Good work should be rewarded books and stories free download online pdf in Marathi

चांगल्या कामाची किंमत व्हावी

चांगल्या कामाला किंमत नाही?

"गुरुजी, आता तरी चपला घालाल काय?"
पत्रकारानं एका गुरुजींना विचारलेला प्रश्न. त्या गुरुजींनी आपली पादत्राणे त्यागली होती. त्याचं कारणही तसंच होतं. ते होतं, त्यांनी केलेलं महान कार्य. जे कार्य त्यांनी केलं होतं, त्या कार्याची दखल जरी घेतली असली तरी त्या शिक्षकाची दखल न घेतली गेल्यानं तसेच त्यांच्यात दोष दाखवून त्यांच्यावर आरोप केले होते. त्यानंतर संबंधीत शिक्षकानं पादत्राणे त्यागली. शेवटी जेव्हा त्यांना दोषातून मुक्ती मिळाली, त्यानंतर पत्रकारानं त्यांना विचारलेला प्रश्न. त्यावर गुरुजीनं अतिशय शांत राहून उत्तर दिलं,
"नाही, मी अजिबात चपला घालणार नाही. कारण माझ्या विद्यार्थ्यांचं बरंच नुकसान झालंय."
चपला घालणे न घालणे हा त्यावरचा उपाय नाही. मग ते गुरुजी तसं का बोलले? त्याचं कारण होतं त्यांनी केलेलं कार्य. त्यांनी अतिशय निरपेक्षरितीनं आपलं कार्य केलं होतं. विद्यार्थ्यांना केवळ वेतन मिळतं म्हणून तयार केलं नव्हतं तर विद्यार्थी आपल्या स्वतःचीच मुलं आहे असा विचार करुन त्यांना तयार केलं होतं. कारण शिकविण्याचं काम सर्वच शिक्षक करतात. मात्र चांगलं शिकविण्याचं काम कोणताच शिक्षक करीत नाही.
वारे गुरुजी त्यांचं नाव. त्यांनी वाबडेवाडीच्या शाळेत जेव्हा प्रवेश केला. तेव्हा तेथील पटसंख्या जेमतेम होती. त्यावेळेस त्या शाळेत दोनच शिक्षक होते. त्यानंतर त्यांनी विचार केला. आपण आपल्या शाळेची पटसंख्या वाढवावी. असा विचार करताच त्यांनी कल्पना केली की जर या विद्यार्थ्यांना कल्पनांती शिकवलं तर.......त्यांचा तो विचार. विचार करताच त्यांनी तो विचार अंमलात आणला. त्यासाठी लागत होती लागत. ती लागतही त्यांनी लोकसहभागातून मिळवली. विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी नवनवीन प्रयोग केलेत. त्यातूनच मुले प्रयोगांती बनली. मुलांनी शिष्यवृत्ती परीक्षेत आपली कामगिरी दाखवली. शिवाय कल्पनाशक्ती वापरुन व लोकांचा सहभाग घेवून त्यांनी शाळेचा विकास केला.एकंदरीत सांगायचं झाल्यास शाळेचा विकास झाला.
वारे गुरुजी चांगलं काम करीत होते. त्यांच्या प्रयत्नातून चांगले विद्यार्थी घडत होते. लोकं सहल आयोजन करुन आपल्या विद्यार्थ्यांना त्या शाळेपासून प्रेरणा देत होते. स्वतः त्या शाळेला भेट देवून व प्रेरीत होवून ते प्रयोग आपल्या शाळेत करीत होते.
ते मॉडेल होते इतर शाळांसाठी. इतर शाळेनही तेच प्रकल्प वापरुन आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांचा विकास करायला हवा होता. परंतु चांगल्या कामाची कधीच किंमत होत नाही अन् चांगल्या माणसांचीही लोकांना किंमत वाटत नाही. चांगली माणसं जर अधिकारपदावर आलीच तर त्यांना कसं पदच्यूत करता येईल याचाच विचार होत असतो घडोघडी. कारण आजच्या काळात कोणीच कोणाची प्रगती झालेली पाहू शकत नाहीत. कारण असतं, आपण तशा स्वरुपाचं करु न शकणं. त्यातूनच द्वेष निर्माण होत असतो. हा द्वेष एकदा का मनात निर्माण झाला की बस. पुढील व्यक्ती कसा संपेल यासाठी संधी शोधणं सुरु होतं. काही काही ठिकाणी तर इज्जतीचाही भाजीपालाच केला जातो. मग दोषारोप होतात. निलंबनही. कारण काही लोकं समाजात असेही असतात की जे स्वतःही काही करीत नाहीत व दुसरा करीत असेल तर त्यालाही काही करु देत नाहीत. त्याचंही कारण असतं, त्याला तसं करता न येणं.
