Vruddhashramtal Prem - 1 books and stories free download online pdf in Marathi

वृद्धाश्रमातलं प्रेम - 1

The Love story in Second Innings.....

भाग – १

“हो, काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही या रविवारी आणि रविवारी नाही जमलं तर सोमवारी या. आठवड्याचे सर्व दिवस आम्ही हजर असतो. त्यामुळे निश्चिंत रहा.” नेटवर्क प्रॉब्लेम असल्याने ‘निवारा’ वृद्धाश्रमाचे मॅनेजर बाहेर पटांगणात येऊन बोलत होते. ‘निवारा ओल्ड केयर’ हा मुंबई-पुणे हाय वे च्या मध्ये कुठेतरी निसर्गरम्य वातावरणात उभारलेला वृद्धाश्रम होता. भलेमोठे पटांगण, समोर ऑफिस, ऑफिसच्या एका बाजूला किचन, वाचनालय वगैरे होते आणि दुसर्‍या बाजूला कॉमन हॉल. तिथं टीव्ही वगैरे होता, पण आयुष्याच रस्ता असा संपत आलेला असताना यांच कशात मन लागणार होतं? असो, शिवाय ऑफिसवर वृद्ध कपल्स साठी सोय, पटांगणाच्या एका बाजूला वृद्ध स्त्रिया आणि दुसर्‍या बाजूला वृद्ध पुरुषांची सोय होती. पटांगणाच्या मधोमध एक मंदिर होते. तिथे रोज सायंकाळी प्रार्थना व्हायची. पटांगणाच्या आवारात भरपूर झाडे वगैरे लावली होती आणि तिथेच बसायला बाकं होती. महिन्याभारत एखादं म्हातारं व्यक्ती हमखास यायचं. आता तिथल्या व्यक्तींची संख्या सुमारे पन्नास झाली होती.

पन्नास जणांचे एक मोठे कुटुंब होते ते. ज्यांच्यामुळे कुटुंब तयार झाले होते, त्यांना आता कुटुंबात ठेवत नव्हते. म्हणून हे मोठे कुटुंब वगैरे.

“चला, अजून कुणी तरी आपल्या पालकांची सोय लावली वाटतं.” मॅनेजरचं बोलणं ऐकून महाजन काका खाली आलेला चश्मा परत नाकावर चढवत म्हणाले.

“सोय कशाला, जड झाले असतील त्यांना त्यांचे जन्मदाते. जसे आपण झालोत.” बर्वेकाका महाजन काकांकडे पाहत म्हणाले.

“तू म्हणतोस तेसुद्धा काही खोटं नाही म्हणा.” महाजन काका म्हणाले.

“मग, नाहीतर काय. मी कधीच खोटं बोलत नाही. स्पष्ट बोलतो. म्हातारा असलो तरी. खरे दात पडून कवळी आली म्हणून माझी वाचा बदलेल की काय? अरे महाजना, मला माहितीये माझ्या मुलाला मी जड झालो म्हणून त्याने मला इथं आणून सोडलं आणि कारण काय दिलं मूर्खाने तर निसर्गाच्या सानिध्यात रहायला मिळेल म्हणे. कशाचा निसर्ग आणि कशाचे काय?” बर्वेकाका तावातावाने बोलत होते.

“बर्वे, ठीक आहे. अरे बाबा, इथली सगळी मंडळी तशीच. माझ्या म्हणण्याप्रमाणे सोय लावलेली किंवा तुझ्या म्हणण्याप्रमाणे जड झालेली. पण आता किती दिवस तू हे शल्य स्वतःच्या मनाला लावून घेणार आहेस? सहा महीने झाले तुला इथे येऊन. पण तू रोज तुझ्या मुलाचं नाव काढल्याखेरीज राहत नाहीस आणि म्हणतोस मी विसरलो त्याला. मला बघ, एक वर्ष झालं इथं येऊन. मी काढली का कधी आठवण माझ्या मुलाची. माझी परिस्थिती काही वेगळी नाही.” महाजन काका समजावणीच्या सुरात सांगत होते.

