Shodh Chandrashekharcha - 21 books and stories free download online pdf in Marathi

शोध चंद्रशेखरचा! - 21

शोध चंद्रशेखरचा!

२१---

सकाळी इरावती ऑफिसात पोहंचली. कामाचा ढीग तिची वाट पहात होता. आशाने सगळे रिपोर्ट्स तिच्या टेबलवर व्यवस्थित रचून ठेवले होते.

काल तीन मृतदेह कोल्ड स्टोरेजच्या गोडाऊन मध्ये सापडले होते. त्यातील तिच्या अपेक्षेप्रमाणे एक चंद्रशेखरचा होता. बाकी दोघांचीही ओळख पटली होती. एक, त्या कोल्ड स्टोरेजचा मालक पीटर होता. ड्रग्ज ट्रांस्पोर्टेशनच्या संदर्भात त्याचे बरेच रेकॉर्ड पोलिसात तयार होते.

दुसरा सुलेमान होता. अनेक गुन्ह्यात, तो पोलिसांना हवा होता. बांगलादेश, नेपाळ बरोबरच तो, दोनदा पाकिस्तानातही जाऊन आला होता. दुबईला तर नेहमीच!

माणिकचे फारसे पोलीस रेकॉर्ड नव्हते. 'मी माणिक' याव्यतिरिक्त त्याची कोठेच नोंद नव्हती! हा आणि विकी अश्या केस मध्ये कसे आलेत? हे इरावतीलला कळेना.

तिने माणिकला ज्या हॉस्पिटलमध्ये नेले होते, त्या हॉस्पिटलला फोन करून चौकशी केली. त्याच्या हृदयाचे ऑपरेशन करून गोळी बाहेर काढली होती. पण त्याच्या जगण्याची शक्यता नव्हती!

या केसची सुरवात चंद्रशेखरच्या गाडीच्या अपघाताने झाली. अपघात -गाडीत चंद्रशेखर नसणे-विकीने त्याला खंडणी साठी काढून दूर नेणे -कस्तुरीला खंडणी फोन-विकीची विस्मरण गाथा-बाक्षीचे मुंबईत आगमन-चंद्रशेखरच्या गॅलॅक्सिजवळ दिसणे-विकीच्या घराची झडतीत बक्षीचा हात असण्याची शक्यता -माणिकचा कस्तुरीला चंद्रशेखरच्या बॉडी बद्दल फोन- पीटरचा कोल्डस्टोरेज पर्यंत तिला नेणे -बक्षीचे तेथेच येणे! हि साखळी होती.

तिने खिशात हात घातला, रात्री माणिकचा मोबाईल तिने घेतला होता. तिने तो ऑन केला. त्यात अपेक्षेप्रमाणे कस्तुरीचा नंबर होता. बाकी आयकॉन पहाताना ती कॉल रेकॉर्डिंग थांबली! त्यावर कस्तुरीचे कॉल होते, आणि एक 'रिपोर्टींगवाला' म्हणून नंबर सेव्ह केला होता! त्या नंबरवर बरेच कॉल रेकॉर्डेड होते! इरावतीने एअर फोनची कॉर्ड फोनला जोडून, एअरप्लग्ज कानात घातले. बापरे, या माणिकने काय डोके चालवले होते? न पाहिलेल्या माणसा साठी तो काम करत होता, सुरक्षा कवच म्हणून, तो त्याचे संभाषण रेकॉर्ड करत होता! माघे पुढे त्या व्यक्तीला ट्रेस करून ब्लॅकमेल करता येऊ शकणार होते!

इरावतीने तो 'रिपोर्टींगवाला' नंबर राकेशला, माहिती आणि लोकेशन काढण्यासाठी पाठवून दिला!

या साखळीला एक वेगळीच कडी होती. चंद्रशेखरच्या मृत्यूने जरी कस्तुरीला सगळ्यात ज्यास्त फायदा होणार होता, तरी तिने हे अपघात नाट्य रचले नव्हते, त्यासाठी इथला आनंत संधी होत्या. इरावतील सुलतानची मुलाखत स्पष्ट आठवत होती!

इरावतीने शकीलला गाडी काढायला लावली. गाडीत बसल्यावर तिने फक्त एकच शब्द उच्चारला.

"गॅलॅक्सि!"

