Ankilesh - 13 books and stories free download online pdf in Marathi

अंकिलेश - एक प्रेमकथा - 13

१३

@ डाॅ.अरूणा गावस्कर

त्या दिवशी डिपार्टमेंट मध्ये बसलेले. खूप दिवसांनी मुग्धाचा फोन आला. मुग्धा नि मी फास्ट फ्रेंड्स. जुळ्या बहिणी जणू. आम्ही दोघींनी फार्म्याकाॅलाॅजी पोस्ट ग्रॅज्युएशन एकाच वेळी केलं. दोघीही नायर हाॅस्पिटलात लेक्चरर म्हणून लागलो. माझी सुरेन्द्रशी गाठ पडली, तिची नरेन्द्र देशपांडेशी! गंमत म्हणजे सुरेन्द्र नि नरेन्द्र दोघे मामे भाऊ! इथवर आमचे आयुष्य समांतर म्हणावे असे चाललेले. मग मुग्धा केईएमला शिफ्ट झाली ए.पी. म्हणून. मी राहिले नायर हाॅस्पिटलला. सुरेन्द्रच्या भावाची बायको म्हणून वहिनी, नणंद वगैरे काही म्हणण्यापेक्षा मी मुग्धाला मैत्रीणच जास्त मानते. माझे निरीक्षण असेय ना, की मैत्रीत जनरली आपण एक दुसऱ्याला स्पेस जास्त देतो. नातेसंबंध आले की अपेक्षा आल्या, दुसऱ्याने आपल्या अपेक्षेप्रमाणे वागावे ही अपेक्षा आली. ते सदैव होणे शक्य नसतेच, म्हणून मग अपेक्षा भंग आला, त्यापाठोपाठ दुरावा आला. मैत्रीमध्ये नाते जमते पण काही एक डेफिनेट अपेक्षा न ठेवता. त्यामुळे मैत्री वर्षानुवर्ष टिकून ताजीतवानी राहू शकते. तर, डाॅ. मुग्धा देशपांडे माझी मैत्रीण. त्या दिवशी अंकिता तिला भेटली हाॅस्पिटल कँपस मध्ये नि त्यानंतर तिचा फोन आला..

"काय गं? खूप दिवसात काँटॅक्ट नाही?"

"वेळ कुठेय? डिपार्टमेंट,घर सगळ्यात बिझी आहे.."

"मी फोन अशासाठी केला.. की अंकिता आलेली.. भेटली मला.'

"कुठे?"

"कुठे काय? इकडे. केईएममध्ये."

"केईएममध्ये? कुठे?"

"काॅलेज कट्ट्यावर."

"कट्ट्यावर? कधी? ते दहा पंधरा दिवसांपूर्वी ना?"

"छे गं! आज."

"आज? कशाला आलेली?"

"म्हणाली ती की तिकडच्या म्हणजे तुमच्या काॅलेजच्या कुठल्यातरी मराठी नाटकाचं इन्व्हिटेशन घेऊन आलेली म्हणून.."

"हां. आहे काहीतरी नाटक. पोस्टर्स लागलीयत खरी. पण मला तर आश्चर्यच वाटतंय की हिला मराठी नाटकात एवढा इंटरेस्ट कसा काय?"

"हो ना. मराठी आणि नाटक! दोन्हींशी हिचा संबंध काय?"

"हो ना. तू अंकिताला चांगली ओळखतेसच.."

'पण मला ना दुसरेच काहीतरी वाटतेय बघ. आमच्या काॅलेजचा हा मराठी वाङमय मंडळाचा सेक्रेटरी आहे ना त्याच्याशी मैत्री असावी अंकिताची."

"मराठी वाङमय मंडळ आणि अंकिता?"

"अगं ते मंडळ महत्वाचं नाही. त्याचा सेक्रेटरी.. त्याच्याशी मैत्री असावी, असावी म्हणजे आहेच. नाहीतर काॅलेजच्या नाटकाला.. ते ही मराठी.. अंकिता येणार हे पचवायला कठीण आहे की नाही? आणि ती इकडे आली ते आमंत्रण द्यायला! काहीतरी नक्कीच शिजतंय.. खिचडी पक रही है."

