Khidki - 2 books and stories free download online pdf in Marathi

खिडकी - २

नंदाने हातातले फुलपात्र जमिनीवर आपटल्याने कर्ण-कर्कश आवाज झाला आणि मी दचकुन किंचाळलो, मा‍झ्या किंचाळण्यामुळे आई आणि नंदा आपसूकच घाबरल्या आणि दोन पावले मागे सरकल्या.

काय झाले हे मला समजल्यावर मात्र मी भानावर आलो आणि दोघींनाही शांत केले.

“असेच टक लावून बसतात बाहेर. काय दिसतयं रे एवढे त्या खिडकीतून?” – आई

“आग तेच तर बघण्यासाठी मी इथे बसलो होतो, आणि त्याच विचारात हरवून गेलो होतो.

पण इथुन तर फक्त समोरची बाग दिसते, जिथे काही मुले खेळत असतात, काही जण बाकड्यावर बसले असतात आणि मग पलीकडचा रस्ता दिसतो. विशेष असे काहीच नाही.” – मी

मा‍झ्या बोलण्यावर बहुतेक त्यांचा विश्वास नसावा, त्यामुळे दोघींनीदेखील आळी पाळीने खुर्चीत बसून समोर काय दिसते याची खातरजमा करून घेतली. मला त्यांच्या वागण्याचे नवलच वाटत होते.

“मला तर काही समजत नाही. या खुर्चीत माणूस तास दोन तास कसा बसू शकतो बाहेर बघत? ही नक्कीच काहीतरी भानगड आहे.” – नंदा

“भानगड म्हणजे? नक्की काय ते स्पष्ट बोल.” – मी नंदावर खेकसलोच.

“नाही म्हणजे, माझी एक काकू पण अशीच हरवून जायची. तिच्यावर कोणी तरी जादू केली होती म्हणे. मग आम्ही एका मांत्रिकाला बोलावले आणि जादू उतरवून घेतली.” – नंदा, ती अतिशय प्रांजळपणे सगळी हकीकत सांगत होती.

“ आणि मग तुझी काकू बरी झाली. होय न?” – मी

“हो, पण तुला कसे कळले?” – नंदा

“हे बघ नंदा, आपण एकविसाव्यां शतकात जगत आहोत. त्यामुळे हे जादूचे वैगेरे प्रकार निदान मला तरी सांगत जाऊ नकोस.” – मी नंदाच्या मताला अजिबात किंमत दिली नव्हती, पण आईचे तसे नव्हते, तिला नंदाचे मत कदाचित खरेही असू शकते अशी शंका वाटू लागली होती. तसे तिने बोलून देखील दाखवले. त्यामुळे नंदाला पाठबळ मिळाल्या सारखे झाले.

”आई, तुम्ही म्हणत असाल तर मी फोन करू का मा‍झ्या काकांना? त्यांना तो मांत्रिक कुठे आहे ते कदाचित माहिती असेल.” – नंदा आईला विचारत होते, आईची मान नकळतच होकारार्थी हलत होती.

“काय? अरे काय बोलतोय काय आपण? या असल्या गोष्टीसाठी तुम्ही माझी सुटी वाया घालवू नका बरे. मी आधीच सांगतो हे असले प्रकार इथे अजिबात चालणार नाहीत.” – मा‍झ्या त्या दृढनिश्चयी पावित्र्यामुळे आईचे मत क्षणातच बदलले.

“ठीक आहे बाबा, तू म्हणतोस तेच खरे. मग पुढे काय करायचे ते तूच सांग.” – आई

“ठीक आहे. मी विचार करतो आणि मग सांगतो.” – मी

आईने तिचे मत बदलले होते, हे नंदाला अजिबात पटले नव्हते. तसेही आई नेहमीच माझी बाजू घेते अशी तिची फार जुनी तक्रार होती जिला आज परत एकदा दुजोरा मिळाला होता.

“एक काम करूयात, तुम्ही उद्या बाबांना कुठे तरी सहलीला घेऊन जा, दिवसभर भरपूर मजा करा. मुलांनाही घेऊन जा हवे तर. आम्ही दोघी इथे एखादा गवंडी बघून खिडकी बुजवून घेऊ दिवसभरात. म्हणजे कसे संकटाचे मुळ कारणच आपण दूर केल्यासारखे होईल.” – नंदाने आणखी एक पर्याय समोर ठेवला होता.

