -- आणि त्याच वेळी घरातून एवढा मोठा ऐवज नाहीसा झाला --- हे सगळं एकाच वेळी अगदी ठरवल्याप्रमाणे कसं झालं? रंजना नक्कीच यात असू शकत नाही ---- विश्वास ठेवा माझ्यावर!" केदारच्या नजरेसमोर रंजनाचा भोळा भाबडा चेहरा आला होता.
"तुमच्या घरी दररोज येणारी एकच व्यक्ती म्हणजे तुझा मित्र सिद्धेश! मी त्याचीही चौकशी केली; पण त्याने त्यादिवशी आदल्या दिवशी सांगून रजा घेतली होती --- तुमचा डिनरचा आणि सिनेमाचा प्लॅन अचानक् ठरला होता-- सिद्धेशला त्याविषयी माहिती नव्हती! त्यामुळे त्याच्यावर आपण संशय घेऊ शकत नाही! या मित्राच्या बाबतीत तू खरंच नशीबवान् आहेस! त्याच्यामुळेच घराची आर्थिक बाजू सुरळीतपणे चालू आहे असा मित्र प्रत्येकाला मिळावा! तुझा घरातल्या सगळ्यांवर पूर्ण विश्वास आहे; त्यामुळे तुझ्याकडून गुन्हेगाराविषयी काही धागादोरा मिळणं कठीण दिसत आहे! पण तूच आम्हाला एक महत्वाची माहिती दिली आहेस ; त्या दिशेने आपण तपास करून बघूया! -- मला खात्री आहे--- नक्कीच काहीतरी हाती लागेल!"
"मी तुम्हाला कोणती माहिती दिली? मला काही आठवत नाही!" केदार गोंधळून म्हणाला.
" ते दोन्ही गुंड रंजनाच्या गावाच्या शेजारच्या गावचे - आंबेगावचे होते; ही महत्वाची माहिती तूच बोलण्याच्या ओघात आम्हाला दिलीस-- तोच या केसमधील आम्हाला मिळालेला एकमेव महत्वाचा धागा आहे! उद्या आम्ही रंजनाच्या गावी जाणार आहोत! तुलाही आमच्याबरोबर यायचं आहे! तिथेच या कारस्थानाची पाळं-मुळं आपल्याला सापडतील! आणि या कथेची सुरुवात तिथे झाली आहे आणि बहुतेक शेवटही तिथेच होईल! उद्या सकाळी तयार रहा!" दिवाकरांना आता रंजनाचं नाव घेऊन केदारचं मन दुखवायचं नव्हतं.
"तिकडे जाण्यापूर्वी मी माझ्या आईला भेटू का? " केदारने विचारलं.
"आपण तिकडून आलो, की मी स्वतः तुमची भेट करवून देईन. उद्या प्रथम तुझी रंजनाशी भेट घालून देणार आहे---- आता तरी तू खुश आहेस नं? आणि औषधं नीट घेत रहा! चांगला -- किंवा वाईट -- मानसिक धक्का तुला पचवता आला पाहिजे! मला वाटतं-- तुला बघून रंजना तर वेडी होईल -- म्हणजे -- मला म्हणायचंय -- अत्यानंदाने!"
इन्स्पेक्टर गूढ हसत म्हणाले. केदारला थोडी कल्पना देणं गरजेचं होतं; त्याला अचानक् मानसिक धक्का बसणार नाही; याची काळजी घेणंही गरजेचं होतं.
त्यांच्या बोलण्याचा मतितार्थ डाॅक्टर पटेलांच्या लक्षात आला. त्यांनी सूचना केली,
"तुम्ही तुमच्याबरोबर निशालाही घेऊन जा! तिला केदारच्या नाजुक मनःस्थितीची चांगली कल्पना आहे! गरज पडली तर तिची मदत होईल! ती केदारची चांगली मैत्रीण आहे! तिच्यासोबत केदारचा वेळही चांगला जाईल -- चालेल नं केदार?"
निशाबरोबर घालवलेले क्षण केदारच्या डोळ्यासमोरून गेले होते; पण रंजनाला भेटायला जाताना निशा बरोबर नको --- असंही एक मन सांगत होतं. पण डाॅक्टर पटेलना तो 'नाही' म्हणू शकत नव्हता. त्याने फक्त खांदे उडवले.
हे प्रकरण कुठल्या दिशेने जात आहे; हे डाॅक्टर पटेलांसारख्या तल्लख बुद्धीच्या माणसाच्या लगेच लक्षात आलं होतं; म्हणूनच त्यांनी निशाला बरोबर नेण्याची सूचना केली होती. त्यांनी लगेच निशाला फोन करून सकाळी काटेगावला जाण्यासाठी तयार रहायला सांगितलं बरोबर कोणती औषधं - इंजेक्शन घ्यायची ; याविषयी सूचनाही केल्या.
*******