“चला, सहा वाजलेत. प्रार्थनेची वेळ झाली. येताय ना मंदिरात?” अण्णांच्या प्रश्नाने बर्वे काकांनी घड्याळात बघितले आणि म्हणाले, “अरे, सहा वाजले पण. चला.”

ते तिघं हळूहळू मंदिराच्या दिशेने जाऊ लागले.

महाजन काका एक रिटायर्ड प्राध्यापक होते. त्यांना वृद्धाश्रमात येऊन एक वर्ष झाले होते. सहा वर्षापूर्वी त्यांच्या पत्नीचे निधन झाले होते. त्यांचा एकुलता एक मुलगा विनय हा एक आयटी इंजिनीअर होता. अमेरिकेत मोठ्या कंपनीत मोठ्या हुद्दयावर होता. शिक्षण झाल्यावर काही वर्ष म्हणून लग्नाआधी तो तिकडे गेला तो कायमचाच. लग्नसुद्धा तिकडेच एका भारतीय वंशाच्या मुलीशी केले मग. दोन-तीन वर्षानी एखादी भेट द्यायचा भारतात. मग हळूहळू भेटी आणि फोन कमी होत गेले. मग ते बंद केव्हा झाले हे कळलं देखील नाही. घरात महाजन काका-काकू असे दोघंच रहात. घर कसलं? एक मोठा बंगला होता तो. घरात कामाला नोकरचाकर होते. पण घरात घरातले माणसंच नसतील तर बोलणार कुणाशी? भिंतींशी? भिंतींना कान असतात म्हणे, पण नुसतं ऐकून काय उपयोग? बोलणारं कुणीतरी हवं ना...

नोकरीच्या काळात आपण पैशांच्या मागे धावलो आणि आता मोकळा वेळ आहे तर बोलायला कुणी नाही. याची खंत त्यांना लागून असायची. महाजन काकूंची तब्येत अचानक बिघडली आणि हृदयविकरच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. आधीच एकटे असलेले महाजन काका अजून एकटे पडले. पंधरा दिवसांनी एक फोन आला होता विनयचा. कामात व्यस्त असल्याने येऊ शकलो नाही असं म्हणाला तेव्हा इकडे महाजन काकांच्या डोळ्यातून अश्रु सुरू झाले होते. दिवसभर महाजन काका पुस्तकं वाचत बसत. करण्यासारखं असं काही उरलंच नव्हतं आता आयुष्यात. ऐन वेळी जिची साथ हवी होती ती अचानक सोडून गेल्याने ते मायामोहाच्या गिल्मिशांपासून हळू हळू दूर जात होते. पण जसं जन्म घेणं आपल्या हातात नसतं तसंच मरणसुद्धा त्या विधात्याच्याच हातात असतं हे त्यांना कळून चुकलं होतं. जगण्याला पर्याय नव्हता. एकट्याने पाच वर्ष कसेबसे काढल्यावर त्यांना एकदमच कसेतरी होऊ लागले. मग त्यांनी झालेलं सर्व विसरून जाऊन एका नवीन आयुष्याची सुरुवात करायची ठरवली. सेकंड ईंनिंग सुरू होत असतानाच पार्टनर कायमचा रिटायर्ड हार्ट झाला होता. त्यामुळे त्यांनी वृद्धाश्रमात जाण्याचा निर्णय घेतला होता.

बर्वे काकांची गोष्टसुद्धा काही निराळी नव्हती. त्यांचा मुलगा मुंबईत नावाजलेला सर्जन होता. मुंबईला खूप प्रदूषित वातावरण आहे, इथं तुम्हाला त्रास होईल. त्यामुळे तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात राहायला हवं. हे मोकळं आणि सुटसुटीत कारण देऊन त्याने त्याच्या जन्मदात्यांना वृद्धाश्रमात हाकललं होतं. जे घर घेण्यासाठी गावातलं चांगलं घर विकलं होतं त्याच घरातून आता त्यांना बाहेर काढलं होतं. एका आलीशान गाडीतून त्यांचा मुलगा, सुनबाई आणि नातू त्यांना सोडायला आले होते. बर्वे काकू नेहमी म्हणत, “मी तुम्हाला संगत होते. गावी घर असलेलं कधीही चांगलं. पण तुम्ही ऐकलं नाही.” इथं बर्वेकाका निरुत्तर व्हायचे.

