Sthityantar - 2 in Marathi Novel Episodes by Manini Mahadik books and stories PDF | स्थित्यंतर - 2

स्थित्यंतर - 2

2.


'अजून देणे आयुष्याचे फिटले नाही

अजून माझे दुःख पुरेसे वटले नाही'

"मी सुधा, रेवती ची सासू.भट साहेबांच्या या ओळी म्हणजे माझ्या आयुष्याचं प्रतिबिंब. मी एक स्त्री आहे हाच मोठा प्रश्न आणि हेच त्या प्रश्नामागचं उत्तर.पण मी उत्तर शोधत बसले नाही,माझ्या पिढीला ते मान्य नव्हतं. प्रस्थपितांनी जे सांगितलं ते आम्ही ऐकलं,तेच अंगिकारले.स्त्री म्हणून ठिणगी-ठिणगी जळून गेलं मन आणि तन सुद्धा.

एक समंजस सून झाले,घराची कारभारीन झाले.आदर्श वहिनी झाले,आज्ञाधारक बायको झाले.आई म्हणून कौतुक झालं. पण

आज सासू नावाचं लेबल लागलं तर माझे अवगुण अधोरेखित करायला सगळे पुढे सरसावले. स्त्री म्हणजे ऊर्जा म्हणणाऱ्यांनो आज मी ऊर्जा नाही का??

उभा जन्म चांगलं वाईट शिकण्यात गेला.रीती भाती चांगल्या असतात, त्याचं पालन करणे अस्मितेचे द्योतक असते,सुसंस्कृतपणाचे लक्षण असते हे माझ्या वर कुणी बिंबवले? श्रद्धा,अंधश्रद्धा हे आजकालचे चोचले बरं का.पूर्वी अंधश्रद्धा फक्त ते निर्मूलन समिती वाल्यांना कळायची.

मामंजी ने सून म्हणून मला पसंत केलं तेव्हा माझा पदर चेहऱ्यावर होता.तर अशा घरातून मी आलेय.काळानुसार बदलायचं असतं ते मला कुणी शिकवायची गरज नाही.रेवती ला बघायला गेल्यास मी अगदी जीन्स मधे पसंत केलं होतं तिला.एवढं वैभव टिकवून ठेवणे देखील कसरतीचे काम होते.त्याला साजेशी सून आणण्याचे कसब आणि मंदार ची आवड बघता एवढं आपण स्वीकारलेच होते.माझं आयुष्य साडीत गेलं,आणि माझ्या समोर ही जीन्स मध्ये घरात वावरणार एवढीही मी बदलले नव्हते.लग्न होईपर्यंत काय घालायचं ते घालून घे,तेवढी मोकळीक आहे तुला असे उदार मनाने रेवती ला लग्नाआधीही हक्कानेच बोललो होतो आपण.नौकरवर्गात मोडणारे रेवतीचे माहेर मात्र कमालीचं आधुनिक निघालं.आता केवळ मंदार च्या पसंतीसाठी थोडं झुकतं माप घेतलं तर व्याही डोक्यावर बसायला लागले.हुंडा मान्य नाही म्हणून चक्क माझ्या मंदार ला नाही म्हटले ते,पण शेवटी रेवतीने हट्ट धरलाच,असा नजरेतून सुटणारा नव्हताच मुळी माझा मुलगा.आधीच हुंड्यासाठी खटकलेले असताना मुलीच्या हट्टासाठी लग्न जमवावे लागल्याने विहिन बाईंचा उतरलेला चेहरा बघायला मला छान वाटलं होतं.

यात मला विघ्नसंतुष्ट म्हणण्याचे काही कारण नसावे,मी आधी झुकले तेव्हा तिची आई देखील अशीच मिजाशीत होती बरं! एकदा लग्न झालं की मग कशाला आपला संबंध येतोय शेवटी रेवती शी काय ते देणंघेणं असेल आपलं.त्यांना दाखवलं पाहिजे रेवती ला गरज नाही इतर कुणाची. सासू आहे मी शेवटी! दरारा राहिला पाहिजेच.

