Old age love - 2 books and stories free download online pdf in Marathi

वृद्धाश्रमातलं प्रेम - 2

भाग – २

सकाळची वेळ होती. साधारणतः नऊ वाजले होते. हवेत अजूनही बर्‍यापैकी गारवा जाणवत होता. इतक्यात पटांगणात एक इनोव्हा येऊन उभी राहिली. सगळ्यांचे लक्ष तिकडे वेधलं गेलं. अर्थातच त्या गाडीतून त्यांच्यामध्ये सामील व्हायला कुणीतरी आलं होतं. पुणे पासींगची गाडी होती. सामनसुद्धा भरपूर होता. महाजन, बर्वे वगैरे काका मंडळी दुरूनच गंमत बघत होती. गाडीचं मधलं दार उघडलं गेलं. त्यातून एक साधारणतः पासष्ट वगैरे वयाची महिला उतरली. पांढरे केस, कपाळावर गोंदलेल्याचा छोटासा हिरवा ठिपका भ्रुकुटीमध्यच्या अगदी थोडासा वर, हातात एक चांदीची अंगठी सोडली तर काहीही आभूषणं नव्हती. खोल गेलेले डोळे, पाठीला किंचितसा बाक कदाचित संसारगाडा ओढताना आलेला असावा असं चेहर्‍यावरून दिसत होतं. त्या गाडीतून ऊतरल्या आणि तिथंच उभ्या राहिल्या. ड्रायव्हर सीटने एक तरुण मुलगा उतरला. तोंडावळ्याने तो त्यांचाच मुलगा होता कुणीही सांगू शकत होतं. ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटवर एक स्त्री बसली होती. सगळ्यांत शेवटी ती उतरली.

त्यांना पाहून निवार्‍याचे मॅनेजर ऑफिस मधून बाहेर आले. त्या तरूणाशी हस्तांदोलन केले आणि मुलांना हाक मारून गाडीवरून समान उतरवायला लावले. मघाशी ड्रायव्हर सिटच्या बाजूला बसलेली स्त्री त्या तरुणाची बायको होती. कोणत्या बॅग उतरवायच्या हे ती त्या मुलांना सांगत होती. मॅनेजर त्या तरुणाला काही फॉरमॅलिटी पूर्ण करायला घेऊन गेले.

“जोशीबुवा, हे एवढं एका जणाचं समान असेल?” गंमत पहात असताना बर्वे काकांनी जोशींना विचारलं.

“काय माहिती बुवा, सांगणं कठीण आहे. पण हे एका जणाचं तर मुळीच वाटत नाही. तीन जणांचं नक्की असेल बहुतेक.” जोशींनी अंदाज लावला.

“बहुतेक काय म्हणताय जोशी, अहो हे एवढं समान एका वृद्धाश्रमात राहायला येणार्‍या व्यक्तिचं नाही हे कुणी शेंबडा मुलगासुद्धा सांगेल. अहो, ते दोघं म्हातारीला सोडून कुठेतरी शिफ्ट होणार आहेत. मला तरी असंचं वाटतंय. तुला काय वाटतं महाजन?” बर्वे काकांनी त्यांचं मत मांडलं.

पण महाजन काकांचे लक्ष नव्हतेच यांच्या बोलणायकडे. ते केव्हापासून त्या महिलेकडे बघत होते. जणू काही त्यांची ओळख असावी असं.

“प्राध्यापक महाशय, अहो तुमच्याशी बोलतोय आम्ही. कुठे हरवलात?” जोशी काकांच्या हाकेने महाजन काका भानावर आले.

“अं? मला म्हणताय का? काय झालं?” महाजन काकांना गोंधळल्यागत झालं.

“काही नाही, काय विचारात हरवलास रे? काही प्रॉब्लेम आहे का?” जोशीकाकांनी विचारलं.