वारे गुरुजींबाबत तेच घडलं. त्यांनी शाळेलाच नाही तर संपूर्ण पंचक्रोशीला इज्जत मिळवून दिली. त्या शाळेचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर नेलं. हेच खुपलं काही समाजकंटकांना. त्यातच त्यांच्यावर तथाकथित आरोप प्रत्यारोप झालेत. मग त्यांचं निलंबन झालं व चौकशी लागली. अशी चौकशी की ज्यातून त्यांच्यासारख्या इमानदार व्यक्तीमत्वाला नोकरीवरुन हात धुवावे लागेल. परंतुवारे गुरुजी इमानदार होते. त्यांनी निःस्वार्थ मेहनत घेतली होती वाबडेवाडीतील विद्यार्थ्यांसाठी. हे त्यांनाही वाटत होतं. त्यांना त्यांच्या इमानदारीपणावर विश्वास होता. शेवटी वारे गुरुजी जिंकले. ते आरोपमुक्त झाले. परंतु या आरोपमुक्तीनंतर त्यांना वाबडेवाडीतील शाळा मिळाली नाही. ज्या शाळेत त्यांनी मुलं घडवली होती. ज्या शाळेतून त्यांनी स्वप्न पाहिले होते अन् ज्या शाळेच्या विद्यार्थ्यांचा त्यांनी विकास केला होता. आज ते दुसऱ्याच शाळेत आहेत. ती शाळा की ज्या शाळेत तीन विद्यार्थी होते. जी शाळा आदिवासी भागात आहे.
शिक्षक म्हणून काम करीत असतांना काही शिक्षक शाळेतील विद्यार्थ्यांना केवळ शिकवीतच नाही तर त्या शाळेचं नंदनवनच करतात. त्या शाळा कुठेही असल्या तरी. ते शिक्षक त्या शाळेत शिकवायला जातात. तेव्हा पटसंख्याही आपोआपच वाढते. वारे गुरुजी आदिवासी भागातील शाळेत गेले. त्यांनीच इथंही चांगले प्रयोग केले. उपक्रमही राबवले. त्यातच त्या शाळेत जेव्हा ते लागले होते. तेव्हा तीन विद्यार्थी होते. आज एक वर्षात शंभर विद्यार्थी आहेत. ते इमानदार होते म्हणून त्यांनी पादत्राणे त्यागली. आजही ते पादत्राणे वापरत नाहीत. कारण त्यांना आजही खंत आहे वाबडेवाडीतील शाळेची. त्या विद्यार्थ्यांची की ज्या विद्यार्थ्यांचं समाजातील समाजकंटकामुळं नुकसान झालं. आता ते केव्हा पादत्राणे वापरतील हे निश्चीत नाही.
वारे गुरुजींबद्दल सांगायचं झाल्यास खरं तर त्यांचे प्रयोग शाळेशाळेतून राबवायला हवे होते. त्यांची मुलाखत टिव्ही चॅनलवर गाजवायला हवी होती. परंतु तसं काहीच घडलं नाही.
समाजात असे बरेच लोकं असतात की जे प्रसिद्धीच्या पहिल्या स्तरावर असतात. तेव्हा त्यांच्याबद्दल काहीच वाटत नाही. परंतु जेव्हा ते यशाच्या शिखरावर पोहोचतात. तेव्हा त्यांना वेळोवेळी मदत करणारेही त्यांना मदत करीत नाहीत. वारे गुरुजींबाबत तेच घडलं होतं.
महत्वाचं सांगायचं झाल्यास माणसानं कोणाचाही द्वेष करु नये. कुणी जर समोर जात असेल तर ते त्याचं प्रारब्धच असतं. आपण त्याला जळू नये वा त्याच्यावर दोषारोप करु नये. जर करायचेच असेल तर त्याचं अनुकरण करावे. त्यानुसार त्याच्यातील गुण उपयोगात आणून आपला विकास करण्याचा प्रयत्न करावा. त्यासोबतच आपल्या परीसराचा देखील विकास करावा. जेणेकरुन त्यामुळं आपलाच नाही तर आपल्या देशाचाही विकास होईल. ज्यातून देशाला महासत्ता बनवता येईल यात शंका नाही.

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०