Geet Ramayana Varil Vivechan - 40 books and stories free download online pdf in Marathi

गीत रामायणा वरील विवेचन - 40 - मज सांग अवस्था दूता रघुनाथांची

देवी सीतांनी रावणाला असे बजावल्यावर रावण म्हणाला,

"ठीक आहे सीते सध्या तू काही ऐकण्याच्या मनस्थितीत दिसत नाही. तुझा तुझ्यापतीवरचा विश्वास लवकरच खोटा ठरेल तरी मी तुला एका महिन्याची मुदत देतो. मी म्हंटले त्यावर विचार कर आणि स्वमर्जीने माझी पत्नी होण्यास तयार हो.",असे म्हणून रावण आपल्या राजप्रासादात निघून गेला.


सीता देवींपुढे जाण्याची आता हीच योग्य वेळ आहे हे हनुमंताने ओळखले व त्यांनी हळू आवाजात राक्षसिनींना न ऐकू जाईल पण सीता देवींना ऐकू जाईल ह्या पद्धतीने राम स्तुती म्हणणं सुरू केली. ती ऐकताच चकित होऊन देवी जानकी नि इकडे तिकडे बघितलं तेव्हा झाडावरून हनुमंताने रामांनी दिलेली अंगठी जानकी देवींच्या ओंजळीत टाकली. ती बघून जानकी देवी वर वृक्षाकडे बघून म्हणाल्या,


"कोण आहे? कोण माझ्या स्वामींची स्तुती गातोय? ही मुद्रिका तर माझ्या स्वामींची आहे. कोण आहे कृपया समक्ष उभे राहा",असे सीता देवींनी म्हंटल्यावर हनुमान सीता देवींसमोर उभे राहतात व म्हणतात,


"जानकी देवी! माझे आपणाला विनम्र अभिवादन आहे. मी श्रीरामांचा दूत हनुमान आहे. किष्किंदा नगरीचे राजे सुग्रीव ह्यांचा मंत्री. आपल्यापर्यंत रामांचा संदेश घेऊन आलोय. माझी ओळख पटावी म्हणून रामांनी तुम्हाला दाखवायला ही त्यांची मुद्रिका माझ्यासोबत पाठवली आहे.",यावर सीता देवी म्हणतात,


"दूता!हनुमंता! ही माझ्या स्वामींची मुद्रिका मी ओळखली आहे त्यामुळे तूच त्यांचा दूत आहेस ही माझी खात्री पटली आहे. मला सांग स्वामी कसे आहेत?ज्यांच्या हातात धनुष्य व कधीही नासंपणाऱ्या बाणांचा भाता ज्यांच्या पाठीशी असतो ते माझे स्वामी दुःखी कष्टी झाले आहेत का? की माझ्या चिंतेने त्यांच्या नेत्राखाली श्यामल वलये निर्माण झाली आहेत. कर्माला दोष देत ते हताश बसले आहेत का? त्यांचे नित्य कर्म पूजा संध्या अर्चना ध्यान हे सगळे ते अजूनही करतायेत न! की माझ्या विरहात ते सगळं विसरून गेले आहेत. अजून त्यांनी धीर सोडला नाही न? त्यांच्या आजूबाजूला त्यांची काळजी घेणारे,त्यांची मदत करणारे सज्जन सहकारी मित्र आहेत न? ते सगळे मित्र त्यांचे हितचिंतक असून रामांना विजय मिळावा असे सगळ्यांना वाटते न? की श्रीराम एकटे पडले आहेत? आतापर्यंत श्रीरामांनी पराक्रमाने ज्यांना ज्यांना त्यांच्या अडचणीत मदत केली ते लोकं आता श्रीरामांना अडचण आल्यावर साथ द्यायला तयार आहेत न?",


(इथे ग.दि. माडगूळकरांना देवी सीतेच्या मुखी अनेक शंका दर्शवणारे वाक्य योजून सीता देवी किती निराश झाल्याहोत्या ते स्पष्ट केले आहे.)


