Sthityantar - 1 books and stories free download online pdf in Marathi

स्थित्यंतर - भाग1

उंचच उंच झोके घेत असताना अचानक कोणी आडवे यावे याशिवाय मोठा विचका तो कोणता? अगदीच सोपं करून सांगायचं झालं तर एखादं लहान मूल मिटक्या मारत कुल्फी खात असावं आणि अचानक ते खाली पडावं असेच काहीसे

सावी चे झाले होते.


सावी….

आपल्या आईच्या उदरात वाढत असलेली निरागस मुलगी.

एक समाधिस्त,संन्यस्त अतिउच्च कोटीतील मनुष्य जर कुठे खरा भेटत असेल तर तो आईच्या उदरातच.या जीवाला बाहेरच्या जगाशी काही-काही घेणं देणं नसतं. सभोवताली आईच्या उदराचे अंतराळ,असंख्य पेशा म्हणजे त्यातील तारका आणि या सगळ्यांचा सूर्य म्हणजे खुद्द आई.सजीव-निर्जीव या संवेदना देखील जाणवू नयेत इतकं शांत आणि सुरक्षित ते जग,त्या जीवाला मग चांगले-वाईट,छळ-कपट गरीब-श्रीमंत गावीही नसतात.असंख्य भावनांच्या समिधा पडतात तेव्हा तर मातृत्वाचा होम जळतो.आधी मुलगी म्हणून मग बहीण,बायको,वहिनी,सून,आई इतकंच नव्हे तर अबला,सबला, सुंदर,कुरूप,शीलवान, व्याभिचारी अशी एक ना अनेक कापडे स्त्रियांना घातली जातात.पण आज उदरात असलेल्या जीवाला कुठं कापड आहे? तो देह नाही,ती तर एक ऊर्जा आहे.ऊर्जा म्हणजे तरी काय असते?

'कोणताही भौतिक बदल घडविण्याची अथवा कार्य करण्याची क्षमता'.मग स्त्री ही ऊर्जाच नव्हे का?

कापडांच्या थरांनी सुशोभित असतो तो तर निव्वळ देह असतो.त्यावर मग गुण दोषाच्या असंख्य झालरी लागत जातात पण आत जी ऊर्जा असते तिचं काय होतं? तर निसर्गाच्या नियमानुसार ती या अवस्थेतून त्या अवस्थेत प्रवास करत राहते,ऊर्जा कधी मरत नाही,मरतो तो केवळ देह.मरते ती केवळ स्त्री,स्त्रीपण कायम करत राहते 'स्थित्यंतर' या अवस्थेतून त्या अवस्थेत,जगाची उर्जा टिकविण्यासाठी.


अजुन 'अ' आईचाही पूर्ण न कळालेली सावी 'ज' जगाचा शिकायला काहीच अवधी बाकी आहे.

"इन मीन पंधरा दिवस" इवलुश्या बोटांवर सावीने चार वेळा मोजून पाहिले. सावी तशी हुशार. ते कसे? असे कोणीही विचारु नका.मुलीला मूर्ख असण्याचा अधिकार असतो का?

मुळात मुलीला मुलगी असण्याचा तरी अधिकार असतो का?

आता तुम्ही म्हणाल पोटातल्या बाळाचं नाव असते का? आजकाल तो ट्रेंड नाही का?

पण सावी च्या बाबतीत काहीसं वेगळं झालं.


परवा आजी कुठलीशी पूजा घालायचं म्हणत होती तेव्हा डोळे मिटून कान टवकारून सावी बाहेरच संभाषण ऐकण्याचा प्रयत्न करत होती. पोटातलं बाळ मुलगा असावा असे आजीचं प्रांजळ मत असलं तरी मुलगी झाली तरी तिला नाकारणार नाही इतकं वैभव नक्कीच तिच्या घरात होते.

'काय? मुलगा हवा होता आजीला तेही 21व्या शतकात? रोज आई कसलीशी बुकं वाचत बसते त्यात आपण पाहिलं आहे की मुलगा-मुलगी समान असणारे कायदे आलेत.भ्रूण-हत्या करणाऱ्याला कठोरातील कठोर शिक्षा देण्यात येते. म्हणजे नक्की त्यावरून वाटते की आजी एवढ्या टोकाला जायची नाही.पण समजा गेली तर..मला अजून आईला बघायचंय..सावी रडवेली झाली,घाबरी झाली. या जगात आपले स्वागत होईल ही आशा नाही तिथे जाणं किती शरमिंधे करणारे असेल. समजा एखादा पाहुणा घरी येतो त्याला आपण ढुंकूनही बघत नाही मग त्यामागून कोणी बडा विशेष पाहूणा येतो त्याला मात्र पायघड्या पासून सगळे इत्यंभूत मिळते. वास्तविक पाहता दोन्ही ही पाहूणेच पण जगाची रीत ठरते ते वितभर नोटा बघूनच.पण मग आम्ही दोघेही रिकाम्या हाताने या घरात येणार मग त्याचा पाहुणचार वेगळा आणि माझा वेगळा असे का होईल?'

