Geet Ramayana Varil Vivechan - 39 books and stories free download online pdf in Marathi

गीत रामायणा वरील विवेचन - 39 - नको करुस वल्गना रावणा

हनुमानाची खात्री पटते की हीच श्रीरामांची स्वामिनी आहे. पण तरीही एकदम सीता देवींच्या समक्ष उभे राहण्याचा त्यांचा धीर होत नाही. हनुमानास वाटते की सीता देवींनी आपल्याला कधीही याआधी पाहिलं नाही तसेच सुग्रीव व श्रीराम यांच्या मैत्रीबद्दलही त्यांना ठाऊक नाही. अश्या परिस्थितीत मी जर अचानक समोर गेलो तर रावणानेच एखादे मायावी रूप घेतले असावे व तोच समोर उभा ठाकला आहे असे सीता देवींना वाटू शकते. हनुमंत असा विचार करतच होते तेवढ्यात सेवकांच्या गराड्यात रावण तिथे येऊन ठेपला आणि सीता देवींसमोर उभा राहिला व म्हणाला,


"सीते! अशी किती काळ इथे खितपत पडणार आहे? अजूनही तुला आशा वाटते की तुझा राम येईल म्हणून? अगं! तुझी खरी जागा माझ्या अंतःपुरात आहे. इथे बसून रडत राहण्यासाठी नाही.",रावणाने असे असभ्य वचन बोलताच एखादी तेजस्वी वीज कडकडावी त्याप्रमाणे सीता देवी रावणास म्हणतात,


"रावणा! राक्षसा! रात्री भटकणाऱ्या प्राण्या(निशाचर) मी एक पतिव्रता स्त्री असून वंदनास योग्य आहे हे सगळ्या देवांना तसेच दैत्यांना सुद्धा ठाऊक आहे. हे पाप्या! माझी त्वरित मुक्तता करून तुझा पुण्यसंचय वाढव. जर तू खरा वीर असशील तर नारीचा मान करायला शिक. पापी राजामुळे संपूर्ण राष्ट्राची वाताहत होते. तुझ्या चुकीच्या वागण्याने,गैरवर्तनाने तुझ्या राष्ट्राला का उध्वस्त करतोयस? तुझ्याशी विवाह करणे तर दूर त्याचा विचार सुद्धा माझ्या मनाला शिवत नाही. श्रीरामांशिवाय माझ्या मनात कोणीच कधीच असू शकत नाही. प्रत्येक क्षणी मी त्यांचेच चिंतन करते. ते माझ्या समक्ष नसले तरी माझ्या समीप आहेत.


इथे ह्या वाटीकेत ह्या वृक्षाखाली जेव्हाही मी रात्री झोपते तेव्हा माझ्या डोक्याखाली उशीच्या जागी त्यांचा डावा हातच आहे असे मला भासते. (' शयनिं ये उशातळीं रामहस्तवाम तो' गीतातील ही ओळ सीता देवी उठता बसता झोपता सतत श्रीरामांचेच कश्या चिंतन करीत होत्या हे अधिक स्पष्ट करण्यासाठी ग.दि.माडगूळकरांनी योजलेली असावी.)

(शास्त्रानुसार पत्नी ही पतीची वामांगी असते म्हणजेच पत्नी ही पतीच्या डाव्या बाजूला असते. धार्मिक समारंभात सुद्धा पतीच्या डाव्या बाजूला पत्नीला बसायला सांगतात.)

