Bali - 23 in Marathi Novel Episodes by Amita a. Salvi books and stories PDF | बळी - २३

बळी - २३

                                                                        बळी -२३
"दिनेशचा पत्ता आम्ही शोधून काढला आहे! ---  ही पूर्ण स्टोरी ऐकाल; तर तुम्हाला पडलेले सगळ्याच प्रश्नांची उत्तरं मिळतील! जरा पुढे ऐका ----" काटेगावचे इन्स्पेक्टर जाधव हसून म्हणाले,
       "त्यांचं प्रेमप्रकरण कळल्यावर  श्रीपतरावांनी रंजनाला घरातून बाहेर पडायला बंदी घातली -- तिची शाळा बंद केली!  त्यानंतर  घरी अभ्यास करून कशीबशी एस. एस. सी. झाली! त्यांनी तिचं लग्न मुंबईच्या एका मुलाशी ठरवलं! आश्चर्याची गोष्ट म्हणजे, तिने लग्न ठरवताना जराही विरोध केला नाही. त्यांनी तिच्यासाठी खूप चांगलं घर शोधलं होतं. तिचा नवरा  इंजिनिअर तर आहेच पण त्याची पर्सनॅलिटीही खूप छान आहे; असं गावातल्या लोकांकडून कळलं!   बहुतेक त्यामुळेच ती  आनंदाने लग्नाला तयार झाली.  पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे लग्न झाल्यावर पंधरा दिवसांच्या आत ती माहेरी परत आली! गेले सहा महिने ती वडिलांकडेच रहात आहे! ती सासरी का जात नसावी, हे गावातल्या लोकांसाठी मोठं कोडं आहे!  पण श्रीपतरावांचा दबदबा एवढा आहे, की त्यांना काही विचारण्याची कोणाची हिम्मत नाही."
     " तुम्ही तिच्यावर नजर ठेवली का? काय करते दिवसभर? खरोखरच तिचा फॅशन डिझाइनिंगचा कोर्स चालू आहे -- की माहेरी रहाण्यासाठी कारण सांगतेय?"            दिवाकरना आपला संशय खरा अाहे की नाही; हे तपासायची घाई झाली होती. पण इन्स्पेक्टर जाधवांनी पुढे  जे सांगितलं; ते अनपेक्षित  होतं; आणि दिवाकर कधी कल्पना करू शकले नसते-- एवढं भयंकर ---
      "काल माझ्या पोलीस-स्टेशनमधून एक माणूस दिवसभर रंजनावर नजर ठेवून होता.ती सकाळी घरातून बाहेर पडली, आणि सरळ दिनेशच्या घरी गेली! दिनेशही घरीच होता!  संपूर्ण दिवस त्याच्याबरोबर काढून रात्री ती  घरी गेली. दिनेशचं घर गावाबाहेर आहे; आजूबाजूला विशेष वस्ती नाही. त्यामुळे ही गोष्ट गावक-यांच्या अजून लक्षात आलेली नाही. आमच्या माणसाने तिचा पाठलाग केला, म्हणून  आम्हाला हे कळू शकलं! मधल्या काळात तिच्या घरी जाऊन माझ्या माणसाने चौकशी केली; तेव्हा "ती काॅलेजमध्ये गेली आहे -- फॅशन डिझाईनिंगचा कोर्स करतेय असं तिची आई म्हणाली! एस.टी. मिळून घरी यायला रात्र होते-- प्रवासातच दिवस जातो!" असं तिची आई म्हणाली.  मुलीचे काय प्रताप चालले आहेत हे घरी कोणाला माहीत नाही! " इ. जाधवनी त्यांचं काम चोख केलं होतं!
      "मी एक दोन दिवसांत तिकडे येतोय! तेव्हा सविस्तर बोलूया! एका खूप मोठ्या चक्रव्यूहाचा छडा लावायचाय आपल्याला! हे फक्त विवाहबाह्य प्रेमप्रकरण नाही ---- तुम्हाला हळू हळू सगळं कळेलच---   सध्या त्या रंजनावर आणि दिनेशवर मात्र नजर असू द्या! पण काळजी घ्या; तुम्ही तिच्यावर नजर ठेवताय, हे तिला कळता कामा नये! "  इ. दिवाकर त्यांना सावधगिरीचा इशारा देत  म्हणाले.
