AAGHAT books and stories free download online pdf in Marathi

आघात !!

आघात

DK ...DK ...DK !!!

दिपक केळकरच्या नावाने संपूर्ण हॉल गजबजून गेला होता. शरीरसौष्ठवाच्या अंतिम फेरीत दिपक पोजिंग करीत होता. अतिश्यय पिळदार आणि सुडोल शरीर कमावलेला दिपक सर्व स्पर्धकांमधून उठून दिसत होता. आकर्षक शरीर आणि तितक्याच प्रचंड ताकदीचा मालक दिपक जेव्हा स्टेजवर आला, तेव्हा प्रतिस्पर्ध्यांच्या उरात धडकी भरली. सर्वांना वाटले कि, हि स्पर्धा पण दिपकच जिंकणार. स्टेजवर येऊन दिपकने प्रेक्षकांना आणि पंचांना नमस्कार केला आणि पोजिंगला सुरुवात केली.

दोन-तीन पोज झाल्या असतील आणि दिपकची नजर प्रेक्षकांत बसलेल्या एका व्यक्तीवर गेली. अतिशय कृष, विद्रुप, हाडकुळी, गालाची हाडे वर आलेली, चेहऱ्यावर मास नसल्याने बाहेर आलेले भयाण डोळे अशी ती व्यक्ती एकटक दिपककडे बघत होती. डोळ्याची पापणी किंचितही न लवता ती व्यक्ती दिपकच्या डोळ्यातडोळे घालून बघत होती. दिपकची नजर त्या व्यक्तीवर पडली आणि दिपकचे सारे अवसान गळाले. दरदरून घाम फुटला. दिपकच्या हातापायांचा थरकाप होऊ लागला. ओठ थरथरू लागले. श्वासोच्छवासाचा वेग वाढला. त्याचा डावा हात आणि उजवा पाय आपसूकच आखडला गेला. त्या व्यक्तीकडे बघून दिपक एखाद्या अपंग व्यक्तीसारखा हातपाय वाकडे करून स्टेजवर उभा राहिला. प्रेक्षकांना काहीच कळेना. त्याचे वडील धावत स्टेजवर आले. दिपकला छातीशी धरले.

"दिपक काय झाले?,..काय झाले बेटा ?"

वडिलांच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. दिपक काहीच बोलत नव्हता. फक्त एकटक ती व्यक्ती जिथे बसली होती, तिथे बघत होता. ती व्यक्ती मात्र कधीच पसार झाली होती. दिपकचे मित्र स्टेजवर धावून आले. कसाबसा दिपकला आधार देत स्टेजवरून खाली उतरवले. दिपक स्पर्धा हरला होता. पण विजेत्या स्पर्धकाने मोठेपणा दाखवून चषक दिपकच्या वडिलांना आणून दिले. दिपकच्या वडिलांना मात्र अश्रू आवरेनात. आपल्या मुलाला अचानक असे काय झाले ते त्यांना कळेना. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून दिपकला तात्काळ दवाखान्यात नेण्यात आले. तिथे त्याच्या विविध चाचण्या घेण्यात आल्या. त्यात काहीच त्रुटी आढळून आल्या नाहीत. कुणालाही काहीच कळेना कि नेमके काय झाले आहे.

दिपक काहीच बोलत नव्हता.. शेवटी मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्यायचे ठरले. दिपकने खाणे-पिणे सोडले. शरीरसौष्ठवासारख्या स्पर्धेत भाग घेतलेला मुलगा अचानक एखाद्या रुग्णासारखा वागू लागला होता. मानसोपचार तज्ज्ञांच्या अथक प्रयात्नानंतर दिपक फक्त "म .. मा... मा... " इतकंच बोलू शकला. डॉक्टरांनी त्याला काही औषधे देऊन दुसऱ्या दिवशी आणायला सांगितले.

ती रात्र दिपकच्या आईबाबांनी आणि मित्रांनी अक्षरशः जागून काढली. सर्वजण त्याच्या उशाशी बसून राहिले. कुणालाही अन्न-पाणी गोड लागले नाही. कधी एकदा सकाळ होते आणि दिपकला डॉक्टरांकडे नेतो असे झाले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी दिपकला डॉक्टरांकडे नेण्यात आले. डॉक्टरांनी दिपकशी वार्तालाप साधला आणि एक धक्कादायक घटना समोर आली.