हा पर्याय व्यवहार्य आहे यावर आमच्या तिघांचेही एकमत झाले, फक्त हे सगळे उद्या न करता रविवारी करावे असे आम्ही एकमताने ठरवले आणि तेथून उठलो. आईने नांदला दुपारच्या जेवणाची तयारी करण्यासाठी बाहेर पाठवले.

“मला तर वाटते हे इथे बसून त्या अभ्यंकर कडेच बघत असतील.” – आई अतिशय दबक्या आवाजात बोलत होती.

“कोण अभ्यंकर?” – मी

“अरे आहे एक, यांच्या शाळेतील मैत्रिण. आता आली आहे रहायला सोसायटी मध्ये. परवाच जोशी काकू मला सांगत होत्या. सगळे पुरुष एक जात सारखेच. आता तूच सांग शोभते का या वयात असे वागणे?” – आई अजूनही दबक्या आवाजात बोलत होती.

आईच्या या मतामुळे मात्र मला माझे हसू आवरणे शक्य झाले नाही आणि मी मोठ्याने हसू लागलो.

“आई तू कुठला विषय कुठे नेत आहेस. जरा पटेल असे बोल काहीतरी.” – मी

“जा मरा मेल्यांनो. दोघेही बाप-लेक एकाच माळेचे मणी. माझी किंमतच नाही कुणाला या घरात.” – आईच्या मतावर मी असे हसलेले तिला अजिबात आवडले नव्हते आणि मी तिचे मत गंभीरपणे घेत नाही हे तिला समजल्यामुळे ती देखील तेथून उठून कामासाठी निघून गेली.

त्यानंतर मात्र माझा संपूर्ण दिवस सुरळीत गेला, बाबा परत आले, थोडावेळ आमच्या सोबत बसले आणि परत खिडकीत जाऊन बसले. बाबा खिडकीत नक्की काय करतात याचे मला कुतुहल वाटू लागले होते. आई आणि नंदा दोघींच्या मताशी मी सहमत नव्हतो. हा जादूटोणा नव्हता आणि आई म्हणते तशी ती अभ्यंकरही नव्हती. नक्कीच वेगळे काहीतरी कारण असणार होते. मी थेट बाबांशीच बोलायचे ठरवले.

रात्री जेवण झाल्यावर मी बाबांना कुल्फी खायला जायचे निमंत्रण दिले अर्थातच कुल्फी हा आवडता पदार्थ असल्यामुळे बाबा माझे निमंत्रण नाकारू शकले नाहीत.

“तू हो पुढे मी आलोच पाच मिनिटात” – बाबा, मला पुढे पाठवून बाबा कपडे बदलण्यासाठी आत गेले. बाबांनी इतक्या सहज फिरायला होकार कसा दिला याचे मला आश्चर्य वाटत होते. कारण त्यांना मनवण्यासाठी मी मनात तासभर तरी उजळणी करत होतो. पण हे काम इतके सहज होईल असे मला अजिबात वाटले नव्हते.

बाबा येईपर्यंत मी खाली मित्रांशी गप्पा मारल्या. त्यातील मा‍झ्या खास मित्राला बाजूला घेऊन मी सगळी हकीकत सांगितली आणि त्याचे मत विचारले.

“बाबा नुकतेच रिटायर्ड झाले आहेत न, मग होते असे कधी कधी. मानावर दडपण येते माणसाच्या. थोडा वेळ जाउदे होईल बघ सगळे नीट.

तुला हवे असेल तर आपण एकत्र मानसोपचारतज्ञाकडे पण जाऊन येऊयात. तेच आपल्याला नक्की मदत करू शकतील. म्हणजे हे दडपण कसे हाताळावे हे ते आपल्याला सांगू शकतील-”

मला खरे तर त्याचे मत पटत होते आणि त्याच्याशी आणखी पुढे चर्चा देखील करायची होती. पण इतक्यात बाबा तिथे आले. आणि आम्हाला आमचे संभाषण उरकते घ्यावे लागले.

बाबांबरोबर मी कुल्फी खायला निघालो.

बाबा आज चांगल्या मूड मध्ये होते. चालता चालता आम्ही भरपूर गप्पा मारल्या. कुल्फिवाल्याकडे जाऊन कुल्फ्या देखील घेतल्या आणि जवळच्याच बाकड्यावर येऊन बसलो. बाबांना खरे तर मला खिडकी विषयीच विचारायचे होते पण विषयाला हात कसा घालावा हे मला समजत नव्हते.

