Lockdown - 8 books and stories free download online pdf in Marathi

लॉकडाउन - खंडोबा उवाच - भाग ८

सायंकाळची तिरपी किरणे गडावर पडली होती. वैशाख महिन्याचे उष्ण वारे मंद गतीने वहात होते. त्यामुळे झाडाच्या पानांची सळसळ ऐकू येत होती. पिकलेली पाने त्यामुळे गळून पडत होती. कधीच परत न येण्यासाठी. स्वतःहून झाडाशी आपला सबंध तोडत होती. आपण पिकलो, पिवळे झालो, आपला कार्यभाग संपला असे वाटताच ती गळून पडत होती. गडावरुन जवळची झाडे मोठी दिसत होती आणि दूरची झाडे त्या गळून पाडलेल्या पानांसारखी. दुरूनच कुठेतरी पक्ष्यांचा थवा उडत होता. दुसर्‍या दिवसाचे अन्न शोधण्यासाठी. आज एका झाडावर, उद्या दुसर्‍या मग परवा तिसर्‍या, अशी त्यांची भटकंती आयुष्यभर सुरूच असते. ते एका जागेशी मोह ठेवत नाहीत. त्यामुळेच कदाचित इतके स्वाच्छंदपणे उडू शकत असावेत बहुतेक.

कधीपासून उधळलेला भंडारा तसाच पडून होता. त्यामुळे सोन्याची जेजूरी ओकिबोकी दिसत होती. कधी कडेपठाराकडे, कधी पक्ष्यांच्या थव्याकडे, कधी दूरवर नजर जाईल तिथपर्यंत देव बघत होते. भलेमोठे ललाट भंडार्‍याने भरले होते. त्यांचा जटाभार खांद्यापर्यंत रूळत होता. पगडी घातली नसल्याने त्यांचे ते रूप भयावह दिसत होते. भयावह होते ते असुरांसाठी. भक्तांसाठी तर ते मंगलमयच होते. एक हात कमरेवर तर दुसर्‍या हातात भलामोठा त्रिशूळ चमकत होता. अस्वथपणे देव गडाच्या तटबंदीभोवती फेर्‍या घालत होते. इतक्यात त्यांचे लक्ष कडेपठारच्या पायथ्याशी गेले. पन्नसेक मेंढया, त्यांच्या अवतीभोवती तीन – चार शिकारी कुत्रे आणि या सर्व लावाजम्यामागे भालीमोठी घोंगडी पाठीवर ठेऊन काठीचा आधार घेऊन ऐंशीतले धनगरबाबा चालले होते. त्यांचे भलेमोठे डोळे कुणालातरी शोधत होते. पण ते त्यांना सापडत नाही हे त्यांच्या डोळ्यांतच दिसत होते.

इतक्यात मागून घुंगरांचा थोडासा अस्पष्ट आवाज येऊ लागला. हळूहळू तो वाढत होता. तो म्हाळसा देवींच्या पैंजणाचा आवाज होता. प्रसन्न वदानाने देवी मल्हारींकडे येत होत्या. “बराच वेळ झाला आता येतो सांगून गेलात ते अजून आला नाहीत महालात. एक प्रहर झाला असेल. सारीपाटाच्या अर्ध्या खेळातून उठलात. ते न बोलताच बाहेर आलात.”

“एकाच वेळी इतके प्रश्न ? देवी, थोडं थांबाल का ? श्वास तरी घ्या आणि आम्हालापण घेऊ द्या.” मार्तंड शांतपणे हसत म्हणाले.

समोरून बाणाई एका रत्नजडीत ताटात पगडी घेऊन येत होत्या. सोबत त्या काहीतरी गुणगुणत होत्या. त्या जसजश्या जवळ येत होत्या, तसतसा तो आवाज स्पष्टपणे ऐकू येऊ लागला. बाणाई मुरळी गात होत्या. जवळ येताच त्या गायचं थांबल्या. त्यांनी ते रत्नजडीत ताट देवांपूढे केले. देवांनी पगडी घातली आणि परत दूरवर नजर फिरवू लागले. मग बाणाईकडे वळून म्हणाले, “देवी आता आपण काय म्हणत होतात?”