सहा - सात वर्षांचा दिपक खूप मस्तीखोर आणि खेळकर होता. संपूर्ण दिवस त्याचा मस्ती करण्यात जाई. एका जागी शांत बसणे म्हणजे अश्यक्यच. सतत कोणाचीतरी खोडी काढणे, छेड काढणे, टिंगलटवाळी करणे. सतत याला मार… त्याला मार असे चालायचे. शेजार पाजारचे सतत तक्रार करायचे. शाळेतही तसेच. सर्व शिक्षकांच्या दिपकविषयी तक्रारी असायच्या. शाळेतील विद्यार्थी शिक्षकांकडे तक्रारी करून थकले होते. विद्यार्थ्यांचे पालक लेखी तक्रारी देऊन दिपकला शाळेतून काढून टाकण्याची मागणी करू लागले होते.

दिपकचे वडील मात्र अतिशय शिस्तप्रिय होते. त्यांना वारंवार शाळेत बोलावण्यात येई. अपमानास्पद शब्द ऐकावे लागे. शाळेतील शिक्षकांचे आणि पालकांचे वाटेल तसे बोलणे ऐकून आणि त्यांची माफी मागून घरी आल्यावर दिपकला काही बोलायला गेल्यास, त्याची आई मध्ये यायची. ती माऊली एक शब्दही दिपकला बोलू देत नसे. हात लावू देत नसे. ती म्हणायची, "तुमचा जो काही राग आहे ना, तो माझ्यावर काढा, पण माझ्या लेकराला काही बोलू नका हो. सगळे त्याचा राग-राग करतात ...तक्रारी करतात ...त्याने कुठे जायचे?" असे म्हणून ती माऊली डोळ्याला पदर लावी. डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागे. आईच ती ..तिला आपले मुलं किती प्रिय असते हे वेगळे सांगायची गरज नाही. राम असो कि रावण तिच्यासाठी दोन्हीही सारखेच. तिचे अश्रू पाहून वडील हतबल व्हायचे. तिला आणि दिपकला जवळ घेऊन भरभरून प्रेम करायचे. दिपकला खूप समजवायचा प्रयत्न करायचे पण दिपक समजण्यापलीकडे होता. तो या गोष्टींकडे दुर्लक्ष करायचा.

एके दिवशी दिपकने त्याच्या वर्गात शिकणाऱ्या नगरसेवकाच्या मुलीची वही फाडून टाकली. तिच्या अंगावर पाणी उडवले. या क्षुलक वाटणाऱ्या गोष्टीचा खूप मोठा परिणाम झाला. नगरसेवकाने मुख्याध्यापकांवर जोर टाकून दिपकला शाळेतून कमी केले. दिपकच्या वडिलांना प्रचंड मनस्ताप झाला. त्यांनी दिपकला बोर्डिंग मध्ये टाकण्याचे ठरवले. दिपकची आई मात्र या गोष्टीला तयार नव्हती. ती खूप दुखावली गेली. तिने नगरसेवकाचे आणि मुख्याध्यापकाचे अक्षरश पाय धरले. पण त्यांनी तिचे एक ऐकले नाही. तिने खूप प्रयत्न केले, नको त्याच्या पाया पडली. पण तिची ममता, तिचे दुःख कुणाला कळले नाही. तिचे अश्रू कुणाला दिसले नाही. सगळे म्हणायला लागले कि "बरे झाले...घाण जाईल एकदाची इथून."

दिपकच्या आईने दिपकच्या वडिलांच्या खूप विनावण्या केल्या. दिपकची सर्व जबाबदारी घ्यायचे कबूल केले. दिपकच्या वडिलांना तिचे दुःख समजत होते, पण त्यांचा नाईलाज होता. त्यांच्यापुढे दिपकच्या भविष्याचा प्रश्न होता. दिपक आपल्यापासून दूर जाणार या गोष्टीमुळे ते देखील तितकेच दुखावले गेले होते. पण ते आपले दुःख, अश्रू गिळून कठोर पणाचा आव आणीत होते. बोर्डिंग मध्ये पाठवणे त्यांना पण पटत नव्हते. म्हणून त्यांनी दिपकला गावी त्यांच्या भावाच्या घरी ठेवण्याचे ठरवले. दिपकच्या आईला हा विचार पटला. ती दिपकला दिराच्या घरी पाठवायला तयार झाली. तिला वाटले बोर्डिंगपेक्षा हे बरे होईल.

