girlfriend books and stories free download online pdf in Marathi

मैत्रिणी

आज बिल्वा फार आनंदात आहे कारण आज ती व तिच्या कॉलेज च्या तीन मैत्रिणी तिच्याकडे भेटणार आहेत. कॉलेज चं शिक्षण संपल्यावर एक दोन वर्षांच्या फरकाने चौघींचेही लग्न झाले. लग्नानंतर चौघीही पुण्यातच असतात पण संसाराच्या धबडग्यात एकमेकींना भेटणे दुरापास्तच झाले, पण ते काही नाही आज वेळात वेळ काढून भेटायचंच असं त्यांनी ठरवलं. बिल्वा चा नवरा कामा निमित्य बाहेरगावी गेल्यामुळे तिचं घर रिकामं च होतं म्हणून तिनेच म्हंटल तिच्याच घरी भेटू म्हणून, आणि चांगलं दोन दिवस राहायलाच या असं तिघींनाही सांगितले. आजचा शुक्रवार, आज संध्याकाळी आल्या की रविवारी संध्याकाळी च आपापल्या घरी जातील.

ते पहा इजा आलीच,तिच्या मागून तिजा पण आली.
इजा म्हणजे इशा जामखेडे आणि तिजा म्हणजे तिलोत्तमा जामकर.
बिजा म्हणजे हीच बिल्वा जामनेरकर.

इजा,बिजा, तिजा गप्पा मारतच होत्या की दहा मिनिटातच जाजा आली, म्हणजे जाई जावडेकर आली.

बिल्वाने तिला गमतीने म्हंटल "जाजा" तर ती खरंच आल्या पावली जायला लागली.

"ए शहाणे! खरंच चालली की काय ? गंमत केली मी बावळट!", बिल्वाने हसून म्हंटल

तशी ती परत यायला वळली आणि खदखदून हसत म्हणाली," मी सुद्धा गंमतच करत होती,खरं थोडीच जाणार होती दीडशहाणे"

" आज किती मस्त वाटतेय न सगळे आपण जमलोय मस्त गप्पा होतील जुन्या आठवणी निघतील 2 दिवस मज्जा", तिलोत्तमा म्हणाली.

" हो ग, चूल अन मूल करता करता वेळ निघून जातो, स्वतः साठी असा निवांत वेळच मिळत नाही आपल्याला ,पण आता असेच ठरवून आपण भेटत जाऊ", इशा म्हणाली.

"डन! ठरलं मग",असं म्हणून तिलोत्तमा नी हात पुढे केला आणि बाकी तिघींनीही तिच्या हातावर हात ठेवले.

"हे बघ मी खमंग भाजणीचे थालीपीठं करून आणलेत", इशा म्हणाली

"व्वा मस्त ! मी आपल्या सगळ्यांसाठी मसालेभात,तिखटमीठाच्या पुऱ्या आणि बटाट्याची रस्सा भाजी केलीय,त्याव्यतिरिक्त आम्रखंड सुद्धा आणून ठेवलं",बिल्वा म्हणाली.

"मी साजूक तुपातले बेसनाचे लाडू आणलेत भरपूर",जाई म्हणाली.

"आणि मी काय आणलंय माहीत आहे?या सगळ्या चविष्ट पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी जीभ आणि दात आणलेत",असं म्हणून तिलोत्तमा खो-खो हसू लागली.

"कॉलेज मध्ये होती तश्शीच आहे ही तिलू,चहाटळ कुठली!",इशा म्हणाली.

"मी तर कच्चा नाश्ता आणलाय जो आपल्याला दोन दिवस नक्कीच पुरेल,चकल्या,शंकरपाळे आणि चिवडा",तिलोत्तमा म्हणाली.

"बापरे! एवढं सगळं कशाला आणत बसल्या, आपण माझ्या घरीच राहणार आहोत न की तंबू ठोकून जंगलात राहणार आहोत. तुम्ही आणलंय खरं,पण संपवावे लागेल बरं का", बिल्वाने म्हंटल.