“मी, ते काही नाही असच,” बाणाई जरा संकोचाने म्हणल्या.

“आपण जे म्हणत होतात त्यासाठी मी आतुर आहे, अस्वस्थ आहे. म्हणा ती मुरळी.” देवांनी विनंतीवजा आज्ञा केली.

बाणाईंनी एक कटाक्ष म्हाळसाईंकडे टाकला, त्यांनी थोडीशी मान डोलावतच त्यांनी आढेवेढे घेणे सोडले आणि आपल्या मधुर आवाजात मुरळी म्हणायला सुरुवात केली. तिचे बोल असे होते,

“हळदीकुकानी वटी माझी भरली

खंडेरायची झाले मी मुरळी

आईबापानं नवस हा केला

कन्या वाहिली मल्हारीला

त्याच्या नामाची गोडी आगळी

खंडेरायची झाले मी मुरळी

सारी नाती मी देवाशी जोडली

त्यानं हुकूमानं मला इथं धाडली

सदा मल्हार माझ्याजवळी

खंडेरायची झाले मी मुरळी”

देव शांतपणे डोळे मिटून मुरळी ऐकत होते. कानांची तहान भागवत होते. मुरळी संपताच त्यांनी प्रसन्नपणे डोळे उघडले. कितीतरी दिवसांनी त्यांच्या चेहर्‍यावर अशी प्रसन्नता पाहून म्हाळसा आणि बाणाईना आश्चर्य वाटले. त्यांनी एकमेकांकडे बघितले आणि एकदमच प्रश्न विचारण्यासाठी तोंड उघडले. त्या काही बोलणार तोच देवांनी बोलायला सुरुवात केली.

“तुम्हा दोघांना मला असे आनंदित बघून आश्चर्य वाटले असेल ना. त्याला कारण देखील तसेच आहे. कितीतरी दिवसांनी मी माझी प्राणप्रिय मुरळी ऐकली. कितीतरी दिवसांनी. तुम्ही माझ्या सेवेत मग्न आहात, हे मला ठाऊक आहे. तुम्ही तत्पर्तेने मला काय हवं नको ते बघतात. माझी मर्जी सांभाळतात. मी तुमच्यात सरीपाट खेळतो, ते केवळ तुम्हाला चांगले वाटण्यासाठी. एरवी मी माझ्या भक्तांच्या वाटेकडे डोळे लाऊन बसलो आहे. मला माझ्या भक्तांची ओढ लागली आहे. आनंदाने भंडारा उधळणारे ते भक्त अजून माझ्या चक्षूंसमोरून जात नाहीत. जातील कसे, रोज त्यांना हा असाच उत्सव पहायची सवय लागली होती ना. आज कितीतरी दिवसांनी मुरळी ऐकून कान तृप्त झाले आमचे.”

“पण देवा, या महामारीच्या संकटकाळात आपले भक्त घरी बसूनच आपली भक्ति करत आहेत, हे आपणास माहिती नाही का ?” म्हाळसा देवांना समजवण्याच्या सूरात म्हणल्या.

“ते आम्हाला उत्तम प्रकारे ठावे आहे देवी. पण रोज लाखोंच्या संख्येने येणारे भक्तगण असे अचानक बंद झाल्यावर मनाला आवर तरी कसा घालणार.” खंडोबा आगतिकतेने म्हणाले.

“त्याला काही पर्याय आहे का देवा, काळासमोर सर्वकाही फिके आहे.” बाणाई म्हणाल्या.

“खरंय तुमचं देवी, पण ही महामारी देखील गरजेची होती.” काहीशा निर्धाराने देव म्हणाले.

“काय म्हणताय देवा? हा अगणित मानवी संहार गरजेचा होता.” बाणाई अतिआश्चर्याने जरा चढया आवाजात म्हणल्या. बोलताना त्यांचे डोळे अचानकच मोठे झाले. आपला आवाज जरा वाढला असे लक्षात येताच बाणाई खाली मान घालून एक पाय मागे सरल्या. खंडोबांच्या तसे लक्षात येताच ते मंद हसले आणि बाणाईंना पुढे बोलावले.

