Vibhajan - 8 books and stories free download online pdf in Marathi

विभाजन - 8

विभाजन

(कादंबरी)

(8)

मोहम्मदने भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात घेतलेली उडी गावच्या लोकांना आवडली होती. प्रत्येक गावन् गाव स्वातंत्र्याच्या ध्येयानं पछाडलेलं होतं. ते ब्रिटीशांना जुमानत नव्हतं. त्यांना देशातील लोक आवडत होते. नव्हे तर जेही स्वातंत्र्यासाठी झिजत होते. त्यांना गावची लोकं मदत करीत असत. मोहम्मदनं तोडलेल्या टेलिफोनच्या तारा.... हा प्रकार ब्रिटीशांसाठी लांच्छनास्पद असला तरी गावासाठी गावचा अभिमान बाळगणाराच होता. म्हणून की काय अख्ख गाव त्याच्या धर्माचा बाऊ न करता त्याला आपल्या घरात लपवीत होते. त्याच्यासाठी प्रसंगी पोलिसांचा लाठीमार खात होते.

मोहम्मद काही पोलिसांच्या हाती लागला नाही. पोलिसांनी बराच प्रयत्न केला. त्यावेळी तर मोहम्मदला गावच्या लोकांबद्दल आत्मीयता निर्माण झाली होती.

हिंदू महासभेची दोन राष्ट्राची कल्पना तसेच वि दा सावरकरांनी १९३७ ला हिंदू महासभेच्या संमेलनात मांडलेली भुमिका तसेच १९४० ला मुस्लिम लीग च्या संमेलनात जीनानं मांडलेल्या भुमिकेचा परिणाम गावावर झाला नव्हता. आजही गाव गांधीजींच्या मागे उभा होता. त्यांना गांधीजींचे विचार आवडत होते. म्हणूनच की काय टेलिफोनच्या तारा तोडलेल्या मोहम्मदला लोकं लपवून नेत होते.

१९४२ ला सुरु झालेली चलेजावची चळवळ. त्या चळवळीच्या माध्यमातून होत असलेले आंदोलन. त्या आंदोलनाला आता उग्र रुप आले होते. स्वातंत्र्यप्राप्तीचे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी लक्षावधी लोकांनी त्याग केला. त्यात अनेकांनी आत्मबलिदानही केले. आंदोलकांची संख्या एवढी होती की इंग्रज सरकार या आंदोलनातून हतबल झाले. प्रसंगी या आंदोलनात मुस्लिम लीग ने तसेच हिंदू महासभेने भाग घेतला नसेल. पण आंदोलनाची तीव्रता कमी झालेली नव्हती. १९४२ ते १९४६ या काळात झालेली आंदोलनं ...... या आंदोलनानं ब्रिटीश सत्तेचा पायाच खिळखिळा झाला. चलेजाव, भारत छोडो च्या आंदोलनातून भारतीय जनतेने प्रखर ब्रिटीशांविषयीचा विरोध व्यक्त केला. प्रत्येक घरातून एक दोन व्यक्ती या आंदोलनासाठी बाहेर निघाला. तसेच या आंदोलनामध्ये भाग घेतलेल्या लोकांचं भरणपोषणही येथील जनतेनं पर्यायानं स्विकारलं.

१९४२ च्या आंदोलनातील आंदोलनकारींना पोलिस शोधत होते. ते भुमीगत झाले होते. तेव्हा ते भुमीगत अवस्थेत कोणाच्याही घरी लपून बसले होते. पण लोकांनी त्यांची जात धर्म न पाहता केवळ भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्राणाची पर्वा न करता केलेलं कार्य लक्षात घेवून लोकांनी त्या भुमिगतांना आपल्या आपल्या घरी लपवलं होतं. त्यांना ते जेवण खावण तसंच सा-या सुविधा पुरवीत होते आपल्याच घरचा एक सदस्य समजून.

मोहम्मदचंही तसंच झालं होतं. गावात रोजचे पोलिस येत. लोकांना मारत असत. गोळीबाराची धमकी देत असत. ते पाहून मोहम्मदने गाव सोडायचा निर्णय घेतला.