शेवटी येत्या रविवारी गावी जायचे ठरले. दिपकच्या आईने दोन दिवस खूप मेहनत घेऊन दिपकच्या आवडीचे सर्व पदार्थ बनवले. दिपकचे खूप लाड केले. एक क्षण देखील त्याला डोळ्याआड होऊ दिले नाही. शनिवार उजाडला..तिचा जीव घाबरा झाला. रक्तदाब अचानक खूप वाढला. उद्या आपला मुलगा जाणार, या विचाराने ती माऊली अर्धमेली झाली. अश्रू थांबेना... दिपकला भरभरून पाणावलेल्या डोळ्यांनी बघू लागली. त्याची प्रत्येक हालचाल आपल्या डोळ्यांत साठवू लागली. तिची अवस्था बघून दिपकचे वडील आतल्याआत अधिकच तळमळू लागले. सिगारेट ओढण्याच्या बहाण्याने बाल्कनीत जाऊन लपून ओक्साबोक्सी रडू लागले. दिपक मात्र ह्या सगळ्यापासून अनभिद्न होता. त्याला कळेना कि आपले आई-वडील का रडत आहेत. त्याला गावी जाण्याच्या बातमीने खूप आनंद झाला होता. त्याची उत्सुकता वाढली होती. तो आपल्या सर्व खेळण्या, गोष्टींची पुस्तके इत्यादी सामान आपल्या बॅगेत भरीत होता.

शनिवारच्या संध्याकाळी आईने दिपकला स्वतःच्या हाताने जेऊ घातले. आईवडील मात्र जेवलेच नाही. दोघेही दिपकची प्रत्येक हालचाल डोळ्यात साठवून ठेवण्याचा प्रयत्न करु लागले. त्याचा आवाज कानात प्राण आणून ऐकू लागले. दिपक तिथेच आईच्या मांडीवर डोके ठेऊन झोपी गेला. आईवडील दोघेही रात्रभर आपल्या मुलाला पाहत तसेच बसून राहिले. रात्रभर अश्रू ढाळीत राहिले, दिपकच्या आठवणींची उजळणी करीत.

सकाळ झाली ...रविवार उजाडला..सकाळी सकाळी दुधवाल्याने दरवाजा ठोठावला. हे दोघे भानावर आले. दिपकला जाग आली. आईने त्याच्यावर चुंबनांचा वर्षाव केला. खूप लाड केले. दिपकला स्वतःच्या हाताने आंघोळ घातली. नवीन कपडे घातले. खाऊ घातले. वडील तयार झाले. रिक्षा घेऊन आले. सर्व सामान रिक्षात ठेवले. वडिलांनी आईला दिपकला बाहेर आणायला सांगितले. आई दिपकला देवाला नमस्कार करवून बाहेर घेऊन आली. शेजारी-पाजारी रिक्षा जवळ जमा झाले. दिपक रिक्षात बसला आणि त्या मातेने हंबरडा फोडला "दिपक..!!". ती तिथेच कोसळली. शेजारी- पाजारी धावून आले. तिला आधार दिला. रिक्षा चालू लागली... ती रिक्षामागे वेड्यासारखी धावू लागली.. साडीत पाय अडखळून सपकन पडली. शेजाऱ्यांनी तिला उठविले. आधार देत घरात नेले. तिची समजूत काढायचा प्रयत्न करु लागले.

रिक्षा स्टेशनवर पोहचली. दिपक टुणकन उडी मारून रिक्षातून उतरला. तो खूप आनंदात होता. वडिलांनी सर्व सामान व्यवस्थितपणे गाडीत ठेवले. खिडकीच्या शेजारीच बसण्याची जागा मिळाल्याने दिपकचा आनंद गगनात मावेना. गाडी चालू झाली. दिपक खिडकीतून बाहेरची पळती झाडे पाहून अधिकच खुश झाला. सारखा बाबांना "हे बघा...ते बघा" असे सांगू लागला. बाबा पण त्याच्या प्रत्येक गोष्टीला भरभरून प्रतिसाद देत होते. थोड्याच वेळात बाहेरच्या थंड हवेने दिपकला झोप लागली. गालावर काहीतरी पडल्या सारखे वाटले. म्हणून त्याने गालाला हात लावला. हात ओला झाला. त्याने वर पहिले. बाबा रडत होते. आज पहिल्यांदाच त्याने बाबांना रडतांना पहिले होते. ही गोष्ट त्याच्या बालमनाला शिवून गेली.

