आता दिसणे सरले- संत सोहिरोबानाथ books and stories free download online pdf in Marathi

आता दिसणे सरले- संत सोहिरोबानाथ

आंबिये बुवा झपाझपा पावलं टाकत सावंतवाडीच्या दिशेने चालले होते.बांदा ते सावंतवाडी हे अंतर सुमारे चार ते पाच कोसांचे.सावंतवाडी राजदरबारातून तातडीच्या सांगावा आला होता.कर्तव्यतत्पर आंबियेबुवांनी त्वरित बाहेर पडण्याची तयारी केली.पत्नी काहीतरी खाऊन चला म्हणून आग्रह करत होती पण त्यांनी नकार दिला. पण त्यांची भगिनी मागून एक झोळी घेवून धावत आली.
"अच्युत,हा फणस घेवून जा आईने दिलाय."
"अग,आता हा भार कश्याला?"
"भार कसला?छोटासा तर आहे.वेळेला उपयोगी पडेल.याच्या रसाळ गर्यांनी तूझी मधुर वाणी अधिक रसाळ बनेल." भगिनी हसत म्हणाली.
"ठिक आहे .दे ती झोळी. "
बुवांनी झोळी खांद्याला अडकवली व पुन्हा मार्गस्थ झाले.
अच्युत आंबिये मूळचे सावंतवाडी संस्थानच्या पेडणे महलातील. खर आडनाव संझगिरी पण घराभोवती आंबराई असल्याने त्याना लोक आंबिये म्हणून ओळखू लागले .तेच पूढे आडनाव झाल.अच्युत परंपरागत कुलकर्णी पद सांभाळत. त्यांची हुषारी,प्रामाणिकपणा व वैराग्यवृत्ती पाहून त्यांची राजदरबारी त्यांची किर्ती वाढली. सावंतवाडी ते पेडणे हे अंतर खूप असल्याने ते बांदा येथे रहावयास आले .अध्यात्मिक प्रवृत्तीचे
बुवा अगदी सहजतेने पदे रचत व गात.ही सारी पदे त्यांची भगिनी लिहून घेई.आज भगिनीने दिलेला फणस त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणार होता हे त्यावेळी कुणालाच कळल नव्हते.
दोन कोस पार करून आंबियेबुवा इन्सुली घाटीजवळ आले.
क्षुधा व तहान यामुळे थकवा आला होता.घाटीच्या पायथ्याशी असलेल्या वटवृक्षाच्या बाजूला असलेल्या भल्यामोठ्या पाषाणावर त्यानी झोळी ठेवली व क्षणभर शांत बसले.सभोवार घनदाट अरण्य,जंगली श्वापदांचे आवाज,स्वछंद पणे उडणार्या पक्ष्यांचा किलबिलाट यामुळे वातावरण गंभीर पण चैतन्यमयी झाले होते.पाषाणाच्या बाजूला एक अवखळ झरा खडकावरून झेपावत खाली कोसळत होता.बुवांनी त्या झर्याचे पाणी ओंजळीने पिऊन तहान भागवली .चेहर्यावर पाण्याचे हबकारे मारले.प्रसन्न मनाने ते पुन्हा पाषाणावर येवून बसले.झोळी तला फणस काढला.दोन्ही हातांनी फणस फाडला.आत पिवळेजर्द रसाळ गरे दिसू लागले.त्यांचा मधुर सुवास परिसरात पसरला.बाजूलाच पडलेल्या वडाच्या भल्यामोठ्या पानावर त्यांनी पाच टपोरे गरे काढून घेतले. त्यातला एक गरा उचलून खाणार तेवढ्यात त्यांच्या कानी गंभीर ध्वनी पडला.
"कुछ खानेको दे दो बच्चा, हमको भी भूक लगी है."