इवलुश्या डोक्याला एवढा मोठा ताण घेण्याची भयंकर खोड स्त्रीजातीला नैसर्गिक असावी बहुधा.

'पोटात कावळे ओरडायला लागले, ही आई पण ना कधीच वेळेवर जेवत नाही स्वतः उपाशी राहते आणि मलाही ठेवते. माझं ठीक आहे मी निदान तिच्या रक्तावर जगते पण तिचं काय? नवऱ्याआधी न खाण्या इतकीही ती जुनाट नाहीये, पण केवढा तो विचार करते ती. तिला पेलता ही येत नाही ते. कुणाला काही बोलत नाही, तिची घुसमट तिलाच ठाऊक. मी तरी कसे विचारणार? तिचा मेंदू हॅक करणे देखील एवढं सोपं नाहीये. मागच्या आठवड्यात आपण किती टेन्शन मध्ये होतो आजी मुळे. तेव्हा एकदा असाच तिच्या विचारांना हॅक करायचा प्रयत्न केला होता. तिला तरी मी हवीये का एवढंच हवं होतं मला.पण तिच्या डोक्यातील असंबंध गुंता तिला देखील सुटला नसता. तेवढ्या जंजाळातून एक 'सावी' हा शब्द काय तो आपण ऐकला होता.अच्छा!तर आईने नाव देखील ठरवूनच ठेवले आहे.मनातच सावी केवढ्याने हसली होती.आई ला मी हवी आहे याचा आनंद तिला आईलाच कधी एकदा सांगेल असे झाले होते. तर ही अशी आई.उद्याचं काम आज करेल पण जेवण म्हटलं की चालढकल सुरू करते.

"ए आई...भूक लागलीय गं" सावी ने पाय खोडायला सुरू केले.मी तपे सांडली जीवना तुजसवे

तरी भेटली ना ती जादूगरी

कळाले मला खेळ ते पाशवी

जादू निघाली ती फसवी खरी…


खरंय जीवनाची जादूगरी कायम फसवी असते.माहीत असूनही आपण त्यात गुरफटत जातो हे हास्यास्पदच नाही का?


उन्हाच्या नुकत्याच लागलेल्या चाहुलीने मनावर उबगतेचा मळभ साठलाय नुसता. वीतभर gallery च्या a.c ने ही हौस भागवणे भागच होते.दार उघडताच बाहेरच्या आवाजांनी हा मळभ जास्तच दाट व्हायला लागला,पण मला विशेष काम नसल्याने या गोंधळाने मनोरंजन होते का ते बघायला लागले.

नजर जाईल तिथवर फक्त अपार्टमेंट्स.आभाळाला गवसणी घालणारे पण मनाची उंची कायमची हरवून बसलेले. चार भिंतींच्या आतून बैठे खेळ खेळणाऱ्या लहानग्यांचा आवाज तिथेच विरून जाताना एवढ्या गजबजाटात एक पोकळी बनवतोय. क्वचित पण धाडसाने गाड्यांच्या गर्दीतून सायकल चालवणाऱ्या लहानग्यांचे मला कौतुकही वाटले अन काळजीही.एका कोपऱ्यात स्थिरावलेल्या छोट्याशा दत्तमंदिराच्या आवारात एकत्र गप्पा मारत बसलेल्या चार-दोन वृद्ध स्त्रिया शांतता शोधत असतील ना??..अन तसं पाहिलं तर त्यांचा हा केविलवाणा प्रयत्न त्या सायकल चालवणाऱ्या मुलांच्या समसदृश्य नाही का??

वर्षानुवर्षे या परिसरात राहूनही शेजाऱ्याची पुसटशीही कल्पना नसणे ही या 'सोसायटी'तील शोकांतिका म्हणावी लागेल.आणि स्टेटस च्या नावाखाली प्रॉब्लेम्स share करायला घाबरणारी ही माणसं क्वचित एकत्र आली तर काय share करत असतील हा मला पडणारा नेहमीचा प्रश्न आहे.