                                      ********
       इ. दिवाकरना केदारविषयी  खूप सहानुभूती  वाटत  होती. इतका हुशार सरळमार्गी मुलगा सहजपणे एका मोठ्या कारस्थानाला बळी पडला होता. काहीही चूक नसताना गेले सहा महिने अनेक संकटांना तोंड देत होता. त्याची अाई आणि भावंडं सुद्धा  अनेक अडचणींना तोंड देत होती-- मनस्ताप सहन करत होती! जर केदारची स्मृती परत आली नसती; तर हे कारस्थान कायम गुलदस्त्यात राहिलं असतं!
आज त्यांनी केदारला पोलीस स्टेशनला बोलावून घेतलं होतं. 
"तुम्ही मला माझ्या आईला आणि रंजनाला का भेटू देत नाही? तुम्ही माझ्यावर एवढे निर्बंध आणले आहेत; की जणू मीच काहीतरी गुन्हा केलाय! "
 केदार चिडून बोलत होता.
"प्रमिलाबेनना तुम्ही काय सांगितलंय? निदान हाॅस्पिटलमध्ये माझा चांगला वेळ गेला असता; पण त्या मला हाॅस्पिटलमध्येही ड्युटी करू देत नाहीत! या आठवड्यात त्यांनी मला मुलांना काॅम्प्यूटर शिकवायलाही जाऊ दिलं नाही! त्याही कुठे जात नाहीत; माझ्यावर सतत लक्ष ठेवून असतात!" केदारचा हा त्रागा  बघून बाजूला बसलेल्या प्रमिलाबेन आणि डाॅक्टर पटेल हसू लागले! 
   "हे सगळं इन्स्पेक्टर साहेबांच्या सूचनेनुसार होतंय! आम्हाला दोष देऊ नकोस!" प्रमिलाबेन हसत म्हणाल्या.
दिवाकरनाही हसू आवरत नव्हतं-- पण चेहरा गंभीर ठेवून ते म्हणाले,
 "त्यांना मीच सांगितलं आहे! काही दिवसांचा प्रश्न आहे! नंतर तू तुझा स्वतंत्र असशील!  पण सध्या तू जगापुढे न येणं तुझ्याच हिताचं आहे! तू जिवंत आहेस हे कळलं तर तुला जिवे मारण्याचा प्रयत्न करणारे लोक सावध होतील! त्यांना बेसावध ठेवणं गरजेचं आहे ! आम्हाला तुझ्याकडून काही दिवस एवढी मदत हवी आहे!  मी कालच तुझ्या आईला भेटून आलो. तीसुद्धा डोळ्यांत प्राण आणून तुझी वाट पहातेय! पण काही दिवस तरी  मी तिला भेटायची तुला परवानगी  देऊ शकत नाही!" इ. दिवाकर सत्य सांगण्यासाठी शब्द शोधत होते.
      "माझ्या आईचं खूप प्रेम आहे माझ्यावर! रंजना तिची आणि घराची काळजी घ्यायला आहे; म्हणून बरं!" केदारचा रंजनावर किती विश्वास आहे; हे त्याच्या बोलण्यातून जाणवत होतं.
      " तू माणसं ओळखायला चुकतोयस,केदार! तू बेपत्ता झाल्यावर  रंजना  काही दिवसांतच माहेरी  गेली; ती परत आलीच नाही! तिने फॅशन डिझाईनिंगचा  कोर्स सुरू केलाय; त्यामुळे ती तिकडेच रहाणार आहे!" दिवाकर केदारचा चेहरा निरंतर बोलत होते.
      "बरं झालं! तिचा वेळ चांगला जात असेल! आणि एक चांगली  कला शिकायला मिळेल! ती दाखवत नव्हती; पण आपलं शिक्षण कमी आहे; ही खंत तिला होतीच!" केदारचा रंजनावरील विश्वास कायम होता.
    " बरं! मला हे सांग --- तू घरातून निघताना बरोबर घेतलेल्या दागीन्यांचं आणि पैशांचं काय केलंस? दिवाकरानी मुद्दामच तिरका प्रश्न विचारला.
"कोणते दागिने? कुठले पैसे? काय बोलताय तुमही साहेब?" केदार गोंधळला होता
