Victims - 9 books and stories free download online pdf in Marathi

बळी - ९

बळी - ९
पत्नीच्या आग्रहाखातर मोठी जोखीम घेऊन डाॅक्टर पटेलनी एका अनोळखी व्यक्तीला रात्री हाॅस्पिटलमध्ये अॅडमिट करून घेतलं होतं! तो पेशंट शुद्धीवर आला, हे कळल्यावर ते एका माणसाचा जीव वाचवल्याच्या समाधानात होते; पण तो विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे देत नाही; आणि गोंधळून इकडे -तिकडे बघतोय; असा रिपोर्ट डाॅक्टर प्रकाशकडून मिळालाl; आणि त्यांच्या आनंदावर विरजण पडलं. त्यांचा चेहरा गंभीर झाला.
"तो जागा झाला, की त्याला चहा - नाष्ता द्या आणि मला निरोप पाठवा--- मी त्याला तपासायला येतो!" ते म्हणाले.
प्रमिलाबेन क्लिनिकमध्ये देखरेख करण्याच्या निमित्ताने केबिनमधून बाहेर पडल्या. हा‌ॅस्पिटलच्या व्यवस्थापनाचं काम त्या बघत असत; पण डाॅक्टरना खात्री होती, की हळव्या मनाच्या प्रमिलाबेन आज नक्कीच त्या पेशंटजवळ जाऊन बसणार होत्या.
काही वेळाने वार्डबाॅय डाॅक्टरांच्या केबिनमध्ये आला.
"मॅडमनी तुम्हाला बोलावलंय! पेशंट उठला आहे, पण खूप अपसेट आहे; काही खात- पीत नाही-- मॅडम त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न करतायत - पण तो काहीच ऐकत नाही!" तो सांगू लागला.
डाॅक्टर पेशंट उठायचीच वाट बघत होते. ते केदारजवळ गेले. केदारच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले,
" काळजी करू नकोस! आता तू ठीक आहेस! काल बेशुद्ध अवस्थेत आम्ही तुला वरळी सी फेसवरून इथे घेऊन आलो. नशीब बलवत्तर, म्हणून तुझा जीव वाचला! तू इथे सुरक्षित आहेस! "
"तुमचा मी आभारी आहे; डाॅक्टर!"" केदारने मनापासून आभार मानले.
" पण एवढ्या रात्री तू समुद्रात एकटाच कशासाठी गेला होतास? तुला ज्यांनी वाचवलं; ते म्हणाले की तू खूप थकला होतास आणि त्यांना मदतीसाठी हात करत होतास, म्हणजेच तू खूप वेळ पोहत होतास आणि तो आत्महत्येचा प्रयत्न नव्हता; हे मी ओळखलं! पण नक्की काय झालं होतं?"
" मला काही माहीत नाही! मघाशी पोलिसही हेच प्रश्न विचारत होते; पण मी आठवण्याचा प्रयत्न केला; तर माझं डोकं दुखू लागलं---ग्लानी आली --- ! डोळ्यांसमोर काळोख पसरला --- मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं नाही देऊ शकत!" केदार हताश होऊन बोलत होता.
" तू जास्त ताण घेऊ नको! पण तुझं नाव काय? रहातोस कुठे? हे तरी सांग! तुझ्या माणसांना तुझ्याविषयी कळवायला हवं! ते एव्हाना खूप टेंशनमध्ये असतील! तुला शोधत असतील! " डाॅक्टरांच्या या प्रश्नावरही पेशंटकडून काहीच उत्तर मिळालं नाही. तो फक्त त्यांच्याकडे हताश नजरेने बघत होता. त्याच्या चेह-यावर अलिप्तपणा होता--- जणू काही त्याला आजूबाजूला काय चाललंय --- काही कळत नव्हतं!
आता आपली शंका खरी ठरतेय, याची डाॅक्टरना खात्री पटू लागली. ते केदारला ऐकू जाणार नाही, अशा हलक्या आवाजात पत्नीकडे पहात पुटपुटले ,
"डोक्याला मार लागल्यामुळे याचा स्मृतीभ्रंश तर झाला नाही?"
त्यांची भीती खरी होती! केदार त्याची स्मृती गमावून बसला होता!