मी माझ्या पतीलाच पत्नी म्हणून योग्य आहे. दुसऱ्या कोणाशी लग्न करून मी सुखी होऊ शकत नाही. मी दुसऱ्या कोणालाही पत्नी म्हणून योग्य ठरणार नाही. रावणा मला माझ्या प्रिय रामांजवळ पाठव. त्यांना शरण जा ते तुला मोठ्या मनाने माफ करतील. आयुष्यात जर तुला तुझं भलं करायचं असेल तर रामांचे शत्रुत्व ओढवून घेऊ नकोस,त्यांच्याशी सख्य कर. श्रीरामांना त्यांची सदैव पवित्र असलेली जानकी अर्पण कर अन्यथा तुझा काळ जवळ आला आहे हे नक्की समज.",देवी सीतेच्या अश्या बोलण्याला रावण गडगडाटी हसतो आणि म्हणतो,


"सीते तुझा राम माझे काहीही बिघडवू शकणार नाही. मी किती पराक्रमी आहे ह्याची तुला कल्पना नाही.",त्यावर सीता देवी त्याला म्हणतात,


"एक वेळ इंद्रदेवाचे वज्र शत्रूला घाव न घालता परत येईल पण माझ्या रामांचा बाण निष्फळ जाणार नाही. एकदा का त्यांचा क्रोध तू ओढवला तर तुझी काही धडगत नाही. स्वामी असा बाणांचा वर्षाव करतील की त्यापुढे प्रलय बरा अशी तुझ्यावर वेळ येईल. एक क्षणही तू जिवंत राहणार नाहीस. एकदा का तुझ्या शी युद्ध करण्याचे रामांनी ठरवले तर तुझा वंश ही शिल्लक राहणार नाही. संपूर्ण लंका नेस्तनाबूत होईल.

हे विषयांध,मूर्ख,दुष्ट रावणा आताही विचार कर अजूनही वेळ गेली नाही अजूनही सन्मानपूर्वक मला माझ्या रामांजवळ पाठव.",एवढं म्हणूनही जेव्हा रावण ऐकतच नाही हे पाहून सीता देवी त्याला शेवटी सांगतात,


"लवकरच तो क्षण मी बघेन असे मला वाटतेय जेव्हा रामांच्या बाणाने तुझे हृदय विद्ध होईल. त्यानिमित्ताने ही पृथ्वी तुझ्यासारख्या पापी राक्षसाच्या भारातून मुक्त होईल. तुझा काळ समीप आला आहे. आता युद्ध आणि विध्वंस अटळ आहे."


(रामकथेत पुढे काय होईल ते पाहू उद्याच्या भागात तोपर्यंत जयश्रीराम🙏🚩)


ग.दि.माडगूळकर रचित गीतरामायण मधील हे एकोणचाळीसावे गीत:-



नको करूस वल्गना रावणा निशाचरा!

समूर्त रामकिर्ति मी, ज्ञात हें सुरासुरां


वंदनास योग्य मी पराविया पतिव्रता

पुण्य जोड राक्षसा झणीं करुन मुक्तता

लाज राख नारिची वीर तूं जरी खरा


नृपति-पाप पाहतें, अनयनित्य साहतें

राष्ट्र तें जगावरी नाममात्र राहतें

काय आग लाविशी तुझ्या करें तुझ्या पुरा?


जिथें तिथें दिसे मला लोकनाथ राम तो

शयनिं ये उशातळीं रामहस्तवाम तो

चिंतनांत पूजिते त्याच मी धनुर्धरा


योग्य एक त्यास मी, योग्य ना दुजा कुणा

परत धाड रे मला प्रियासमीप रावणा!

शरण त्यांस रक्षुनी राम देइ आसरा


सख्य जोड त्यासवें, हो कृतार्थ जीवनीं

नित्यशुद्ध जानकी राघवास अर्पुनी

ना तरी मृतीच ये चालुनी तुझ्या घरा


इंद्रवज्रही कधी चुकेल घाव घालितां

क्षणहि आयु ना तुझे रामचंद्र कोपतां

रामबाणवृष्टि ती प्रळयसी भयंकरा


ठाकतां तुझ्यापुढें वीर युद्धकाम तो

ठेवणार वंश ना असा समर्थ राम तो

अधम काममूढ तूं, विचार हा करी जरा


बघेन रामबाण मी निडर या तुझ्या उरीं

कंक पंख पाठिशीं, नामचिन्ह ज्यावरी

भारमुक्त हो‌उं दे एकदां वसुंधरा

★★★★★ ★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★