रात्रीचा तो भयाण अंधार. तो ज्या हिंदू कुटूंबात लपला होता. त्या कुटूंबाशी तो बोलला. म्हणाला,

"मला आता गाव सोडायला हवं. आपले उपकार मी कधीही विसरु शकणार नाही. "

"नको जावूस मोहम्मद. पोलिस तुझ्या मागावर आहेत. तू सापडशील. "

"अन् नाही गेलो तरीही सापडू शकेल. पोलिस मला सोडणार नाहीत. हं वाचलोच तर परत येईल मी. पण नाही आलो तर माझ्या पत्नीची व लेकरांची काळजी घ्या. "

गाव मोहम्मदला अडवीत होतं. पण मोहम्मद तरी काय करणार. आपल्यामुळं गावाला त्रास नको असं त्याला वाटत होतं. म्हणून तो गाव सोडत होता.

रात्रीचा भयाण अंधार. मोहम्मदनं गाव सोडलं खरं. पण त्या अंधारात तो रस्ता काढतांना त्याला फार त्रास होत होता. रातकिड्याची किरकिर आवाज कानी येत होती. कधी वाघ सिंहाचा आवाजही कानात गुंजत होता. तेव्हा फार भीती वाटत होती. पण मोहम्मद त्या भीतीचं काय करणार. त्याच्या मनात तर त्या वाघसिंहापेक्षा भयंकर हे ब्रिटीश वाटत होते. कारण वाघ सिंह तर एका वेळी एकाच माणसाला मारेल. पण ते ब्रिटीश गोळीबारानं एकाच वेळी अनेकांचा बळी घेत होते. तसेच वाघ सिंहाशी प्रसंगी लढता येत होतं. पण त्या ब्रिटीशांच्या गोळीसमोर लढताही येत नव्हतं. मोहम्मदला गोळीबाराची तसेच ब्रिटीशांची पाहिजे तेवढी चीड येत नव्हती. त्याला चीड येत होती ती म्हणजे आपल्याच लोकांची. आपलेच लोकं त्या ब्रिटीशांच्या सैन्यात होते. ते सैनिक वेतन मिळते म्हणून ब्रिटीशांची नोकरी करीत होते. एव्हाना म्हणूनच ते ब्रिटन सगळ्या जगावर राज्य करीत होतं.

१९४२ चं आंदोलन हे अयशस्वी ठरलं होतं. पण हे आंदोलन ब्रिटीशांना सळो की पळो करुन सोडणारं ठरलं. अख्खे लोकं मैदानात आल्यानं त्यांना भारतातील सत्ता फार काळ टिकविता येणार नाही याची प्रचिती आली होती.

मोहम्मद त्या रात्रीच्या भयाण अंधारात भुमीगत झाला होता. तो मरण पावला की जीवंत हे काही अजूनही उमगलं नव्हतं. पण त्याच्या त्या कार्याला गाव काही विसरलं नव्हतं. अशातच तीन चार वर्ष निघून गेली होती. असाच तो १६ आगष्ट १९४६ चा दिवस उजळला.

१६ आगष्ट १९४६ ह्या दिवशी जीनानं पाकिस्तान ची मागणी पूर्ण होत नसल्याचे पाहून मुस्लिम लीग ने प्रत्यक्ष कृतीदिन पाळायचे ठरवले होते. वार्ता कानावर येत होत्या. आता पाकिस्तान बनणार ही लक्षणे दिसत होती. त्यातच ती बातमी मोहम्मदच्या कानावर आली. तशी त्याला त्याच्या पत्नीची व मुलाबाळाची आठवण आली.

मोहम्मद दूर गावी एका हिंदूच्याच घरी भुमीगत अवस्थेत लपलेला होता. तो जीवंत होता. तसा त्याला विचार येत होता की त्याच्याच बरोबरीच्या कित्येक लोकांनी स्वतः आत्माहूती पत्करली होती. पण इंग्रजांना ते शरण गेले नव्हते. त्यांना इंग्रज आवडत नव्हते. कित्येक विरांनी विहिरीत उड्या टाकल्या होत्या. तर काहींना इंग्रजांनी कोरड्या विहिरीत हातपाय बांधून फेकले होते. तर काहींचे शरीरअवयवही कापून टाकले होते. १९४२ चे चलेजाव भारत छोडोचे तर आंदोलन शमले होते. पण या चलेजाव आंदोलनातून भारतीय लोकांचे हालहाल करुन टाकले होते.