*********
सिनेमाला जाण्यासाठी घराबाहेर पडलेली रंजना रात्र झाली; तरीही अजून ताईकडेच होती. लगेच येतो असं सांगून गेलेला केदार अजून आला नव्हता! हळूहळू रात्र वाढू लागली. सगळेच खूप काळजीत होते. तयार असलेलं जेवण जेवायचीही इच्छा कोणाला होत नव्हती. काय करावं कोणालाही सुचत नव्हतं.
"अगं रंजना! खाऊवाचून काही अडलं होतं का? कशाला त्याला एकट्याला पाठवलंस? तुमचा सिनेमाचा कार्यक्रम ठरला होता नं? सिनेमा बघून एकदमच आला असतात, तरी चाललं असतं! आता तुझ्या सासूबाईंना आपण काय सांगायचं?"
नेहा दीदी अस्वस्थ होऊन बडबडत होती! तिला या सर्व प्रकारामुळे उगाचच अपराधी वाटत होतं!
"तुला नेहमी माझीच चूक दिसते! केदारची काहीच चूक नाही का? अशा त-हेने मला एकटीला सोडून एवढा वेळ बाहेर रहाणं त्याला शोभतं का? त्याचा बेजबाबदारपणा तुम्हाला दिसत नाही?" रंजना चिडून म्हणाली.
शेवटी बराच वेळ झाल्यावर दीदीने तिला घरी फोन करायला लावला,
"केदार घरी आले आहेत का?" रंजनाने घाबरलेल्या स्वरात विचारलं. आता तिला घरातल्या लोकांच्या प्रश्नांना उत्तरं द्यावी लागणार होती. घरी गेल्यावर त्यांच्या नजरांचा सामना करावा लागणार होता! तिच्या छातीत कल्पनेनेच धडधडत होतं! मीराताईंचं केदारवर किती प्रेम आहे; हे तिला माहीत होतं. त्यांच्या नजरेला नजर द्यायची; म्हणजे तिची मोठी परीक्षा होती!.
रंजनाचा प्रश्न ऐकून मीराताईंच्या छातीत धस्स झालं,
"तुम्ही एकत्र गेला होतात नं? केदार एकटाच घरी कसा येईल? " त्यांनी गोंधळलेल्या स्वरात विचारलं. नक्की परिस्थिती जाणून घेण्यासाठी त्यांनी रंजनाला प्रश्न केला,
"आणि तू कुठे आहेस? " काहीतरी गडबड आहे हे त्यांच्या लक्षात आलं होतं.
"सिनेमाला वेळ होता, म्हणून आम्ही माझ्या ताईला भेटण्यासाठी आलो. टॅक्सीतून उतरल्यावर केदार म्हणाला; की "तू पुढे जा! मी मुलांसाठी खाऊ घेऊन पाच मिनिटात येतो;" पण तो अजूनही आला नाही! तो असा कसा वागू शकतो? मला काही सुचेनासं झालंय! मी काय करू आता?"
"तू कोणाला तरी बरोबर घेऊन घरी ये!" सोफ्यावर हताशपणे बसत शांताताईंनी फोन ठेवला. " कुठे असेल माझा केदार? तो इतका बेजबाबदार नाही! तो कुठल्या संकटात तर नसेल? देवा माझ्या केदारला सुखरूप ठेव! " त्या मनोमन प्रार्थना करू लागल्या.
थोड्या वेळाने बहिणीला आणि मेहुण्यांना घेऊन रंजना आली. ती सासूबाईंच्या गळ्यात पडून रडू लागली.
"मला म्हणाले, "तू ताईकडे जाऊन बस - मी पाच मिनिटात येतो!"--- काय झालं असेल? मी फोन करायचा प्रयत्न केला-- पण त्यांचा फोन बंद आहे." ती हुंदके देत सांगू लागली.
"पण तुम्ही सिनेमा बघायला गेला होतात नं? मधेच ताईकडे जायचं कसं ठरलं? तिच्याकडे तुम्ही रात्री जाणार होतात! अचानक् बेत कसा बदलला?" मीराताईंनी विचारलं.