“तुमचं म्हणणं अगदी रास्त आहे देवी. पण हे खरे आहे की ही महामारी देखील तितकीच गरजेची होती. निसर्गाचा समतोल ढळत चालला होता, जगातून माणुसकी हद्दपार व्हायच्या मार्गावर होती, क्रूरतेने कळस गाठला होता, जागोजागी मूर्तीमंत क्रूरतेचे दर्शन घडत होते. माणुसकी फक्त नावालाच उरली होती. माणूस माणसाला पारखा होत होता. त्यामुळे हे सर्व गरजेचे होते. मानव प्राणी काही काळाने वेळोवेळी त्याच चुका करत असतो. त्यामुळे धडा शिकवणे हे आगत्याचे ठरते.”

“पण या सर्वांत सर्व सामान्य सज्जनांचे काय? आपल्या भक्तांचे काय?” म्हाळसा देवींनी मध्येच प्रश्न उपस्थित केला.

“त्यांना काही होणार नाही देवी. चिंता नसावी. कधी कधी भावनिक दुराव्यात देखील एक अदृश्य जवळीक निर्माण होत असते. एक विश्वास निर्माण होत असतो. आपल्याला काही होणार नाही याचा. हीच श्रद्धा तारून नेत असते. त्यामुळे माझे भक्त कायम निश्चिंत असतात.”

“हे सर्व ठीक आहे पण कधी - कधी याच निश्चिंत असण्याचा गर्व वाटू लागला तर.” बाणाई म्हणल्या.

“होय, तसे तर होणारच. काळाचा महिमा अगाध आहे. कालांतराने त्यांना तसे वाटणे स्वाभाविक आहे. मणी – मल्लाला देखील तसेच वाटायचे की आपल्यापेक्षा कुणीही श्रेष्ठ नाही. पण आमच्यासमोर त्यांनी हार मानलीच ना. आणि भक्तांचे म्हणाल तर त्यांना मी तरतोय. पण जो चुकेल त्याला मात्र शिक्षा ही होणारच.”

“मग त्याचा भक्ति करून काय फायदा?” म्हाळसा देवींनी प्रश्न उपस्थित केला.

“फायदा…. फायदा, लोभ, या व्यावहारिक गोष्टी भक्तीत आल्या की तो संपला देवी.”

“मग शिक्षेचं बोललात ते.” बाणाईंनी मागील प्रश्नाची आठवण करून दिली.

“प्रारब्ध..., होय प्रारब्ध हेच त्याला करणीभूत असते देवी. बाकी सर्व निमित्तमात्र. आम्ही फक्त त्याची तीव्रता कमी करणारे. घरातून बाहेर निघू नका असे संगितले तरी जर कुणी निघत असेल तर त्याला बळी पडावेच लागेल. पण त्याची आमच्यावर निस्सीम भक्ति असली तर त्यालादेखील लागण होईलच पण तो निदान आमच्या कृपेने बरा तरी होईल. त्याला वाटणारी भीती कमी होईल. सकारात्मक ऊर्जेची कंपन त्याला तारुन नेतील, याच सकारात्मक उर्जेमुळे तो बरा होईल आणि आभार मात्र आमचे मानेल. विचित्र आहे की नाही.”

“या महामारीचा नाश करण्यासाठी आपण काहीच का नाही करत. कितीतरी निष्पाप जीव यात बळी जात आहेत. त्यांच्या जगण्याच्या इच्छा आपुर्‍या रहात आहेत. जगण्याची खरी मजा यायला आता कुठे सुरुवात झाली आहे असे वाटत असतानाच ते आयुष्याला पारखे होते आहे. या सर्वांतून काय साध्य होत आहे देवा. थांबवावा आता हा संहार.” बाणाई पोटतिडकीने म्हणल्या.