मंदार चे बाबा म्हणजे माझे अहो हे सात बहिणींच्या पाठीवर एकुलते एक.आयुष्यभर 7 नंदांचे सणवार,माहेर पण केलं.मी जेवढा आदर त्यांना दिला तेवढा त्यांच्या सुनांनी देखील त्यांना दिला नाही. ही मात्र आतली बाब आहे कुणाला सांगू नका. काय होतं कुणास ठाऊक, पण सात पैकी फक्त दोन नंदाना मुलगा झाला तेही चार-पाच मुलीनंतर.बाकीच्या दोघींना मुली असूनही शेवटी हाल-हाल होऊन कष्टात जगावे लागले.पैसा पुष्कळ होता त्यांचाही पण पैशाने काय होते? मंदारचे बाबा एकटे तसेच पुढे मंदारही एकटाच मुलगा मला झाला. घराण्याला कुलदीपकच का हवा पणती का नको हे पोकळ सुविचार मला झुकवणार नव्हते.

घराण्याचा इतिहास पाहता मंदार ला मुलगा होईल की नाही ही भीती मला सारखं लागून राहिली होती.एवडी अमाप दौलत कुणाला द्यायची पुन्हा?

मुलगी झाली तर काय घरात ठेऊन घेणार आहे का रेवती तिला? माझ्या मंदार ला आधार राहील मुलाचा. ते काही नाही. मला शक्य ते सगळे प्रयत्न करणार मी त्यासाठी. शेवटी विठ्ठलाच्या हाती सगळं.आजवर रेवती च्या नकळत थोडे का प्रयोग केले आपण? मला तुमचे कायदे कळत नाहीत,तुमचे कायदे म्हातारपणी हक्काचा आधार देत नाहीत.भावकी शी लढत इथवर आलो आपण. कशात एक तुलना होत नाही तिथे.भावकी म्हणजे उण्याची वाटेकरी ही म्हण त्याचमुळे रुजू झाली असावी.शामली ला मुलगा होईपर्यंत माझ्या मंदार ला किती दाताओठाखाली धरलं होतं तिने.हा जायचा काकू-काकू करत पण नेमका तिकडे गेला की रडत यायचा. माझ्या मंदार ला मी कशासाठीच रडू दिलं नाही कधी.का म्हणजे??मुलगा आहे तो.मूळूमुळू रडायचं काम मुलीचं असतं.रडली नाही ती मुलगीच मुळी उलट्या काळजाची असते असे माझे स्पष्ट मत आहे.

मंदार पोटात होता तेव्हा किती हाल झालेले आपले.सतत च्या उलट्या जळजळ,भारावलेले पाय घेऊन गावी वाडाभर कामे करत फिरावं लागायचं.आत्तेसासूबाई म्हणायच्या बाईच्या जातीने सोसलं नाही तर सुस्तपणा येतो.सात नंदांच्या माहेरपणात माझं माहेरपण कधी मनाजोगं झालेच नाही.बाळांतपणात पंधरा दिवस तरी खाटेवर राहिलो का आपण?मंदार च्या बाबांचा परत येण्यासाठी लकडा बघून थोरली भावजय चेष्टेतच म्हणाली होती वण्सं अण्णासाहेबांना दुरावा सहन होत नाही दिसतंय. त्यावर लटकेच हसून आपणही दुजोरा दिलेला. माहीत होतं,घरात कामे खोळंबली होती या बाळंतपणाने. गायी-म्हशी गाभण असतात तेव्हा मोकळी होणे हा सर्रास शब्द त्यांच्या बाळंतपणासाठी वापरला जातो.बाई मोकळी झाली हे जेव्हा आपल्यासाठी म्हटलं होतं तेव्हा अक्षरशः दावणीत बांधल्यासारखं वाटून गेलेलं.असे हिणवुन बोलणं बाईने सटवी कडूनच लिहून आणलेले असते.ती पण एक स्त्रीच ना शेवटी.धुणं भांडी झाली की बसत असेल अक्षरे टाकायला.रागारागात लिहीत असेल मनात येईल ते. पण मी ती अक्षरे स्वीकारली होती.मी त्या दुय्यमपणाला देखील मान्य केलं होतं.मी जे-जे सहन केलं ते माझ्या सुनेने देखील काही प्रमाणात का होईना करायला हवं होतं मला.बाईची जात आहे शेवटी सोसलं नाही की सुस्तावते आणि सुस्तावली की सोकावते.

आजी होणार आहे मी,खुश आहे पण एक हुरहूर आहे.मला नाही जमत आनंद दाखवायला.दाखवलं की कमकुवत भासतो आपण लोकांना."

3....

"मंदार.. निदान यावेळी तरी तू सोबत येशील हॉस्पिटलला"

" नो आय कान्ट"

"बट व्हाय? हे बाळ तुझंही आहे"

" म्हणूनच धावतोय ना.. त्याच्याचसाठी"

" आणि 'ती' असेल तर?"

