Dhadsi Khun books and stories free download online pdf in Marathi

धाडसी खून

धाडसी खून

बाबु गेल्या महिनाभरापासून महिपतीचा खुन कसा करायचा? याचा विचार करत होता. कारण त्याच्या बायकोने महिपतीमुळेच आत्महत्या केली आहे, हे त्याला चांगलच माहित होतं. आणी म्हणूनच त्यानं सगळं माहित असूनही महिपती सावकाराच्या शेतातलं काम अजूनही सोडलं नव्हतं. तो महिपतीचा काटा काढण्यासाठी योग्य वेळेची वाट पाहत होता.

आठ महिण्यांपुर्वीच आपल्या नवविवाहीत बायकोला सखुला घेवून तो आपल्या गावाकडे काम नसल्यामुळे आणी शेती नसल्यामुळे हिरापूरला आला होता. हिरापुरात महिपती सावकाराच्या शेतात त्यानं साल धरलं होतं. गरीबी असली तरी पोटा पाण्याचा प्रश्न मिटला होता. त्यामुळे दोघेही नवरा-बायको सुखात होते. दोघेही शेतात दिवसभर काबाडकष्ट करत होते. त्यांच्या मेहनतीला फळ आलं होतं. साऱ्या शिवारात महिपती सावकाराचं पिक जोमात आलं होतं.

पण काही दिवसांपासून महिपती सखुवर वाईट नजर ठेवून होता. त्याच्या नजरेवरूनच सखुनेही त्याचा वाईट हेतु ओळखला होता. ती त्याच्यापासून चार हात लांबच राहायची. ही गोष्ट नवऱ्याला सांगीतली, तर पुन्हा हे काम सोडावं लागेल आणी कामाच्या शोधात वणवण फिरावं लागेल,म्हणून ती शांत राहिली. पण तिनं शेजारच्या शेतात खोपीत एकटीच राहणाऱ्या छबुबाईला महिपतीच्या वाईट हेतु बद्दल सांगीतलं होतं. छबुबाई तिला लेकी सारखं धरत होती. ती तिला नेहमी धीर द्यायची. म्हणून सखुलाही तिचा आधार वाटायचा.

एके दिवशी महिपती सावकाराने बाबुला शेतीच्या वस्तु आणायला मुद्दामच शहरात पाठवलं.आणी चित्रपट बघून सावकाश ये म्हणून सांगीतलं. बाबु शहरात आला. त्यानं शेतीच्या आवश्यक असणाऱ्या वस्तु घेतल्या. आणी त्या वस्तु तेथेच दुकानात ठेवून जाताने नेतो, असे दुकानदाराला सांगून तो चित्रपट पहायला गेला. चित्रपट पाहताना सखुपण सोबत हवी होती. असं त्याला मनोमन वाटलं.

इकडे सखु जनावरांना पाणी पाजण्यासाठी विहीरीतून पाणी शेंदत होती. तेवढयात महिपती तिथे आला. त्याने जवळपास कोणीच नसल्याचा अंदाज घेतला. आता सावज चांगलच जाळयात गावलं होतं,तो मनोमन खुष झाला होता. सखुला त्याची चाहूल लागली. तिनं मागे वळून पाहिलं, तो अगदी एका हाताच्या अंतरावर उभा होता. त्याच्या डोळयात तिला वासना दिसली. तिचं काळीज धपापलं, अंग थरथरलं. तिनं त्याच्या पासून दूर जाण्याचा प्रयत्न केला. पण त्याने तिची वाट अडवली. आता ती खुप घाबरली. होती.

तरीही उसनं आवसान आणून ती त्याला म्हणाली, “जाऊ द्या मला, वाट सोडा माझी.”

महिपती रंगेल हसून बोलला,

“इतक्या दिवसापासून या मोक्याची वाट पाहतोय. आणी आता तुला तसंच कसं सोडु?”

