Irshalgad: Our first night trek books and stories free download online pdf in Marathi

इर्षाळगड : आमचा पहिला नाईट ट्रेक

जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला अचानक कोरोना पेशंट ची झालेली वाढ , यामुळे हा महिना खुपचं दगदगीचा चालला होता. रिफ्रेश होण्यासाठी ट्रेकला जायचं म्हटलं तर महाराष्ट्र सरकारने कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे, खबरदारी म्हणून गडकिल्ले आणि पर्यटनस्थळे बंद ठेवली होती. त्यामुळे "महाराष्ट्र देशा" ट्रेक ग्रुपवर पण काही अपडेट येत नव्हते. हळू हळू कोरोना पेशंटची संख्या कमी होवू लागली. वातावरण जरा निवळायला सुरवात झाली.. भटके, भटकंती साठी बाहेर पडू लागले..मी आशेने प्रसादचे ( महाराष्ट्र देशा ट्रेक ग्रुप) स्टेटस चेक केले तर त्याने येणाऱ्या ट्रेकची जाहिरात टाकली होती.. त्यातल्या त्यात आपल्याला कोणता जमू शकतो याची चाचपणी करून मी आणि अनिलने इर्षाळगड करण्याचे ठरवले.. रोहितला मेसेज करून ट्रेक कन्फर्म करुन टाकला.. पटापट ट्रेकची तयारी केली.. सगळ्यात महत्वाचे थंडीचे कपडे नीट पॅक केले... महाराष्ट्र देशा ग्रुपबरोबर तीन चार ट्रेक केल्यामुळे यावेळी मनात एवढी भीती नव्हती.. ट्रेक लीडर्सवर विश्वास होता की आमचा ट्रेक नक्कीच यशस्वी होणार.. त्यामुळे यावेळी यू ट्यूब वर व्हिडिओ वगैर बघण्याच्या भानगडीत पडलो नाही..
आम्हाला शनिवारी 23 जानेवारीला रात्री 11.15 वाजता CST वरून सुटणारी खोपोली ट्रेन , दादरला पकडायची होती.. ट्रेनने आम्ही कर्जतला उतरणार होतो व पुढे गाडीने नानिवली पर्यंत जाणार होतो.. पुढचा ट्रेक पायी होता...
ठरल्याप्रमाणे मी आणि अनिल वेळेवर कांदिवली वरून निघून दादरला पोहचलो.. प्रसाद आम्हाला तिथेच भेटणार होता.. आम्ही वेळेवर प्लॅटफॉर्म 4 वर पोहचलो.. तिथे प्रसाद बरोबर मयुरेश पण होता.. मयुरेश दुसरा ग्रुप घेवून कळसूबाई ट्रेक लीड करणार होता.. हळूहळू जे जे ट्रेकर्स दादर वरून ट्रेन पकडणार होते ते प्लॅटफॉर्म वर जमा होवू लागले.. ट्रेन अगदी वेळेवर आली.. गर्दी बघून मला बसायला जागा मिळावी म्हणून अनिलने धावत जावून ट्रेन पकडली. त्यामुळे मला बसायला जागा मिळाली.दादर वरून कर्जत पोहचण्यासाठी अंदाजे दोन तास लागतात. बाकीचे ट्रेकर्स त्यांना जवळ पडेल त्या स्टेशन वरून तीच लोकल पकडत होते. प्रसाद, फोनवरून प्रत्येकाचे अपडेट घेत होता.आम्ही साधारण 1.30 च्या सुमारास कर्जतला पोहचलो.कर्जतपासून पुढे नानिवली गावापर्यंत शेअर टॅक्सी ने जायचे होते. ट्रेक लीडर्सनी अगोदरच या टॅक्सी बुक करून ठेवल्या होत्या. प्रत्येकजण 7/7 असे आरामात एकएका ओमनी टॅक्सी मध्ये बसले आणि नानिवलीच्या दिशेने आमचा प्रवास सुरू झाला.अर्धा तासाचा प्रवास करून आम्ही नानिवलीला पोहचलो. मला वाटलं की आता या गावातच पहाटे पर्यंत आराम करून पहाटे ट्रेक सुरु करू. तेवढ्यात ट्रेक लीडर्सनी सर्वांना गोलाकार उभे राहायला सांगून आपली ओळख करून द्यायला सांगितली. तेंव्हाच मला समजलं की आत्ता लगेच ट्रेक सुरु करणार आहेत. सगळ्यांनी आपापली ओळख करून दिली. मला मात्र आज एक ट्रेक लीडर नवीन दिसत होता.मी मनातल्या मनात अंदाज लावत होते, कोण बरं असावा हा? जेंव्हा ट्रेक लीडर्स आपली ओळख करून देवू लागले त्यावेळी त्या अनोळखी लीडरचे नाव ऐकून मला आश्चर्याचा सुखद धक्का बसला. तो रोहित होता.रोहित साबळे! ज्याच्याशी मी प्रत्येक ट्रेकला जायच्या अगोदर बोलायचे, ज्याच्याकडे बुकिंग कन्फर्म करण्यासाठी पैसे पाठवायचे , ट्रेक संबंधी काही शंका असतील तर प्रसाद किंवा रोहितला मेसेज करायचे , आणि तोही " हो ताई , हो ताई "करत माझ्या सगळ्या शंकांचं निरसन करायचा..तो रोहित!! For me it was big surprise ..
