Kimiyagaar - 31 books and stories free download online pdf in Marathi

किमयागार - 31

किमयागार -मक्तूब - Girish
वृद्ध प्रमुखाने इशारा केल्यावर सर्व उभे राहिले. चर्चा संपली होती. हुक्के विझवले गेले. पहारेकरी त्यांच्या स्थानावर उभे राहिले.
प्रमुख परत बोलू लागले.
आपण उद्या पासून ओॲसिसवर हत्यार बाळगू नये हा नियम बदलतं आहोत.
पूर्ण दिवस आपण शत्रू वर लक्ष ठेवायचे आहे. सूर्यास्त झाल्यावर सगळ्यानी शस्त्रे माझ्या ताब्यात द्यायची आहेत.
शत्रूच्या १० मृत माणसामागे एक सोन्याचे नाणे दिले जाईल.
पण समोरच्यानी हल्ला केल्याशिवाय कोणीही हत्यार वापरायचे नाही.
हत्यारे पण वाळवंटासारखीचं लहरी असतात, वापरली गेली नाही तर ती पाहिजे तेव्हा उपयोगी पडतीलच असे नाही.
तरुण आपल्या तंबू कडे निघाला.
पोर्णिमेच्या चांदण्याच्या प्रकाशात सर्व स्पष्ट दिसत होते. तो त्याच्या तंबूच्या दिशेने चालू लागला.
जे काही घडले होते त्याने तो सावध झाला होता.
तो जगद्आत्म्याच्या सहाय्याने आपले म्हणणे मांडू शकला होता.
पण त्याने हा धोकाच पत्करला होता व त्यात त्याचा जीवही गेला असतां. जेव्हा त्याने नशीब आजमावण्यासाठी आपल्या मेंढ्या विकल्या होत्या तेव्हा पासूनच तो धोक्यांचा सामना करीत होता.
आणि उंटचालक म्हणाला तसे,
'मरण कधीही येऊ शकते. '
प्रत्येक दिवस हा आपले जाणे महत्वाचे व्हावे यासाठी जगण्याचा असतो.
सर्व काही " मक्तुब " या शब्दावर आधारित आहे.
किमयागार - घोडेस्वाराची भेट
तो परत जात असताना एकदम शांत होता. त्याच्या मनात निराशेची भावना नव्हती.
उद्या मरण आले तरी त्याचा अर्थ एवढाच असणार होता की देवाच्या मनात त्याच्या भविष्यात बदल घडवायचा नाही.
हे मरण त्याने कठीण परिस्थितीना सामोरे जात, क्रिस्टल दुकानात काम करून आणि वाळवंटातील व फातिमाच्या डोळ्यातील शांततेचा अनुभव घेतल्यानंतर आलेले असेल. त्याने खूप दिवसांपूर्वी घर सोडले होते आणि तेव्हापासून तो प्रत्येक दिवस भरभरुन जगला होता.
आणि उद्या मरण आले तरी या गोष्टीचा त्याला अभिमान होता की इतर मेंढपाळांपेक्षा त्याने जगातील जास्त अनुभव घेतले होते.
अचानक एक मोठा आवाज झाला व तो पूर्वी कधीच नसेल इतक्या जोराने जमीनीवर फेकला गेला. चक्राकार फिरणारी धूळ (वाळू) इतकी पसरली होती की क्षणभर चंद्र पण दृष्टी आड झाला.
त्याच्या समोर एका मोठा पांढराशुभ्र घोडा होता व मोठा आवाज करत तो त्याच्या दिशेने येत होता.
डोळ्यावरील धुळ बाजूला झाल्यावर तरुणाला जे दिसले ते बघून त्याचा थरकाप झाला. त्या घोड्यावर एक पूर्ण काळे कपडे घातलेला माणूस बसला होता आणि त्याच्या डाव्या खांद्यावर बहिरी ससाणा होता. त्याने डोक्यावर मुंडासे (पागोटे) घातले होते व काळ्या रुमालाने डोळे सोडून सर्व चेहरा झाकला होता. वाळवंटातील संदेश वाहकांसारखा दिसतं असला तरी तो सामान्य दूतांसारखा वाटत नव्हता तो एक शक्तिशाली वीर वाटत होता. त्याच्या कडे एक थोडी वक्र तलवार होती आणि तलवारीचे पाते चंद्रप्रकाशात चमकत होते.
किमयागार - घोडेस्वार कोण होता?.
घोडेस्वाराने विचारले, बहिरी ससाण्यांच्या आकाशातील विहरण्यावरून त्याचा अर्थ सांगण्याची हिंमत कोणी केली ?.
त्याचा आवाज इतका मोठा होता की, अल फायोममधील पन्नास हजार पाम वृक्षांमधून त्याचा प्रतिध्वनी ऐकू आला.