आता आपलं काहीच खरं नाही, हे सखुनं ओळखलं. तिनं मोठयानं ओरडण्याचा प्रयत्न केला. पण त्यानं तिचं तोंड दाबून तिला ज्वारीच्या पिकात नेलं. पण सखुनं त्याच्या डोळयात माती फेकून तेथून पळ काढला. सावकार तिच्या मागेच पळाला. आता हा आपली अब्रु लुटल्याशिवाय राहणार नाही हे तिला कळून चुकलं. तिनं अब्रु वाचवण्यासाठी विहीरीमध्ये उडी मारली. सावकार पळता-पळता धडपडून खाली पडला. तेवढयात छबुबाई तिथे आली. म्हातारीला पाहताच महिपती सावकार तेथून पळून गेला. म्हातारी विहीरीकडे आली. तिने पाहिले, सखु वर-खाली होत होती. म्हातारी आधीच थकून गेली होती.तिच्यामध्ये काहीच आवसान राहिलं नव्हतं. तीची इच्छा असतानाही ती सखुला वाचवु शकली नाही. थोडयाच वेळात सखु तिच्या डोळयांदेखत पाण्यात बुडाली. थोडया वेळानं म्हातारीचा दहा वर्षाचा नातु तेथे आला. म्हातारीनं त्याला पटकन गावात पाठवलं.

थोडयाच वेळात विहीरीवर बाया-माणसांची चांगलीच गर्दी झाली. सखु चांगली पोरगी होती. सर्वांना मोकळया मनानं,हसून बोलायची.त्यामुळे बाया हळहळ व्यक्त करत होत्या. सखुनं आत्महत्या का केली ते छबु म्हातारी सोडून कोणालाच माहिती नव्हतं. सर्वांना वाटत होतं, पाणी शेंदतानाच ती पाय घसरून विहीरीत पडली असेल. छबु म्हातारीला सगळं माहित असून ती शांत बसली. कारण तिला माहित होतं, महिपतीच्या विरोधात बोलावं, तर तो आपल्याला जिवंत ठेवणार नाही. पुढं तो आपल्या लेकरा बाळांसोबतही वैर धरेल. त्यामुळे ती शांतच राहिली. पण आतून म्हातारी जीवाला खात होती. एके दिवशी तिनं न राहवून शांत राहून काम करण्याच्या अटीवर बाबुला घडलेली गोष्ट सांगीतली. तेव्हापासून बाबु महिपतीला संपवण्याची योजना आखत होता.

आज या घटनेला एक महिना झाला होता. तरी आपल्या बायकोचा खुनी जीवंत आहे, याची सल बाबुच्या मनात होती. बाबु त्याला समोरा-समोर मारु शकत नव्हता. कारण मारताना थोडी जरी चूक झाली, तरी बाबुचं मरण निश्चीत होतं. आज सावकार बुलेटवर एकटाच तालुक्याला गेल्याचं बाबुला कळालं होतं. तालुक्यात मामा मसणजोगी या गुंडाशी त्याचं संधान जुळलं होतं. मामा मसणजोगी राजकारण्यांना हाताशी धरून तालुक्यात गुंडागर्दी करत होता. आणी त्याच्या सोबतच सावकारानं दोन नंबर धंद्यात भागीदारी केली होती. म्हणून त्याच्या सद्या तालुक्याला बऱ्याच चकरा वाढल्या होत्या.

हिरापूर गाव डोंगराच्या कुशीत वसलेलं होतं. त्यामुळे गावात येण्यासाठी दहा फुटाचा वळणा-वळणाचा घाट रस्ता होता. आज काहीही करून सावकाराला संपवायचंच, असा निर्धार बाबुने केला होता. एका वळणावर गाडीचा वेग कमी होत होता. वरून डोक्यावर दगड डोक्यावर सोडून दिला की, सावकाराचं काम होणार होतं. त्या वळण रस्त्यावरील डोंगरावर बाबु भला मोठा दगड घेवून सावकाराची वाट पाहत थांबला होता. हिवाळयाचे दिवस असल्याने दिवस लगेच मावळला. बघता-बघता अंधार झाला. तरीही सावकार येईना, म्हणून बाबु जीवाला खाऊ लागला. तितक्यात बुलेटचा फटफट असा आवाज त्याच्या कानावर आला. एका वळणावर त्याला गाडीच्या हेडलाईटचा उजेड दिसला. तो आता सावध झाला. गाडी जवळ येऊ लागली तशी त्याची हदयाची धडधड वाढली. थोडी जरी चूक झाली, आणी सावकाराने आपल्याला पाहिलं तर आपण वाचणार नाही. हे त्याला पक्कं माहित होतं. गाडी जवळ आली. बाबुनं श्वास रोखून धरला. आणी हातात तो मोठा दगड उचलून तो सावध झाला. गाडी बरोबर त्याच्या टप्प्यात आली, त्यानं वरून दगड सोडून दिला. दगडाने आपलं काम बरोबर केलं होतं. गाडी रस्त्याच्या कडेला पडली होती. दगड घरंगळत जावून पुढे पडला होता. बाबुने इकडे-तिकडे पाहून अंदाज घेतला. कोणीच नाही याची खात्री झाल्यावर तो हळूच खाली उतरला. त्याने कालच चित्रपटात पाहिलं होतं. खून झालेलं हत्यार लपवायचं असतं. हे त्याला माहित होतं. त्याने आधीच दूर अंतरावर खड्डा खणून ठेवला होता. तेथे त्याने तो दगड पुरुन टाकला. गेल्या कित्येक दिवसापासून अस्थिर असलेलं त्याचं मन शांत झालं होतं.

