Bali - 22 in Marathi Novel Episodes by Amita a. Salvi books and stories PDF | बळी - २२

बळी - २२

बळी - २२
केदारच्या अपहरणानंतर रंजना काटेगावला गेली; आणि त्यानंतर एकदाही घरच्या माणसांना भेटायला घरी आली नाही; असं मीराताई म्हणाल्या; तेव्हा इन्सपेक्टरना मोठं आश्चर्य वाटलं! केदारने तिच्याविषयी जो विश्वास दाखवला होता, त्याच्याशी तिचं हे वर्तन सुसंगत नव्हतं. त्यांनी मीराताईंना प्रश्न विचारला,
"फोनवर तिच्याशी बोलणं होत असेलच! ती धक्क्यातून सावरली की नाही? किती दिवसांचा कोर्स आहे --- इकडे परत कधी येणार आहे --- काही कळवलं का तिने?" इन्सपेक्टरच्या या प्रश्नावर मीराताई म्हणाल्या,
"नाही! तिच्याशी माझं बोलणं झालं नाही! तिच्या घरी अनेक वेळा फोन केला, पण ती भेटली नाही! तिची आई म्हणाली, की "ते काॅलेज घरापासून खूप लांब आहे! जाण्या - येण्यातच दिवस जातो! घरी यायला रात्र होते! रंजनाच्या मनानं घेतलं आहे, की शिक्षण कमी असल्यामुळेच केदार तिला सोडून गेला, त्यामुळे ती जिद्दीने इतकी मेहनत करतेय!"---- त्यामुळे यावर मी काही बोलू शकले नाही; कारण या सगळ्याला कारणीभूत आम्हीच आहोत! आमच्यामुळे तिच्या आयुष्याची परवड झाली आहे!"
दिवाकर मनात म्हणाले,
"असं आहे तर! यांच्या मनातील अपराधाच्या भावनेमुळे रंजनाच्या चुकीच्या वागण्यालाही मीराताई दुजोरा देत आहेत!"
ते मीराताईंना म्हणाले,
"ठीक आहे! तिकडचा पत्ता मला द्या! आणि फोन नंबरही द्या! गरज वाटल्यास फोनवर बोलेन तिच्याशी! पण कृपया तुम्ही मात्र इतक्यात तिला आम्ही चौकशी चालू केली आहे; याविषयी काही कळवू नका!" यावर मीराताईंनी होकारार्थी मान हलवली.
थोडा विचार करून इन्स्पेक्टर दिवाकर पुढील चौकशी करू लागले,
"हे सगळं घडलं तेव्हा तुमच्या घरी आणखी कोण येत होतं? -- म्हणजे बाहेरची कोणी व्यक्ती --- नोकर-चाकर?
"फारसं कोणी नाही-- हो-- कविता नावाची एक मुलगी त्यावेळी घरकामाला येत होती! पण ती फार फार तर दीड - दोन तास काम करून निघून जात असे ! थोडे दिवसच तिने काम केलं! तीन महिने झाले -- तिची आई आजारी होती; म्हणून ती तिच्या हैद्राबादजवळच्या गावी गेली आहे! ती स्वभावाने इतकी चांगली होती; की तिच्यावर घर सोडून आम्ही बाहेर जाऊ शकत होतो! पण मला खात्री आहे; तिने चोरी केलेली नाही; कारण त्या दिवशी केदार आणि रंजना बाहेर पडले; त्यानंतर रंजना परत घरी येईपर्यंत मी आणि कीर्ती घरीच होतो!" मीराताई म्हणाल्या.
"तुम्हाला तुमचा मुलगा सोडून सगळ्यांविषयी खात्री आहे! बघू-- आम्ही नक्कीच सत्य शोधून काढू!" दिवाकर स्वरात विषाद होता.
"माझा केदारवर सुद्धा विश्वास आहे; पण असे पुरावे समोर आले; की मी काही बोलू शकले नाही! तुम्ही माझ्या केदारला शोधून काढा! तुमचे उपकार होतील! -- पण माझी एक विनंती आहे-- चोरीचा ठपका त्याच्यावर ठेऊ नका! रंजनाच्या वडिलांचं झालेलं नुकसान मी भरून देईन! फक्त तो सुखरूप असू दे; इतकीच देवाकडे प्रार्थना आहे!" त्या डोळ्यात पाणी आणून म्हणाल्या.