“तुम्हाला खरच असे वाटते काय की आम्ही काहीच केलेले नाही अजून. दवाखान्यात दिवसरात्र राबणार्‍या त्या वैद्यबुवांकडे जरा बारकाईने पहा, आपल्या जिवाची पर्वा न करता अखंडपणे कोरोनाग्रस्तांवर उपचार करणार्‍या त्या धाडसी वीरांकडे पहा. रणरणत्या उन्हात उभे राहून आपले कर्तव्य बाजवणार्‍या पोलिसांकडे जरा निरखून पहा. अन्नपाण्याची पर्वा न करता ते आपले काम चोखपणे करत आहेत. चोवीस तास उभे आहेत. गोरगरिबांना अन्नपाण्याची व्यवस्था करणार्‍या संस्था, लोकं यांच्याकडे पहा थोडं. आम्हीच त्यांच्या रूपात महामारीला तोंड देत आहोत. त्यांच्यातच आम्हाला बघा. त्यांना जिवाची पर्वा न करता कामाला उद्युक्त करणारी ती अदृश्य प्रेरणा, शक्ति आम्हीच आहोत. निःसंशय त्यांना तथा त्यांच्या कुटुंबीयांना काहीही होणार नाही याची आम्ही ग्वाही देतो. त्याग फार मोठा असतो देवी, जिंकायचे असेल तर त्याग हा करावा लागतोच लागतो. जेवढा असीम त्याग तेवढी जास्त विजयाची चव चाखयला मिळते. विचार करा जेव्हा हे योद्धे महामारी संपल्यावर घरी जातील तेव्हा त्यांच्या कुटुंबात किती आनंद होईल. त्या आनंदाला वर्णन करण्याला काही सीमा आहेत काय?”

“माफी असावी देवा. आमच्या लक्षात नाही आलं ते.” बाणाईं जरा खालच्या आवाजात म्हणल्या.

मग काही वेळ कुणीच काहीच बोलले नाही. आकाशाचा रंग आता फक्त आकाशी राहिला नव्हता. त्या लालबुंद तेजाच्या गोळ्याच्या अवतीभवती कितीतरी असंख्य रंगछटा उमटल्या होत्या. ते आकाश जणू एखाद्या जातिवंत चित्रकारचे चित्रच वाटत होते जणू. तिघेही स्तब्धपणे ते दृश्य पहात होते. कुणालाच काय बोलावे ते सुचत नव्हते.

“वारी हो वारी |

देई का गां मल्हारी ||

त्रिपुरीरी हरी |

तुझ्या वारीचा मी भिकारी ||”

“दरवर्षी ऐकू येणारे हे बोल देखील ऐकू येणार नाहीत देवी.” खंडोबा हसत म्हणाले.

“म्हणजे वैष्णव या वर्षी त्यांच्या माहेरी जाणार नाहीत?” म्हाळसा आश्चर्याने म्हणल्या.

“नाही.”

“बेलभंडार्‍याची मुक्तपणे उधळण करीत जेजूरी नागरी पादाक्रांत करणारे वारकरी या वर्षी बघण्याचे भाग्य नाही तर.” बाणाईं उदास होऊन गडावरुन दिसणार्‍या रस्त्याकडे बघत म्हणल्या. हा तोच रास्ता होता, ज्यावरून असंख्य वारकरी मार्ग क्रमत. आता हा रास्ता रिकामा दिसणार म्हणून नाराज होऊन बाणाईंनी तोंड वळवले. कडेपठारावरील मंदिराचा झेंडा उगाच वार्‍याने फडफडत होता. त्यावर दृष्टी केन्द्रित करून बाणाई म्हणल्या,

“मग आता या घरात बसलेल्या जनतेच काय देवा? त्याबद्दल काही उपदेश.”

“अवश्य देवी, केव्हाही चांगल्यातून वाईट शोधावे देवी. ही मानवजात परमार्थिक सुखाच्या मागे इतकी लागली आहे की त्यांना स्वतःचा विसर पडला आहे. जिथे स्वतःचा विसर पडला तिथे कुटुंब कुठून आठवणार. लहान-लहान बालकांना बाहेर ठेऊन ही जात स्वतःचे पोट भरते आणि ज्यासाठी कामावतात तो जीव मात्र यांच्या मायेपासुन अलिप्त रहातो, जेव्हा सगळ्यात जास्त गरज असते तेव्हा. मग यांच आयुष्य हे असच निघून जातं. जे बोलायचं ते राहून जातं. आज कितीतरी वर्षानी घरातील सर्व लोकं एकत्र जेवत असतील. या आनंदाची सर कशालाही करता येणार नाही. घरातील वडीलधार्‍यांशी कसे वागावे हे मूल्यसंस्कार आजची तरुण पिढी विसरत चालली आहे. मोठ्या व्यक्तींशी कसे बोलावे, कसे वागावे, हे आत्मसात करण्यासाठीच घरी बसावे लागले असे मी म्हटलो तर त्यात नवल वाटण्याचे मुळीच कारण नाही देवी.”