      " लग्नात तिच्या वडिलांनी दिलेले पैसे आणि दागिने घेऊन तू  पळून गेलायस अशी हाकाटी रंजनाने केली आहे! तिच्या बोलण्यात किती तथ्य आहे; हे तुझं तुलाच जास्त माहीत असेल!" ते केदारचा चेहरा निरखत  म्हणाले.
"रंजनाला तिच्या वडिलांनी दिलेले  पैसे आणि तिचे सगळे दागिने तिच्याच कपाटात होते. मी कधी हातही लावला नाही.  खरं म्हणजे तिच्या वडिलांनी ते पैसे वरदक्षिणा म्हणून लग्नाच्या वेळी  मला द्यायला आणले होते! पण मी हुंडा प्रथेच्या विरुद्ध आहे; त्यामुळे मी घ्यायला नकार दिला, म्हणून त्यांनी ते रंजनाला  दिले ---  मी   कशाला चोरी करू?" केदार रागात म्हणाला. 
"पण तूझ्याबरोबरच हा ऐवजही बेपत्ता झाला. रंजनाने ही गोष्ट सगळ्यांच्या निदर्शनास आणून दिली; आणि सगळेच हवालदिल झाले. तू बेपत्ता झाल्याची काळजी होतीच, पण सगळं कळलं, तर  पोलीस तुला  चोरीच्या आरोपाखाली पकडतील;म्हणून तुझ्या आईने पोलिसात मिसिंग कम्प्लेंट आजपर्यंत  दिली नाही; फक्त तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसली आहे!" 
केदार डोकं धरून बसला होता ; हे पाहून दिवाकर  गंभीर स्वरात पुढे बोलू लागले,
"तुझ्या बाबतीत जे काही झालं, ते अचानक् घडलं नाही; हे तुझ्या आता लक्षात आलंच असेल! हा सगळा जाणीवपूर्वक आखलेला प्लॅन  होता! तुला काय वाटतं? एवढ्या हुशारीनं तुझ्याभोवती जाळं कोणी विणलं असेल? तुझी आई, भाऊ आणि बहीण की रंजना? कारण कोणीतरी घरचा भेदी असल्याशिवाय त्या दिवशी तू घरातून  बाहेर पडणार आहेस; हे त्या गुंडांना कसं कळलं?"
त्यांचं बोलणं ऐकून केदार हादरून गेला होता. 
"माझ्याविरूद्ध एवढा मोठा कट कोणी का रचला असेल? आई, कीर्ती आणि नकुल यांच्याबाबतीत हे शक्यच नाही --- ही तिघं सोडली तर राहिली भोळी भाबडी, गावंढळ  रंजना--- ती तर एवढं सगळं करणं शक्यच नाही. साधं घरातल्या माणसांशी बोलायलाही घाबरायची ती! रहाता राहिला घरी दररोज  कामानिमित्त घरी येणारा माझा मित्र सिद्धेश! पण तो माझा लहानपणापासूनचा जिवलग मित्र आहे! श्रीमंत घरातला आणि खूप हुशार---- तो माझ्या खोलीत कधीच येत नसे! आणि कपाटाची चावी फक्त माझ्याकडे आणि रंजनाकडे होती! रोकड पैसे आणि दागिने आत असल्याकारणाने कपाटाचं कुलूप नेहमी लावलेलं असे!  कपाटातून ऐवज कसा नाहीसा होईल? " 
बोलताना केदार थरथरत होता.
"अजूनही तुझ्या लक्षात कसं येत नाही? कपाट रंजनाचं---- चावी रंजनाकडे--- कपाटातले दागीने रंजनाशिवाय दुसरं कोणी नाहीसे करू शकणार होतं का?" इन्सपेक्टर म्हणाले.
"पण तिचेच दागिने ती का चोरेल?" केदारला अजूनही रंजनावर आळ घेणं जड जात होतं.
        **********                 contd.- Part २४              
 
 
 
              
 

Rate & Review

suvarna bhambak

suvarna bhambak 10 months ago

sanjana kadam

sanjana kadam 11 months ago

Jayashri

Jayashri 11 months ago

DEVENDRA D D

DEVENDRA D D 11 months ago

Vaishali Kamble

Vaishali Kamble 11 months ago