Kalcha nirop books and stories free download online pdf in Marathi

कालचा निरोप

उन्हाळ्याचे दिवस आणि घरातल्या उष्ण वाफा फेकणाऱ्या पंख्याखाली उभे राहता राहत आईच्या सूचना हा सोनेरी योग प्रत्येक घराघरात दिसून येतो.अपवादानेच एखादे किंवा बोटांवर मोजता येतील इतपत किंबहुना अशी दुर्मिळ घरं सापडतील.बाकी सगळीकडे घर घर की कहाणी आहे तीच ती आमच्याही घरी. मी घाईघाईत बाहेर निघाले.एकतर क्लासला जायला उशीर झालेला आणि इथे आईच्या की एक ना दुसरी कहाणी....तिच्या सूचना काहीकेल्या थांबत नव्हत्या. खरं म्हटलं तर आई हा असा उपवर्ग आहे की समोर कोणीही असो सूचनांचा पाऊस त्या व्यक्तीवर बरसणार नाही असे होणारच नाही.आणि सूचनांची सुरुवात कशीही आणि कुठूनही होऊ शकते.म्हणजे जरी बाहेर अगदी रम्य वातावरण असले तरीही बाहेर जाताना सांभाळून आणि सावकाश जा ही सूचना ठरलेली.कधीकधी या अजब रसायानाचा जितका हेवा वाटावा तितका कमीच.

उन्हात जास्त फिरू नको,ओढणी घेऊन जा,आकाशाकडे सूर्याजवळ जास्त बघू नको,कुठेही छोट्या स्टॉलवर लिंबूपाणी पिऊ नको,जास्त लांबचा प्रवास करू नको आणि एक ना अनेक....आणि हो,काल काय सांगितलं ते लक्षात आहे ना...आज लवकर काम संपव आणि तडकघरी निघून ये .(मनात विचार आला की आई सून घरात आल्यावर मग काय करणार?सून बिचारी थकून जाईल तिच्या सूचना ऐकत ऐकत..तरी बरंच आहे की घरात आम्ही सहा जणी मुलीच..आई किती थकून जात असेल याची कल्पनाही करवत नाही.आणि होणारी दगदग शेवटी कितीही झाले तरी बाहेर येणारच.त्रागा आणि लाहीलाही दोन्हींचा अगदी सुरेख संगम साधला गेलेला असे मला जाणवले. नाहीतरी शेवटी प्रत्येक माणसाची सहनशक्ती वेगवेगळ्या थरावरची असते मग ती बाहेर येण्याची पद्धत पण वेगवेगळीच असणार यात दुमत असून कसे चालेल.)

तर कधी विचारांच्या नादात कामाचा रस्ता पकडला आणि मी माझ्या कामाच्या जागी पोहोचले ते कळलेच नाही.आईचं शेवटचं वाक्य तेवढं मनात घुमत राहिलं.आज लवकर ये घरी..मला तुझ्याशी काहीतरी बोलायचे आहे महत्वाचे...

मी कधी त्या स्त्रीसुलभ देहाकडे निरखून पहिलेच नव्हते.म्हणजे तशी कधी गरजच पडली नव्हती.सहा बालकांना जन्म देणारी जन्मदात्री घरात रात्रंदिवस राब राब राबते.सूर्य माथ्यामागून ते माथ्यापर्यंत येईपर्यंत तिची पायाची भिंगरी काही थाऱ्यावर नसते.हे काम कर,ते काम कर ,जिथे काम नसेल तिथूनही काम शोधून काढण्याची कला ही प्रत्येक बाईमध्ये असते असं मला उगाचच वाटून गेलं.पुन्हा मुलं झाली की मुलांचा दुनियेभरचा पसारा,त्यांचे लालनपालन आणि काळजी करण्यात वेळ सर्व निघून जातो हे त्या भाबडीच्या गणितापलीकडचे आहे.घर सांभाळण्याच्या रहाटगाडग्यात त्या स्त्रीदेहाचा सापळा अगदी कणखर भिंतीसारखा उभा असतो.कितीही वादळे आली तरीही त्यांचा सामना करण्याची तिची तयारी असते.पिल्ल्लांच्या भूकेसमोर ती स्वतःची भूक विझवून चूल पेटवायला नेहमी तयार असते.असं म्हणतात की मानसिक आघात सहन करण्याची जास्तीत जास्त क्षमता तिच्यात असते.जे आव्हान पुरुष पेलायला चरकतात त्या आव्हानांना अतिशय उत्क्रुष्ठपणे सांभाळण्याची मशीन तिला म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाही.