“धन्य आहे देवा तुमची. आपला एक - एक शब्द म्हणजे अमृतचा कण आहे. जीवनाला संजीवनी देत आहे. पण तरीही एक शंका मनात आहे. हे झाले सधन कुटुंबाचे, पण ज्यांचे पोट हातावर आहे, त्यांचे काय? त्यांना तर प्रत्येक दिवस काळ होऊन येत असेल. त्यांचे काय?” म्हाळसा.

“या भारतवर्षातील आर्थिक विषमता याला करणीभूत आहे देवी. पण घाबरण्याचे काही कारण नाही. सेवाभावी संस्था, दानशूर व्यक्ती यांच्या मदतीला आहेतच आहेत. सगळीकडे गरजूंना अन्न, धान्य, जीवनावश्यक वस्तूंचे वाटप सुरू आहे. या संस्थांना, व्यक्तींना या निस्सीमपणे केलेल्या दानाने अमाप असे पुण्य प्राप्त होणार आहे. एकवेळ मला अभिषेक केला नाही तरी चालेल, पण या गरजूंना मदत केल्यास त्यांनी दिलेला आशीर्वाद हा आम्ही दिलेल्या आशीर्वादपेक्षा कितीतरी पटींनी शक्तीशाली असतो. कारण या सृष्टीच्या चराचरात मीच असतो. फक्त तो बघण्याची दृष्टी मात्र प्रत्येकाची वेगळी असते. ही महामारी यावच्चन्द्रदिवाकरौ समस्त पृथ्वीवासीयांना एक चांगलाच धडा शिकवणार आहे. लग्नताली भरमसाठ उधळमाप थांबणार आहे. प्रदूषण कमी होऊन पृथ्वी परत एकदा मोकळा श्वास घेणार आहे. अजून बर्‍याच चांगल्या गोष्टी ही महामारी शिकवणार आहे आणि लक्षात ठेवा ही महामारी आहे त्यात समाधान मानून जगायला शिकवणार आहे. यानंतर मनुष्य प्राण्याला कळेलच की विज्ञानाने कीतीही प्रगती केली तरी निसर्गासमोर तो एक कळसूत्री बाहुलीच आहे आणि राहणार आहे.”

“खरं म्हणजे आम्हाला देखील खूप कंटाळा आला होता. असा मोकळा वेळ कधी मिळालाच नव्हता. रोज त्याच एका जागेवर बसून आलेल्या भक्ताचे म्हणणे ऐकून घ्यायचे आणि त्याला आशीर्वाद द्यायचा. हाच दिनक्रम वर्षानुवर्षे सुरूच होता. अगदी थकून गेलो होतो. त्यामुळे हा विश्राम. पण आता पुरे झाले, काही महिन्यांतच सर्वकाही सुरळीत होईल. भारतवर्ष पुन्हा एकदा वायुवेगाने आपली विजयी घोदौड सुरू ठेवेल. परत कधीच मागे वळून बघणार नाही. कधीही नाही......”

देवांचे असे बोलणे ऐकून म्हाळसा आणि बाणाई यांच्या चेहर्‍यावर संमिश्र भाव उमटले. डोळे विस्फरून त्या समोरील स्थितप्रज्ञ मूर्तीकडे एकटक बघू लागल्या. नव्हे, त्या विचारात पडल्या. आता ऐकले ते खरे की खोटे, देव म्हणतात की आम्हाला भक्तांची ओढ लागली आहे आणि इकडे म्हणतात की आम्ही कंटाळलो होते. नक्की खरे काय समजावे. मग हा अपरिमित संहार देवांच्या इच्छेने सुरू आहे काय? की देव हतबल झाले आहेत. नक्की काय सुरू आहे? त्या दोघांना असे गोंधळलेले बघून देव मोठयाने हसले आणि मंदिराकडे चालू लागले.......