"गीता आणि तुझे सासू-सासरे तुझ्या जाऊ बाईंकडे गेलेत का?", बिल्वाने जाई ला विचारले

"जाउबाई कसल्या येऊ देतात,त्यांना तर कुठलीच जबाबदारी नको,अग माझ्या सासूबाईंची लहान बहीण आलीय,त्या म्हणाल्या मी इकडे बघते दोन दिवस तू जाऊन ये मैत्रिणीकडे,फार मोठया मनाच्या आहेत त्या, नाहीतर कसचं येणं झालं असतं माझं. सासू सासरे वाताने जागीच खिळलेलें,तर नणंदेची वेगळीच तऱ्हा हिस्टेरिया झाल्यामुळे वेड्यासारखी वागते. कधीकधी मला वाटते बरं झालं मला मुलबाळ होत नाही ते, त्या बाळाचं करायला वेळ तरी मिळाला असता का मला? लहान पणी मला डॉक्टर व्हायचं होतं,डॉक्टर तर झाली नाही मी पण सासूसासरे नणंद यांना औषध देणारी त्यांची देखभाल करणारी नर्स मात्र मी नक्कीच झाली.", जाई फणकार्याने म्हणाली

"बरोबर आहे तुझं,माझी तर समस्याच वेगळी आहे,मला मुल होऊ शकते पण मलाच होऊ द्यायचं नाहीये, माझ्या नवऱ्याचा तर्हेवाईक स्वभाव बघता मला मुलबाळ करून गुंतावं असं वाटतच नाही,माझा नवरा बिपीन ऑफिसच्या कामा निमित्य सतत बाहेरगावी दौऱ्यावर जात असतो,गावात असला तरी बरेचदा मध्यरात्र उलटल्यावर येतो का तर म्हणे ऑफिस मध्ये कामच जास्त आहे,बरं माझ्या नवऱ्याला पण आपल्याला मुलबाळ असावं असं चुकूनही वाटत नाही,कधीकधी तर मला संशय येतो की त्याचं कुठे अफेअर तर नाही. मला लहानपणी पोलीस व्हायचं होतं पण नवऱ्यावर लक्ष ठेवत,मध्यरात्री पर्यंत त्याची वाट बघत गस्तीचा पोलीस कधीच व्हायचं नव्हतं. ",बिल्वाने हताशपणे म्हंटल.

"अग तुम्हाला मुलंबाळं नाहीत तर काय झालं , असले तरी त्यांचं टेन्शन वेगळंच असते. आता माझ्याच मुलाचं अवधूत चं उदाहरण घ्या,आधी माझ्या नवऱ्याने तन्मय ने त्याचा अति लाड केला,तेव्हा मी त्यांना परोपरीने समजावलं होतं की कौतुक आवश्यकच आहे पण तो चुकला तर त्याची कानउघाडणी करणंही तेवढंच आवश्यक आहे,पण नाही, माझ्या नवऱ्याने मलाच वेड्यात काढलं,आता तो त्यांच्या डोक्यावर मिरे वाटतोय. सतत येता-जाता वडिलांशी उद्धट बोलतो,चिडून तन्मय त्याला मारायला धावतो मग मलाच मध्येत पडावं लागते. आजही मी अवधूतला माझ्या माहेरी सोडलंय आणि मगच निश्चिन्त मनाने मी इथे येऊ शकली. मला लहानपणी वकील व्हायचं होतं पण मुलासमोर नवऱ्याची बाजू आणि नवऱ्यासमोर मुलाची बाजू मांडणारी वकील होईल असं कधी सुद्धा वाटलं नव्हतं.",तिलोत्तमा एक सुस्कारा सोडून म्हणाली.

"मुलंबाळं म्हंटल की जवाबदारी आलीच आणि त्यात गुंतणही आलंच, मुलं संसार यांचं करता करता वेळ कसा जातो काही कळतच नाही,स्वतः साठी वेळच मिळत नाही.
आधी आमची आर्थिक परिस्थिती बेताचीच होती,इंद्रजित ची नोकरी च्या पगारातून आमचं कसंतरी भागायचं,मग मी घरीच ट्युशन्स घेणं सुरू केलं,सुरुवातीला कमी विद्यार्थी होते पण हळूहळू विद्यार्थ्यांची संख्या वाढत गेली,इंद्रजित ला देखील चांगल्या मिळकतीची नोकरी मिळाली. मग दोन नको पण एक तरी मुलबाळ आपल्याला हवं असं आम्हा दोघांनाही वाटायला लागलं,पण देवाला आम्हाला दोनच मुलं द्यायचे होते,मला जुळे अपत्य झाले ,एक मुलगा एक मुलगी ओंकार आणि ओवी, दोघंही गुणी आहेत आज्ञाधारक आणि अभ्यासू त्याबद्दल वाद नाही पण वाढती महागाई बघता आमची जवाबदारी वाढली पण गुणी नवरा आणि मुलं मिळाल्यामुळे संसारा चा गाढा हसत हसत ओढल्या जातो दुसरं काय. मला प्राध्यापिका व्हायचं होतं,ते तर झालं नाही पण शिकवण्या घेऊन त्याचं समाधान मानून घेते.",इशा म्हणाली.

