Victims- 2 in Marathi Adventure Stories by Amita a. Salvi books and stories PDF | बळी- २

बळी- २

बळी - २
मीराताईंच्या आग्रहास्तव केदार रंजनाला बघायला काटेगावला गेला खरा; पण त्याने मीराताईंना स्पष्ट शब्दांत सांगून ठेवलं होतं,
" मला जर पसंत नसेल, तर नकार द्यायचा-- माझ्यावर दबाव आणायचा नाही" मीराताईंनीही त्याची अट कबूल केली होती; पण रंंजनाचं सौदर्यं पाहिल्यावर केदारचा विरोध मावळला. तो मनापासून तिच्याशी लग्न करायला तयार झाला. रंजना होतीच तशी लाखात एक देखणी!
लग्न ठरल्यावर काही दिवसांतच श्रीपतरावानी थाटामाटात त्यांचं लग्न लावून दिलं. लग्नात त्यांनी पाण्यासारखा पैसा खर्च केला. लग्न काटेगावात झालं. गावच्या पद्धतीने चार दिवस लग्नविधी झाले! लग्नाला मोठमोठे राजकारणी आणि उद्योगपती आले होते. रंजना तर दृष्ट लागण्याएवढी सुंदर दिसत होती. तिच्या चेह-यावरून केदारची नजर हटत नव्हती. हे सगळं पाहून आपण या लग्नाची घाई केली ते योग्यच केलं, या समाधानात मीराताई होत्या.
लग्न झालं; आणि दुस-याच दिवशी लग्नाचं व-हाड मुंबईला परतलं. आता त्यांचं लग्न होऊन आठवडा झाला होता. घरात केदारची आई, भाऊ नकुल आणि बहीण कीर्ती इतकी सगळी माणसं होती! नकुल आणि कीर्ती रंजनाची समवयस्क होती; घरातलं वातावरण खेळीमेळीचं होतं; पण रंजना घरातील सगळ्या माणसांशी जाणीवपूर्वक ठराविक अंतर ठेऊन वागत होती! विशेष कोणाशी बोलत नव्हती. ती कुणाशी वाईट वागत होती असं नव्हतं; पण स्वतःच्याच विचारात गुरफटलेली असे! केदार जवळपास दिसला तरीही ती घाबरल्यासारखी होत असे! कोणी काही विचारलं, तर जेवढ्यास तेवढं उत्तर तिच्याकडून मिळत होतं. न राहवून केदारने तिला आज समज दिली होती.
जोडीने कुलदेवतेचं दर्शन घेण्याआधी सहजीवनाला सुरुवात करायची नाही; ही परंपरा तिच्या आईने सांगितली आहे; असं तिने मुंबईला घरी येताच मीराताईंना सांगून टाकलं होतं. मीराताईंनी तिच्या श्रद्धेवर विश्वास दाखवून तिची झोपण्याची व्यवस्था सध्या कीर्तीच्या खोलीत केली होती. चार दिवसांनी केदारच्या गावी कुलदेवतेच्या दर्शनासाठी जायचं होतं. तिथे कुलपरंपरेप्रमाणे गोंधळ - जागर करायचा होता. त्यानंतर केदार रंजनाला घेऊन हनीमूनसाठी महाबळेश्वरला जाणार होता. तिकडे एका आठवड्यासाठी हाॅटेलचं बुकिंग झालेलं होतं.
" असं जरी असलं; तरीही निदान एकमेकांशी गप्पा मारायला, एकमेकांना जाणून घ्यायला काय हरकत आहे? त्याशिवाय मनं जुळणारा कशी? रंजना तर बोलणं सोडा; माझ्याकडे बघतही नाही -- माझ्या आसपासही फिरकत नाही!" केदार मनातल्या मनात चरफडत असे. कधी कधी त्याच्या मनात संशयाचं भूत डोकावू लागत असे ---मनात उलट-सुलट सुलट विचारांचं वादळ उठत असे. -- "तिच्या मनाविरूध्द तर लग्न झालं नसेल? लग्नापूर्वी तिला विचारायला हवं होतं! माझ्याकडून मोठी चूक झाली--- " तो स्वतःलाच दोष देत असे.