नजरेच्या टप्प्यात फक्त दोन झाडं.इथल्या माणसांसारखीच मातीचा नव्हे तर सिमेंटचा थर घेऊन उभी आहेत.पानांची रंध्रे श्वास घेण्यासाठी धडपडत आहेत,तग धरून आहेत अजून तरी!!.मंदिरातील छोटासा औदुंबर आणि घराघरातल्या तुळशीनी कुंडीत समाधान मानलेलं दिसतंय बहुधा.परिस्थितीशी जुळवून घ्यायला त्यांच्याकडूनच शिकावं लागेल मला .

कदाचित काही दिवसांनी मीही या सोसायटीचा हिस्सा बनेल.

इतपरही काही माणसं मुक्त मनानं वावरताना दिसतात....हेही नसे थोडके.

खोट्या सभ्यतेच्या मुखवट्याआड कुठेतरी स्पंदने शाश्वत असतील ना??ती स्पंदनं झगडत असतील वाव मिळण्यासाठी,अगदी त्या मातीसारखं जी धडपडत असेल या सिमेंटच्या जंगलात श्वास घेण्यासाठी.समोर एका जागी लाकडी फळ्यांचा ढीग पडलेला रोज दिसतो...भिजत कुजत पडलेला. काही संदेश देत असेल का तो??.

मी विचार करू लागले अन रोजच येणारी एक अबोल संध्याकाळ बोलू लागली..

हे काय मधेच, असे शून्यातून मला अचानक परत आणलं?

आऊच! केवढं लाथ मारते बाळ.

"फार घाई झाली का रे बाळा तुला?"

रेवतीने पोटाला हात लावून चाचपून पाहिले. तिकडे डोके इकडे पाय आहे..

अशा गोड लाथा चालशील बरं लाडोबा म्हणून तिने हातानेच स्वतःच्या पोटाचा मुका घेतला.सगळं कौड कौतुक झाल्यास मग कुठे तिला लक्षात आले की कदाचित बाळाला भूक लागली असणार. अचानक तिच्या मनात गिल्ट उफाळून आला. आपण साधं वेळेवर जेवू देखील शकत नाहीत बाळासाठी, याला काय भविष्य देणार?

भराभर जेवून परत गॅलरीत झाडांजवळ बसली.दिवे लावायला वेळ होता अजून. अशा वेळी तिथे येऊन लेखन-वाचन करणे हा तिचा नित्यक्रम.व.पु काळे यांचे 'ही वाट एकटीची' ही कादंबरी जवळजवळ चार महिने झाले वाचत आहे ती .अशी वाचायला बसली असली की काम पडणार. पण आता फारच जड होत आहे काम करायला.

" रेवती" सासुबाई ची हाक आली .

पण मनाचा हिय्या करून आज रेवती उठलीच नाही.येऊदेत सासूबाईंना. इतर वेळी नातेवाइकांना सांगत असतात की मी अगदी मुलीसारखी काळजी घेते रेवतीची.मग मीही आज मुली सारख्याच हक्काने बसून राहील. जीव गोळा होतोय हालचाल करताना. डॉक्टरने पंधरा दिवस बाकी आहेत म्हटलं ते त्यांच्या समोरच ना. आजवर कुठलंही काम टाळलं नाही आपण,पण आता खरंच त्रास होतोय. आज सांगूनच टाकावं घरी आता तरी माहेरी पाठवा म्हणून."

मागाहून ताडताड पावलांचा आवाज येऊ लागला तसं तिचं उसणं बोलणं गळून पडलं.

"तुम्ही का आला आई, मी येतच होते"

असं बोलून ती गुमान उठली पण सासूबाईंचा तोरा आज वेगळाच होता.

"रेवती बस आधी हे दूध पिऊन टाक"

"पण आई' मला ओकारी…"

" पण बिन काही नाही, हे विशेष दूध आहे. पांढरा खोंड झालेल्या गाईचं."

"याने काय होणार?"

" तिला जसा राजबिंडा खोंड झाला, तसा तुला मुलगा होणार."

" फक्त दूध प्यायल्याने ते शक्य होते?"

" मला जास्त प्रश्न विचारू नकोस आम्हालाही थोडं फार कळते."

" पण आई आता डिलिव्हरी इतकी जवळ आली बाळाचं लिंग केव्हाच नियतीने ठरवलं असणार.बाळ वाढत आहे,मला जाणवत आहे. मग फक्त दुध पिल्याने लिंग बदलता येते का?"