सगळ्यांची ओळख झाली आता ट्रेक लीडर्स नी पुढची ऑर्डर दिली."आता आपण ट्रेकला सुरवात करत आहोत. दीड ते दोन तासाचा ट्रेक करून आपल्याला इर्षाळवाडी येथे पोहचायचे . त्यानंतर तिथे किशोर दादा यांच्या घरी थोडा वेळ आराम करून पहाटे परत ट्रेक सुरु करून किल्ल्यावर पोहचायचे." आम्ही सगळे टॉर्च काढून ट्रेक साठी तयार झालो. साधारण 2.30 च्या सुमारास ट्रेकला सुरवात केली. सुरवातीचा पॅच सपाट पायवाट आहे नंतर चढाईला सुरवात होते. जशी चढाई सुरु झाली तसं मला थकायला होतं होत. मग मी मध्ये मध्ये थांबून परत चालायला सुरवात करत होते. आम्ही टॉर्चच्या उजेडात पुढे पुढे जात होतो. आभाळ असल्यामुळे काळोख जास्त जाणवत होता. मध्येच ढग बाजूला होत होते व चंद्रमा आपले दर्शन देत होता. त्याच्या त्या सौम्य प्रकाशात टॉर्चची गरज पण पडत नव्हती.वाटेने जाताना अंधारात काय काय आहे हे दिसत नसले तरी उजव्या हाताला पसरलेला मोरबे धरणचा प्रचंड जलाशय त्या अंधारात पण आपले अस्तित्व सिध्द करत होता.. वरून खाली नजर टाकली तर खालचा परिसर विजेच्या दिव्यांत चमकत होता.
प्रत्येकजण जमेल त्या गतीने इर्षाळवाडी कडे चालत होता. रोहित लीड करत होता .प्रसाद आणि आकांक्षा सगळ्यात पाठी होते. आम्ही नेहमी प्रमाणे प्रसाद आणि आकांक्षा च्या पुढे म्हणजेच सगळ्यात पाठी होतो. जाताना एक दोन ट्रेकर्स ना त्रास झाला पण प्रसाद आणि आकांक्षा ने सांभाळून घेतलं .अजिबात घाई न करता त्यांना जमेल तसं त्यांची काळजी घेत इर्षाळवाडी पर्यंत पोहचायला मदत केली.