रंजनाला घरात जुळवून घ्यायला वेळ द्यायला हवा; हे केदारला मान्य होतं पण तिला आपल्याविषयी जराही ओढ वाटत नाही; हे बघून त्याचा अहंकार दुखावला जात होता. कुठे तरी काही तरी चुकतंय; असं त्याला अशी शंका त्याच्या मनात डोकावत होती! पण काही दिवस तिच्या कलाने घ्यायचं; असं त्याने ठरवलं होतं.
"आज मात्र तिचा मूड चांगला दिसतोय! माहेर खूप लांबच्या गावात आहे; आणि गावच्या वातावरणातील संस्कार आहेत, त्यामुळे ती मुंबईत थोडी बावरली असावी! मी उगाच शंका घेत होतो! ती हळू हळू रुळेल!" केदार मनातून सुखावला होता.
*********
केदारने ऐकलं होतं , बायका तयार व्हायला एवढा वेळ घेतात; कि तासभर उशिराच घरातून बाहेर पडतात; पण रंजना पाचच्या ऐवजी साडेचारलाच तयार झाली, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर हसू आलं. "हिला मोकळ्या हवेची सवय आहे --- घराच्या चार भिंतींमधून बाहेर पडायला ही किती उतावीळ झालीय!" तो मनाशी म्हणाला.
त्याची बहीण कीर्ती वहिनीला तयार व्हायला दुपारपासून मदत करत होती. अनेक दिवसांनी वहिनीला खुश बघून तिलाही आनंद झाला होता. सुंदर साडी आणि हलक्या मेक-अप मध्ये रंजना आज खूपच आकर्षक दिसत होती. मुंबईला आल्यापासून तिच्यात कधी न दिसलेला उत्साह आज पहायला मिळत होता.चेह-यावर मोहक हास्य होते --- केदारला तर तिच्याकडे पहातच रहावं असं वाटत होतं!
"आपण लगेच निघायचं नं?" रंजनाने त्याच्याकडे तिरक्या नजरेने बघत हसत विचारलं; आपल्या रूपाचा गर्व तिच्या नजरेत स्पष्ट दिसत होता. केदार भानावर आला.
"हो! चल! मी तयारच आहे! आई! आम्ही येतो गं!" स्वयंपाकघराच्या दरवजात उभं राहून मुलाकडे आणि सुनेकडे कौतुकाने पहाणा-या मीराताईंना तो म्हणाला.
"सावकाश या! तिच्याकडे जायला तुम्हाला थोडा उशीरच होणार आहे-- छान गप्पा मारा--- निघायची घाई करू नका!" मीराताई तृप्त नजरेने त्या देखण्या जोडीकडे पहात म्हणाल्या.
त्यांना निरोप द्यायला कीर्ती जिन्यापर्यंत आली होती. वहिनीशी जवळीक साधायची संधी आज अनेक दिवसांनी तिला मिळाली होती.
"वहिनी! एवढी मोठी बॅग कशासाठी घेतलीयस?" रंजनाच्या खांद्यावरच्या मोठ्या शोल्डर बॅगेकडे आश्चर्याने बघत कीर्ती उद्गारली.
कीर्तीचा प्रश्न ऐकून रंजनाचा चेहरा पडला; किर्तीकडे तिने नाराजीने बघितलं.
"ही बॅग---- " ती चाचरत शब्द शोधू लागली.
रंजनाला तिचा प्रश्न आवडला नाही, हे केदारने जाणलं, आणि तो म्हणाला,
"आम्ही रात्री तिच्या नेहाताईकडे जेवायला जाणार आहोत; तिला द्यायच्या वस्तू असतील!"
"होय! तिची कायद्याची पुस्तकं आहेत! ती एका महत्वाच्या केससाठी लग्नानंतर लगेच निघाली, आणि आईच्या लक्षात आल, की तिची पुस्तकं तिथेच राहिली आहेत-- तिने माझ्या बॅगेत टाकली! आज तिला देण्यासाठी घेतली आहेत! कोर्टात उभं रहाताना तिला रीफर करावी लागतात--- वेळेवर दिलेली बरी!" रंजनाने थोडं रागात उत्तर दिलं.
