TRIP TO FOREST PART 5 books and stories free download online pdf in Marathi

अभयारण्याची सहल - भाग ५

अभयारण्याची सहल

भाग ५  

भाग ४  वरुन पुढे वाचा....

संदीप ला शुद्ध आलेली बघून त्यांना आनंद झाला. त्याच्याशी किती बोलू आणि किती नाही असं आईला झालं, पण बाबांनी समजावलं. गेले पांच दिवस सगळेच टेंशन मध्ये होते. पण आता ते दूर झालं होतं.

“काय ग आई, ही मुलगी इथे का थांबतेय?” – संदीप.

“अरे तू जिवाची पर्वा न करता तिला वाचवलं ना म्हणून येतेय तुझी काळजी घ्यायला.” – संदीपची आई. 

“अग पण आपली ओळख नाही, पाळख नाही, अशी कशी येतेय? तिच्या घरचे सुद्धा काही म्हणत नाहीत? अग ती काल रात्री पण इथेच होती.” – संदीप. 

“चांगली आहे मुलगी.” आई संदीपला म्हणाली, “मला शलाका म्हणाली की, ज्या माणसांनी आपल्या जिवाची पर्वा न करता माझं रक्षण केलं, त्यांची काळजी घेण्याचा पहिला हक्क माझा आहे. तेंव्हा आता ते बरे होई पर्यन्त मीच इथे थांबणार. आम्ही सगळेच आळी पाळीने थांबणार होतो पण तिने आमचं काही एक ऐकून घेतलं नाही. गेले पांच दिवस तीच इथे दिवस रात्रं थांबते आहे. कौतुकाची गोष्ट आहे. इतकी सेवा फक्त आणि फक्त बायकोच करू शकते. माझ्या तर खूपच मनात भरली आहे ती.”

“अग काय हे आई, कुठल्या कुठे पोचलीस तू? मी तर तिला नर्सच समजलो होतो, आणि तिलाच विचारलं की ती मुलगी सुखरूप आहे का म्हणून.” – संदीप  

“मग काय म्हणाली ती?” – आई.

“तर म्हणाली की ही बघा तुमच्या समोरच उभी आहे, तेंव्हा मला कळलं की ती नर्स नसून, तीच मुलगी आहे, जिच्या साठी एवढं महाभारत घडलं. तिचं नाव सुद्धा मला कालच कळलं. आणि तू सुता वरून स्वर्ग गाठते  आहेस.” संदीपला काही आईचं बोलणं आवडलं नव्हतं.

“अरे जितके दिवस तिला पाहते आहे, तेवढ्यांवरून कळलं मला की तुला ती सुखातच ठेवेल म्हणून.” – आई.

“आई, काय बोलतेस तू ? हे दुखणं कीती दिवस घेईल हे माहीत नाही, प्रायवेट नोकरी आहे माझी, टिकेल की नाही हे ही माहीत नाही. वरतून जखमे मुळे चेहरा विद्रूप झालेला असणार, ती फक्त कर्तव्याच्या भावनेने इथे येतेय, ही उर्मी काही दिवसांतच ओसरेल. छे, उगाच काही कल्पना करत बसू नकोस. जे आहे ते ठीकच  आहे.” संदीप निर्वाणीचं बोलला.  

आई पुढे काही या विषयावर बोलली नाही. कदाचित संदीपच्या बोलण्यावर विचार करत असावी. मग जेवण झाल्यावर संदीपला सुद्धा झोप लागली.

संदीपला जाग आली तेंव्हा सहा वाजले होत आणि शलाका आली होती आणि आई तिच्याशी गप्पा मारत होती. बाबा कुठे दिसत नव्हते, बहुधा बाहेर गेले असावे,

त्याला उठलेला पाहून शलाका जवळ आली म्हणाली,  

“उपमा आणला आहे, थोडा खाऊन घेता का?. पण आता थंड झाला असेल. चालेल?”

“नको. आता भूक नाहीये. जेवूच एकदम.” – संदीप.

“ठीक आहे. चहा हवा का?” – शलाका.

“चालेल.” – संदीप.  

“घेऊन येते.” आणि ती कॅंटीन कडे निघाली.

“आई, ही पुन्हा आली?” संदीपने विचारले.

“अरे माघाशीच नाही का सांगून गेली की चार वाजे पर्यन्त येते म्हणून, तशी ती आली. तुलाच झोप लागली होती.” – आई.  

“अग पण आता ही रात्री पण थांबणार आहे का?” – संदीप.

“हो.” – आई.  

“बाबांना थांबू दे ना. उगाच तिला कशाला त्रास द्यायचा.” – संदीप.  

“तूच बोल बाबा. आमचं काही ती ऐकत नाही या बाबतीत.” – आई.  

“आई, मी कसं बोलणार, तूच बोलायला पाहिजे. ती माझ्या साठी कष्ट करतेय आणि मीच नको म्हणायचं, हे बरोबर दिसत नाही. तूच सांग की इथे तूच थांबणार आहे म्हणून. अग परक्या माणसाकडून कशी सेवा करून घ्यायची ? संकोच वाटतो फार.” – संदीप.  