"नाही गं. गॅसवर काही नाहीये.. खिचडी सुरेन्द्रला आवडत नाही.."

"मूर्ख आहेस तू? मी सांगते काय.. तू ऐकतेस काय?"

"अगं खरंच. अजून स्वयंपाकाला सुरूवात नाही केली."

"तू धन्य आहेस. मी काय सांगतेय.. अगं तो मुलगा नि अंकिता.. काहीतरी गडबड आहे. नाहीतर ही अशी आली नसती.."

"असं म्हणतेस? मग, आता गं?"

"अगं तसं असेलच ते नाॅट टू वरी. मी ओळखते त्याला. अटिपिकल फाॅर धिज टाइम्स. ही इज अ गुड बाॅय. मी त्याच्या आईलाही ओळखते. फार मेहनती. मुलगा चांगलाय.."

"मुलगा चांगला आहेस म्हणतेस? मग चांगलेच आहे.."

"त्याची आई लोणची पापड विकते. हिज फादर इज अ मिल वर्कर. म्हणजे बघ. माझ्या ओळखीतले आहेत सारे. मुलगा हुशार आहे.."

"असणारच! नाहीतर केईएम मध्ये कसा असेल? पण सुरेन्द्र..? तुला ठाऊक आहे ना त्याचा स्वभाव. गरिबाघरी पोरीला पाठवायला तो तयार व्हायचा नाही.."

"हुं.."

"पण हिस्टरी विल रिपीट इटसेल्फ! मी सुरेन्द्रशी लग्न केलं तेव्हा तो ही असाच होता.. तुला ते सगळंच ठाऊक आहे ते.."

"अगं बघू. नक्की काही आहे असं कसं म्हणणार आपण. पण असेल तरी इट्स ओके. आजकाल वेल बिहेव्ड कोणी मिळणे कठीण. आणि वुई नो हाऊ अंकिता इज. तिला पटले नाही तर ती नाही ॲडजस्ट होणार कोठेच. आणि शी ईज टू चूझी.. त्यामुळे तिच्याकडून चूक होणार नाही.."

"गाॅड! होप एव्हरीथिंग गोज स्मूथली. मला वाटतं ती काही दिवसांपूर्वी पण आलेली तिकडे. ते ही बसने! ही गाडीशिवाय न हलणारी. बसने जाते की काय? बसची तिकिटे सापडली मला.. मी विचारले तर थोडी भांबावली.. जस्ट कीप अ वाॅच.."

मग आमच्या काॅलेजच्या त्या नाटकाला मी अगदी हाॅल भरून गेल्यावर गेले. नाहीतर मॅडम आल्या म्हणून सगळे पुढे बसायला लावायचे.. मला त्या मुलाला बघायचे होतं. नाटक थोडीच. थोडक्यात मला ते नाटक बघायचं नाटक करायचं होतं! अंकिता नि तो मुलगा एका बाजूला बसलेले.. मुलगा छानच आहे.. आवडावा असाच. मला माझ्यावेळी सुरेंद्रशी जोडी जुळली तेव्हा मुग्धानी म्हटलेली ती कविता आठवली.. तो रविकर का गोजिरवाणा.. आवडला आमुच्या राणीला! सुरेंद्र आणि रविकर! काय ते तारूण्यातले वेडे दिवस असतात नाही?

काही असो, एकाच वेळी मला काळजीही वाटली नि आनंदही झाला. काळजी आणि आई यांचे तर अतूट नाते. पोर चालायला लागली तेव्हापासून ती शाळेत जाते, काॅलेजात जाते.. पदोपदी काळजी. त्यात आता ही दुसऱ्या घरी जायची. काळजी तर वाटणारच. त्यात सुरेन्द्र. खरोखरच जर अंकिताला हा मुलगा आवडला तर ती काही तिची जिद्द सोडायची नाही. नि एका मोठ्या डाॅक्टरची मुलगी एका मिल वर्करच्या घरात.. सुरेन्द्रला कितपत पचेल? नाही, पचणारच नाही. किती ही पाचक औषधी माझ्या डिपार्टमेंटमधून दिली तरी!

