नात्यांचे आयुष्य…
माणूस जन्माला येतो तोच मुळी नात्यांच्या गोतावळ्यात. जन्मापासूनच त्याच्याभोवती नात्यांचे एक सुंदर जाळे विणलेले असते. आई-वडील, भाऊ-बहीण, आजी-आजोबा, मित्र-मैत्रिणी, पुढे जोडीदार, मुले, सुना-जावई, नातवंडे… अशी नात्यांची वीण विस्तारत जाते. प्रत्येक नात्याला एक वेगळा अर्थ असतो, वेगळे महत्त्व असते आणि त्या नात्याचे आयुष्यही वेगळे असते.खरे तर नात्यांचे आयुष्य किती असते, हा प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर वर्षे, महिने किंवा दिवसांत देता येणार नाही. काही नाती जन्मभर टिकतात, तर काही अगदी थोड्या काळासाठी आयुष्यात येतात. काही नाती काळाच्या ओघात दूर जातात, तर काही दूर असूनही मनाच्या अगदी जवळ राहतात. अंतर वाढले म्हणून नाते संपतेच असे नाही आणि रोज भेटतो म्हणून नाते टिकतेच असेही नाही.नाते निर्माण होण्यासाठी फार काही लागत नाही. एखादी ओळख, एखादा सहवास, एखादे हसणे, एखाद्या प्रसंगी केलेली मदत किंवा मनापासून बोललेले दोन शब्दसुद्धा नात्याची सुरुवात करू शकतात. पण नाते टिकवण्यासाठी मात्र खूप काही करावे लागते. त्यासाठी लागतो विश्वास, समजूतदारपणा, एकमेकांबद्दलचा आदर, थोडी तडजोड आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे एकमेकांना समजून घेण्याची तयारी.
नात्यांचे आयुष्य कमी होण्यामागे अनेक कारणे असतात. अपेक्षांचे ओझे, अहंकार, गैरसमज, संशय, तुलना आणि मीच बरोबर या वृत्तीमुळे नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो. सुरुवातीला किरकोळ वाटणाऱ्या गोष्टी मनात साठत जातात. संवाद कमी होतो आणि अबोला वाढत जातो. एकमेकांना समजून घेण्याऐवजी एकमेकांना दोष देण्याची स्पर्धा सुरू होते. मग एक दिवस असे लक्षात येते की, जवळ असूनही आपण खूप दूर गेलो आहोत.
नात्यांमध्ये अपेक्षा असणे स्वाभाविक आहे. पण अपेक्षांना मर्यादा असायला हवी. प्रत्येकाने आपल्याच मनासारखे वागावे, आपल्याला हवे तेच बोलावे आणि आपल्याला हवे तेवढेच महत्त्व द्यावे, असा आग्रह धरला तर नाती टिकणार कशी? प्रत्येक व्यक्तीचे विचार, स्वभाव, आवडीनिवडी वेगळ्या असतात. हे स्वीकारता आले तर अनेक प्रश्न आपोआप सुटतात. नात्यात जिंकण्यापेक्षा नाते टिकवणे अधिक महत्त्वाचे असते, हे समजायला हवे.काही नाती अशी असतात की त्यांना कोणत्याही औपचारिकतेची गरज नसते. कित्येक दिवस बोलणे झाले नाही तरी भेटल्यावर तोच जिव्हाळा जाणवतो. तर काही नाती रोजच्या संपर्कात असूनही केवळ औपचारिकतेपुरती उरलेली असतात. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, नात्यांचे आयुष्य संपर्काच्या वारंवारतेवर नव्हे, तर मनातील ओलाव्यावर अवलंबून असते.
आयुष्याच्या उत्तरार्धात तर नात्यांचे महत्त्व अधिक प्रकर्षाने जाणवते. तारुण्यात मित्रमंडळी, कामधंदा, जबाबदाऱ्या आणि धावपळ यांत आपण अनेक नाती सहजपणे गृहीत धरतो. पण वय वाढत जाते तसे गर्दीपेक्षा सोबत महत्त्वाची वाटू लागते. आपले म्हणणे शांतपणे ऐकून घेणारे, एखाद्या वेळी आपली विचारपूस करणारे, अडचणीच्या प्रसंगी पाठीशी उभे राहणारे आणि आपल्या आनंदात मनापासून सहभागी होणारे माणूस जवळ असणे हीच खरी श्रीमंती वाटू लागते.
आणखी एक गोष्ट म्हणजे, प्रत्येक नाते आयुष्यभर टिकलेच पाहिजे असा अट्टाहासही योग्य नाही. काही नाती आपल्याला अनुभव देण्यासाठी येतात, काही जगण्याचा अर्थ शिकवतात, तर काही आपल्याला स्वतःची ओळख करून देतात. एखादे नाते संपले किंवा त्यातील जवळीक कमी झाली म्हणून त्या नात्याला काहीच अर्थ नव्हता असे होत नाही. त्या नात्याने दिलेले चांगले क्षण, शिकवण आणि आठवणी यांचेही एक वेगळे आयुष्य असते.शेवटी, नात्यांचे आयुष्य किती मोठे आहे यापेक्षा त्या नात्यात आपण किती मनापासून जगलो, हे अधिक महत्त्वाचे आहे. नाती ही केवळ रक्ताच्या संबंधांनी निर्माण होत नाहीत, तर ती मनाच्या धाग्यांनी घट्ट विणली जातात. हे धागे जपण्यासाठी संवाद हवा, विश्वास हवा आणि एकमेकांच्या अस्तित्वाचा स्वीकार हवा.नाती ही रोपट्यांसारखी असतात. त्यांना प्रेमाचे पाणी, विश्वासाचे खत आणि समजुतीचा आधार मिळाला तर ती बहरतात. दुर्लक्ष, अहंकार आणि अविश्वास यांच्या उन्हात मात्र ती कोमेजून जातात.म्हणूनच नाती जोडण्यापेक्षा ती जपण्याला अधिक महत्त्व द्यायला हवे. कारण आयुष्याच्या शेवटी आपल्या वाट्याला किती पैसा, किती संपत्ती किंवा किती प्रसिद्धी आली यापेक्षा आपल्या माणसांच्या मनात आपण किती जागा निर्माण केली, हेच अधिक समाधान देणारे असते.नात्यांचे खरे आयुष्य वर्षांनी मोजता येत नाही; ते मोजावे लागते एकमेकांसाठी दिलेल्या वेळेत, जपलेल्या विश्वासात आणि मनात साठलेल्या आठवणींत!— प्रल्हाद दुधाळ.