शेवटी एकदाचे ते गावी पोहचले. वडिलांचा भाऊ स्टेशनवर त्यांना घ्यायला आला होता. दिपक आनंदाने त्यांच्याकडे पळत गेला. ‘काका काका’ म्हणून त्यांना बिलगला. काकांनी आपल्या लाडक्या दिपूला उचलून घेतले. काकांना मुलबाळ नव्हते. ते दिपकला खूप प्रेम करीत. कितीतरी वेळा त्यांनी दिपकला दत्तक घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. आज दिपक त्यांच्याकडे राहण्यासाठी आला होता. त्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही. दिपकला आणि त्याच्या बाबांना घेऊन काका घरी गेले. काकू दारातच उभ्या होत्या. त्यांनी दिपकची भाकर तुकड्याने नजर काढली. दिपकला घरात यायला सांगितले. दिपकने घरात पाय ठेवला आणि उंबऱ्यात पाय अडखळून दिपक सपकन जमिनीवर पडला....

दिपक पडला...वडिलांच्या काळजात धस्स झाले. हातातले सामान खाली पडले. धावत जाऊन त्यांनी दिपकला उचलले, पटापटा त्याचे मुके घेतले. "दिपक .. बेटा तुला लागले तर नाही ना ?" असे म्हणून त्यांनी त्याचे हातपाय झटकले, त्याच्या गुडघ्याचे मुके घेतले.. काका सुद्धा पळत आले. त्यांनी दिपकला पटकन उचलून घेतले. काकूंनी मात्र एक तुच्छतेचा धुत्कार टाकून मानेला एक झटका दिला आणि स्वयंपाक घरात निघून गेल्या. मनात पुटपुटल्या "काय बाई लाड..."

इकडे दिपकची आई झोपेतून अचानक दचकून उठली. दिपक कसा असेल या विचाराने अस्वस्थ झाली.

दुसऱ्या दिवशी दिपकचे वडील निघून आले. दिपक खेळण्यात मग्न होता. बाबांना व्यवस्थित निरोप पण नाही दिला. संध्याकाळी काका दिपकला फिरायला घेऊन गेले. खूप धमाल केली. जेवण झाले. दिपकने काकांकडे गोष्ट सांगण्याची मागणी केली. काका गोष्ट सांगू लागले. दमल्यामुळे दिपकला कधी झोप लागली कळलेच नाही. तो काकाच्या कुशीतच झोपी गेला.

थोड्या वेळाने काकू आली...तिने दिपकला काकाच्या कुशीत झोपलेले पाहिले आणि तिचा पारा चढला. तिने काकांना सांगितले कि, याला दुसऱ्या खोलीत झोपवा.

काका म्हणाले, "अगं...लहान आहे तो, आईबाबांपासून आज पहिल्यांदाच दूर आलाय...झोपू दे त्याला आज माझ्या कुशीत...बघ कसा छान झोपला आहे तो".

"तो लाड तुमच्याकडेच ठेवा...मला नाही खपायचा...असं करायचं असेल तर, या घरात एक तर तो राहील, नाहीतर मी राहील...काय ते ठरवा." असे म्हणून काकूने जोरात दारावर लाथ मारली आणि खोलीच्या बाहेर निघून गेली.

दिपक काकांच्या हातावर डोके ठेऊन झोपला होता. म्हणून काकांना उठता आले नाही. काकूने मात्र याचा अर्थ वेगळाच घेतला. ती दुसऱ्या खोलीत जाऊन झोपली. तिचा फार जळफळाट झाला होता. तिला दिपकचा फार राग आला होता. ती रात्रभर झोपू शकली नाही. दिपकचा काटा कसा काढायचा याचाच विचार करीत राहिली.

सकाळ झाली...दिपकला जाग आली. काका अंथरुणात नव्हते. दिपक स्वयंपाकघरात गेला. तेथे काकू नाश्ता करीत होत्या. दिपक गेला आणि लाडाने काकूंच्या गळ्यात पडला. लाडालाडाने विचारले .."काका कुठे आहेत?" तसा काकूंनी त्याला एक जोरदार झटका देऊन दूर ढकलले. एक शिवी हासडून म्हणाल्या, "तुझा काका गेला म्हसनात आणि आता तू पण जा...परत माझ्या अंगाला हात लावला तर हात तोडून ठेवीन".