"तुम्ही काळजी करू नका! आमच्याकडून होतील तेवढे सर्व प्रयत्न आम्ही करू! देवावर विश्वास ठेवा! सगळं ठीक होईल!" मीराताईंना आश्वासन देऊन दिवाकर निघाले.
सहा महिन्यांनंतर आज मीराताईंना वाटत होतं, की कोणाचा तरी भक्कम आधार आपल्याला मिळाला आहे ; अनेक दिवस गुदमरलेलं मन आज मोकळं झालं होतं! . त्यांच्या नजरेसमोर आशेचा किरण दिसू लागला होता!
******
"ही जगावेगळी सासू आज बघायला मिळाली! मुलापेक्षा सुनेची काळजी मीराताईंना जास्त आहे! -- इतका हुशार सद्गुणी मुलगा त्यांना चोर वाटतो; आणि वाईट वेळ येताच माहेरी निघुन जाणा-या सुनेचं मात्र कौतुक चालू होतं!" घराबाहेर आल्यावर काॅन्स्टेबल राघव हसत म्हणाले!
" त्या भोळ्या-- खूप बाळबोध विचाराच्या आहेत! जे त्यांना दाखवलं गेलं ते त्यांनी खरं मानलं! त्यांना इमोशनल ब्लॅकमेल केलं गेलंय! रंजनाच्या आयुष्याचं आपण खूप मोठं नुकसान केलंय; असं त्यांच्या मनाने घेतलंय; त्याचा हा परिणाम आहे!" दिवाकर म्हणाले.
"पण रंजनाच्या हातात मोठी शोल्डरबॅग होती; तरीही तिचा संशय त्यांना आला नाही -- हे कसं? मला तर या सगळ्या प्रकरणात तिचाच संशय येतोय!" राघव विश्वासाने आपलं मत मांडत होते!
"त्या बॅगेत खरोखर पुस्तकं असतील तर? --- राघव! आपण पूर्ण तपास केल्याशिवाय कोणाला दोषी मानू शकत नाही! पण केदारने त्याच्या किडनॅपरविषयी जे काही सांगितलं; त्यावरून या गुन्ह्याच्या तारा काटेगावपर्यंत गेल्या आहेत; हे मी नक्कीच सांगू शकतो! आपल्याला तिकडेच लक्ष केंद्रित करावं लागेल! मी तिकडच्या पोलिस- स्टेशनशी संपर्क करून काही माहिती मागवली आहे! दिनेश आणि राजन नावाचे तरूण असतील; तर त्याच्यावर लक्ष ठेवायला सांगितलं आहे! दोन-तीन दिवसांत ते कळवतील; त्यानंतर आपल्याला पुढची पावलं टाकायची आहेत!" दिवाकर म्हणाले!
"पण सर! त्यांनी त्याचं नाव- गाव खोटं सांगितलं असेल तर? एवढा गंभीर गुन्हा करणारी माणसं एवढी काळजी घेणारच! ते खरं नाव कसं सांगतील? त्यांनी काटेगावच्या बाजूच्या आंबेगावचे असल्याचं सांगितलं, ते सुद्धा खोटं असू शकतं! रंजना राजेशला ओळखत नव्हती; त्याने टॅक्सीमध्ये स्वतःहून ओळख काढली--- रंजनाकडून माहिती काढून घेण्यासाठी त्याने आंबेगावचा असल्याचं सांगितलं असेल तर?" राघवच्या या बोलण्यावर दिवाकरांनी संमतिदर्शक मान हलवली.
"ही शक्यता नाकारता येत नाही; पण त्यावेळी त्यांना त्यांच्या प्लॅनविषयी खात्री होती! सावज जिवंत रहाणं शक्य नव्हतं! त्यामुळे ते बिनधास्त होते! केदार त्याच्या पोहण्याच्या हाॅबीमुळे जिवंत राहिला--- दुस-या कोणाच्या बाबतीत ते शक्य नव्हतं! त्यामुळे त्यांनी खरा ठाव ठिकाणा लपवला नसावा; असं मला वाटतं! आपल्याला प्रयत्न करायला हरकत नाही! जरी त्यांनी खोटं नाव-गाव सांगितलं असेल; तरी एक गोष्ट नक्की आहे की त्यांना त्या एरियाची चांगली माहिती आहे! --- तिथले नसतील तरीही ते दोघे त्या पंचक्रोशीत रहाणारे असू शकतात! त्यामुळे काटेगावच्या आसपासच्या गावांमध्ये तरी अापल्याला त्यांच्याविषयी माहिती निश्चितपणे मिळेल; याची मला खात्री आहे!" ते म्हणाले.