“नाही रे. मी ते आपलं थोडं विचारात पडलो होतो. त्या बाईला कुठंतरी पहिल्यासारखं वाटतंय रे. सुधा असेल का ती? पण कॉलेजनंतर कधी बघितलं नहो रे. पदवी प्रदान समारंभाला सुद्धा आली नव्हती ती. कुठे गेली काय माहीत? आता असेल की नाही हेसुद्धा माहिती नाही. छे!!! दुसरी कुणीतरी असेल ती. सुधा तर नक्की नसेल.” महाजन काका त्यांच्याच तंद्रीत बोलत होते.

“ए बाबा, काय झालंय तुला? ताप वगैरे तर आला नाही ना. काय बडबड करतोयस केव्हाची? आणि ही सुधा कोण? आमच्या बोलण्याकडे काही लक्ष आहे की नाही तुझं?” बर्वेकाका महाजन काकांचे खांदे गदगदा हलवत म्हणाले.

“काही नाही रे बर्वे. सांगतो तुला नंतर”, असं म्हणून महाजन काकांनी विषयाला तात्पुरती तिलांजली दिली. मग परत समोर घडणारे दृश्य बघू लागले. समान जवळपास उतरवून झालं होतं. बर्वेकाकांचा अंदाज बरोबर होता. कारण फक्त तीन बॅग खाली उतरवल्या गेल्या होत्या. बाकीचा समान अजून वरंच होता आणि काही गाडीत होता अजून. मुलं समान घेऊन जायला लागली.

“आई, चल. ऑफिसमध्ये बोलावलंय तुला. काही ठिकाणी सह्या लागताहेत तुझ्या. तू पण चल गं.” असं म्हणून तो त्या दोघांना ऑफिसमध्ये घेऊन गेला. दोघांच्या मागून म्हातारी चालू लागली. बाकावर तिघं म्हातारे बसले होते. आसपास कुणीही नव्हते. पण तरीही ते तिघं शांतच बसून होते. अजून एका आईला तिच्या मुलाने नि“वार्‍यावर” सोडले होते. या गोष्टीची खंत त्यांना लागून राहिली होती. हॉस्पिटल आणि वृद्धाश्रम ही दोनंच ठिकाणं अशी आहेत जिथली संख्या कमी व्हावी असं प्रत्येकाला वाटतं. अगदी जो तिथले भोग भोगतोय त्यांनासुद्धा असंच वाटतं, हे दुःख आपल्या शत्रूला सुद्धा नको.

फॉरमॅलिटी वगैरे पूर्ण करून झाल्या. तिघं आणि त्यांच्यासोबत मॅनेजर असे चौघं ऑफिसच्या बाहेर आले. मॅनेजर त्या तरुण दांपत्याला आत्मविश्वासाने म्हणाले, “तुम्ही काही काळजी करू नका. काकू इथं आनंदात आणि सुरक्षित राहतील. आम्ही सर्वजण चोवीस तास इथेच असतो.”

तरुणाने त्याच्या आईच्या पाया पडल्या आणि म्हटला, “काळजी घे आणि काही लागलं तर लगेच फोन कर. मी लवकरात लवकर व्यवस्था करेल.”

“हो, सांगेन मी.” तिच्या डोळ्यातले अश्रु कसेतरी लपवत ती माऊली म्हणाली. तसं बघायला गेलं तर त्या आईला तिच्या मुलाची आणि सुनेची गरज होती. तिला ते दोघं हवे होते. पण तिचा मुलगा आणि सून भौतिक सुखाच्या मागे लागून मानसिक सुख न दिसण्याइतके आंधळे झाले होते.

नवर्‍याने पाया पडले म्हणून नाईलाजाने सुनाबाईला सुद्धा पाया पडावे लागले. मग तिसुद्धा बळेच वाकली.