दिपकला काही कळेना. त्याला फार दुःख झाले. त्याच्याशी आजपर्यंत कोणीच असं वागलं नव्हतं. त्याला आईबाबांची आठवण यायला लागली. बाहेर ओसरीत जाऊन तो रडू लागला. त्याला वाटले काकू येतील आणि त्याची समजूत काढतील. त्याचे लाड करतील, जशी आई करते. पण नाही, काकू आल्या नाहीत. ही गोष्ट त्याच्या बालमनाला फार लागली. त्याला आठवले कि, जर कधी तो रुसला फुगला असेल, तर त्याची आई किती प्रयत्न करायची त्याला हसविण्यासाठी. त्याने पाणी जरी नाही पिला, तरी त्याची आई किती अस्वस्थ व्हायची. इथे तो सकाळी झोपेतून उठल्यापासून उपाशी होता. काकू मात्र खाऊन पिऊन झोपी गेल्या.

दुपारचा एक वाजत आला. दिपकला खूप भूक लागली. त्याने काकूला झोपेतून उठवले. आणि काहीतरी खायला मागितले. काकूला या गोष्टीचा फार राग आला. तिने रागाच्या भरात दिपकला खूप मारले. दिपक तसाच दारात बसून रडत राहिला. काकाची वाट पाहत.

संध्याकाळ झाली. दिपकने लांबूनच काकांना येताना पहिले. त्याला अतिशय आनंद झाला. तो पळत जाऊन काकांच्या गळ्यात पडून रडू लागला. काकांना झालेला सगळा प्रसंग रडून सांगितला. काकांना या गोष्टीचा खूप राग आला. ते काकूंना खूप रागवले. आज पण काकूंना दुसऱ्या खोलीत झोपावे लागले.

दुसऱ्या दिवशी काकूंनी निरोप पाठवून त्यांच्या भावाला बोलावून घेतले. भाऊ आला, म्हणाला, "ताई काही काळजी करू नको. मी बघतो". त्याने दिपकला बोलावले...त्याचे कपडे काढले...त्याच्या तोंडात बोळा कोंबून, त्याचे हातपाय घट्ट बांधून त्याला घरामागील गाईच्या गोठ्यात नेऊन टाकले. गाईच्या शेणा-मुताने दिपकचे सर्व अंग भरले... दिपक रडू लागला ...डोळ्यांनी विनवण्या करू लागला....काकू खरकटे पाणी घेऊन बाहेर आल्या...ते घाणेरडे पाणी दिपकच्या अंगावर टाकून म्हणाल्या, "काकाच्या कुशीत झोपायचं व्हय तुला ?...इथं गाईच्या शेणात झोप ...बघ कशी मज्जा येती."

संध्याकाळी काका यायच्या आत दिपकचे हातपाय सोडले. त्याच्या अंगावर थंड पाणी भडाभडा ओतले. त्याचे अंग खसाखसा घासून धुवून काढले. कपडे घालायला दिले. दुपारचं शिळंच जेवण खायला दिलं. काकूने त्याला बाहेरच्या खोलीत झोपायला सांगितले. काकूंच्या भावाने म्हणजे मामाने त्याला दम दिला. "जर तू काकाला काही सांगितले, तर उद्या तुला विहिरीत उलटा टांगून ठेवील." दिपक भिंतीकडे तोंड करून अश्रू गाळीत राहिला. मामा त्याच्या पायथ्याशी बसून राहिले. एका हाताने त्याचा पाय दाबून धरला. काका आले, त्यांनी बघितले तर दिपक झोपलेला होता. काकांनी त्याला हाक मारली, एक क्षण दिपकला वाटले उठून काकांना घडलेला सगळा प्रकार सांगावा. तो थोडासा हलला... तसा मामाने पायावरचा जोर वाढवला. दिपक तसाच पडून राहिला. काकू आल्या आणि काकांना लाडिकपणे आपल्या खोलीत घेऊन गेल्या. मामाने दिपकला केस धरून उठविले आणि पाय चेपायला सांगितले. रात्री उशिरापर्यंत मामाला झोप लागेपर्यंत तो पाय चेपत राहिला. रात्री उशिरापर्यंत जागल्याने त्याला सकाळी जागच आली नाही. दिपक काकांना भेटू शकला नाही. काकांना पण त्याला झोपेतून उठविणे बरे वाटले नाही. काका तसेच कामाला निघून गेले.

