TRIP TO FOREST PART 6 books and stories free download online pdf in Marathi

अभयारण्याची सहल - भाग ६

अभयाराण्याची सहल

भाग ६

भाग ५  वरुन पुढे वाचा....

 

“आपली कुठलीही ओळख नसतांना तुम्ही माझ्या साठी जिवाची बाजी लावलीत ते कुठल्या हक्कानी?” शालाकाचा बिनतोड सवाल.

“हक्क कसला, ते कर्तव्यच होतं माझं आणि हे मी तुम्हाला आधीही सांगितलं आहे.” – संदीपने सफाई दिली.  

“तुम्ही आणखीही म्हणाला होता की जवान लढतात ते कर्तव्य म्हणून बरोबर?” – शलाका.

“हो.” संदीप.  

“कर्तव्य का असतं? कारण त्यांचा देशावर हक्क असतो म्हणून. मग याच न्यायाने मी कर्तव्य करते आहे ते माझा तुमच्या वर हक्क आहे म्हणूनच. कळलं का?” – शलाकाने आपला मुद्दा मांडला.

“यावर मी काय बोलणार आता?” – संदीप.

“नकाचं बोलू. शांत पणे झोपा. आणि काही लागलं तर संकोच न करता मला सांगा. मी आहे इथे.” शलाकाने चर्चा संपवली.

“सारखं झोपा, झोपा असं नका म्हणू. मला तुमच्याशी बोलायचं आहे.” - संदीप  

“सकाळी बोलू की आपण, मलाही आता झोप आली आहे.” – शलाका.  

“नको आत्ताच. पेशंट चं मन मोडायचं नसतं. माहीत आहे ना. आणि तसंही सकाळी गोंधळ असतो, बोलणं जमणार नाही.” – संदीप.  

शलाकानी खुर्ची बेड जवळ सरकवली.

“मला प्रॉब्लेम नाहीये. तुम्हाला जागरण होऊ नये म्हणून मी म्हणत होते. काय बोलायचं आहे तुम्हाला, इतकं महत्वाचं आहे का ते? मुद्दाम जागरण करून, बोलण्या सारखं?” – शलाका जरा अनिच्छेनेच म्हणाली.

“हो, माझ्या दृष्टीने फार महत्वाचं आहे. तुम्ही प्लीज आढे वेढे घेऊ नका.” – संदीप.  

“ओके. आता तुम्ही इतका पिच्छाच पुरवता आहात, तर ऐकतेय मी. बोला.” शलाकानी शरणागती पत्करली.

“हे पहा मॅडम, तुम्ही हे जे काही करता आहात ते बरोबर नाहीये. तुम्हालाच पश्चात्ताप होईल.” – संदीप.

“पहिली गोष्ट म्हणजे, मला मॅडम म्हणू नका. माझं नाव शलाका आहे. आणि पश्चात्तापाचा प्रश्न येतोच कुठे.” – शलाका.

“आता कसं सांगू तुम्हाला? आई तुमच्या वर खूपच खुश झाली आहे. आणि तेच मला खटकतंय.” – संदीप.  

“मला अहो, जाहो करू नका. प्लीज. आणि तुमची आई माझ्यावर खुश आहे त्यात तुम्हाला राग येण्या सारखं काय आहे?” – शलाका.

संदीप विचारात पडला. कसं सांगायचं हिला, शेवटी सगळं धैर्य गोळा करून म्हणाला, “हे बघा, आईनी तुमची आणि ..”

शालाकानी मधेच टोकलं.

“अहो जाहो करू नका हो. मला फार अवघडल्या सारखं होतं.”

संदीप नी आवंढा गिळला आणि एका दमात म्हणाला,

“ओके. तू म्हणतेस तसं. आपण एकमेकांना धड ओळखतही नाही आणि आईनी आत्ताच तुझी आणि माझी जोडी, लावून पण टाकली आहे. म्हणाली की ही पोरगी तुला सुखात ठेवेल.”

हे ऐकून, शलाका प्रसन्न हसली. ती हसतांना संदीपला इतकी आकर्षक दिसली की तो तिच्याकडे पहातच राहिला. भुरळच पडली त्याला तिची. काय बोलायचं ते विसरूनच गेला.

शलाका सुद्धा त्याच्या कडे पहात होती, क्षणभर थांबली. आणि म्हणाली की,

“काय हो, मी इतकी वाईट आहे का? की आईंनी जोडी लावली म्हंटल्यांवर राग आला?” – शलाकानी खोचक पणे विचारलं.

“अग नाही. उलट तू सुंदरच आहेस. म्हणूनच मला हे नको आहे. तुला खूप स्मार्ट मुलगा मिळेल.” – संदीप.  

“तुम्ही म्हणता ते कदाचित बरोबरही असेल, पण मी तुलना कशा साठी करू? मला आईंनी लावलेली जोडी मान्य आहे.” – शलाका.  