" हे बघ रेवा सकाळी-सकाळी निगेटिव्ह वाइब्स देऊ नकोस"

"निगेटिव्ह वाइब्स?मुलगी असेल तर?"

" मी अगदीच असे म्हणत नाहीये रेवा"

" मग काय म्हणत आहेस तू?"

" मला वेळ नाही बोलू नंतर"

"मंदार मी किती प्रेशर मध्ये आहे दिसत नाही का तुला?"

" यात काय प्रेशर घेण्यासारखं आहे?मुलगाच होणार आहे आपल्याला निश्चिंत रहा."

" अरे पण मला का असे वाटत आहे की मुलगी झाली तर तिचं स्वागत होणार नाही या घरात, का सतत मुलगा-मुलगा करत आहेत सगळे"

"हे बघ मी मुलगा हवाच असे म्हणत नाहीये पण मुलगाच होईल असे म्हणत आहे"

" बघ परत मुलगाच...सांगून ठेवतेय मंदार मुलगी झाली म्हणून तिच्या कोड-कौतुकात काही कमतरता मला दिसली नाही पाहिजे."

"रेवा हे आपण रात्रीही बोलू शकतो गं आय एम गेटींग टू लेट."

" रात्री कधी,दोन वाजता?"

" बरं आज लवकर येईल,प्रॉमिस."

" बघू.."

रेवाला हे नेहमीचेच. तिच्या मनाला व्यक्त व्हायला जागाच ठाऊक नाही. सतत तणाव.. पतंगाच्या दोरी सारखा. तिच्या मुक्त पणाचा कुणाही पामराला हेवा वाटावा. पण तिच्या दोरीला ताण आहे,खेचणारे हात आहेत. तिला तेवढीच ढील दिली जाते जेवढी देणाऱ्याला द्यावी वाटते.मंदार म्हणजे गरुड आहे. तिच्या मनावर गारूड करून तिच्या अवकाशावर नियंत्रण केलेला गरुड.त्याची उडान राजबिंडी आणि त्याची शिकारही..आपणच सावज स्वतःहून शरण गेलेले.

..दवाखान्यात गर्दी कमी होती.ही शेवटची सोनोग्राफी.यावेळी सासुबाई सोबत होत्या.केबीन बाहेर रिपोर्ट साठी रेवती बसली होती,सासूबाई सवयीप्रमाणे स्थिर बसणारच नव्हत्या.शेजारी एक गर्भवती गर्भगळीत होऊन सासू च्या खांद्यावर विसावली होती.. रेवा ला हेवा वाटला.

छे सासू असेल कशावरून,आईच असावी ती.

आई..आईची आठवण झाली.अशावेळी आई हवी होती जवळ.का बरे आपण एवढे दूर झालो तिच्यापासून.

विचार करत-करत रेवती ची नजर एका स्त्री वर स्थिरावली.चेहऱ्याला स्कार्फ बांधला असल्याने कयास व्यर्थच. पण राहून राहून तिचं रेवतीकडे एकटक बघणं रेवतीला खटकत होतं. कोणी ओळखीचं असेल म्हणून रेवतीही धिटाई ने न्याहाळत होती..तिचे डोळे..कुठेतरी पाहिलंय हिला..

पळ दोन पळाचा अवकाश अन रेवती तिच्यासमोर जाऊन ठाकली.

"आई?"

मालती बाई ओशाळल्या,आपलं बिंग फुटल्याच्या अविर्भावात स्कार्फ सोडून आता रेवती काय बोलेल याची वाट बघू लागल्या.

"आई तुलाच बोलतेय मी, तू इथे काय करत आहेस."

मालती बाई स्तब्ध होत्या.

मुलीला दोन वर्षात आज समोर बघून ओलेत्या शब्दांना वजन आलं होतं..ओठ जड झाले होते.मेंदू ने आईला हाक दिली होती.खरं म्हणजे आईला आई होण्याची जाणीव होते तेव्हा या जगाच्या सगळ्या रितिभाती, लाज,भीती,गर्व सगळं गळून पडते.ममता अशीच असते.पण ममता या शब्दातच मम येतं.ममता म्हणजेच माझेपणा.. लेकरू कुठेही असलं तरी लेकरू माझंच असावं असे कुठल्या आईला वाटत नाही?