थोड्या वेळाने दिपकला जाग आली. त्याने मामा आणि काकूची नजर चोरून घरातून पळ काढला. जिकडे दिशा मिळेल तिकडे वेड्यासारखा धावू लागला. गावातील कुत्री त्याच्या मागे लागली. तो गावाबाहेरील जंगलाकडे पळू लागला. खूप दूर गेला. मागे बघून पळता पळता त्याला ठेच लागली. दिपक खाली कोसळला. शेतातील ढेकळावर पडल्याने त्याला खूप लागले. तो तसाच पडून राहिला, डोळे घट्ट मिटून. कितीतरी वेळ… तो देवाचे आभार मानू लागला.

इकडे त्याच्या आईला अचानक उचकी लागली. तिच्या डोळ्यांतून आपसूकच अश्रू ओघळू लागले. तिला काही समजेना. आपला मुलगा बरा तर असेल ना ? त्याला काही त्रास तर नसेल ना? त्याचं काही बरंवाईट झालं असेल तर ? असे अनेक विचार तिच्या मनात येऊ लागले. ती अस्वस्थ झाली. तळमळू लागली. तिला दिपकची फार आठवण येऊ लागली. दिपक तिच्या नजरे समोर फिरू लागला. "दिपक... दिपक " असा नामजप करीत आणि अश्रू ढाळीतच ती माउली कधी झोपी गेली कळलेच नाही.

इकडे दिपकच्या तोंडावर सावली पडली, म्हणून त्याने डोळे उघडून पहिले तर समोर मामा उभा होता. त्याने उठून पळण्याचा प्रयत्न केला, पण तो उठू शकला नाही. मामा त्याच्या पायावर पाय ठेऊन उभा राहिला. आधीच ठेच लागल्याने रक्ताळलेल्या पायावर मामा पायाचा जोर टाकू लागला. खाली मातीचे ढेकळं पायाला टोचू लागले. जखमेतून अधिकच रक्त वाहू लागले. जखमेत माती घुसली. मामाला दया येईना. तो त्या कोवळ्या जीवाचा पाय आपल्या पायाखाली चिरडू लागला. दिपक वेदनेने विव्हळू लागला. "मामा ...नको मामा ...सोडा मला ...खूप दुखतंय ...मामा ..मामा ". मामाने त्याला कॉलरला धरून खेचत खेचत घरी आणले. दिपक पडत.. धडपडत होता. त्याच्या अनवाणी पायांना खडे-काटे बोचत होते. तो मामाच्या विनवण्या करीत होता, पण त्या नराधमाला दया आली नाही. मामाने त्याला उचलून घरात आणले आणि काकूंच्या पुढ्यात जोरात आपटले. काकू रागारागात स्वयंपाक घरात गेली आणि अगोदरच तापवून ठेवलेला चमचा घेऊन आली आणि दिपकच्या दोन्ही तळपायांना चटके देऊन म्हणाली,

" मुडद्या...पळशील का घरातून? दादा...हातपाय बांध मुडद्याचे...बघतेच कसा काय पाळतो ते..."

"ताई तू काळजी करू नको....हे नाय पळायचं आता...लंगडं झालयं" मामा असुरी हसत म्हणाला.

संध्याकाळी काका घरी आले... काकूला विचारले, "दिपू कुठे आहे? दोन दिवस झाले...त्याला भेटलोच नाही...बोलव त्याला". काकूने सांगितले, "अहो...तुमच्या दिपूचे मामा सोबत बरेच जमते...एक क्षणही दोघ एकमेकांना सोडून राहत नाहीत बाई ...आता ऐकत असेल मामाची गोष्ट...खोटं वाटत असेल तर या दाखवते", असे म्हणून काकूने दिपकच्या खोलीचा दरवाजा किंचितसा खोलून दाखवला. आत मध्ये मामा आणि दिपक एकाच पांघरुणात झोपले होते आणि मामा गोष्ट सांगत होते, "एक मुलगा जंगलात पळत पळत गेला ...आणि ठेच लागून पडला..."