" तू असे बोलत आहेस जसे काय मुलगीच होईल हे माहीत आहे तुला" सासुबाई डोळे वटारून बोलल्या.

नकळत नको त्या विषयाला हात गेल्याचं पाहून रेवती गांगरली.

" नाही आई, पण ते कोणाच्या हातात असते का म्हणून…"

" मी म्हटलं की पी. निदान पहिला मुलगा व्हावा एवढीच अपेक्षा आहे मला. मी काही एवढी निष्ठूर नाही. माझ्याकडे माझी वेगळी कारणे आहेत समजलं?"

जास्त खोलात न जाणे हिताचे होते.विषय बदलायचा म्हणून रेवती म्हणाली ,

"आई, मला माहेरी कधी पाठवणार?"

सासुबाई ताडकन उठल्या आणि केवळ एक कटाक्ष टाकून निघून गेल्या. त्या कटाक्षा चा अर्थ रेवती जाणून होती. दूध संपवून परत त्तिनं पुस्तकाची पानं पटायला सुरू केलं.

वपू नी निर्माण केलेली ही कादंबरीतील 'बाबी' खरंच का या जगात अस्तित्वात असेल?

केवळ कलह वाढू नये म्हणून स्वतःला पार बदलून टाकणारी मी आणि जीव गेला तरी तत्व न बदलणारी बाबी केवढी ती तफावत. पण तरी तिच्या यातना आपल्याला आपल्या का वाटतात? प्रतिकूल परिस्थितीतही गरोदर असण्याचा आनंद घेणारी बाबी आणि आपण मात्र सतत काही न काही चिंतेत असतो.

अवघ्या देहाचा होम करायला स्त्री कायम तयार असते हेच खरे मग ती कुठलीही असो.

आपली आई आणि सासू बाई दोघीही स्त्रियाच.त्यादेखील या अवस्थेतून पुढे गेल्या असतील. पण तरीही माझी अवस्था अशी असतानादेखील त्या आपसातील तेढ सोडायला तयार नाहीत.दोघींनाही आजी होणार याचा आनंद नाही. सासूबाईंना वाटतं आईने स्वतःहून बोलून घ्यावे आईला वाटते सासूबाईंनी स्वतःहून घेऊन जा असे सांगावे.बाबा आणि अण्णांनी हे डिपार्टमेंट लेडीजचे आहे हे सांगून सोयीस्करपणे मान सोडवून घेतली पण खरंच का हे डिपार्टमेंट फक्त लेडीज चे होते? तसे असते तर मुलगा व्हावा हा हट्ट मध्ये येतोच कुठे मग.

काय करावे आपण ही तेढ सोडवायला,दरवेळी निरुत्तर करणारा हा प्रश्न तूर्तास बाजूला ठेवून ती खुर्चीत विसावली.

जेवणाने बाळाला शांत केलं होतं.काहीही हालचाल जाणवत नसल्याचे पाहून आपसूक ती म्हणाली "झोपलास का रे बाळा"

मग अचानक परत खिन्न झाली.हे काय बोलून गेलो आपण. म्हणजे नकळतपणे आपणही मुलगा होण्याची अपेक्षा करतोय का? दिवस गेले तेव्हापासून मनात उकळ्या फुटत होत्या की मुलगीच असावी. तिचं रूप कल्पनेतच कित्येकदा बनवून झालं होतं.मार्केटला जाताना कपड्यांच्या दुकानात सजावटीसाठी लावलेले फ्रॉक दिवसा बघितले जायचे आणि रात्री मग प्रत्यक्ष स्वप्नात छोटीशी परी तेच घालून तिला दिसायची.नावही मनोमन ठरवून टाकलं होत आपण.पहिले तीन महिने काळजीचे म्हणून कोणीही काही बोलले नाही पण नंतर मात्र मनातली खदखद सगळेच बाहेर काढू लागले.

प्रत्येक गोष्टीत 'हे घरातलं मला काही सांगायचं नाही' असे म्हणणारे अहो अजून दूर गेले. पहिल्या बाळाची पहिली चाहूल अशी कोरडी तिच्या मनाने स्वीकारली होती.

लग्नावेळी हाच मुलगा पसंत असल्याने आपण अडून बसलो होतो तेव्हा पुढे मग वेळोवेळी माहेरच्यांकडून 'तुझं तू निस्तार' हेच ऐकून घ्यावं लागलं होतं. त्याचाच परिणाम म्हणजे आई आणि सासू यांची विकोपास गेलेली तेढ.


-------क्रमशः--------