"आणि त्या कविताचं काय? दागिने आणि पैसे चोरणं तिला सहज शक्य होतं! असं असू शकतं की; थोडे दिवस थांबून संधी मिळाल्याबरोबर तिने नोकरी सोडून दिली असेल!" राघव म्हणाला.
"अपहरण आणि खुनाच्या प्रयत्नाचं प्रकरण जास्त महत्वाचं आहे; ते प्रकरण उलगडत नाही तोपर्यंत केदारला त्याच्या आईला आणि इतरांना भेटवता येणार नाही-- त्याला परत धोका होऊ शकतो! त्यासाठी प्रथम त्या गुन्हेगारांना शोधून काढणं गरजेचं आहे! नंतर चोरीचा तपास सुरू करूया! चोरीचं प्रकरण तितकं महत्वाचं नाही! किंवा असंही असेल; की दोन्ही गुन्ह्यांमधे एकाच टोळीचा हात असू शकतो! असं असेल तर तर एक शोध घेता घेता चोरीचाही शोध लागेल!" दिवाकर म्हणाले.
********
स्वतः काटेगावला जाण्यापूर्वी इ. दिवाकर तिकडच्या पोलिस अधिका-यांशी बोलले होते --- त्यांना केदारची केस समजावून सांगितली होती; आणि रंजना आणि तिच्या कटुंबाची जमेल तेवढी माहिती काढायला सांगितली होती. दोन दिवसांनी त्यांनी काटेगावला फोन केला,
"मी तुम्हाला श्रीपतराव आणि त्यांच्या कुटुंबाची माहिती काढायला सांगितली होती ---- विशेषतः त्यांच्या रंजना नावाच्या मुलीची---! काही संशयास्पद आढळून आलं का तुम्हाला? त्यांनी विचारलं.
" रंजनाचे वडील गावातली एक प्रतिष्ठित आसामी आहे. ते मोठे उद्योजक आहेतच, पण त्याचबरोबर ते चांगले सामजिक कार्यकर्तेही आहेत. शिस्तप्रीय आहेत; पण धनाढ्य असूनही निगर्वी माणूस आहे. त्याना आम्ही चांगले ओळखतो! पण त्याच्या मुलीविषयी आम्ही गावात चौकशी केली! तिच्याबद्दल मात्र गावात अनेक प्रवाद आहेत. असं म्हणतात की गावातल्या एका मुलावर तिचं प्रेम होतं! पण तो मुलगा - दिनेश --- वाईट संगतीत पडलेला होता --- व्यसनी होता; त्यामुळे तिच्या वडिलांना पसंत नव्हता.
दिनेश नाव ऐकताच इन्सपेक्टर सावध झाले.
"मी तुम्हाला दिनेश नावाच्या तरूणांची माहिती काढायला सांगितली होती! हा तोच तर नाही? तो आता कुठे असतो? या केसमधला तो एक महत्वाचा संशयित आहे! त्यालाही शोधून काढा; आणि त्याच्यावर लक्ष ठेवा! मी लवकरच काटेगावला येणार आहे! माझ्या हातात तो सापडायला हवा! जराही हलगर्जीपणा नको!" ते खुश होऊन म्हणाले.
"बहुतेक प्रेमाचा त्रिकोण दिसतोय!" दिवाकर मनाशी म्हणत होते.
******* contd--- part 23.

Rate & Review

Aaradhya

Aaradhya 11 months ago

Shubhangi Kadam

Shubhangi Kadam 11 months ago

Usha

Usha 11 months ago

Vaishali Kamble

Vaishali Kamble 11 months ago

Preeti Patil

Preeti Patil 11 months ago