Angad Shishtai - 1 books and stories free download online pdf in Marathi

अंगद शिष्टाई - भाग १

अंगद शिष्टाई - संत एकनाथ.
श्रीराम सैन्यासह लंकेत पोहोचले. राजधर्माला अनुसरून त्यांनी रावणाकडे अंगद याला वकील (राजदूत) म्हणून पाठवले. अंगदाने रावणाच्या सभेत (राजदरबार) जाऊन त्याला सीतेला परत पाठविण्याविषयी सांगितले, पण रावणाने ते ऐकले नाही. व अंगद श्रीरामांकडे परत आला. या प्रसंगाचे वर्णन यामध्ये केले आहे.
श्रीराम सेतू पार करून लंकेत पोहोचले. तेंव्हा त्यांनी सर्वाना विचारले की आता पुढे काय करायचे ते सांगा. सर्वजण म्हणाले की युद्ध करून लंकानाथाला सैन्यासह मारावे. तेव्हा श्रीराम म्हणाले की राजधर्माला व शास्त्राला अनुसरूनच कार्य करावे त्यामुळेच परमार्थ साधला जातो. त्याप्रमाणे आपला दूत लंकेला पाठवावा. तेव्हा वानर म्हणाले की त्यानी सीता चोरून नेली व आपणच दूत पाठवायचा हे कसे?. युद्ध करण्यात भीती कसली?. तेव्हा श्रीरामांनी राज धर्म व भूत दया परमार्थ सर्वांना समजावून सांगितला.
युद्ध धर्म सांगितला.
साम , दाम , दंड, भेद हे चार प्रकार व त्यांचे महत्व सांगितले. आणि युद्धाच्या वेळी प्रथम सामोपचाराने शत्रूला समजावणे हा धर्म असलेचे सांगितले. सामोपचाराने आदर निर्माण होतो व ते स्तुत्य कृत्य आहे असे सांगितले. सामोपचाराचा वापर न करता युद्ध केलें तर अनेकजण नाहक मृत्यूमुखी पडतात. हे ऐकून हनुमान, ‌‌‌अंगद, सुग्रीव व बिभीषण यांनी अनुमोदन दिले. तेव्हा श्रीराम म्हणाले दूत म्हणून कोणास पाठवावे ते सांगा. दूत हा भित्रा नसावा, भीड बाळगणारा नसावा, चतूरपणे व स्वत:ची बुद्धि वापरून बोलणारा असावा. अग्रभागी उभे राहून योग्य असे प्रत्युत्तर देण्याची क्षमता त्याच्या अंगी असावी. आपल्या राजाचे कार्य सिद्धीस नेणारा असावा.
असे सांगितल्यावर हनुमान म्हणाले, हे श्रीराम ! वानरांची संख्या वीस पद्म इतकी आहे. ते‌ शक्तिनी परिपूर्ण आहेत. त्यामध्ये वालीचा मुलगा अंगद हा बलवान आहे. तो रावणाच्या सभेत बोलण्यास समर्थ आहे. तो धैर्यवान आहे. तो रावणाच्या सभेत जाण्यास सुयोग्य आहे. त्यालाच दूत म्हणून पाठवावे.
अंगद आल्यावर श्रीरामांनी त्याला हृदयाशी धरले व म्हणाले तूं दुत म्हणून रावणाकडे जा.
रावणाला काय सांगायचे ते ऐक. या युद्धाचे कारण तू केलेली चोरी आहे. तू माझ्या पत्नीला पळवून नेले आहेस . मी ( धनुर्धारी राम ) निर्धार केला आहे की तुला याचा दंड (शिक्षा) मिळेल. परदारा (दुसऱ्याची पत्नी ) हरण हे तुझ्या मरणाचे कारण होणार. माझे अमोघ बाण सूटल्यावर त्यांना कोणी थांबवु शकत नाही. त्यामुळे तू अयोध्येच्या राजाला शरण जाऊन सीतेला परत द्यावेस. तुझ्या लंकेचे, राज्याचे हित बघ. असे सांगून अंगदाला फळे वगैरे देऊन लंकेला जाण्यास सांगितले.
अंगद म्हणाला ' हे रघुनाथा ! हे समर्था , तुमची आज्ञा प्रमाण आहे. आपणच आपला पराक्रम सांगणे हे मुर्खतेचे लक्षण आहे. त्यामुळे मी आपणास नमस्कार करतो व लंकेस जातो.
अंगद रामबाणाप्रमाणे उडाला व वेगाने मार्गक्रमण करत लंकेत पोहोचला. रावणाच्या सभेत त्याची उडी पडली तेव्हा रावण दचकला. धरती कांपू लागली. सर्व जण भयभीत झाले. हा अवघ्यांचा घात करावयास आला आहे असा सर्वत्र पुकारा झाला. राक्षसांमधे हाहाकार माजला. अंगदाला समोर पाहताच रावण स्तब्ध झाला. सर्व राक्षस टकमक बघत होते पण कोणीच काही बोलत नव्हते. अंगद म्हणाला, मी आपला अतिथी आहे, तरी आपण माझे स्वागत करीत नाही. भयभीत झाला आहात. अरे राक्षसांनो, हनुमंताने अशोकवनाचा व राक्षसांचा नाश केला त्यामुळे तुमची दातखिळी बसली आहे. तुम्हाला बोलण्यास शब्द सापडत नाहीत.
अंगद बसलेला पाहून रावणाने हळूच विचारले तू हनुमान नाहीस तर कोण आहेस ? इथे कां आला आहेस? असे रावणाने विचारता अंगदाने आपला वृतांत सांगितला. ज्या रामाने मारिच राक्षसाचा वध केला, खर, दुषणाचा वध केला त्या रामाचा मी दूत आहे. मी महाबली वालीचा पुत्र अंगद आहे. ज्या वालीने रावणाला कांखेत घेऊन आंघोळ केली होती त्याचा मी अती बलशाली पुत्र आहे. ‌‌‌मी इथे का आलो आहे ते ऐक. तू सीतेला परत करावे. सीतेला परत केले तर लंकानाथ वाचेल नाही तर मी त्याचा वध करीन असे श्रीरामांनी सांगितले आहे.