महाजन काका, बर्वे दाम्पत्य आणि तिथं असलेल्या सर्वांच्या जवळपास सारख्याच कहाण्या होत्या. आयुष्याची सेकंड ईनिंग अशा प्रकारे व्यतीत करावी लागेल असा कधी त्यांच्यापैकी कुणीच विचार केला नसेल.

प्रार्थना झाली आणि सर्वजण परत पटांगणात जाऊ लागले. आज वांग्याच्या भरताचा बेत असल्याने जोशीकाकांच्या आनंदाला उधाण आले होते. मूळ जळगावचे असलेले जोशीकाका नोकरीसाठी म्हणून नाशिकला स्थायिक झाले आणि मग एकुलत्या एक मुलीने तिच्या घरात राहायला स्पष्टपणे नकार दिला मग सपत्नीक आले ते ‘निवार्‍या’त. पटांगणाच्या एका बाजूला वांगी भाजण्याचे काम सुरू होते. तिथे सर्व मंडळी बसली. थंडीचे दिवस असल्याने सात वाजताच काळोख पडायला सुरुवात झाली होती. आयुष्याच्या सायंकाळी काळोख अनुभवणारी मंडळी वांगी भाजता-भाजता गप्पा मारत बसली होती.

“काय रे जोशी? आज तर मजा आहे राव तुझी. तू तर काय भरीत असल्यावर एकदम शेफ होऊन जातोस.” महाजन काका जोशींना चिडवत म्हणाले.

“हो तर, अरे भाई मी भरीत स्पेशलिस्ट आहे तुला माहीती नाही का ?” जोशीकाका भाजलेलं वांगं विस्तवाच्या बाहेर काढत म्हणाले.

“तो तर आहेस रे तू, मला सांग घरी असताना कोण बनवायचं रे भरीत? म्हणजे तू, की वाहिनी?” बर्वेकाका चेष्टेच्या सुरात म्हणाले.

“हीच बनवायची रे. मृणालिनी सासरी गेली आणि तिने असं केल्यापासून हिने हाय खाल्ली आणि तेव्हापासून किचन मध्ये मी इंटरेस्ट घेतला. काहीतरी विरुंगळा लागतो रे आयुष्यात, नाहीतर मग कधी कल्पना न केलेली संकटं आली तर आमच्या हिच्यासारखं होतं. वाटलं नव्हतं रे जिला इतकं जपलं लहानपणापासून ती आम्हाला असं करेल.” जोशीकाका बोलताना फार गंभीर झाले.

“जाऊ देत. आता विसरायचंय ना सगळं? तू ते वांगे बघ बरं झाले का? जाम भूक लागलीये रे आज. त्यात भरीत म्हणजे कळस.” महाजन काकांनी विषय बदलण्याच्या उद्देशाने गप्पांची गाडी दुसरीकडे वळवली.

रात्री मस्तपैकी भरीत पुरी खाऊन आडवे झाले. तसं बघायला गेलं तर सर्वजण एक मुक्त जीवन जगत होते. पण त्या जगण्याला कुठेतरी चिंतेची कीड लागली होती. सर्वांच्या काळजात कुठेतरी भग्न अशा स्वप्नांची तुटलेली तार होती. तीच त्यांना हळूहळू पोखरत होती. वरकरणी सर्वजण आनंदी आहोत असं भासवत असले तरी सर्वजण एकाच दुःखात होते. अवघड जागेवरच्या दुखण्यासारखे, सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही.

†††