मी तेव्हा खूप विचार केला. अंकिताला इथेच अडवावे म्हणजे पुढचे सर्व टाळता येईल. पण अंकिता हट्टी आहे. ती मानायची नाहीच. उलट जे होतेय ते मला सांगायचीच नाही. आणि सुरेन्द्रला या बाबतीत काही सांगणे म्हणजे.. मोठ्याच गोंधळाला आमंत्रण. तो कसा रिॲक्ट होईल सांगता यायचे नाही. अमेरिकेत पोरीला पाठवण्याची स्वप्ने पाहता पाहता अचानक त्याची लाडकी पोर छोट्याशा चाळीसारख्या घरात जाईल रहायला.. सुरेन्द्र हे मानणे अशक्यच. पण जेव्हा होईल ते रामायण तेव्हा पाहू.. सध्या जे जे होईल ते ते पहावे. पोर तशी चुकायची नाही. बाकी श्रीमंती नि गरीबी काय.. येते नि जाते..

पण अंकितातला बदल जरा जास्तच ठळक होता. रविवारी सकाळी लोळत पडणारी नि उशीरा उठणारी अंकिता चक्क सहा वाजता उठून सायकलिंगला जायला लागली? आदल्या दिवशी स्वत: जाऊन सायकल रिपेअर करून आणली? हल्ली मध्येच कुठेतरी नजर लावून काय बसते नि काही स्पेसिफिक प्रश्न विचारले की नजर काय चुकवते! पपांना सायकलिंगला पाठवते बरोबर म्हटले तर बिचारीच्या तोंडाचा रंगच उडतो! साहजिकच आहे. बट आय वाॅज हॅपी फाॅर हर. म्हणजे एकूण ती खुशीत आहे म्हणून मी खुशीत आहे. मुलगा तसा चांगला आहे.. हे ही कारण आहे त्याचं.

दर रविवारचे सायकलिंग सुरू झाले.. आणि दोघांसाठी लिंबूपाणी हळूच बनवून घेऊन जाणाऱ्या अंकितामुळे भाजीवाल्याकडील लिंबांचा खप वाढला! अंकिता दर रविवारी सकाळी मांजरीच्या पावलांनी उठते.. हळूच पाण्याच्या दोन बाटल्या भरते.. लिंबं चिरून सकाळ सकाळी सरबत बनवते.. आणि गंमत म्हणजे लिंबाची साल कोणाला दिसू नये म्हणून कचऱ्याच्या डब्यात लपवल्यासारखी टाकते! प्रेमापाठोपाठ हा चोरटेपणा कसा आपोआप येतो नाही? दूध चोरून पिणारी माझी माऊ.. डोळे मिटून! एक दोनदा मी तिच्या नकळत त्या ग्राउंडवर ही जाऊन आले. अखिलेश.. उमदा होता. स्टुडियस लुक्स.. जीएसआईट आहे म्हणजे तसाच असायचा. जीएस मेडिकल इज नोन फाॅर सच स्टुडंट्स. सिन्सियर स्टुडंट्स.. दोघे ग्राउंडला चकरा मारायचे. चकरा मारता मारता गप्पा.. एक दीड तासांनी परतायचे. ते काय बोलत असावेत?

अंकिता हळूच घरी यायची.. नि अभ्यासात डोकं खुपसून बसायची! अभ्यासू तर ती आधी ही होतीच, पण कोणी काही विचारायला नको म्हणून जास्तच पुस्तकं उघडून बसायची!

आणि सगळ्यात गंमत म्हणजे, तिला हे माहितच नव्हते तोवर की मला काय काय माहिती आहे!