आंबिये बुवा भान हरपून बघत राहिले. बाजूच्या वनराईतून एक भगवी कफणीधारी योगी वेली बाजूला करत बाहेर आला.हाती दंडकमंडलू ,भस्मविलैपित अंग---तेजस्वी चेहरा ,मुखकमलावर दैवी हास्य व गळ्यात अन् मनगटात रूद्राक्ष माळा असे ते दिव्य रूप पाहून बुवांची अवस्था 'माझा मी न राहिलो ' अशी झाली.त्याक्षणी वातावरणातील अणू-रेणू दैवी संगीतावर ताल धरून नाचत असल्याची जाणीव बुवांना झाली.वटवृक्षाचा परिसर अनोख्या गंधाने भरून गेला होता.अभावितपणे बुवांनी हात जोडले व गर्यांच पान उचलून त्या योग्याच्या हाती दिल.स्मितहास्य करत योग्याने एक गरा मुखात घातला व दुसरा गरा बुवांच्या मुखी घातला.
"बहोत अच्छा,किती गोड ." योगी प्रसन्नतेनं म्हणाला.
बुवा काहीच बोलले नाही.अजूनही ते भावमग्न अवस्थेतून बाहेर आले नव्हते.
"अरे मी गैबीनाथ-गहिनीनाथ,तुमको जगाने आया हू.तूझं जीवितकार्य सांगायला आलोय.तूला अज्ञानी लोकांना जाग करायचंय.मस्त कलंदर बनून नाथ संप्रदायाची ध्वजा पूढे घेवून जायचीय.तुझ्या अभंगानी लोकांना ईश्वरभक्तीची गोडी लावायची आहे."
गैबीनाथांनी आपला उजवा हात बुवांच्या मस्तकावर धरला व कानात सोःअंहम मंत्र सांगितला.
"आजपासून तू अच्युत नाहिस.अबसे तुम सोहिरोबानाथ!
सोःअहंम या मंत्रांचा जप सतत करायचा."
त्या क्षणापासून अच्युत आंबिये हे सोहिरोबानाथ आंबिये झाले.
गैबीनाथांचा तो स्पर्श एवडा उष्ण होता की सोहिरोबानाथांना वाटल की प्रत्यक्ष सूर्याच तेज त्यात सामावले आहे .क्षणभर त्यांना भोवळ असल्यागत वाटल.
गैबीनाथांनी उरलेला फणस त्यांच्या हाती दिला.
"ये प्रसाद ले लो. अशीच मधुर आणी रसाळ पद तुझ्या मुखातून बाहेर पडतील.आता मी जातो."
क्षणार्धात गैबीनाथांचा ती आकृती धुक्यात विरून गेल्यासारखी नष्ट झाली.
सोहिरोबानाथांचा अहंभाव गळून पडला.त्यांना आत्मसाक्षात्कार झाला.त्यांच जीवितकार्य त्यांना समजल.
त्यांच्या मुखातून सहजपणे शब्द बाहेर पडले---
" मीपणा तुटी, पडली मिठी
आजि विरक्ती वाटली मोठी."
त्याना प्रत्यक्ष देव सापडला होता. अंतरात ज्ञानदिवा प्रज्वलित झाला होता. वैराग्यवृत्ती निर्माण झाली.
पुढे सावंतवाडीची वाट चालता -चालता कुलकर्णी पदाचा राजिनामा द्यायचा निश्चय केला. राजदरबारी पोहचताच त्यांनी आपला राजिनामा व लेखणी राजांसमोरच्या तबकात ठेवली. राजे चकित झाले.
" बुवा ,आमचं काही.चुकलय का?"
"नाही राजा,आम्हीच वाट चुकलो होतो!गैबीनाथांनी योग्य वाट दाखवली. आता एके ठिकाणी थांबणे नाही. अंतरीचा ज्ञान दिवा सतत तेवत ठेवायचा आहे. " सारा दरबार स्तब्ध झाला. सर्वांना उद्देशून ते म्हणाले-
हरीभजनाविण काळ घालवू नको रे
अंतरीचा ज्ञान दिवा मालवू नको रे
दोरीच्या सापा भिऊन भवा
भेटी नाही जीवा शिवा
अंतरीचा ज्ञानदिवा मालवू नको रे.
सोहिरोबानाथ नोकरी सोडून भ्रमंतीला निघाले.आंबोली घाटातून करवीर नगरी पोहचले.तिथे महालक्ष्मीची काही काळ सेवा केली.नंतर पंढरपुरी प्रस्थान केल,प्रत्यक्ष विठ्ठल विट सोडून त्यांच्या भेटीला आला. पुढे अक्कलकोटात त्यांनी मठ स्थापन करून अनेकसाधकांना नाथपंथाची दिक्षा दिली. पण एका ठिकाणी न थांबवण्याचा वसा त्यांनी घेतला होता. पुढे सूरत येथे मठ स्थापन करून ते गिरनार पर्वतावर पोहचले .तिथे सोःअंहम मंत्र जपत तप केल.त्याना तिथे अनेक सिद्धी प्राप्त झाल्या.पण ते सिध्दींच्या जाळ्यात अडकले नाहीत. पुढे ते