काकांनी हळूच दरवाजा बंद करून घेतला. त्यांना दिपू आनंदात असल्याचे बघून खूप आनंद झाला. आपण उगीच आपल्या बायकोला वाईट समजत असतो, असा विचार करून त्यांना या गोष्टीचा खेद झाला. त्यांनी काकूला प्रेमाने जवळ घेतले. काकूंनीपण खोटेपणाचा आव आणत काकांना पटवून दिले कि, त्या दिपकचा किती लाड करतात..किती काळजी घेतात.

दुसऱ्या दिवशी सकाळी दिपकला काकूंनी रात्रीच्या उरलेल्या डाळीत पाणी घालून खायला दिले. पाणी घातल्यामुळे डाळ अळणी लागली. दिपकने काकूंकडे मीठ मागितले. पण काकूंनी ऐकून न ऐकल्या सारखे केले. दिपकला वाटले काकूंनी ऐकलेच नाही. म्हणून तो स्वयंपाक घरात गेला आणि डाव्या हाताने चिमूटभर मीठ घेऊन आला. या गोष्टीचा काकूंना भयंकर राग आला. त्या रागारागाने स्वयंपाक घरात गेल्या आणि मूठभर मीठ घेऊन आल्या आणि दिपकच्या तोंडात तेवढे मीठ कोंबले. दिपकने ते मीठ तिथेच थुंकले. तो उलट्या काढू लागला. काकूंनी मामाला बोलावले आणि कांगावा करून एक चे दोन सांगितले. मामांनी दिपकचा डावा हात दोन्ही हातांची ताकद लावून पिरगळला. दिपक वेदनेने ओरडू लागला, तर काकूंनी त्याच्या तोंडात लाटणे घुसवले. दिपकचा हात सुजला. त्याला हात हलवता येईना. मामा त्याला म्हणाले, "आज पासून तुझा डावा हात तूटला...काय ? आज पासून तुझा डावा हात तुटला...माझ्या समोर तुझा हात असाच राहील". असे म्हणून मामांनी त्याचा हात तुटल्या सारखा वाकडा करून त्याच्या गळ्यात टाकला. जो पर्यंत मामा समोर होते, तो पर्यंत दिपकने हात वाकडाच करून ठेवला. त्या नंतर मामा जेव्हा कधी त्याचा हात खाली किंवा सरळ झालेला पाही, तेव्हा ते त्याच्या हातावर हातात येईल त्या वस्तूने प्रहार करीत.

काही दिवसांनी दिपकच्या पायाची जखम बरी झाली. एके दिवशी तो अंगणात मुलांचा खेळ पाहत उभा होता. मामा मागून गुपचूप आले आणि जोरात त्याच्या लवणीत सुई खुपसली. दिपक किंचाळून खाली कोसळला. खेळणारी मुले पसार झाली. मामांनी दिपकला मनगटाला धरून खेचत घरात नेले. दिपकला पायावर उभे राहता येईना. मामा त्याला म्हणाले, "आज पासून तुझा उजवा पाय तुटला...काय ??...तुटला ...माझ्या समोर कसं उभं राहायचं ? हे...असं” असे म्हणून मामांनी दिपकचा डावा हात वाकडा करून त्याच्या गळ्याशी धरला आणि उजव्या पायाच्या लवणीत गुढग्याने मारून पाय वाकडा केला. दिपकची अशी अवस्था बघून दोघांना असुरी हास्य आले. दोघेही जोरजोरात हसू लागले. त्या दिवसापासून दिपकने मामांना बघितले कि याच स्थितीत उभा राहायचा.

एके दिवशी मामा खुर्चीवर बसून चहा पीत होते. दिपक त्यांच्या शेजारी बसून भिंतीवर बोटाने रेघोट्या मारीत होता. मामांना माहित नाही काय हुक्की आली आणि त्यांनी दिपकच्या मांडीवर गरम चहाचा कप ठेवला. गरम कपाचा चटका लागल्याने दिपकने पाय झटकला. धक्का लागल्याने कपातील चहा खाली सांडला. तसे मामा जोरात ओरडून म्हणाले, "ताई ..या पोरानं म्हा च्या सांडिवला बघ". काकू रागारागाने बाहेर आल्या आणि दिपकला खूप मारले. दिपक म्हणाला, "मी नाही सांडवला चहा...मामानेच कप ठेवला मांडीवर". काकूंना या उलट उत्तराचा खूप राग आला. त्या घरात गेल्या आणि उकळता चहा आणून दिपकच्या तोंडात ओतला. दिपकचे सगळे तोंड, ओठ, जीभ पोळून निघाली. दोन दिवस तो जेऊ शकला नाही.