मोहम्मद हा हिंदूंच्या घरी भूमीगत अवस्थेत लपलेला होता. पण त्या हिंदू कुटूंबानं आपल्या लेकरागत त्याची सेवा केली होती. कोणतंही इवलसं अंतर पडू दिलं नव्हतं. ते उपकारच होते मोहम्मदवर.

मोहम्मदला विचार येत होता की ज्या भारतात आम्ही राहतो. ज्या हिंदूंचा आम्ही द्वेष करतो. ते हिंदू स्वभावानं किती चांगले आहेत. हं तांदळात खडे असतातही दोनचार. त्याचप्रमाणे समाजातही दोनचार हिंदू असे असतील की जे मुसलमानांना शिव्या हासडत असतील. याचा अर्थ असा नाही की हिंदूंची संपूर्ण बिरादरीच खराब असावी. आमच्याही मुसलमानात असेच काही तांदळातील खडे आहेत की जे पाकिस्तान मागत आहेत. आज ह्याच खड्यांनी देशाला नाशवलं आहे. मी तर या तमाम हिंदूंना चांगलंच म्हणेल. कारण माझ्या गावातही माझ्या आजोबा पणजोबापासून तर आमच्या पूर्ण पिढीला आजपर्यंत हिंदूनीच आम्हाला सांभाळलं. तसेच आजही ओळख पाळख नसतांना चार वर्षपर्यंत या हिंदू लोकांनी मला सांभाळलं. लेकराबाळाचीही आठवण येवू दिली नाही. केवळ सत्याग्रही एवढीच ओळख सांगीतली. आता गावाला निघालं पाहिजे. कारण आता पाकिस्तान जवळ जवळ बनण्याची चिन्हं दिसत आहेत.

१६ आगष्ट १९४६ चा तो दिवस. मुस्लिमांनी प्रत्यक्ष कृतीदिन म्हणून साजरा केला. त्यांना स्वातंत्र्य मिळवून घेण्याची कोणतीच अभिलाषा नव्हती. स्वातंत्र्याशी काहीही घेणंदेणं नाही हे एकंदर त्यांच्या वर्तनावरुन दिसत होतं. तर त्यांना त्यांच्या धर्माचं पाकिस्तान हवं होतं.

हिंदू महासभेलाही त्यांच्या धर्माचं स्वतंत्र्य असे राष्ट्र हवे होते. स्वातंत्र्य मिळणं जवळजवळ निश्चित झालं होतं. फक्त ब्रिटीश सरकार सांगत होते की भारत पाकिस्तान याबद्दल येथील लोकांनीच निर्णय घ्यावा. जोपर्यंत यावर निर्णय होणार नाही. तोपर्यंत स्वातंत्र्य कसं देणार.

राष्ट्रीय सभा... ... जो एकमेवाद्वितीय पक्ष होता की ज्या पक्षाला वाटत होतं भारताचे तुकडे होवू नये. जात पात धर्म पंथ न पाळता सर्वांनी एकत्र एकाच संघराज्यात राहावं. म्हणून की काय मुसलमानांना भीती वाटत होती की आम्हाला आमचा वेगळा पाकिस्तान मिळतो की काय?

मुसलमानांनी १६ आगष्ट १९४६ हा प्रत्यक्ष कृतीदिन पाळायचा तर ठरवला. पण त्यांना वाटलं की असा शांततामय मार्गानं पाकिस्तान मिळणार नाही. म्हणून की काय?या दिवशी झालेल्या आंदोलनांला हिंसक वळण लागलं. मुस्लिम लीगच्या अनुयायांनी हिंसक मार्गाचा अवलंब केला. मग काय देशात ठिकठिकाणी हिंदू मुस्लिमांच्या कत्तली झाल्या. ही हिंसकता बंगालमध्ये नौआखाली या भागात घडल्या. त्याचबरोबर संपूर्ण देशच आता दंगलीमध्ये परावर्तीत झाला.

१६ आगष्टची दंगल उसळली. तेव्हा मोहम्मद त्याच हिंदू घरात लपून बसला होता. त्या दंगलीची चर्चा त्याच्याही कानावर आली होती. तशी त्याला आपल्या मुलांची व पत्नीची चिंता पडली. पण जायचे कसे?कारण रस्त्यावर जिथे तिथे हिंदू मुसलमान एकमेकांना मारण्यासाठी सशस्र तलवारी घेवून उभे होते.