“बाबा, ही अभ्यंकर कोण हो?” – मी माझा खरा प्रश्न विचारण्याआधी एक उपप्रश्न करून बघितला. बाबा जर चिडले असते तर पुढचा प्रश्न मी विचारणार नव्हतो आणि जर बाबांनी हसत खेळत उत्तर दिले असते तर मात्र मी बिनधास्त पुढचा प्रश्न विचारणार होतो.

माझा प्रश्न ऐकून बाबा आश्चर्यचकित झाले. दोन क्षण ते कुल्फी खायचे देखील थांबले. पण अगदी थोड्याच वेळात त्यांनी स्वत:ला सावरले.

“आता मी सुद्धा काही नावे घेतो, तूच मला सांग या सगळ्या कोण ते.

मिनाक्षी, दिपिका, सोनल, शीतल.....” – आणि बाबांनी एका मागून एक मा‍झ्या मैत्रिणींची नावे घ्यायला सुरुवात केली.

“बस, बस. समजले.

मला समजले.” – मी त्यांना थांबवण्यासाठी म्हणालो.

“अरे अजून यादी संपलेली नाही आणि मला हे देखील माहिती आहे की नंदाला यातील कुठली नावे माहिती आहेत आणि कुठली नावे माहिती नाहीत.”

आता मात्र मी निरूत्तर होतो आणि बाबांना आपण चुकीचाच उपप्रश्न विचारला अशी माझी खात्री पटली. मी आवाक होऊन बाबांकडे बघत होतो.

“खा, कुल्फी खा. बच्चू बाप आहे मी तुझा.

अरे मला माहिती आहे या सर्व तुझ्या केवळ मैत्रिणी होत्या किंवा आहेत.”

“तशीच अभ्यंकर सुध्दा ....”

“हो माझी मैत्रिण आहे, नुसती मैत्रिण नाही तर बालमैत्रिण आहे. आख्खे बालपण एकत्र घालवले आहे आम्ही.” – बाबा

बाबांच्या चेहर्‍यावरची चमक बघून आईची शंका खरी तर नाही ना असा प्रश्न मा‍झ्या मनात डोकावून गेला.

पण एकंदरीत मला उत्तर मिळाले होते. बाबा सध्या आनंदात होते आणि ही खिडकी विषयी विचारण्याची अतिशय योग्य वेळ होती.

“बाबा, मला सांगा तुम्ही सध्या त्या खिडकीत बसून काय करता? मी बघितले आहे तुम्ही भरपूर वेळ कुठे तरी दूर बघत तिथे बसून असता, नक्की काय कारण आहे?” – मी

माझ्या अशा थेट प्रश्नाने बाबा थोडे गोंधळले. थोडावेळ त्यांनी विचार केला.

“काही विशेष नाही.

मला सवय आहे न खिडकीत बसायची, माझी संपूर्ण नोकरी खिडकी समोर बसूनच केली न मी. थोडे बरे वाटते खिडकीसमोर बसल्यावर.”

“ते ठीक आहे, पण तुम्ही तर चांगले तास तास भर बसत असता.”

“हो मग. काय प्रोब्लेम काय आहे तुम्हाला? मी काय चोरी तर करत नाही ना?

तुला सांगतो गेल्या काही दिवसात प्रथमच खिडकीने मला खूप काही शिकवले आहे. खूप तत्त्वज्ञान सांगीतले आहे तिने.” – बाबा आता परत दूर कुठे तरी बघत बोलत होते.

“कसले तत्वज्ञान? मला पण सांगा की.”

“सांगतो की, त्यात काय एवढे. पण उगाच चेष्टा करू नकोस बर का.

अरे अशीच एक खिडकी मा‍झ्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक होती, रोज सकाळी कामाला सुरुवात झाल्यापासून ऑफिस सुटे पर्यंत मी खिडकी समोर बसून असायचो. इतक्या वर्षात खिडकीसमोरील रांग कधीच संपली नाही. खिडकीच्या या बाजूनेच मी जग पहिले आहे. शांत चित्ताने रांगेत उभे राहणारे पहिले आणि कधी एकदा नंबर लागतो आहे या विचाराने अस्थिर होणारे पण पहिले. खरे सांगायचे तर या खिडकीनेच मला माणसांचे वेगवेगळे रंग दाखवले. कोणी आनंदाने आभार मानायचा तर कोणी रागाने शिव्या हासडायचा. पण खिडकीच्या इकडच्या माणसाला ते सगळे अगदी स्थितप्रज्ञासारखे सहन करावे लागते. आमच्या भावनांना तिथे स्वातंत्र्य नसतेच, आम्ही नेहमीच त्या खिडकीच्या नियमांना बांधील असतो. नियमा बाहेर जाऊन काम करण्याचे आम्हाला कधीच स्वातंत्र्य नव्हते.

