Victims - 7 books and stories free download online pdf in Marathi

बळी - ७

बळी -- ७
दिनेश त्याच्या माणसांना सांगत होता,
"आपण किना-यापासून खूप आता- खोल पाण्यात आलोय! आपण ज्या कामासाठी इथपर्यत आलोय; ते पूर्ण करा--- म्हणजे आपण परत फिरायला मोकळे!"
बोटीवरचे लोक केदारपासून जरा मागे सरकले. केदारला इथपर्यंत कशासाठी अाणलं गेलं आहे, हे सगळ्यांनाच माहीत होतं; पण वेळ आली, तेव्हा सगळेच कचरायला लागले!! प्रत्येकाला वाटत होतं, की हे अमानुष कृत्य दुस-या कोणीतरी करावं! प्रत्येकजण दुस-याकडे बघत होता!
साथीदारांकडे बघत क्रूर हास्य करत दिनेश म्हणाला,
"आता एकमेकांकडे का बघताय? त्याला जलसमाधी द्यायची वेळ आलीय! आता वेळ घालवू नका--- रात्र वाढतेय! भीमा आणि संदीप -- याला उचला लवकर! "
नाइलाजास्तव दोघे पुढे आले ----
दुस-याच क्षणी केदारला उचलून समुद्रात फेकण्यात आलं. समुद्राचं पाणी उंच उडालं, आणि शांत झालं. केदार नक्की बुडाला आहे; याची खात्री करून घेण्यासाठी, थोडा वेळ कठड्यावर उभे राहून तो जिथे बुडाला; त्या जागेकडे सगळेजण बराच वेळ बघत होते; पण -- रात्रीची वेळ आणि फेसाळणा-या लाटांमुळे दूरवर पाण्याच्या पृष्ठभागावर येऊन तरंगणारा केदार त्यांना दिसला नाही. काही वेळ निरीक्षण करून सगळे आत गेले---- आणि लाँच परत फिरली. थोडा वेळ लाँचवरील वातावरण तंग होतं; पण काही वेळातच पार्टीविषयी गप्पा चालू झाल्या -- काहीजणांनी दारूच्या बाटल्या काढल्या, आणि तिथेच पार्टीला सुरूवात केली. सहलीला गेल्याप्रमाणे हास्यविनोद सुरू झाले.. काही वेळापूर्वी एका जिवंत माणसाला आपण खवळलेल्या समुद्राच्या हवाली केलं; हे विसरून जाण्याचा निष्फळ प्रयत्न ते करत होते.
********
केदार स्वीमिंग चँपियन होता. पोहण्याच्या स्पर्धांमध्ये त्याने अनेक बक्षिसे मिळवली होती; पण रात्रीच्या वेळी एकट्याने समुद्रात पोहण्याची वेळ कधी आली नव्हती. दूरपर्यंत अथांग समुद्र दिसत होता. लाटांच्या आवजाशिवाय कोणताही आवाज कानावर येत नव्हता. आजूबाजूला जिथे नजर जाईल, तिथपर्यंत फक्त समुद्राच्या फेसाळणा-या लाटा दिसत होत्या. केदारच्या मनावर खूप मोठं दडपण आलं होतं. तो नक्की कुठे आहे; आणि किनारा गाठण्यासाठी कुठल्या दिशेने गेलं पाहिजे हे कळायला मार्ग नव्हता; पण घाबरून चालणार नव्हतं. कितीही कठीण असलं तरी जीव जगवायचा असेल, तर हे आव्हान स्वीकारणं भाग होतं. घाबरून चालणार नव्हतं. चित्त शांत आणि स्थीर ठेवलं; तरच पुढचा मार्ग शोधणं शक्य होणार होतं.