१६ आगष्टच्या या दंगलीचा एवढा प्रकोप वाढला होता की बरेच लोकं घरात लपून दरवाजे लावून बसले होते. कोणी बाहेर निघायला तयार नव्हते. मुस्लिमांनी आपली दाढी मिशी काढली होती. ओळख लपवून टाकली होती. तेच हाल हिंदूंचेही होते. त्यांनीही आपली पगडी उतरविली होती. कोणी कोणाला ओळख दाखवाला तयार नव्हते. यापेक्षा हे इंग्रज बरे होते असं जनसामान्याला वाटायला लागलं होतं.

काही हिंदू घरात मुसलमान बळजबरीनं शिरुन हिंदूंच्या मुलींवर बलात्कार करीत होते. तर काही हिंदूही मुसलमानांच्या घरात शिरुन तेच कृत्य दोहरावत होते. कधी तर मानाही छाटून टाकत होते.

१६ आगष्ट निमित्यानं भडकलेली दंगल आता विझणे कठीण होते. अशातच आपला धर्म या कुटूंबाला माहीत होईल व हे मला मारुन टाकतील या भीतीनं हिंदूच्या घरी भूमीगत असलेला मोहम्मद आपला सांभाळ करणा-या त्या हिंदू परीवाराला म्हणाला,

"मी आता जातोय. आता चलेजावचं आंदोलन संपलेलं दिसतंय. "

"कुठं जाणार. " हिंदू भाई म्हणाला.

"जातो मी आपल्या पत्नी आणि मुलांना भेटायला. "

"पण ते जीवंत तरी असतील का?"

"मी इथे राहलो. आपण मला सांभाळलं. आपले उपकार भरपूर झाले. आता मला जावू द्या. मला फार आठवण आलीय माझ्या लेकराबाळाची. "

"हो जा. आम्हालाही कळतं. पण जरा दंगली शांत होवू द्या. "

"तुम्ही मला एवढं चांगल्या पद्धतीनं सांभाळलं माझी ओळखपाळख नसतांना. अन् आताही दंगल शांत झाल्यावर जा म्हणता. किती चांगली तुम्ही मंडळी. पण तुम्हाला माहीत झाल्यावर तुम्ही मला जीवंतही सोडणार नाही हे माहीत आहे का तुम्हाला?"

"हो. माहीत आहे. "

"काय माहीत आहे?"

"हेच की तुम्ही मुसलमान आहात. "

"तरीही तुम्ही मला अभय देत आहात. "

"होय. "

"का बरं!"

मोहम्मद आश्चर्यचकित झाला होता. त्यांना माहीत होवूनही त्यांनी हाकलून दिलं नव्हतं.

हिंदू परीवारातील तो बोलणारा सदस्य काही काळ चूप राहिला. तसा तो म्हणाला,

"हे बघा हिंदू, मुसलमान या धर्माच्या पलिकडंही एक धर्म आहे. तो म्हणजे माणुसकीचा. तुम्ही मुसलमान असालही. पण त्या आधी माणूस आहात. तुम्ही जेव्हा इथे आले. तेव्हा तुमच्यातील माणूस दिसला आम्हाला. तो माणूस....... ज्यानं आपल्या देशासाठी आपल्या प्राणाचीही पर्वा केली नाही. मग आज आमचं काम संपल्यावर आम्ही तुम्हाला मुसलमान समजून मारुन टाकावे. हे कितपत बरोबर आहे?खरं तर या देशाचे दोन तुकडे व्हायलाच नको. पण काय करणार बैरीस्टर जीना ऐकायलाच तयार नाहीत आणि आमचे हिंदूही ऐकायला तयार नाहीत. आम्हाला नाही वाटत की दंगली शमणार. ह्या दंगली पुढे पाकिस्तान बनल्यावरही सुरुच राहणार असं वाटतं. पण दंगली शमणार कधी ना कधी. आता तुम्हाला त्या इंग्रजांची भीती नाही. तर भीती आहे ती आपल्याच माणसाची. जी माणसं आज धर्मानं पछाडली आहेत. तुम्ही जा नको. कारण तुम्ही जर जाल तर जीवंत घरी परत जाणार नाही. तेव्हा काही दिवस राहा. "