रांगेतील काही माणसे खूप अडचणीत असत. माणुसकीच्या नात्याने एखाद्याला मदत करावी असे खूप वेळा वाटले पण बहुतेकदा नियमांमध्ये आमची माणुसकी जखडूनच राहिली.” - बाबा अतिशय गंभीर होऊन सांगत होते.

मी देखील नुसतीच मान डोलवत होतो.

“तुला सांगतो, आयुष्यात खिडकीला नेहमी दोन बाजू असतात. तू कुठल्या बाजूला उभा आहेस त्यावरून तुझा दृष्टीकोन ठरतो. रांगेत उभ्या माणसाला नेहमीच एक संथ गतीने काम करणारा माणूस दिसत असतो, तर खिडकीत बसलेल्या माणसाला समोरील कधीच न संपणारी रांग दिसत असते.

अगदी गाडीचीच खिडकी घे.

गाडीच्या खिडकीच्या बाहेरील माणसाला आतील श्रीमंती खुणावत असते तर खिडकीच्या आतील माणसाला बाहेरील गरीबीच दिसत असते.

म्हणूनच आपण खिडकीच्या कुठल्या बाजूला उभे आहोत हे आधी समजून घेतले पाहिजे म्हणजे कसे आपला दृष्टीकोन अगदी स्वच्छ होतो.

काय समजलास?” – बाबा

“तुम्ही खिडकीत बसून एवढा सगळा विचार केलात?” – मी

“हो अर्थात.

पण इतकेच नाही हं.

तर या वेळी पहिल्यांदाच मी खिडकीत बसलो असताना कसलेही नियम नव्हते, मी मुक्तपणे जगाकडे बघत होतो. मी प्रथमच खिडकीसमोर स्वतंत्र होतो. आकाशात बागडणारी पाखरे बघत होतो, बागेत खेळणारी मुले बघत होतो. खूप मजा वाटत होती......” – बाबा, बाबा खरे तर पुढे काहीतरी बोलणार होते पण त्यांनी पुढचे वाक्य जाणीवपूर्वक टाळले आणि मा‍झ्या मनात शंकेची पाल चुकचुकली.

“बाबा, नक्की काय होते आहे. मला स्पष्ट सांगा. काही प्रोब्लेम आहे का तुम्हाला?

जमले तर मदतच करेल तुमची, अगदी या कुल्फीची शपथ.” – मी

“कुल्फीची शपथ?”

“हो, कुल्फीची शपथ, जर मोडली तर परत कधी कुल्फी खाणार नाही आयुष्यात.”

“बघ रे बाबा अगदी विश्वास ठेवून सांगतो आहे, उगाच कुठे पचकू नकोस.

अरे त्या दिवशी तो एसी काढला आणि खिडकी रिकामी झाली, सवयीप्रमाणे मी खिडकीतून डोकावले, आणि समोरचे दृश्य मोहक दिसले, मग मी खुर्ची लावून बसलो. बागेतील मुले खेळताना बघत होतो, रस्त्यावरची वर्दळ बघत होतो मला कसलेच बंधन नव्हते. मी मुक्त झालो होतो, भलताच आनंदात होतो.

आणि त्याच वेळी बागेतल्या बाकड्यावर ती येऊन बसली, नकळतच मी तिला पाहत राहिलो. मी तिला पाहतो आहे हे तिच्या लक्षात आल्यावर आम्ही इशार्‍यातच बोलायला सुरुवात केली. खरे तर मी खाली जाऊनच भेटणार होतो तिला, पण तीच नको म्हणाली, नंतर कधीतरी असे खुणेनेच सांगीतले आणि निघून गेली.”

“ती, ती कोण?”

“अभ्यंकर रे..” – बाबा माझ्यावर डाफरत म्हणाले.