इंदूर-उज्जैनला रवाना झाले.एका धर्मशाळेत एका दुष्ट अश्या हुक्का पिणार्या इसमाने त्यांच्यावर मुद्दाम धूर सोडायला सुरूवात केली.ते शांत राहिले अखेर सोहिरोबानाथांची थोरवी पटून तो त्यांना शरण गेला. त्याला उद्देशून त्यानी हिंदी पद गायिले-
'तुम अच्छा हुक्का पिना'
या उपदेशाने तो त्यांचा अनुयायी झाला.
असच एकदा रात्री एकांतस्थानी समाधीत मग्न असताना एका समाजकंटकाने त्यांना उचलून बाजूच्या विहिरीत फेकले.
सकाळी तिथून जाणार्या लोकांना विहिरीतुन भजनाचा आवाज ऐकू आला. आत सोहिरोबानाथ पाण्यावर आसनमांडी घालून अभंग गात होते.या घटनेने सर्वत्र त्यांची किर्ती झाली.कोकणातून आलेल्या या संतांची कहाणी महादजी शिंदेच्या सेनापती जिवबादादाबक्षी केरकर यांच्या कानी गेली. ते तर सोहिरोबानाथांचे गोव्यातील सहपाठीच निघाले.त्यांच्या विनंतीला मान देत सोहिरोबानाथ शिंदेच्या दरबारी गेले.प्रत्यश महादजी शिंदे त्यांच्या स्वागतासाठी उठून उभे राहिले.
सोने -चांदीचे भरलेले तबक त्यांच्या समोर ठेवण्यात आले .
"सोना चांदी हमको नही चाहिए
हम अलखभुवन के राही ।"
अस म्हणत त्यांनी ते तबक दूर सारले.
महादजी तलवारबाजी सोबत काव्य रचत त्यांनी आपली वही सोहिरोबानाथांसमोर ठेवली .
'अरे ही कसली भिकारडी कविता यात देवाचं नावही नाही '
असे म्हणत त्यांनी भर दरबारात ती वही फेकली.
चिडलेल्या शिंदेनी तलवार उचलली पण निर्भीड व निर्भय नाथांसमोर ते अखेर नत मस्तक झाले.
सोहिरोबानाथांची योग्यता लक्षात घेवून क्षिप्रा नदीकाठावर शिंदेंनी त्यांना मठ बांधून दिला.'श्री नाथ' या नावाने मुद्रा काढली.
एका रात्री सोहिरोबानाथच्या खोलीत दिव्य प्रकाश पसरला. मच्छिंद्रनाथ,गोरक्षनाथ व जालंदरनाथ तिथे अवतरले.गोरक्षनाथांनी त्यांचा हात पकडला व म्हणाले -
'चलो सोहिरा तेरा यहांका काम खत्म हुआ. चल आमच्या सोबत.'
नाथत्रियींच्यासोबत सोहिरोबानाथ अंनताच्या प्रवासाला निघून गेले.
दुसर्या दिवशी सोहिरोबानाथ नाही हे पाहून भक्त व शिष्यांनी
त्यांचा सर्वत्र शोध घेतला.पण नाथ कुठेच सापडले नाहित पण त्यांच्या अंथरूणाखाली एका कागदावर लिहिलेलं पद सापडल---
' दिसणे हे सरले अवघे प्राक्तन हे मुरले
आलो नाही गेलो नाही,मध्ये दिसणे हे भ्रांती
---- ----
-------- गैबिप्रसादे गैबचि झाले,आप आपणामधी लपले.'

जय जय अलख निरंजन !

(नाथांचे गोवा पालये येथील मूळ घर सांस्कृतिक वारसा म्हणून जतन केलय. बांदा येथील घराजवळ मंदिर बांधलय तर सावंतवाडी इन्सुली येथे सुंदर असे आत्मसाक्षात्कार मंदिर व धर्मशाळा उभारण्यात आलीय.गैबीनाथांची भेट झालेला तो पाषाण व वटवृक्ष आजही आहे.नाथांच्या भगिनीने लिहून काढलेली नाथांची ग्रंथसंपदा मराठी साहित्यातील अनमोल ठेवा ठरला आहे.)

--