दीड तासाची पायपीट करून आम्ही किशोर दादाच्या घरी पोहचलो. ग्रुपचे बाकीचे मेंबर्स आधीच तिथे पोहचले होते. थंडी एवढी होती की हिमालयात आल्याचा भास होत होता. किशोर दादाला याची कल्पना असावी म्हणूनच त्यांनी आधीच घराबाहेर शेकोटी पेटवून ठेवली होती. कडाक्याच्या थंडीत ती शेकोटी म्हणजे आमच्यासाठी पर्वणीच जणू! तिथे गेल्यावर आम्ही बॅगा ठेवून, थोडा वेळ झोप घ्यावी या विचाराने जिथे जागा मिळेल तिथे आडवे झालो.पण थंडी एवढी वाजत होती की मला एक शाल आणि एक चादर घेऊन पण कुडकुडायला होत होतं. मला काही ती थंडी सहन होत नव्हती. अनिल मात्र शांत झोपला होता.त्याची झोपमोड करून मी त्याला उठवले आणि शेकोटी कडे जाऊया असे सांगितले. शेकोटी भोवती बसल्यावर माझ्या जीवात जीव आला. हळू हळू उबदार वाटू लागले. शेकोटी भोवती सगळ्यांच्या छान गप्पा रंगल्या होत्या . काही मेंबर्स आतमध्ये बसून गेम खेळत होते तर काहीजण गाढ झोपले होते. तास दीड तास कसा गेला समजलेच नाही.5.30 च्या सुमारास ट्रेक लीडर्स नी चहा नाष्टा तयार असल्याचे सांगितले. याचाच अर्थ असा की आता पुढचा ट्रेक सुरु करायची वेळ झाली.आम्ही चहा नाष्टा घेवून फ्रेश झालो.
रोहितने सगळ्यांची काऊंटिंग केली आणि आम्ही किल्ल्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली. सकाळचे आल्हाददायक वातावरण आणि फ्रेश मूड यामुळे चढताना अजिबात त्रास जाणवत नव्हता.समोरच किल्ला दिसत होता. जाताना उजव्या हाताला एक छोटेसे देवीचे मंदिर आहे.किल्ल्याकडे जाणारी पायवाट चांगलीच मळलेली आहे त्यामुळे चुकण्याची शक्यता कमी आहे. एका ठिकाणी मात्र दोन वाटा फुटतात तिथे रोहित उभा होता नाहीतर आम्ही नक्कीच वाट चुकलो असतो.
अर्धा तास चालल्यावर आपण किल्ल्याच्या पायथ्याशी एका सपाट पठारावर येवून पोहोचतो. समोर दिमाखात उभा असलेला इर्षाळगड बघून इथपर्यंत आल्याचं सार्थक वाटतं. इथून गड त्रिकोणी सुळक्यासारखा दिसतो. आपण गुगल वर इर्शाळगड म्हणून सर्च केलं की जे फोटो दिसतात ते याच पठारावरून घेतलेले असावेत.या किल्ल्याचा उपयोग आजूबाजूच्या परिसराची टेहळणी करण्यासाठी होत असावा. किल्ल्याभोवती कोणतीही तटबंदी नाही हे या किल्ल्याचं एक अनोखं वैशिष्ट्य आहे.
आम्ही सूर्योदयासाठी इथेच थांबायचे ठरवले . सगळेजण आरामात इथे तिथे बसून दिसणारा नजारा पाहण्यात गुंग झाले. अजून बऱ्यापैकी अंधार होता त्यातच ढगाळ वातावरण त्यामुळे सूर्यदेव दर्शन देतील की नाही याचा खात्री नव्हती. ढगाळलेल्या वातावरणात पण आजूबाजूचा परिसर छान वाटत होता. हळू हळू थोड उजाडलं . तसे सगळेजण फोटोशूट करण्यात बिझी झाले. आमच्या ग्रुप मधील ओमकार स्वतःचे फोटो तर काढत होताचं पण इतरांचे पण फोटो अगदी मनापासून काढत होता. ट्रेक नंतर त्याने जेंव्हा फोटो शेअर केले तेंव्हा जवळ जवळ दीडशे ते दोनशे फोटोज् त्याने इतरांचे काढले होते. थँक्यू मित्रा !!
ग्रुप फोटो पण इथेच घेऊया असे आकांक्षा म्हणाली. मग किल्ला बॅकग्राऊंडला येईल असे सर्वजण उभे राहिले. ग्रुप फोटो काढताना सगळ्यांनी मिळून खूप एन्जॉय केलं आणि ही एन्जॉयमेंट जर एखाद्या त्रयस्थ व्यक्तीने बघितली असती तर आम्ही सगळे पहिल्यांदा भेटतोय असे कोणालाच वाटले नसते. एवढा आमचा ग्रुप छान होता..Guys,love you, एकदम दिल से !!