म्हणजे आईची शंका खरी होती तर. आत पुढे काय बोलावे हे मला निश्चित समजत नव्हते.

“पण मग आता प्रोब्लेम काय झाला?” – मी विषय पुढे नेण्यासाठी विचारले.

मी त्यांच्याकडे रोखून बघितल्याने त्यांना अस्वस्थ वाटू लागले. आता माझ्याशी कसे बोलावे याचा विचार बाबा करत होते. थोडावेळ त्यांनी इकडे तिकडे पहिले आणि शेवटी बोलू लागले.

“अरे जेमतेम पाच मिनिटे मी तिच्याशी बोललो असेल रे त्या दिवशी, पण मी तिच्याशी खुणा करताना बहुतेक तुझ्या आईने पहिले, मग मी मा‍झ्याच विचारात हातवारे करतो आहे असे सोंग केले आणि तिने विषय पुढे वाढवला नाही.”

“आणि म्हणून मग तुम्ही रोज तिथे खुर्ची टाकून बसू लागलात तिची वाट बघत. बरोबर की नाही?”

“अगदी तसे नाही, खरे तर मलाही तिथे बसायला आवडते, पण तासभर बसवत नाही रे बाबा. आणि तिची वाट बघत तर मुळीच नाही.

तुला तर माहिती आहे तुझी आई किती संशयी आहे, तिने तर नंदाला मा‍झ्या मागावरच लावले आहे, ती दर पाच मिनिटांनी येते आणि खिडकीतून डोकावून जाते. त्यामुळे माझे त्या दिवशीचं टक लावून बघण्याचे सोंग खोटे ठरू नये म्हणून रोजच तसे सोंग आणावे लागते आहे.

आता तूच मार्ग सांग, नाही रे बसवत तास तासभर तिथे आता.”

“काय बाबा, तुम्ही न आमच्या सगळ्यांची शाळा केलीत. किती काळजीत पडलो होतो आम्ही माहिती आहे का तुम्हाला?”

“मी किती काळजीत आहे हे माहिती आहे का तुला? तुला आता कुल्फीची शपथ आहे, यातून काहीतरी मार्ग काढ.”

बाबांच्या त्या वाक्यामुळे मला खरा प्रोब्लेम समजला. बाबा अभ्यंकरला खुणा करताना आईने पहिले होते आणि ते लपवण्यासाठी म्हणून बाबांनी जे काही नाटक केले होते ते आता त्यांच्या गळ्याशी आले होते आणि मी त्यातून काहीतरी मार्ग सुचवावा असा बाबांचा हट्ट होता.

असा प्रोब्लेम मित्राचा असता तर मी त्याला काहीतरी उत्तर देऊ शकलो असतो पण साक्षात बाबांनाच मी काय उत्तर द्यावे हे मला काही केल्या सुचत नव्हते.

त्यानंतर आम्ही खूप चर्चा केली, गप्पा मारल्या हास्यविनोद केले, एकूणच मी विषय टाळण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. पण बाबा काही केल्या मला तिथून उठू देईना, घरी जायचा विषय निघाला की लगेच ते मला कुल्फीच्या शपथेची आठवण करून देत आणि परत बसवून घेत. बाबांना नक्की कशी मदत करावी हे मला समजत नव्हते.

“तुम्ही आईला सगळे खरे का नाही सांगून टाकत?”

“अरे काय बोलतोस काय तू?

त्या पेक्षा सोपा मार्ग सांगतो न मी तुला, उद्या त्या जोशीच्या ओळखीतले कोणी तरी चार-धाम यात्रेला चालले आहे, मी ही जातो त्यांच्या बरोबर. आणि तिथेच संन्यास घेऊन स्थायिक होतो.

तुला काय आपल्या घरातली शांतता बघवत नाही काय? अरे बाबा तुला तुझी आई काय इतकी साधी वाटली काय? ते काय प्रकरण आहे हे मला एकट्यालाच माहिती आहे.

हे बघ मला आईला दुखवायचे नाही आहे आणि आता खिडकीतही बसायचे नाही आहे.

तुला समजते आहे का माझा नक्की प्रोब्लेम काय आहे ते?” – बाबा आता माझ्यावर ओरडूच लागले होते.