तसं म्हणायचं तर आईच्या रोज सूचना असायच्या.पण आज काहीतरी वेगळे जाणवत होते.ती शेवटची वाक्यं माझ्या कानात काम संपेपर्यंत घुमत होती.एका मैत्रिणीने विचारलेदेखील याबद्दल;की सकाळपासून तुझा चेहरा गंभीर दिसतोय परंतु नीटसा काही उलगडा झाला नाही त्यामुळे तिनेही जास्त खोलात जाण्याचा विचार केला नाही.माझा स्वभाव सर्वांना माहित झालेला होता आत्तापर्यंत की कितीही वाईट परस्थिती असली तरीही ती दुसऱ्याला कळू द्यायची नाही.आणि त्याला कळलीच तर ती एकतर माझ्या जिवलगांकडून किंवा मग माझ्या चेहऱ्यावरून.

कामावरून घरी जायला निघाले तर एक मिनिट एका तासासारखा भासत होता.मनाला रुखरुख लागून राहिली होती की आईला एवढे काय महत्वाचे बोलायचे असेल माझ्याशी .मग विचार केला छोट्या बहिणीला फोन करून विचारावं की काही गंभीर बाब आहे का?

त्या विचारासरशी मी तिला फोन लावला आणि विचारले.तर तिचा रडका स्वर कानी आला.मला कळेना काय झाले नेमके?तर पुनःपुन्हा विचारल्यावर ती म्हणाली की आईने तिचे लग्न एका मुलाशी ठरवले आहे आणि तातडीने निर्णय कळवण्यासाठी तिने आज मुलाला आणि त्यांच्या घरच्यांना आपल्या घरी बोलावले आहे.ती इतक्या रडक्या आवाजात सर्व सांगत होती की त्याचे नावही लक्षात न राहिल्याने तिच्याकडून कळले नाही.रुखरुख अजूनच वाढली.मनावरचं दडपण कमी व्हायचं सोडून अजूनच वाढलं.घरी गेल्यावर आईसमोर प्रश्नांचा निचरा करायचा असे मनोमन ठरवले आणि मोकळा श्वास घेतला.

म्हटलं हे काय आणखी नवीनच आईचं.अजून तिला करिअर करायचं आहे आणि स्वतःच्या क्षेत्रात नाव कमवायचे आहे.एक प्रथितयश गायिका व्हायचं आहे; स्वतःची अकॅडेमी सुरु करून गरजू विद्यार्थ्यांना त्यांचे मार्ग निवडायला यशाची पायरी निर्माण करून द्यायची आहे.

तर नाही हिचं आपलं लग्नाचं पालुपद सुरु.पण राहून राहून मला आश्चर्य एका गोष्टीचं वाटलं की माझ्या लग्नाच्या आधी माझ्या लहान बहिणींचा नंबर कसा काय लागला...तेवढ्यात माझं लक्ष माझ्या फोनकडे गेलं...सायलेंट वर कधी ठेवला मलाच कळलं नाही .तर फोन घेतला आणि जरा कुठे समाधान मिळालं.राहुलचा फोन आलेला.फोन उचलल्यावर त्याचा आवाज कापरा भासला.मी प्रत्युत्तर केलं तर आणि म्हणाला मला आत्ताच्या आत्ता तुला भेटायचं आहे आणि महत्वाचं बोलायचं आहे.मला कळेना की माझ्या आईला आणि ह्याला अचानक एवढा महत्वाचा विषय आजच कसा काय सुचला.माझ्या मैत्रिणीचा निरोप घेऊन मी राहुलकडे जाण्यासाठी निघाले.म्हणतात ना दुष्काळात तेरावा महिना...म्हणजे माझ्या कामाला जाण्याच्या फेऱ्यांपेक्षा या अश्या फेऱ्या जास्तच व्हायच्या.