रंजनाची मोठी बहीण - नेहा मुंबई हायकोर्टात यशस्वी वकील होती. भाऊ मेकॅनिकल इंजिनियर होता. पुण्याला एका मोठ्या आॅटोमोबाइल कंपनीमध्ये नोकरी करत होता; म्हणजेच श्रीपतरावांना शिक्षणाचे महत्त्व कळत होते. मग रंजनाचं शिक्षण अर्धवट का सुटलं असेल? --- हा प्रश्न अनेक वेळा मनात आला; तरीही त्याने रंजनाला काही विचारलं नव्हतं. वीस वर्षाच्या रंजनाची काॅलेजची दोन - तीन वर्षे तरी व्हायला हवी होती, पण रंजनाने एस. एस. सी. सुद्धा कसंबसं पास केलं होतं . "असं का असेल?" या प्रश्नचं उत्तर तो स्वतःच स्वतःला देत असे, "कदाचित् तिला शिक्षणाची गोडी नसेल--- मघाशी ज्या पद्धतीने सुसंगत बोलत होती; त्यावरून तिची बौद्धिक उंची कमी नाही! ती का शिकली नसेल? अभ्यासाची आवड नाही म्हणून ---- एखादं आजारपण --- की आणखी काही कारण असेल? ---- विचारू कधीतरी---!" केदारला आज तो विषय नको होता.
जिना उतरून दोघं रस्त्यावर गेली. केदारने घराच्या बाल्कनीकडे पाहिलं.
बंगल्याच्या बाल्कनीत उभी राहून कीर्ती दादा - वहिनींकडे डोळे भरून पहात होती.
"किती छान दिसतायत दोघे ! कोणाची नजर नको लागायला!" त्यांना हात करत ती मनाशी म्हणाली.
*********
घराबाहेर आल्यावर केदार म्हणाला,
"जवळच एक सुंदर गार्डन आहे. तिथल्या कॅफेमध्ये काॅफी छान मिळते! आपण थोडा वेळ गार्डनमध्ये फिरूया--- काॅफी पिऊन मग थिएटरला जाऊया! नाहीतरी आपण खूप लवकर निघालो आहोत!" बोलता बोलता त्याने रंजनाकडे पाहिलं; पण रंजना केदारकडे पाठ करून मोबाइलवर हळू आवाजात कोणाशी तरी बोलत होती.
"आम्ही निघालोय---- तू सांगितल्याप्रमाणे साडेचारला--- तिकडे यायला थोडा वेळ लागेल---- एका काॅफी - शाॅपमध्ये जातोय! ---- काळजी करू नकोस---- एका तासाच्या आतच येऊ! काय? आताच यायला हवं? आताच बरं पडेल? रात्री ट्रॅफिक जास्त असतो?---रस्त्यावर गर्दी असते? ठीक आहे! तू म्हणशील तसं---!" तिने फोन बंद केला ; पण तिच्या चेह-यावर ताण स्पष्ट दिसत होता.
ती केदारबरोबर होती, पण आताही ती कुठेतरी हरवलेली होती! ती केदारची नजर चुकवत होती.
"खरं म्हणजे रंजनाच्या म्हणण्याप्रमाणे आज सगळं ठरलं आहे! तरीही ती कसल्या तणावाखाली वावरतेय? की तिचा स्वभावच असा आहे? ती इतकी सुंदर आहे, पण जर स्वभाव असा असेल, तर माझी वाट लागली असंच म्हणावं लागेल! हिचे मूड सांभाळण्यातच आयुष्य घालवावं लागणार बहुतेक! ---"
केदारने रंगवलेलं सुखी संसाराचं चित्र --- आणि प्रत्यक्षातलं वैवाहिक जीवन यांमध्ये जमीन अस्मानाचं अंतर होतं.
******* contd. - part 3.

Rate & Review

Gautam pawar

Gautam pawar 2 years ago

Arun Salvi

Arun Salvi 2 years ago

Shradha Deokar

Shradha Deokar 2 years ago