“बाबा, मला थोडा विचार करू देत. त्याचे काय आहे हे असले प्रोब्लेम मी काही रोज सोडवत नाही ना.” – मी

माझे ते वाक्य एकदम वर्मी बसले आणि बाबा बाकड्यावरून उठले आणि मी सुटकेचा निश्वास टाकला. आता मी घरी जाऊन झोपू शकणार होतो, उद्या ऑफिसात जाऊन शांततेने विचार करून बाबांना उत्तर देता आले असते.

“मी जाऊन दोघांसाठी कुल्फी घेऊन येतो, तो पर्यंत तू विचार करून ठेव.” – बाबा म्हणाले.

म्हणजे विषय संपला नव्हता, तर बाबांनी केवळ मला विचार करता यावा म्हणून संभाषणात अल्पविराम घेतला होता.

तरीही या मिळालेल्या विश्रांतीचा मी पुरेपूर फायदा करून घेतला आणि बाबा परत आले तेव्हा माझे उत्तर तयार होते.

“बाबा, मी परिस्थितीचा एकंदरीत विचार केला आहे, परिस्थिती गंभीर आहे. यावर मी तुम्हाला दोनच पर्याय सांगू शकतो.”

“लवकर सांग बाबा.”

“पहिला म्हणजे – येत्या रविवारी आपण सहलीला म्हणून बाहेर जायचे. तेव्हा आई आणि नंदा घरात ती खिडकी बुजवून टाकतील. परत आल्यावर तुम्हाला बसायला खिडकीच नसेल म्हणून तुम्ही आम्हाला ओरडू शकता. आम्हीपण तुमची बोलणी खाऊन घेऊ.

मग थोडे दिवसानी तुमचा राग शांत होईल आणि प्रोब्लेम संपेल”

माझा पहिला पर्याय बाबांना फारसा आवडला नाही, त्यांना ती खिडकी बुजवणे मान्य नव्हते.

“तुझा दुसरा पर्याय काय आहे? त्यातही खिडकी बुजवावी लागेल का?”

“नाही, अजिबात नाही. पण त्यात तुम्हाला थोडा त्रास होईल.”

“चालेल, खिडकी बुजणार नसेल तर मी सगळे सहन करेल.”

“तर मग ऐका, नंदाला शंका आहे कि कोणी तरी तुमच्यावर जादू केली आहे. आईलाही तशी शंका आली होती. आपण याचाच फायदा उचलायचा. तुम्ही असेच खिडकीत बसून राहायचे, प्रकरण आणखी गंभीर करायचे. मग थोडे दिवसांनी नंदा एका मांत्रिकाला बोलावेल, तो जी काही पूजा सांगेल ती घरात करून घ्यायची आणि पूजा झाल्यावर तुम्ही परत नॉर्मल वागू शकाल.

म्हणजे साधारण तुम्हाला अजून आठवडाभर तरी खिडकीत बसायचे नाटक करावे लागेल.”

खरे तर मी बाबांसमोर आई आणि नंदाने सांगितलेले मार्गच ठेवले होते. यातील कुठलाही मार्ग त्या दोघींनाही पटला असता. आता फक्त बाबांच्या होकाराची गरज होती.

“चालेल, हे जमण्यासारखे आहे. घरी पूजा देखील होईल त्या निमित्ताने” – बाबांनी खूप विचार करून मग होकार कळवला. त्याच आनंदात आम्ही आणखी एक-एक कुल्फी ऑर्डर केली. त्यानंतर आम्ही दोघेही घरी परत आलो, पुढे आठवडाभर सगळे आम्ही ठरवल्याप्रमाणे केले. मांत्रिक आला त्याने घरी पूजादेखील केली आणि त्यानंतर बाबा परत आधीसारखे वागू लागले.

खरे तर आई आणि नंदाच्या अंधश्रद्धेचा फायदा घेऊन आम्ही आमचा हेतू साध्य केला होता. आमच्या घरातले एक वादळ आपसूकच शमले होते.

बाबा आता पत मोकळेपणाने पाच दहा मिनिटे खिडकीत बसत असतात, त्यांच्या तो आनंदी चेहरा बघून मनाला एक वेगळेच समाधान मिळते.

आणि हो आज देखील जेव्हा केव्हा मी कुठल्याही रांगेत उभा असतो तेव्हा मला खिडकीची दुसरी बाजू बाबांमुळेच समजते, बाबांनी त्या रात्री सांगितलेले खिडकीविषयीचे तत्त्वज्ञान आजही मला साथ देत आहे.

- स्वप्नील तिखे