विचार करत बसायला वेळाही कमी पडत होत्या म्हणून थोडा वेगाने चालायचा निर्णय घेतला.

घाईघाईत निघताना मी कामावरून हेडफोन घ्यायचे विसरले म्हणून फोन कानाला लावून बोलत चालले होते तेवढ्यात माझ्या समोर एक मांजरीचं पिल्लू रस्ता ओलांडत होते आणि नेमका त्याचवेळी एक छोटी पोर त्याच्या दिशेने टाळ्या पिटत त्याला घेण्यासठी तिच्या आईचा हात सोडून धावत गेली पुढे.त्या समोरच्या मुलीच्या नादात समोरून भरधाव येणारी मोटारसायकल धडकणार येऊन तिच्यावर तेवढ्यात मोबईल फोन मधून पटकन आवाज आला की थांब..पुढे येऊ नकोस..पण....

माझा कालचा निरोप आजही कानामध्ये घुमत होता.त्याचा तो कापरा आवाज आणि आज त्याचा रक्ताने माखलेला हात माझ्या डोक्यावर होता.माझ्या हातात ते मांजरीचं गोड पिल्लू होतं.त्याच्या शेजारी पदरात लपलेली ती खेळकर मुलगी डोळे पुसत होती आणि तिची आई पदराने तिचे मातकट रक्ताचे हात पुसत होती.राहुलचं हेल्मेट रस्त्याच्या कडेला पडलं होतं.डोळ्याकडून घामाच्या आणि रक्ताच्या धारा वाहत होत्या आणि अश्रूंनी त्यांची स्वतंत्र जागा शोधून घेतली होती.राहुलचे अखेरचे शब्द कानात घुमत राहिले.

आईने काल दुपारी मला आणि राहुलला एकत्र पाहिलं आणि ती थोडीशी अस्वस्थ झाली.कारण मी आणि राहुल शाळेपासूनचे खास मित्र होतो.तो चार-पाच घर सोडली तर शेजारीच राहायचा.बोलताना माझा तोल गेला आणि राहुलने पटकन सावरताना माझा हात ओठांजवळ नेऊन ओठांनी स्पर्श केला.आत्ता साहजिकच आहे की घरातील कोणत्याही वरिष्ठ मंडळींना ही गोष्ट रुचणार नाही.तसेच घडले माझ्या आईच्या बाबतीत.मग काय आईसाहेबांची लगेच तयारी सुरु झाली लग्नाच्या बोलणीसाठी.आणि मुख्य म्हणजे लग्न माझे ठरवण्यात आले नव्हते तर माझ्याऐवजी माझ्या लहान बहिणीचे आणि राहुलचे लग्न ठरले जाणार होते.हे सर्व बोलण्यासाठी काल आईने कामावरून लवकर येण्याचा निरोप आधीच देऊन ठेवला होता.

ह्या सर्व विषयाबद्द्दल राहुलला कल्पना दिली होती.आणि लहान बहिणीला माझे आणि राहुलचे प्रेम माहित असल्याने तिनेसुद्धा राहुलला सकाळीच फोनवर सांगितले होते.मला या शेवटच्या गणिताचा खुलासा तेव्हा झाला जेव्हा मला स्ट्रेचरवर ठेऊन वरती नेण्यात आले.माझ्या शेजारी राहूलचा देह निपचित पडला होता.माझ्या डोळ्यांवर अंधारी येत होती.आजूबाजूचे सर्व धूसर दिसत होते.अजूनही ते आईचे शब्द कानात घुमत होते.खूप थकल्यासारखे वाटत होते.कोणीतरी आपला प्राण नेतयं याची बोचरी जाणीव मनाला आश्वस्त करून गेली .

© काजोल मधुकर नम्रता शिराळकर