पण ही समोर उभी असलेली रेवती माझी आहे?? लग्नावेळी सगळ्या जगासमोर हिने आपल्याला खाली बघायला लावलं.आपली इच्छा नसताना हट्टाने लग्न केलं.कितीदा सांगितले होते हे लग्न तुला सुख देणार नाही पण हिने एक ऐकले नाही.कितीही आठवण आली तरी मनावर दगड ठेवतच होतो आपण इतके दिवस.पण रेवा गरोदर आहे हे कळलं आणि सगळा गर्व गळून पडला.फोनवर तुरळक बोलणं होत असले तरी सासू कान लावूनच असते जसे काही मी काही भरवत आहे.घरी जायची सोयच नाही,मी माझा स्वाभिमान सोडून तिच्या दाराला जाणार नाही.तसे ठणकावूनच सांगितले होते आपण तिच्या सासूला.रेवा दवाखान्यात जाणार असल्याचे फोनवरच कळले होते.दुरून का होईना तिला बघावे म्हणूनच एवढं सोंग आपण केले नाही का?

" अगं आई काय विचारतेय मी तुला?"

"ते मी असेच पोटात दुखत होतं म्हणून.."

"भेटलीस का मग डॉक्टर ला,काय म्हणाले ते?"


"ते म्हणाले.."

रेवाच्या मागून विहिनबाई येताना बघताच मालतीबाईनी पसारा आटोपता घ्यायच्या तयारीत घाईत म्हटले

" ते म्हणाले सगळं नॉर्मल आहे."

मालतीबाई पटकन निघून जाणार अन सुधाबाई समोर ठाकल्या. आता मी रेवा ला बघायला आल्याचे कळले तर ही बाई चांगला पाणउतारा करणार हे ओळखून आधीच त्यांनी दवाखान्याची जुनीच file समोर दाखवली आणि हात जोडून येते मी म्हणून काढता पाय घेतला.

"चल रेवती रिपोर्ट्स आलेत"

रेवती निशब्द झाली होती.किती आणि काय-काय बोलायचं होतं तिला आईला.बोलणं नाही झालं ठीक आहे पण एकदा मिठीत तरी…

समोर पायऱ्या होत्या पण पायात अवसान नव्हतं.चढून आल्यास उतरणे क्रमप्राप्तच होते.आयुष्याचेही तसेच असते.कधी-कधी सुख शोधत आपण एका उंचीवर येतो मग कळते की सुख तर मागेच राहिलं.. मग परत उतरून यावेच लागते..चढणे सोपे असते पण उतरणे नाही.एखादी पायरी इतकी खडतर असते की वाटच बदलून जाते..

"रेवा बाई जपून चला" रेवती स्वगत बोलली.पण ती खडतर पायरी नेमकी आजच तिच्या वाटेला लागली अन पाय घसरून रेवती पोटावर जोरात पडली..सासूबाई पुढे चालत होत्या..आई दूर रिक्षासाठी थांबलेली दिसत होती..हाक मारताच दोघी धावत येणार होत्या..कदाचित इतक्या दिवसांची दोघीतली ती तेढ आज सुटणार होती पण रेवतीचा आवाज विरून गेला..सासूबाई अंधुक झाल्या..आई दिसेनाशी झाली.. डोळ्यासमोर अनिश्चिततेची काळी पोकळी तरळू लागली.. रेवती आता नवीन विश्वात निघून गेली.. परत दुष्कर, निरंतर स्थित्यंतर..

इतके दिवस या जगात येण्याची वाट बघत असलेली सावी या जगाला बघून हरखून गेली नाही,घाबरून भेदरली नाही.

पहिल्यांदा आणि शेवटचं आई ला बघितले तेव्हा आई चे डोळे बंद होते.तिला कळले होते आपल्या या स्थित्यंतरातील आईचा प्रवास संपला होता..

मनाने मनाचा तळ गाठला..आज आईचं मन शांत होतं..हॅक करणं सोपं गेलं..

ती म्हणत होती..

"माझे जळणे कुणा कळावे

राखेलाही पुन्हा छळावे

उरल्या सुरल्या कणाकणाने

पुन्हा एकदा जन्मा यावे.."

देह अनंतात विरून गेला पण अनंतच उदरात वाढवणारी ऊर्जा अमर झाली 'आई' म्हणून...

---क्रमशः----

Rate & Review

Bharat Deshmukh

Bharat Deshmukh 5 months ago

Bhumi

Bhumi 1 year ago

Karuna

Karuna 1 year ago