"तेच म्हणाले; सिनेमा सुरू व्हायला वेळ आहे--- रस्त्यात तुझ्या ताईचं घर आहे! उन्हात फिरण्यापेक्षा सिनेमाची वेळ होईपर्यत ताईकडे जाऊया! नाहीतरी तुला माहेरची आठवण येत असेल!" ताईकडे जाण्यामागे आपला हात नाही-- तर ती केदारचीच इच्छा होती; हे रंजनाने लगेच स्पष्ट केलं. तिला केदारच्या कुटुंबाचा रोष स्वतःवर ओढवून घ्यायचा नव्हता! तिचा रडण्याचा अभिनय इतका उत्तम होता, की ती खोटं बोलतेय हे कोणाच्याही लक्षात आलं नाही. सगळ्यांनाच आता तिच्याविषयी सहानुभूती वाटत होती.
केदारच्या मित्रांना फोन लावून चौकशी केली--- जवळच्या नातेवाइकांकडेही फोन लावले गेले--- पण केदारविषयी कोणालाच काही माहिती नव्हती.
रात्र वाढत होती; पण केदारचा पत्ता नव्हता. शेवटी रंजनाचे मेहुणे म्हणाले,
"आपल्याला पोलीस कंप्लेंट करावी लागेल. या मुंबईत आपण त्याला कुठे- कुठे शोधणार? तू चल माझ्याबरोबर! पोलिसांना काही माहिती लागेल; आणि ती माहिती तूच सविस्तरपणे देऊ शकतेस!"
"माझे पाय गळून गेले आहेत! तिकडे येण्याचं त्राण माझ्यात नाही! आणि तुम्हाला मी जी माहिती दिली त्यापेक्षा जास्त मलाही काही माहीत नाही!" रंजना डोकं धरत म्हणाली. ती धक्कयाने पूर्णपणे ढासळून गेली आहे, हे पाहून मोहनराव नकुलला म्हणाले,
"ठीक आहे! नकुल तू चल माझ्याबरोबर!"
ते नकुलला बरोबर घेऊन पोलीस-स्टेशनला जायला निघाले, तेवढ्यात त्यांना आठवण झाली,
"केदारचा एखादा फोटो असेल; तर द्या --- पोलिसांना द्यावा लागेल." मोहनराव मीराताईंना म्हणाले.
"मी देते फोटो -- माझ्याकडे अगदी अलीकडचा फोटो आहे!" रंजना म्हणाली.
फोटो शोधण्यासाठी रंजना बेडरूममध्ये गेली; तिने कपाट उघडलं; चावी लावून डाॅव्हर उघडला आणि तिच्या तोंडून किंचाळी बाहेर पडली. ती मोठमोठ्याने सगळ्यांना हाका मारू लागली. सगळे धावतच तिच्याजवळ गेले.
तिने कपाटाच्या ड्राॅव्हरकडे बोट दाखवले. --- कपाटातील तिचे लग्नात सासर- माहेर, दोन्हीकडून घातलेले दागिने आणि बाबांनी पाठवणीच्या वेळी तिच्याकडे दिलेले पैसे कपाटातून गायब झाले होते.
"माझे दागिने आणि बाबांनी दिलेली रोकड रक्कम कुठे गेली? मी सगळं या ड्राॅव्हरमध्ये ठेवलं होतं! ड्राॅव्हर रिकामी कसा? हे सगळं काय चाललंय?" ती कपाटाच्या आधाराने कशीबशी उभी होती. विस्फारलेल्या नजरेने कपाटाकडे बघत होती. तिचा चेहरा पांढराफटक पडला होता.
तिला आधार देऊन कीर्ती हाॅलमध्ये घेऊन आली. सोफ्यावर बसण्याचीही ताकत आता रंजनाच्या अंगात राहिली नव्हती.ती उशीला टेकून डोळे बंद करून बसली होती. कीर्तीने तिला पाणी आणून दिलं. " वहिनी दागिने तू आणखी कुठे ठेवले असशील, जरा शोधून बघ! मला चांगलं आठवतंय ; तू आज दुपारी मॅचिंग कुड्या घातल्या होत्यास; तेव्हा तू दागिन्यांची पेटी ड्राॅव्हरमध्ये नीट ठेवली होतीस! नंतर जागा बदलली असशील! जरा शांतपणे आठवून बघ!"
"नाही कीर्तीताई! नंतर मी कपाट उघडलं नाही! "
पोलीस -स्टेशनला जायला निघालेले मोहनराव आणि नकुल आता थांबले होते. घटनेला काहीतरी नवीन वळण मिळत होतं.

******** contd. -- part. 10