शलाका रूम मध्ये आली होती. म्हणाली, “चहा आणलाय.” आणि तिने बेड ची डोक्याची बाजू वर उचलली आणि चहाचा ग्लास संदीपच्या हातात दिला. संदीप ने एक घोट घेतल्यावर म्हणाली,

“कसला संकोच वाटतो?”

“काही नाही, असंच.” संदीप ने जरा बिचकतच उत्तर दिलं.

संदीप ची आईच म्हणाली की

“अग त्याला तुझा संकोच वाटतोय. तू चहा आणतेस, धाव पळ करतेस त्याचा संकोच वाटतोय. मला म्हणतोय की परक्या माणसाकडून अशी अपेक्षा कशी करायची? पहा बाई आता तूच.”

“काळजी करू नका. मी देते त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं. निश्चिंत पणे घरी जा. आता मी आलेय.” शलाकाने सांगितले.  

मग थोड्या वेळाने आई आणि बाबा निघाले.

“बाबा, आज तुम्ही थांबा न. रात्रीची वेळ आहे, या मुलीला जाऊ द्या घरी.” – संदीपने पुन्हा टुमणं लावलं.  

“अरे माझी  काही हरकत नाहीये पण ही मुलगी तयार होईल तर ना. तिने तर आम्हाला साफ सांगितलं की तीच इथे थांबणार म्हणून. आणि दोघा जणांना थांबू देत नाहीत. असं करतो, उद्या मी हिच्या भावाशी बोलतो मग ठरवू. मग तर झालं?” – बाबा.

मग आठ वाजता जेवण आलं. डॉक्टर चा राऊंड झाला, औषधं देऊन झाली, मग त्याचं अंथरूण, पांघरूण व्यवस्थित करून शलाका म्हणाली की,

“आता दहा वाजले आहेत. झोपायची वेळ झाली आहे, शांत झोपा. जितका आराम कराल तेवढी लवकर रिकव्हरी होईल.”

“जबरदस्ती आहे झोपायची?” – संदीपने जरा चिडक्या स्वरातच विचारले.

“हो, आणि तुमच्याच भल्या साठी आहे.” – शलाकाचं उत्तर.  

“तुम्ही का थांबलात इथे, चांगलं बाबांना म्हणत होतो की तुम्ही थांबा म्हणून, तुम्ही का एवढा त्रास घेता आहात?” – संदीप.

“माझा हक्क आहे इथे थांबण्याचा आणि हे त्यांना पण पटलं आहे.” – शलाका.

“अहो, तुमची आणि माझी साधी ओळख पण नाही, आणि तुम्ही हक्क कसला दाखवता आहात?” – संदीप.

“हे बघा, पेशंट नी वाद नसतो घालायचा. जे सांगितल्या जाईल ते शांत पणे ऐकायचं असतं. झोपा आता. नाही तर वाघ येईल मग काय कराल?” – शलाका मिस्किल पणे म्हणाली.

संदीपला हसायला आलं.

“हसताय कशाला?” – शलाका.

“लहान मुलाला दाखवतात तसा धाक घालताय मला तुम्ही.” संदीप म्हणाला.  

मग शलाकाला ती काय बोलली हे आठवलं आणि तिला पण हसू आलं. आणि तिला हसतांना पाहून संदीपला पण हसायला आलं.

“अहो शलाका मॅडम, हे सगळं तुम्ही का करताय?” – संदीप.

“सांगितलं ना की माझा हक्कच आहे म्हणून.” – शलाका आता ठामपणे म्हणाली.

“तो कसा काय हे जरा सांगाल का?” आता संदीपला तिच्याशी बोलण्यात मजा वाटायला लागली होती.

“आपली कुठलीही ओळख नसतांना तुम्ही माझ्या साठी जिवाची बाजी लावलीत ते कुठल्या हक्कानी?” शालाकाचा बिनतोड सवाल.

“हक्क कसला, ते कर्तव्यच होतं माझं आणि हे मी तुम्हाला आधीही सांगितलं आहे.” – संदीपने सफाई दिली.  

“तुम्ही आणखीही म्हणाला होता की जवान लढतात ते कर्तव्य म्हणून बरोबर?” – शलाका.

“हो.” संदीप.  

“कर्तव्य का असतं? कारण त्यांचा देशावर हक्क असतो म्हणून. मग याच न्यायाने मी कर्तव्य करते आहे ते माझा तुमच्या वर हक्क आहे म्हणूनच. कळलं का?” – शलाकाने आपला मुद्दा मांडला.

“यावर मी काय बोलणार आता?” – संदीप.

“नकाचं बोलू. शांत पणे झोपा. आणि काही लागलं तर संकोच न करता मला सांगा. मी आहे इथे.” शलाकाने चर्चा संपवली.

 

क्रमश:.........

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com

धन्यवाद.