सीतादेवी एकामागून एक हनुमंताला प्रश्न विचारताना म्हणतात,


"असं तर नाही न की स्वामी मला विसरले. मी इथे दैवयोगाने परक्याच्या दारी कुढतेय स्वामी येतील या आशेवर पण स्वामीच मला विसरले असतील तर मला इथेच असं कुढत राहण्यावाचून पर्याय नाही. त्यांना माझी आठवण येते की नाही? स्वामी करतील का माझी इथून सुटका? भ्राता भरत पाठवतील का सैन्य रावणाशी लढायला? त्यांना श्रीरामांची काय अवस्था आहे हे कळलं असेल का?",एवढं बोलून पुढे सीता देवी वेगळीच शंका बोलून दाखवतात,


"असं तर नाहीये न की आता माझी आशा सोडून ते दुसरे लग्न तर करायला निघाले आहेत? माझ्यावरचं त्यांचं प्रेम तर आटले नाही न? कधी करतील ते इथून माझी सोडवणूक? कित्येक काळापासून मी इथेच डोळ्यात त्यांची आस घेऊन उभी आहे. ह्याच आशेवर की एक दिवस राम येतील ती सुवर्णघटिका येईल. राम रावणाचा वध करतील आणि मला त्यांच्या सोबत घेऊन जातील. जोपर्यंत ते सुखरूप आहेत ह्याची वार्ता माझ्यापर्यंत पोचत राहील तोपर्यंत मी कुठेही असली तरी तिथे जिवंत राहील. ह्या जन्मी कधीतरी आमची पुन्हा भेट होईल का?",असे म्हणून सीता देवी अतीव नैराश्येने अश्रूपात करू लागतात.


त्यावर हनुमंत त्यांना धीर देतात व म्हणतात,


"देवी सीता आपण काळजी करू नका. श्रीरामांच्या मनात तुमच्याशिवाय दुसरे कोणीही नाही. सुग्रीव हे त्यांचे मित्र झाले आहेत त्यामुळे त्यांची सेना घेऊन लवकरच श्रीराम रावणाशी युद्ध करून तुमची इथून सुटका करतील. तोपर्यंत धीर धरा. इतका काळ आपण धीर धरलाय तसा आणखी काही काळ धीर धरा. मनात शंका कुशंका आणून व्यथित होऊ नका. हेच मी सगळं सांगण्यासाठी आलो होतो. आता मला निरोप द्या",असे म्हणून सीता देवींना वंदन करून हनुमंत तेथून निघाले. सीता देवींच्या निराश मनाला आशेची पालवी फुटलेली असते. त्यांच्या कोमेजलेल्या चेहऱ्यावर एवढ्या काळानंतर पहिल्यांदाच हास्य फुलते.


(रामकथेत पुढे काय होईल ते पाहू उद्याच्या भागात तोपर्यंत जयश्रीराम🙏🚩)


ग.दि.माडगूळकर रचित गीतरामायण मधील हे चाळीसावे गीत:-


मुद्रिका अचुक मी ओळखिली ही त्यांची

मज सांग अवस्था दूता, रघुनाथांची


हातांत धनू तें, अक्षय भाता पृष्ठीं

विरहांत काय ते राघव झाले कष्टी?

कां श्यामल वलयें नयनतळीं चिंतांचीं?


बसलेत काय ते लावुन कर कर्मातें?

विसरलेत काय ते दुःखें निजधर्मातें?

करितात अजुन ना कर्तव्यें नृपतीचीं?


सोडिले नाहिं ना अजुन तयांनीं धीरा?

का शौर्याचाही विसर पडे त्या वीरा?

साह्यार्थ असति ना सैन्यें सन्मित्रांची?


इच्छिती विजय ना त्यांचा अवघे राजे?

का लोकप्रीतिला मुकले प्रियकर माझे?

विसरले थोरवी काय प्रभू यत्‍नांची?


का मलाच विसरुन गेले माझे स्वामी?

मी दैवगतीने पिचतां परक्या धामीं

का स्मृती तयांना छळिते या सीतेची?


करतील स्वयें ना नाथ मुक्तता माझी?

धाडील भरत ना सैन्य, पदाति, वाजी?

कळतसे त्यांस का वार्ता रघुनगरीची?


का विपत्कालिं ये मोह तयांच्या चित्तीं?

पुसटली नाहिं ना सीतेवरची प्रीती?

करतील मुक्तता कधिं ते वैदेहीची?


त्या स्वर्णघडीची हो‌इन का मी साक्षी?

कधिं रामबाण का घुसेल रावणवक्षीं?

वळतील पाऊलें कधी इथें नाथांचीं?


जोंवरी तयांचें कुशल ऐकतें कानीं

तोंवरी सजिव मी असेन तैशा स्थानीं

जन्मांत कधी का होइल भेट तयांची?

★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★