Devache Thane in Marathi Thriller by Balkrishna Rane books and stories PDF | देवाचे ठाणे - 5

Featured Books
Categories
Share

देवाचे ठाणे - 5

देवाचे ठाणे ५    मी इन्स्पेक्टरची परवानगी घेतली व रुम वर परतलो.आंघोळ करून मी थोडी विश्रांती घ्यावी म्हणून बेडवर पहुडलो.काही काळ डोळे बंद करून तसाच राहिलो.अर्धा तास मी नुसता पडून होतो.मला झोपायच होत पण झोप येत नव्हती.काल रात्रीची घटना डोळ्यासमोर सारखीफिरत होती. मी उठून ' धर्मानंद वर्मा ' माहिती मिळवायला सुरुवात केली.मोबाईलवर सर्च केल्यावर सुमारे सहा धर्मानंदवर्मा दिसले.मला हवा असलेला धर्मानंद वर्मा त्यातच होता.दिल्लीत केंद्रीय मंत्रालयात सचिव म्हणून त्याने तीन वेगवेगळ्या खात्यांमध्ये काम केले होते.त्याचे अनेक मंत्र्या सोबत व खासदारां सोबत मैत्रीचे व अर्थपूर्ण संबंध होते.निवृत्त झाल्यावर त्याच लक्ष कोकणातील जमीनींकडे गेले.त्यानेकोकणातल्या किना-या लगतच्या जमीनी खरेदी करायला सुरुवात केली.तो अत्यंत अधाशी व  महत्वकांक्षी होता.तो सगळी कामे सरळ केंद्राचा दबाव आणून करून घ्यायचा.कोकण किनारपट्टीलगत त्याने ब-याच जमीनी घेतल्या होत्या.गावातील काही लोकांना पैसे व दारू देऊन त्यांची माणसं काम करून घेत.कोणी विरोध केला तर त्याचे गुंड तिथे हजरहोत. एकंदरीत वर्मा व त्याची माणसे धोकादायक होती.आता त्यांचं लक्ष देवाचे ठाणे येथील शेकडो एकर पसरलेल्या सड्यावर गेल होती.  मी हे वाचताना अचानक फोनची रिंग वाजली.फोन सुजाताचा होता." बोल..."" एक आनंदाची बातमी आहे."" कसली...?" वर्मा आणि कंपनीला सड्यावर आता कोणतंही काम करता येणार नाही.हायकोर्टने स्टे दिलाय."" पण तुला हे कसे कळले...?"" काकांनी मेसेज केलाय. ते काल आमच्या सोबत मुंबईला आले होते.आज केस होती. आपण केलेले प्रेझेंटेशन कोर्टात प्रभावी ठरले."" ओ ,तरीच, मला आल्यापासून काका कुठेच दिसले नाहीत."" कोर्टाने पुरातत्त्व विभागाला सगळ्या जागेचा सर्व्हे करायला सांगितला आहे.त्यात तुलाही सामील ह्वायच आहे कोर्टाने तसं सांगितलय."  " बरं झालं.काही काळ तरी शांतता राहिलं. पण लढाई इथे संपणार नाही."" बरं ऐक, मी उद्या सायंकाळी रत्नागिरी येथे येतेय.चिपळून क्राॅस केल्यावर फोन करते.न्यायला ये."   कोण समजते ही स्वतःला ? सरळ सरळ हूकूम देतेय.मी मनातल्या मनात वैतागलो. पण तिला आणायला तर जावंच लागणार होतं.      मला आता भूक लागली होती.खाली काहींनी जेवण केलं की नाही हे पाहण्यासाठी मी खाली उतरलो.जेवण तयार नसेल तर बाहेर जाऊन जेवायचं असं मी ठरवलं होतं." काकी..! काकी! कुठे आहात?"मी दरवाज्यातून आत डोकावलो.आतल दृश्य बघून मी सावध झालो.आत एकूण पाच इसम होते.त्यांचा पेहराव व चेहरे बघून कळत होतं की ती चांगली माणसं नाहीत.चारजण हॉलमध्ये उभे होते.पाचवा काकीच्या अगदी जवळ उभा होता. काकी किचनच्या दरवाज्यावर जेवणाच ताट घेऊन उभ्या होत्या.बहुधा त्या माझं जेवण घेऊन येत होत्या. मला बघताच काकींना थोडा धीर आला.त्यांच्या डोळ्यातली भिती कमी झाली होती. मला अचानक आत आलेला पाहताच काकीजवळ असलेल्या इसमाने खिश्यातून धारधार चाकू काढून काकीच्या मानेला लावला." कुठे गेला तो म्हातारा शिपुरडा ?"आता मात्र वातावरण तंग झाले होते." काकी,माझंच जेवण आणत होता ना? मी इथंच हॉलमध्ये बसून जेवतो."मी पुढे सरकत म्हणालो.पण मी अतिशय सावध होतो.कोणत्याही क्षणी हालचाल करण्याची मी तयारी ठेवली होती." हे बघ तू आमच्या भानगडीत पडू नको. जसा आलास तसा माघारी जा." त्यातला एक गुंड म्हणाला." अरे, राघव हाच तो प्रेझेंटेशन देणारा ' रत्नकांत ' ! बरा सापडला आहे." दोघेजण माझ्या दिशेने येत असतानाच मी झपाट्याने काकीच्या मानेला चाकू लावलेल्या गुंडावर लाथ झाडली.कोल्हापूरात मी लहानपणी कुस्ती खेळलो होतो.