या केस मध्ये दोन कथांचा गुंता झाला होता. एक चंद्रशेखरच्या आयुष्यातला आणि एक आंतरराष्टीय गुन्ह्याचा! हि गोष्ट इरावतीच्या चांगलीच लक्षात आली होती!

मोजून पंचेवीस मिनिटात, इन्स्पेकटर इरावतीच्या व्हॅन मध्ये चैत्राली होती! आणि इरावती पोलीस स्टेशन मध्ये परत आली होती!

"इन्स्पे. इरावती, असे बळजबरी मला तुम्हाला अटक करता येणार नाही!" चैत्राली चिडून म्हणाली.

"चैत्राली, अशा चिडू नका. चंद्रशेखरच्या अपघाताला एक आंतरराष्ट्रीय अतिरेकी संघटनेचा संपर्क आहे. याची तुम्हाला कल्पना नसेल! तुम्ही हि एक, एन आर आय आहेत! प्रिकॉशन म्हणून तुम्हाला येथे आणून चौकशी करावी लागत आहे! गॅलॅक्सि सेफ नाही आमच्या साठी आणि तुमच्या साठी सुद्धा!" हि बाई काय सांगते आहे? टेररिस्ट आणि आपली सांगड तर घालत नाही? थोडे बोलणे पुढे सरकल्यावर कळेल.

"ठीक! विचारा!"

इरावतीने इंटरकॉम वरून दोन फिल्टर कॉफीची ऑर्डर दिली, तेव्हा चैत्राली आश्चर्याने उडालीच.

"तुम्हाला काय ठाऊक मला फिल्टर कॉफी हवी ते!" चैत्रालीने विचारले.

"चैत्राली, मला तुमच्या बद्दल अजूनही बरच माहित आहे! तुम्ही रुद्रकांतचे 'चैत्राली' का आणि कसे झालात? पण तो मुद्दा सध्या गौण आहे! सध्या महत्वाचा प्रश्न हा आहे कि, अपघातातली गाडी अपघाताच्या आदल्या दिवशी तुमच्या कडे होती का?"

चैत्रालीच्या तळहाताला घाम सुटला. या इरावतील कर्णपिशाच्य वश असावं! या बयेने आपली माहिती कशी, कुठून आणि कधी काढली? हिला सगळंच कस कळत?

"हो!" चैत्रालीने अडखळत होकार दिला.

"तुम्ही असं करयायला नको होत! आणि तुम्ही ते का केलंत? हेही सांगून टाका! सत्य सांगाल तर तुमच्या साठी मला मदत करता येईल!"

इरावतीला सकाळीच त्या मैसूर करस्पॉण्डट तर्फे चैत्रालीने लिंग परिवर्तन करून घेतल्याची आणि तिचे आधीचे नाव रुद्रकान्त असल्याची माहिती कळाली होती. बऱ्याच वर्षांनी ती आफ्रिकेतून मुंबईत उतरल्याचे हि कळवले होते. चैत्रालीच्या पुरुषी आवाजच रहस्य यातच दडलेले होते तर?

आता या इरावती पासून काही लपवून ठेवण्यात अर्थ नव्हता. चंद्रशेखरची डेड बॉडी सापडल्याची बातमी, मेडियावाले बोंबलून सांगत होते! दीदी हि आता नव्हती. तिचा मुंबईत येण्याचा उद्देश संपलाच होता. तिने सरेंडर करण्याचा विचार पक्का केला.

"बोला चैत्राली! बोला! सांगा सगळं!"

"हो सांगते सगळं! कारण आता लपवल्यात अर्थच उरलेला नाही!"

तेव्हड्यात इरावतीचा फोन वाजला. राकेश?

"इरा, तू दिलेला नंबर गायत्री यांचा आहे!"

हे कसे शक्य होते? गायत्रीने तर आत्महत्या केली होती!

"आणि लोकेशन?"

"तू रिंग दे तुलाच कळेल!" राकेश गूढपणे म्हणाला.

समोरच्या खुर्चीतली चैत्राली इरावतीचा फोन संपण्याच्या प्रतीक्षेत होती.

इरावतीने राकेशच्या फोन कट केला.