केदारचं लक्ष आकाशाकडे गेलं! त्या दिवशी पौर्णिमा असावी. आकाशात पूर्ण चंद्र दिसत होता. केदारच्या मनात आशा जागृत झाली. "ती पूर्व दिशा आहे! मला त्या दिशेलाच किनारा मिळेल! शिवाय पौर्णिमेची रात्र असल्यामुळे उसळणा-या या भरतीच्या लाटा किनाऱ्याकडे झेपावत असणार! ह्या लाटा मला नक्कीच कुठल्या ना कुठल्या किना-याकडे घेऊन जातील!" तो समाधानानं हसला! त्याला त्याचा मार्ग सापडला होता.
"आणखी एक माझ्या फायद्याची गोष्ट आहे! भरतीच्या लाटा किना-याकडे मला अगदी सहज घेऊन जातील--- पोहत जाणं सोपं होणार आहे! जर ओहोटी असती, तर लाटांशी झुंज द्यावी लागली असती आणि आता तेवढी शक्ती माझ्यात नव्हती! " केदार मनोमन देवाचे आभार मानत होता.
केदारने सगळी शक्ती एकवटून लाटांबरोबर पोहायला सुरुवात केली. त्याच्या मानात आशा होती, की मासेमारीसाठी निघालेली एखादी बोट समुद्रात दिसली, तर आपल्याला चांगली मदत मिळेल!
जिवाच्या आकांताने केदार पोहत होता! बराच वेळ झाला; पण किनारा दृष्टिपथात येईना आणि मदत मिळण्याचीहि शक्यता दिसेना; तेव्हा मात्र केदार हताश झाला. किनारा किती लांब आहे, आणि आपण नक्की कुठे जाऊन पोहोचणार, हे त्याला माहीत नव्हतं. किनारा दिसेपर्यंत पोहत रहाणं -- एवढंच त्याच्या हातात होतं! दुपारनंतर काही खाणं तर दूर --- पाण्याचा घोटही त्याला मिळाला नव्हता. -- आजूबाजूला इतकं पाणी होतं, पण समुद्राचं खारं पाणी --- तो तहान भागवू शकत नव्हता! त्याला आता ग्लानी येऊ लागली होती. आपली दमछाक होतेय असं वाटू लागलं होतं! पण त्याने मनाचा निग्रह केला,
" मला आशा सोडून चालणार नाही. किनारा गाठण्यासाठी शक्य तितके प्रयत्न केलेच पाहिजेत. जीव वाचवायची ही मला मिळालेली शेवटची संधी आहे!" तो निर्धाराने स्वतःला समजावत होता!
केदारच्या प्रयत्नांना यश आलं. काही वेळातच त्याला दूरवर समुद्रावर मोठा पूल त्यावर धावणा-या गाड्या दिसू लागल्या.
"हा वांद्रे - वरळीचा सी - लिंक दिसतोय! इथून किनारा जवळ आहे! मी मुंबईतच परत आलो आहे! परमेश्वराचे आभार मानावेत तितके थोडेच आहेत." तो मनोमन खुश झाला होता! भरतीच्या लाटा त्याला परत त्याच्या मुंबईकडे घेऊन आल्या होत्या.
********
दूरवर उंच इमारतींमधील दिवे दिसू लागले! रात्री झगमगणारी मुंबई त्याला लांबून दिसत होती; पण अजूनही किनारा दूर होता; केदारच्या हातापायांची शक्ती संपत चालली होती; पण आपण योग्य दिशेने जात आहोत हे समाधान खूप मोठं होतं. तो मनाशी ठरवू लागला,
" सर्वप्रथम घरी फोन लावून मी सुखरूप आहे; हे सांगायचं! आई आणि रंजना- दोघीही खूप काळजी करत असतील. ---- टॅक्सीसाठी माझ्याकडे पैसे नाहीत, पण टॅक्सी करून घर गाठायचं, आणि तिथे पैसे त्याला द्यायचे! हे ओले कपडे समुद्राच्या वाळूत थोडी विश्रांती घेतली, की हवेने पाच मिनिटात सुकून जातील! एकदा किनारा गाठला, की सगळे प्रश्न सुटतील!"
केदार किन-यावर पोहोचल्यावर काय करायचं, हे ठरवत होता , पण अतिश्रमाने त्याच्या शरीरातली शक्ती हळू - हळू कमी होत होती!