माझ्या जबरदस्त किक् मुळे चाकू दूर उडाला.माझ्या अंगावर धावुन आलेल्या दोघांना मी काही क्षणातच चितपट केले. पुढची तीन मिनिटे मी फिरकी सारखा चपळाईने हालचाली करत पाचही जणांना चांगलाच चोप दिला. काकींनी ताट टेबलावर ठेवून किचनमधून लाटणं आणलं व समोर दिसेल त्याच्यावर फटके हाणायला सुरुवात केली.बघता बघता ते सगळे पळून गेले." काकी, बहुतेक ही वर्माची माणसे असावीत."" ह्यांना धमकावयला आले होते."" काकी, तुम्ही कमाल आहात?"" अरे,सुभेदारीन आहे मी. तू आल्यामुळे मला जास्तच अवसान आलं."" काकी,आज रात्री मी खोलीतच राहतो. काका उद्या येताहेत ना?"" नको.तूला जर सड्यावर जायच असेल तर जा.बाजूची सुभद्रा येणार आहे सोबतीला. तू तूझे संशोधन वैगरे काय ते कर."-------++++++++---------+++++++______++++++रात्री जेवण झाल्यावर मी बाहेर पडलो. शेजारची सुभद्रा काकींच्या सोबतीला आली होती.त्यामुळे मी निश्चिंत होतो.तरीही मी काकींना सांगितले की जराही संशय आला की फोन करा म्हणून!     मी परशुरामांच्या देवळाजवळ पोहचलो.तिथे बकुळीच्या झाडाखालच्या पारावर काही गावकरी बसलेले मला दिसले.मी नेहमीच्या जागेवर गाडी लावून माझ्या टेन्ट जवळ गेलो.डावीकडे दूरवर काही दिवे दिसत होते.कदाचित तिथे पोलीस व वर्माची माणसं तळ ठोकून बसली होती .ती पुन्हा कुंपणउभं करण्याची तयारी करत असावीत.कदाचित पोलीसांकडे कोर्ट ऑर्डर अजून पोहचली नसावी. मी माझी फोल्डींग टेबल बाहेर कातळावर ठेवले व शांतपणे बसलो.आज दिवसभरपाऊस पडला नव्हता त्यामुळे गरम होऊ लागले होते.सभोवतालचा अंधार व दूरवरचे दिवे या दोनच गोष्टी माझ्यासाठी अस्तित्वात होत्या. आज मी या माळावर एकटा नव्हतो.( तसा कालही एकटाच नव्हतो नाही का?)माझं लक्ष त्या अद्भुत गूढ मानवी शिल्पा कडे गेले व कालची घटना आठवली. या शिल्पात काय रहस्ये दडलेली आहेत हे कळणे गरजेचे आहे. मी उठलो व माझी उपकरणे तिथे बसवली.नेहमी प्रमाणे चुंबकीय क्षेत्रात अनिश्चितता दिसत होती. सिस्मोग्राफवर आता कोणतीही हालचाल दिसत नव्हती.      मी उठून आत गेलो. डोळ्यांवर झापड आल्यागत वाटल.मी तसाच अर्धवट झोपेत पडून होतो.अचानक कसल्यातरी आवाजाने मला जाग आली. सरसरण्याचे व दबक्या पावलांचे आवाज येत होते.सड्यावर काहितरी अशुभ घडत होतं. मी टेन्ट ची चेन बाजूला केली. डोके बाहेर काढून पाहिले . सड्यावर चारही बाजूंनी बॅटर्यांचे प्रकाशझोत दिसत होते.काही मानवी आकृत्या प्रकाशाच्या पार्श्वभूमीवर सरकताना दिसत होत्या. माझ्यापासून पन्नास एक फूटापर्यंत ते पोहचले होते म्हणजे मानवी कातळ शिल्पा पासून अवघ्या पंधरा फूटांवर ते पोहचले होते. माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली.बहुतेक ते सुरूंग पेरत असावेत .सरसर आवाज हा वायर्सचा होता.सगळ्या सड्यावरचे दगड सुरूंगाने उडवायचे त्यात शिल्पाची आणि दुर्मिळ वनस्पतींची आपोआप नासधूस होईल अशी त्यांची योजना होती. कोर्टाने दिलेली ऑर्डर घेऊन काका सकाळी येणार होते त्या आधीच त्यांनी हा बेत आखला होता.आज रात्री काहीतरी भयानक घडणार याची मला जाणीव झाली होती." गुपचूप बाहेर ये."दबक्या आवाजात कोणीतरी मला बजावलं.त्याचवेळी माझ्या डाव्या कानाच्या बाजूला खानचा थंडगार स्पर्श मला जाणवला.मी टेन्टच्या बाहेर पडलो." आज हा सगळा सडा आम्ही उध्वस्त करणार आहोत.पण याच खापर तुझ्यावर फोडलं जाईल.कुणीतरी काळोखातून बडबडला." मूर्ख आहात तुम्ही ." मी शांतपणे म्हणालो. त्यावेळी माझं लक्ष आकाशाकडे होते. काही गूढ बदल आकाशात होताना मला जाणवत होते.सड्यावर सुध्दा वातावरण बदलत होते.धुक्याची एक विरल पडदा सड्यावर पसरायला सुरुवात झाली.-------******-----****-----*****------****------****--भाग ५ समाप्त बाळकृष्ण सखाराम राणे 8605678026