हे विचारताना त्याने तलवार तरुणाच्या दिशेने केली होती.
तरुण म्हणाला, ते धाडस करणारा मी आहे. तलवारीचे पाते लागू नये म्हणून थोडे वाकून तो परत म्हणाला होय ," तो मी आहे. "
यामुळे अनेकांचे प्राण वाचणार आहेत कारण हे मी जगद्आत्म्याच्या दृष्टीने पाहिले.
घोडेस्वाराने तलवारीचे टोक तरुणाच्या कपाळावर टेकवले त्यामुळे तरुणाच्या कपाळावर रक्ताचा थेंब आला.
घोडेस्वार स्थिर होता व तरुण देखील स्थिर उभा होता.
तरुणाला पळून जावेसे वाटत नव्हते. त्याला मनातून एक समाधान वाटत होते की, तो आपले भाग्य शोधण्याची धडपड करत असताना आणि फातिमासाठी तो हे मरण स्विकारायला तयार झाला होता.
तो आता शत्रूच्या समोर होता आणि मृत्यूचा विचार करण्याची ती वेळ नव्हती.
तो जगद्आत्म्याची वाट पाहत होता आणि लवकरच तो कदाचित त्याचा एक भाग होणार होता आणि उद्या त्याचा शत्रू देखील आत्म्याचा भाग बनणार होता.
घोडेस्वाराने कपाळावर टेकवलेली तलवार बाजूला न करता विचारले, तू पक्ष्यांच्या उडण्याच्या पद्धतीचा अर्थ कसा काय लावलास?.
तरुण म्हणाला, पक्षी जे मला सांगू इच्छित होते ते मी समजून घेतले. ते ओॲसिसला संकटातून वाचवण्याचा प्रयत्न करत होते.
उद्या तुम्ही सर्वजण मराल कारण ओॲसिसवर तुमच्यापेक्षा जास्त सैनिक आहेत.
तलवारीचे टोक अजून कपाळावर होते आणि प्रश्न विचारला गेला, अल्लाहची इच्छा बदलणारा तू कोण आहेस?.
अल्लाहनी सैन्य निर्माण केले, त्यांनीच ससाणे निर्माण केले आहेत.
अल्लाहनीच मला पक्ष्यांची भाषा शिकवली. सर्वकाही लिहिणारा हात एकच आहे. हे बोलताना तरुणाला उंटचालकाचे बोलणे आठवत होते.
घोडेस्वाराने तरुणाच्या कपाळावरची तलवार काढली आणि तरुणाला हायसे वाटले.
घोडेस्वार म्हणाला, भविष्याविषयी बोलताना विचार करीत जा, जर एखादी गोष्ट लिहिलेली असेल तर ती बदलण्याचा मार्ग नसतो. तरुण म्हणाला, मी फक्त सैन्य बघितले. युद्ध झाले असे बघितले नाही.
घोडेस्वार या उत्तराने थोडा समाधानी झालेला दिसला पण त्याने तलवार अजून हातातच ठेवली होती.
एक परका माणूस या परक्या ठिकाणी काय करत आहे? त्याने विचारले.
मी माझ्या भाग्याच्या शोधात आहे पण कदाचित तुम्हाला ते कळणार नाही. तरुण म्हणाला.
घोडेस्वाराने तलवार म्यान केली. तरुणाला एकदम शांत वाटले. घोडेस्वार म्हणाला मला तुझ्या धैर्याची परीक्षा घ्यायची होती. जगाची भाषा समजण्यासाठी माणसाकडे धैर्य असावे लागते.
तरुणाला आश्चर्य वाटले कारण तो माणूस अशा गोष्टी बोलत होता ज्या फार कमी लोकांना माहित असतात.
तो घोडेस्वार म्हणाला, तू आता इथपर्यंत आलायसच तर आता धीर सोडू नकोस.
वाळवंटावर प्रेम करावे पण त्याच्यावर पूर्ण विश्वास टाकू नये.
वाळवंट माणसांची परीक्षा घेत असते आणि जे ध्येयापासून ढळतात त्यांना मृत्यू देते.
हे ऐकताना तरुणाला म्हाताऱ्या राजाची आठवण झाली.
घोडेस्वार म्हणाला, जर कोणी योद्धे आले आणि संध्याकाळपर्यंत तुझे शिर धडावर राहिले तर येऊन माझा शोध घे.
आता ज्या हातात तलवार होती त्या हातात चाबूक होता. आणि घोडा धुळ उडवत दुसऱ्या दिशेला फिरला व जाऊ लागला.
तुम्ही कोठे राहता? तरुणाने ओरडून विचारले. चाबुकवाल्या हाताने त्याने दक्षिण दिशा दाखवली.
तरुणाला किमयागार भेटला होता.