दुस-या दिवशी सकाळी चार पोलिसांचा फौजफाटा बरोबर घेऊन इ. दिवाकर निघाले. बरोबर केदार होता. निशाला तिच्या घराजवळच 'पिक' केलं होतं. ती दोघंही एकमेकांशी बोलणं टाळत होती; हे दिवाकरांच्या लक्षात आलं होतं!
निशाशी रंजनाविषयी कधी कोणी बोललं नव्हतं; ती गप्प होती; कारण केदारची पत्नी कशी असेल; याविषयी तिच्या मनात विचार चालले होतेच; पण केदारच्या तब्येतीची जबाबदारी डाॅक्टरनी तिला दिली होती! पत्नीला भेटल्यामुळे खरं म्हणजे केदारला तर आनंद होणं तिला अपेक्षित होतं; पण त्याऐवजी त्याच्या प्रकृतीला गंभीर धोका होऊ शकतो असं डाॅक्टरना का वाटतंय; हा प्रश्न तिला पडला होता.
"कुठेतरी पाणी मुरतंय! माझ्यापासून डाॅक्टर काहीतरी लपवतायत---!" या उलट-सुलट विचारांमुळे तिचा चेहरा गंभीर होता.
मोठं अंतर कापायचं होतं; शिवाय मध्येच एका खड्डयामुळे जीपचा टायर पंक्चर झाला--कसेबसे संध्याकाळी चार वाजता ते गावच्या सरकारी अतिथीगृहात पोहोचले. केदार त्यांच्या बरोबर होता. निशा दमून गेली होती -- तिला दिवाकरांनी गेस्ट- रूममध्ये आराम करायला सांगितला होता. चहा पिऊन फ्रेश झाल्यावर त्या ठाण्याचे इन्सपेक्टर - गायकवाड म्हणाले,
"तुम्ही एवढा मोठा प्रवास करून दमला असाल! आज इथे विश्रांती घ्या! उद्या तुमच्या तपासाला सुरूवात करा!"
"छे! छे! कामात दिरंगाई करून चालणार नाही!
"दिनेशचा फोटो आहे का? असेल तर केदारला दाखवा; हा तोच दिनेश आहे की दुसरा कोणी आहे; हे आधीच पाहिलेलं बरं!" इ. दिवाकर म्हणाले.
"होय! आमच्या माणसाने कालच काही फोटो फाॅरवर्ड केलेयत!" फोटोंचा एक जुडगा दिवाकरांच्या हातात ठेवत जाधव म्हणाले.
ते फोटो दिवाकरांनी नजरेखालून घातले; त्या फोटोंमध्ये अनेक फोटो रंजना आणि दिनेशच्या प्रणयप्रसंगांचे साक्षीदार होते; पण त्यातील फक्त दिनेशचे एकट्याचे फोटो त्यांनी केदारला दाखवले.
ते फोटो बघून केदारच्या चेह-याचा रंग उडाला.
"हा तोच ड्रायव्हरचा मित्र दिनेश -- ज्याने मला जिवंत जलसमाधी देण्याचा प्रयत्न केला होता. त्या प्लॅनचा मास्टर -माइंड. हाच होता! केदार ओरडून म्हणाला.
त्या दिवशीचा प्रसंग आठवून त्याला संताप आवरत नव्हता.
"हा तुम्हाला सापडला आहे; तर त्याला लवकर पकडा! मला त्याला विचारायचं आहे; की मी त्याचं इतकं काय बिघडवलं होतं; --- की तो माझ्या जिवावर उठला होता?"
"त्याला अॅरेस्ट करण्यासाठीच आता आपण जाणार आहोत! फक्त खरा गुन्हेगार हाच आहे; याची तुझ्याकडून खात्री करून घेण्यासाठी आम्ही थांबलो होतो! इ. जाधव म्हणाले.
"जर दिनेशचे फोटो बघून हा इतका संतापला आहे; तर रंजनाबरोबरचे फोटो दाखवले असते; तर काय झालं असतं? --- पण लवकरच त्याला सत्याला सामोरं जावं लागेल! तेव्हा ह्याला कसं अावरायचं?" ते हळूच इ. दिवाकरांच्या कानात पुटपुटले.
"काळजी करू नका! त्यासाठीच निशाला-- त्याच्या जवळच्या मैत्रिणीला मी बरोबर आणलं आहे! त्याला कसं हँडल करायचं; ते तिला चांगलंच माहीत आहे; असं डाॅ. पटेल म्हणाले. त्याच्या आजारपणात तिनेच त्याची काळजी घेतली होती! एक्स्पर्ट नर्स आहे!-- काळजी करू नका!" इ. दिवाकर हसत हलक्या आवाजात म्हणाले.
त्यांनी केदारला एका काॅन्टेबलला सांगून व्हरांडयात मोकळ्या हवेत बसायला पाठवलं.
ते इ. जाधवांना म्हणाले,
"आजच मी रंजनाच्या घरी जाऊन तिच्याशी बोलणार आहे! आणि जर ती दिनेशच्या घरी गेली असेल तर तिला रंगे हाथ पकडायचं आहे! एका निष्पाप मुलाचं आयुष्य उध्वस्त करण्याचा प्रयत्न केलाय तिने! तुमच्याकडे आजचे रिपोर्ट्स काय आले आहेत?" इ. दिवाकर केसचा सोक्षमोक्ष लवकरात लवकर लावायच्या तयारीत होते.
"या घटकेपर्यंत रंजनाविषयी काहीतरी गैरसमज असू शकतो; अशी आशा त्यांना होती! हे सगळं रंजनाला मिळवण्यासाठी दिनेशने रचलेलं षड्यंत्र असू शकतं; असंही अजूनपर्यंत त्यांचं एक मन त्यांना सांगत होतं, पण दिनेशच्या बाहुपाशातले तिचे फोटो पाहिल्यावर--- आता मात्र सगळं चित्र स्पष्ट झालं होतं --- संशयाला जागा राहिली नव्हती.


******** contd. - Part 25.


Rate & Review

Usha

Usha 7 months ago

Preeti Patil

Preeti Patil 11 months ago

Kaustubh Gitapathi

Kaustubh Gitapathi 11 months ago

sanjana kadam

sanjana kadam 11 months ago

Sachin

Sachin 11 months ago