“पण मला मान्य नाहीये.” – संदीप.  

“ते कळलं हो. तुम्ही मला जर पटवून दिलं की मी तुमच्या साठी योग्य नाहीये, तर मी हट्ट धरणार नाही. सांगा, एक तरी कारण सांगा.” शलाका आता हट्टाला पेटली.  

“तू सुंदर आहेस हेच तर कारण आहे.” – संदीप.

“अहो काही तरीच काय? सर्वांना गोरी, आणि सुंदर मुलगी हवी असते, बायको म्हणून. आणि तुम्ही म्हणता आहात की, मी सुंदर आहे म्हणूनच नको, हे काय कारण झालं ? अहो लोकं हसतील तुमच्या वर.” आणि वरतून शलाका पण दिलखुलास हसली.

ती हसतांना इतकी मोहक दिसली की क्षण भर संदीप विसरूनच गेला की त्याला काय बोलायचं आहे ते. पण लवकरच त्यांनी स्वत:ला सावरलं. म्हणाला की,

“हे बघ, हा विषय जरा गंभीर पणे घे. तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. मी काय सांगतो ते ऐक. आणि मग बोल.”

“ठीक आहे. सांगा.” – शलाका.  

शलाका असं गंभीर पणे म्हणाली खरं, पण संदीपला वाटलं की ती अजूनही सगळं गंमतीतच घेते आहे. म्हणून तो जरा जास्तच गंभीर झाला आणि म्हणाला.

“हे बघ, उताविळपणा करू नकोस, आणि लाइटली तर मुळीच घेऊ नकोस. नीट ऐक, माझ्या पूर्ण अंग भर जखमा झाल्या आहेत. जंगली प्राण्यांच्या मुळे झालेल्या जखमा लवकर बऱ्या होत नाहीत. किती दिवस या जखमा अंगावर बाळगाव्या लागतील, हे माहीत नाही. माझ्या चेहऱ्यावर दोनदा पंजा मारला वाघाने, किती ठिकाणी कापलं असेल, ते सध्या तरी माहीत नाही. जवळ जवळ पूर्ण चेहऱ्यावर बॅंडेज बांधलं आहे. काढल्यावर संपूर्ण चेहरा जखमांच्या खुणां मुळे विद्रूप झाला असेल. चेहरा आणि अंगभर जखमांचे व्रण असतील. जर खूप दिवस घरी राहावं लागलं तर नोकरी पण जाण्याची शक्यता आहे. अशा विपरीत परिस्थितीत मी कसं तुला हो म्हणू आणि तुझं आयुष्य खराब करू. शक्य नाही ते.” संदीपने एक लांबलचक भाषण दिलं.  

शलाकाने उठून खुर्ची त्याच्या आणखी जवळ सरकवली. त्याचा हात हातात घेतला आणि म्हणाली

“तुम्ही नका ना असा विचार करू, माझ्यावर जेंव्हा संकट आलं तेंव्हाही असाच मागचा पुढचा विचार न करता वाघाला सामोरे गेलात. कुठलंही शस्त्र हातात नसतांना, वाघाशी दोन हात करायची हिम्मत दाखवलीत. कोणा साठी? माझ्या साठीच ना? माझ्या भावाची तर कार मधून खाली उतरायची सुद्धा हिम्मत झाली नाही. मदत तर फार दूर ची गोष्ट होती. आणि तुम्ही आत्ताही फक्त माझाच विचार करता आहात. आता माझं ऐका, कुठलीही गोष्ट घडते ना तेंव्हा त्या मागे काही तरी ईश्वरी योजना असतेच अशी माझी ठाम धारणा आहे. त्या योजनेनुसारच तुमची आणि माझी गाठ आधीच बांधल्या गेली आहे.” – शलाकाने तेवढ्याच निर्धाराने उत्तर दिलं.   

“थांब, थांब, हे बघ आत्ता, तुझ्या मनात कृतज्ञतेची भावना प्रबळ आहे. पण वर्षभरातच ती ओसरून जाईल आणि हे सगळं खटकायला लागेल. तू खूप सुंदर आहेस, आणि माझ्या अंगावर, चेहऱ्यावर या जखमांचे व्रण, आणि त्यामुळे कुरूप झालेला चेहरा, चार लोकं जेंव्हा बोलायला लागतील, तेंव्हा तुला तुझी चूक कळून येईल. पण तेंव्हा फार उशीर झाला असेल. म्हणून म्हणतो. आताच सावध पणे पावलं उचल. नको या भानगडीत पडू. मी पुन्हा पूर्ववत होणं शक्य नाही.” संदीप काकुळतीने म्हणाला.  

“तुमचं बोलून झालं का?” – शलाका.

“हो. आणि माझी विनंती आहे की आजची आपली ही भेट शेवटची समज आणि पुन्हा इथे येऊ नकोस.” संदीपने शेवटचं सांगितलं.  

क्रमश:......

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com