रविवार उजाडला...आज काकांना सुट्टी होती. काकूंनी सकाळी सकाळी दिपकला झोपेतून उठवले. त्याला स्वतःच्या हाताने आंघोळ घातली. स्वयंपाक घरात नेले. मांडीवर बसवून स्वतःच्या हाताने त्याला भरवू लागल्या. दिपकला कळेना...हे काय चालले आहे...त्याला वाटले तो अजून झोपेतच आहे...काका आले...काकू आणि दिपकचे प्रेम बघून सुखावले. काकांनी काकूंचे आभार मानले. काका काकूंना म्हणाले, "मी दादा बरोबर वार्ता करतो...दिपकला दत्तक घेऊनच टाकतो...मी गेल्यानंतर ही इस्टेट कुणाची आहे?...ही सगळी मी दिपकच्या नावे करतो...म्हातारपणी तोच आपला आधार होईल...तुला काय वाटते".

"मी काय सांगू बाई ?...तुम्हाला जे बरं वाटतं ते करा", असे म्हणून काकू बाहेर गाईला वैरण टाकायला गेल्या. त्यांची संमती बघून काका खूप खुश झाले. दिपकला गालावर मुका घेऊन कामानिमित्त बाहेर निघून गेले.

काकू घरात आल्या...आतल्या घरात जाऊन मामाला म्हणाल्या, "दादा, ऐकलंस का ? दिपकच्या नावावर सगळं करणार हायेत हे....आता काय करायचं ?"

"ताई, तू काळजी करू नगस...आज-काल नदीला पाणी लय आलंय...जातो घेऊन याला अंघोळीला", असे म्हणून मामा खदाखदा हसले.

संध्याकाळी मामा दिपकला घेऊन नदीवर गेले. त्याचे हातपाय बांधले. दिपकला उचलून नदीत फेकणार तेवढ्यात पोलिसांनी त्यांच्या पायावर गोळी झाडली. ते खाली कोसळले. पोलीस धावून आले, सोबत काका पण होते. दिपकची सुटका केली. शेजाऱ्या पाजाऱ्यांनी आपली भूमिका बजावली होती. त्यांनी काकांना वेळोवेळी परिस्थितीची जाण करून दिली होती. पण पुराव्या अभावी काका काही करु शकत नव्हते. आज मुद्दाम काकांनी पोलिसांची मदत घेऊन त्यांच्यावर पाळत ठेवली होती. त्यांना रंगेहात पकडून दिले होते.

दुसऱ्या दिवशी सकाळी काकांनी दिपकचे सर्व सामान, कपडे-लत्ते घेतले आणि दिपकला त्याच्या घरी सोडायला निघाले. रस्त्यात त्यांनी दिपकच्या पायाला हात लावून विनवणी केली, कि झाला प्रकार कुणाला सांगू नको. दिपकने वचन दिले. दिपक घरी परतला. आईबाबांना खूप आनंद झाला. शेजारी पाजारी जमा झाले. सगळ्यांना खूप आनंद झाला. सर्व त्याचे लाड करू लागले. दिपक मात्र शान्त होता. निशब्द. डोळ्यांत असंख्य प्रश्न घेऊन.

इतके सांगून, दिपक रडू लागला. आई वडीलांना खूप दुःख झाले. आपल्या मागून आपल्या मुलाला अशा भयंकर संकटांना सामोरे जावे लागले, इतक्या यातना भोगाव्या लागल्या, याची त्यांना कल्पना देखील नव्हती. त्यांना खूप अपराध्या सारखे वाटू लागले.

आज पुन्हा एकदा मामा समोर आले, आणि दिपक आपली शुद्ध हरपून बसला. एखाद्या चित्रपटा प्रमाणे सगळा प्रसंग त्याच्या डोळ्यांसमोर उभा राहिला. त्याच्या मनावर खूप मोठा आघात झाला होता. त्याच्या वडिलांनी तात्काळ पोलिसांना तक्रार केली. पोलिसांनी वेळीच दखल घेऊन मामांना बस स्थानकाहून अटक केली.

- प्रदीप बर्जे