आता मात्र किल्ल्याकडे निघुया असे लीडर्स नी सांगितले.या पुढचा पॅच थोडा चढाईचा आहे. मध्ये चढाई शक्य व्हावी म्हणून दोन शिड्या लावल्या आहेत. पहिल्या शिडीच्या बाजूलाच एक पाण्याचं टाकं आहे.त्यातलं पाणी बऱ्यापैकी स्वच्छ होतं . या दोन शिड्या नसत्या तर चढणे कदाचित अवघड झाले असते. दुसऱ्या शिडी जवळ तिथले स्थानिक ,एक म्हातारे बाबा ट्रेकर्स ना चढताना त्रास होवू नये म्हणून येवढ्या कडाक्याच्या थंडीत पण उभे होते. त्यांची ती निस्वार्थी सेवा आम्हाला खूप काही शिकवून गेली.. ते थंडीत कुडकुडत आहेत असे बघून आमच्या ग्रुप मधील रसिका शिकरे हिने तिचा स्वेटर काढून त्यांना दिला. रसिका तुला माझा सलाम 🙏🙏.
दोन शिड्या चढल्यानंतर नैसर्गिकरित्या बनलेल्या नेढ्याजवळ आपण पोहोचतो. नेढे म्हणजे वारा आणि पाऊस यांच्या सतत होणाऱ्या माऱ्यामुळे नैसर्गिकरीत्या कातळात तयार झालेले मोठे छिद्र. अशी मोजकीच नेढी सह्याद्रीत आहेत. इर्षाळगडाचा हा युनिक पॉइंट आहे. ग्रुप मधील सर्वांनी नेढ्यात बसून छान फोटो काढले. किल्ल्यावरील नेढ्याकडे पोहोचताना शेवटच्या काही अंतराची चढाई कठीण आहे, पण तरीही नेढ्यापर्यंत कोणत्याही गिर्यारोहण तंत्राशिवाय पोहोचता येतं. मात्र नेढ्यापासून पुढे असणाऱ्या सुळक्याची चढाई करण्यासाठी प्रस्तरारोहणाचं तंत्र अवगत असणं आवश्यक आहे. आम्ही पुढे गेलो नाही. अर्धा पाऊण तास ईथे घालवल्यावर, या ठिकाणा वरूनचं आम्ही गड उतरायचे ठरवले. उतरताना थोडी काळजी घ्यावी लागते. माती आणि मुरूम यामुळे पाय घसरण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे सगळे अगदी सावकाश काळजीने उतरत होते . तरीपण एक दोन जण घसरून पडलेच.पण ट्रेकिंग करताना इतना तो चलता हैं 😀
खाली येत असताना ग्रुप मधील पवन नरखेडे याने गडावरील कचरा गोळा करायला सुरवात केली. त्याला इतर मेंबर्स नी पण मदत केली. पवनचा हा उपक्रम अभिमानास्पद होता. सगळ्यांना एकचं विनंती आहे की कोणत्याही गडावर गेल्यावर प्लॅस्टिकच्या पिशव्या, बाटल्या, खाण्याचे रॅपर्स गडावर न टाकता आपापल्या बॅगमध्ये ठेवावेत आणि खाली आल्यावर कचराकुंडीत टाकावेत. म्हणजेच गड संवर्धन करण्यासाठी सगळ्यांचा हातभार लागेल.
आम्ही गड उतरून किशोर दादाच्या घरी आलो.. हातपाय धुवून फ्रेश झालो. प्रसादने सांगितले की आता लगेच खाली उतरून जायचे आहे. नानिवलीला गाड्या बोलावल्या आहेत तिथून कर्जतला जावून पोटपूजा करूया.
उतरताना मात्र रात्री चढताना जो आजूबाजूचा परिसर दिसला नव्हता.. तो बघत बघत, मध्येच कुठेतरी फोटो काढत आम्ही तासाभरात खाली आलो. खाली गाड्या उभ्या होत्याच. तिथून कर्जतला आल्यावर आम्ही कर्जतच्या फेमस " मावूकर हॉटेल" मध्ये पोटपूजा करायला गेलो. यांची मिसळ खुपचं फेमस आहे. भूक खूप लागली असल्याने ,सगळ्यांनी मिसळ पाव वर आडवा हात मारला. मिसळ खरचं खूप टेस्टी होती. पोटपूजा तर अगदी मनासारखी झाली..
आता घरी जायची ओढ लागली. कर्जत वरून CST लोकल पकडुन आम्ही दादर कडे रवाना झालो..


डॉ. स्वाती अनिल मोरे
कांदिवली पूर्व