त्यानंतर चैत्रालीने सर्व सांगण्यास सुरवात केली. तिचे आणि गायत्रीचे संबंध. चंद्रशेखरला धडा शिकवण्या साठी तिने आफ्रिकेतून भारतात येणे. अपघाताच्या दिवशी गाडीत बिघाड करून ठेवणे, ऍपल जूस मध्ये सिडेटिव्ह मिसळणे, हे सगळे तिने न लपवता सांगितले. तिचे संपूर्ण बोलणे रेकॉर्ड झाले होते!

"चैत्राली, थँक्स! आता माझ्या कडे तुला थांबवण्याचा कोर्टाचे वारंट नाही, म्हणून तुला सोडते! मुंबई सोडायची नाही! आणि शेवटचा प्रश्न गायत्रीचा एखादा मोबाईल तुझ्या कडे आहे का?"

"नाही! तिचा मोबाईल असेल असे वाटत नाही!" चैत्राली उठून उभी राहत म्हणाली.

"ओके, यु मे गो!" चैत्राली दारापर्यंत पोहंचलीही नसेल, तिच्या पर्स मधला मोबाईल वाजला! इरावतीने 'रिपोर्टींगवाला' नंबर डायल केला होता! म्हणजे चैत्रालीने गायत्रीचे सिम रिचार्ज करून लाईव्ह ठेवले होते आणि माणिकला चंद्रशेखरवर लक्ष ठेवण्यासाठी हायर केले होते!

०००

राजेंच्या समोर बक्षीला जखडून बसवले होते. त्याच्या सर्वांगाची झडती घेऊन दोन विषारी गोळ्या काढून घेण्यात आल्या. शत्रूच्या हाती लागण्याची शक्यता वाटली तर आत्महत्येसाठी, बक्षी सारखे अतिरेकी एजंटअश्या गोळ्या बाळगतात. त्याचे तोंड उघडण्याचे काम चालू होते.

०००

चैत्राली निघून गेली होती, तिच्या पाठोपाठ शकीलही गेला होता. तो तिच्यावर लक्ष ठेवणार होता. आशाने तत्परतेने कॉफी आणून इरावतीच्या टेबलवर ठेवली. या आशाला बाकी काही लक्षात राहो ना राहो, इरावतीच्या कॉफीच्या वेळा मात्र पक्या लक्षात राहतात. कॉफीचा मग तोंडाला लावून इरावती विचारात गढून गेली. चंद्रशेखरच्या केस मधली डोमेस्टिक लिंक बरीचशी स्पष्ट झाली होती. बक्षीचा या केसमधला सहभाग पहाता तो दुबई पासून चंद्रशेखरच्या गॅलॅक्सि पासून विकीच्या घराकडे आणि तेथून पीटरचा गोडाऊन पर्यंत, तेथे चंद्रशेखरच्या डेड बॉडी होती! चंद्रशेखर दुबईहून नुकताच परतला होता, हि बाब दुर्लक्ष करून चालणार नव्हते! त्यानंतर बक्षी कुठे गेला?, याचा आता पर्यंत तर तपास लागला नव्हता! तो गोडाऊनमध्ये चंद्रशेखरच्या बॉडी पर्यंत पोहचाला होता का? एस, तो आत आला होता! पाचवा थर्मल ओव्हरकोट त्यानेच घातला असावा! पण मग, गेला कोठे? एकंदर त्याच्या हालचालीवरून तो एका विशिष्ट वस्तूच्या शोधात होता, जी चंद्रशेखरच्या अंगावर बाळगण्या जोगी होती, किंवा ती विकीकडे असण्याची शक्यता होती!

तिने खसकन टेबलवरचे ड्राव्हर उघडले! ' अफगाण लेदर्स, दुबई!' हिरव्या चमकीच्या एम्बॉसिंगच्या अक्षराचे पाकीट तिला वाकुल्या दाखवत होते!

इरावतीच्या फोनवर मेसेज टोन वाजला. 'स्पेशल रिपोर्ट ऑफ पोस्टमोर्टम -चंद्रशेखर सेंट बाय इ-मेल.'

तिने लॅपटॉप उघडला.

चंद्रशेखरच्या पी.यम.रिपोर्ट प्रमाणे, मृत्यूचे कारण 'मेंदूला जबरदस्त इजा.' हेच होते. पुढील ओळ ज्यास्त महत्वाची होती, तो अपघाताच्या क्षणी, तात्काळ 'मेला' होता! म्हणजे? विकीने त्याला हलवले तेव्हा तो 'ब्रेन डेड होता, हीच शक्यता होती!

*******