तो शेतात येवून झोपला. घडलेल्या प्रकाराने त्याला झोप आली नाही. त्याला पोलीसांची भिती वाटु लागली होती. तो सकाळी दूध घालायला गावात आला. पाहतो तर काय? महिपती सावकार चावडीवर उभा आहे. त्याच्या बाजूला गर्दी जमली होती. मग रात्री आपण कोणाला मारले याचा त्याला बोध होईना. पण थोडयाच वेळात त्याला कळालं, रात्री मेलेला मामा मसणजोगीचा लहान भाऊ लाला मसणजोगी होता.

आता तर त्याचे हातपायच गळाले. कारण वैरी तसाच जीवंत होता उलट दुसऱ्याच खुनात पोलीस आपल्याला अटक करतील, याची त्याला भिती वाटु लागली. पोलीसही घटनास्थळाचा पंचनामा करून गेले होते. त्याला आज पण रात्रभर झोप लागली नाही. पोलीसांची भिती त्याच्या मनात बसली होती. आता कधी पण पोलीस येतील, आणी आपल्याला पकडतील असं त्याला वाटत होतं.

दुसऱ्या दिवशी सकाळी तो परत दूध घालायला गावात आला. आज पण चावडीवर गर्दी झाली होती. बाबु हळूच गर्दीतून वाट काढत पुढे आला. पाहतो तर काय? महिपती सावकार रक्ताच्या थारोळयात पडला होता. त्याच्या शरीरावर तलवारीचे असंख्य वार होते. त्याला चर्चेतून कळालं. लाला मसणजोगी आणी महिपती सावकाराचे पैशावरून मतभेद झाले होते. त्यामुळे लाला मसणजोगी काल गावात येत होता. लालाचा खून महिपतीनेच केला, असा मामा मसणजोगीचा समज झाल्यामुळे त्याने गुंड पाठवून महिपतीचा खून पाडला होता. पोलीस आले, पंचनामा झाला. सगळया जिल्ह्यात वातावरण तंग झालं. महिपती सत्ताधारी पक्षाचा जिल्हा परिषद सदस्य होता, त्याचा खुन करणारे आरोपी पाच तासाच्या आत पोलीसांनी पकडले.

दुसऱ्या दिवशी ‘पैशाच्या कारणावरून जिल्हयात दुसरा धाडशी खून’ या मथळयाखाली पेपरला बातमी छापून आली. मामा मसणजोगी व महिपती सावकार यांच्यात पैशाच्या कारणावरून वाद होता. लाला मसणजोगी या गुंडाने तालुक्यात दहशत निर्माण केली होती. त्याच्यावर बऱ्याच पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल होते. तसेच महिपती सावकार यांच्यावरही नळ योजनेमध्ये पैसे खाल्ल्याचा आरोप होता. अखेर पैशांच्याच कारणांवरून लाला मसणजोगी व महिपती सावकार यांचा खून झाला. लालाचा खुन महिपतीने केला, त्यामुळेच मामा मसणजोगीने महिपतीचा खून केला. मामा मसणजोगीला पोलीसांनी अटक केली आहे. ही बातमी वाचून बाबुच्या मनातील पोलीसांबद्दलची भिती कुठल्या-कुठे पळून गेली. सखुच्या मृत्युचं गुढ जसं जगाला माहित नव्हतं. तसंच लाला व महिपतीच्या धाडसी खुनाचं गुढही गुढच राहणार होतं.