“चल आई, येतो आम्ही. लवकर निघालो तर लवकर पोहोचू. काळजी घे.” असं म्हणून तो निघलासुद्धा. त्याच्या मागे सुनाबाईसुद्धा पतीधर्माचे पालन करत निघाली. दोघं गाडीजवळ आले. दर उघडण्याच्या आधी एकदा त्यांच्या आईकडे पहिलं, तिच्याकडे बघून हात हलवला आणि गाडीत बसले. पाठमोर्‍या जाणार्‍या गाडीकडे त्यांची आई बघतच राहिली. जसजशी गाडी पुढे जात होती तसं तिला डोळ्यातल्या खार्‍या पाण्यामुळे धूसर दिसू लागलं. धुराळा उडवत जाणार्‍या गाडीकडे बघत असताना गंगा यमुना वाहायला केव्हा सुरुवात झाली, हे तिचं तिलाच कळलं नाही.

“त्याने अभिनेता बनायला हवं. उत्तम नट होईल तो.” जोशीकाका महाजन काकांकडे बघत म्हणाले.

“कुणाची गोष्ट करतोयस तू?” महाजन काकांनी विचारलं.

“कुणाची काय, आता त्याच्या आईचे पाया पडून गेला ना, तो मुलगा. भारी अॅक्टिंग केली मुलाने. वृद्धाश्रमात सोडायला आलेल्या आईचे पाया पडून सांगत होता, काळजी घे म्हणे आणि सुनाबाई तर काय, नवर्‍यापेक्षा सरस नटी हो.” जोशीकाका चढया आवाजात बोलत होते.

त्यांचं बोलणं ऐकून महाजन काकांना थोडं अस्वस्थ झाल्यासारखं वाटलं. ते ऑफिसच्या समोर उभं असलेल्या महिलेला न्याहाळत म्हणाले, “जोशी, कधीची कंटाळली असेल ती या दोघांना. त्यामुळे खर्‍या अर्थाने आज तिची सुटका झाली असं म्हटलं तर त्यात काही विशेष नाही. नीट बघ तिच्या डोळ्यांत. खूप त्रास दिलेला वाटतोय म्हातारीला दोघांनी. डोळ्यांत आधीसारखं तेज राहिलं नाही रे आता.”

जोशी आणि बर्वेकाका महाजन काकांच बोलणं ऐकून खूप आश्चर्यचकित झाले. आ वासून महाजन काकांकडे दोघं पाहू लागले.

“महाजन, अरे बोलतोयस तरी काय? तुला काही भान आहे का? अरे, फक्त पंधरा मिनिटं झाले फक्त या कुटुंबाला बघून आणि तू काय सांगतोस सुटका झाली वगैरे? तुला काय माहिती त्यांच्या घरात काय झालं? की तू आधीपासून ओळखतोस या कुटुंबाला? महाजन बोल काहीतरी. मघाशीसुद्धा काहीतरी सुधा वगैरे म्हणत होतास. तू ओळखतो का यांना?” जोशीकाका कोंडी फोडत म्हणाले.

“अरे बाबांनो, ही बाई माझ्या ओळखीची वाटतेय. म्हणजे कॉलेजला असताना माझ्या वर्गात एक मुलगी होती सुधा नावाची. ही बाई सुधा तर नाही ना अशी शंका माझ्या मनात येतेय केव्हाची. आम्ही एकाच वर्गात होतो. नंतर ती अचानक गायब झाली ती कधीही न दिसण्यासाठी. मग आज या महिलेला बघून सुधाची आठवण झाली आणि तिच्या कुटुंबाबद्दल म्हणशील तर लोकांच्या डोळ्यात दिसतं रे सगळं. त्या मुलाचे आणि त्याच्या बायकोचे डोळे बघितले होतेस का? काहीही भाव नव्हता त्यांच्यात. अगदी निर्विकार आणि शुष्क होते ते आणि त्यांच्या आईचे डोळे, त्यात तर अजून भावनेचा ओलावा आहे.” महाजन काका एकदमच त्यांच्या मनातलं बोलून गेले. मग तिघं एकमेकांकडे बघत शांत बसले. त्यांच्या नाश्त्याची वेळ होत आली होती, मग निघाले ते हळूहळू.

†††