केदार जिवाच्या आकांताने पाण्यात हात - पाय मारत होता पण आता तो मनातून घाबरला होता. "या थंड पाण्यामुळे पायात गोळा आला तर? अशक्तपणा खूप जाणवतोय--- मला चक्कर आली तर? पण हा शेवटचा परीक्षेचा क्षण आहे; आता कच खाऊन चालणार नाही! किनारा अगदी जवळ आहे! ज्याने परमेश्वराने इथपर्यत आणलं तोच पुढेही साथ देईल!" स्वतःच्या मनातील शंकांंवर स्वतःला स्वतःच धीर देत होता.
किनारा जवळ आल्याची खूण --- उंच कठडा दिसू लागला. समुद्रामध्ये किना-याच्या कोप-यावर बोटी बांधून ठेवलेल्या दिसत होत्या. लागून असलेल्या रस्त्यावर गाड्यांची मोठी रहदारी चालू होती. केदारच्या मनावरचं मोठं ओझं उतरलं होतं --- त्याने लक्ष्य गाठलं होतं ---- किना-यावर पोहोचला होता! तो बोटीच्या दिशेने जाऊ लागला. बोटीपासून हाकेच्या अंतरावर तो आला. त्याने देवाचे आभार मानले; कारण एका बोटीमध्ये दोन इसम बसलेले दिसत होते.
पण आता केदारच्या हातपायांनी काम करणं बंद केलं होतं! एवढ्या जवळचं अंतरही पार करता येईल; असं त्याला वाटत नव्हतं. त्याने मोठ्याने हाका मारण्याचा प्रयत्न केला, पण समुद्राच्या लाटांच्या घनगंभीर आवाजात त्याचा आवाज विरून जात होता. त्याने हात हलवून त्यांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. "जर त्यांचं लक्ष गेलं नाही; तर मात्र आता माझं काही खरं नाही!" तो मनाशी म्हणत होता. स्वतःला वाचवण्यासाठी एवढी धडपड केल्यावर आता मात्र त्याला निराशेने ग्रासलं होतं!
********
शाम आणि संदीप - दोघे तरूण रात्रीच्या शांत वेळी त्या छोट्या बोटीमध्ये बसून गप्पा मारत होते. दोघेही शाळेपासूनचे जिवलग मित्र! शामच्या वडिलांची ती बोट होती. दोघेही दिवसभर नोकरी करत आणि रात्री बोटीत बसून समुद्राची थंड हवा अंगावर घेत थोड्या इकडतिकडच्या गोष्टी करून दिवसभराचा श्रमपरिहार करत असत. हा त्यांचा रोजचा दिनक्रम होता.
"पौर्णिमेच्या रात्री समुद्राचं रूप काही वेगळंच असतं; बघ! असं वाटतंय की आपली बोट चांदीच्या रसावर डोलत आहे! आणि हवा किती छान सुटलीय! आकाशातल्या पूर्ण चंद्राची किरणं अंगावर पडली; की शरीराच्या रोमारोमाला नवचैतन्य मिळालंय असं वाटतं!" शाम संदीपला म्हणत होता.
" आज तरी पौर्णिमा आहे; पण अमावास्येच्या रात्रीही चमचमणा-या चांदण्याची शोभा न्यारीच असते! माणसांच्या अनेक पिढ्यांमधल्या भावभावनांचा - संघर्षाचा हा निसर्ग मूक साक्षीदार आहे! इथे येऊन थोडा वेळ बसलं; समुद्राचं हे अथांग रूप बघितलं; की दिवसभरातले माणसांमधले हेवेदावे क्षुल्लक वाटायला लागतात. मन शांत होतं! " संदीप म्हणाला.
सृष्टीचं ते भव्य - गंभीर रूप बघताना ते कविमनाचे दोघे मित्र भारावून गेले होते.
त्याच वेळी अचानक् शामचं लक्ष हात उंचावून मदत मागणा-या केदारकडे गेलं.
********* contd.--- part 8.