"हो खूप गुणी आहेत ओंकार आणि ओवी मागच्या महिन्यात त्यांच्या शाळेचा कार्यक्रमाचा विडिओ तू पाठवला होता न व्हाट्सअप्प वर तो बघितला आम्ही, फारच छान काम केलं दोघांनी",बिल्वा म्हणाली,जाई आणि तिलोत्तमा ने देखील तिची री ओढली.

"ए,बिल्वा तुझा तो उंनिस दिसला मला काल,मी बाजारात गेली तेव्हा",तिलोत्तमा म्हणाली.

"माझा नाही ग बाई! काहीही म्हणू नको,तुम्हीच आणि वर्गातले चहाटळ मुलं-मुली तुम्हीच ‘उंनिसबीस’ असं चिडवायचे",बिल्वा ठसक्यात म्हणाली.

"पण योगायोगाने किती छान जुळून आलं न नाव
उंनिकृष्णन सरवय्या म्हणजे उंनिस आणि बिल्वा सरदेशमुख(माहेरचे आडनाव) म्हणजे बिस,व्वा,आणि विशेष म्हणजे त्याला तू फार आवडायचीस",जाई म्हणाली

"अगं फक्त त्याला आवडून काय उपयोग मला तर आवडायला पाहिजे न तो,माझ्या डोक्यात कधी तसा विचारच आला नाही",बिल्वा

"तुझ्या डोक्यात फक्त आणि फक्त अभ्यासाचेच विचार असायचेत बाई,शी किती बोअर!",तिलोत्तमा

"असू दे बाई मी बोर,
तुला कशाला हवा त्याचा घोर,
टिंगलटवाळी करण्यात भारीच तुला जोर,
तिलोत्तमा दिसते साधी पण आहे लई डॅम्बिस पोर", बिल्वा मिश्किल हसत म्हणाली.

"ओहोहो मार डाला! क्या तिर मारा है,गजब!",तिलोत्तमा हसत म्हणाली.

"अहो!शीघ्र कवियित्री,भोजनास्तव प्रस्थान करावयाचे का?,माझ्या पोटात कावळ्यांचं काव्य सम्मेलन भरलंय",ईशा हसू दाबत म्हणाली.

"व्वा थालीपीठ काय चविष्ट झालंय तोंडात टाकलं की विरघळतेय, फारच छान,मला सांगशील बरं रेसिपी ",तिलोत्तमा

"अगं बाई आत्तापर्यंत आठवेळा तुला मी ह्याची रेसिपी पाठवलीय व्हाट्सअप्प वर,प्रत्येक वेळा पहिल्यांदाच रेसिपी मागितल्यासारखा कसा भाव आणू शकते तू चेहऱ्यावर,कमाल आहे",ईशा डोक्याला हात लावत म्हणाली.

"अगं मला करून बघायचे असते रेसिपी प्रमाणे मी रेसिपी वाचते सुद्धा पण काही कारणाने विसरून जाते, एकदा मी नक्की करून बघणार थालीपीठ तू दिलेली रेसिपी वाचून",तिलोत्तमा

"आम्हाला नक्की बोलावशील हं",जाई

"नक्कीच, व्वा व्वा,काय बेसनाचे लाडू केले जाई,झक्कास , मला जरा---",असं तिलोत्तमा चं वाक्य पूर्ण होण्याआधीच जाई म्हणाली,"देते हं ह्याची रेसिपी लगेच पाठवते".
आणि चौघीही खळखळून हसायला लागल्या.

जेवणं आटोपल्यावर,चौघींनी मिळून पटापट स्वयंपाक घर आवरून घेतलं आणि बैठकीत पुन्हा एकदा त्यांची गप्पांची मैफिल रंगली.

"कॉलेज मध्ये असताना काय सिनेमे बघायचो आपण ,आत्ता फारसं बघणं होत नाही.",ईशा

"हो न ! लेक्चर बंक करून सुद्धा बघितले आपण बरेच सिनेमे",जाई

"तेव्हा सिनेमे चांगले वाटायचे,सगळं सहज घेता येत होतं, आतातर सिनेमे सुद्धा बोअर होतात,त्यातला फोलपणा प्रकर्षाने जाणवतो,त्याच त्या करकोचा मानेच्या नट्या आणि वायफळ डायलॉग मारणारे नट", बिल्वा

"हे मात्र खरंय हं, आजकाल सिनेमात हिरो पेक्षा व्हिलन च हँडसम असतो.",तिलोत्तमा

"मी आणि जयदीप सिनेमाला जायची इच्छा असली तरी बरेचदा जाऊ शकत नाही,मग घरीच विडिओ स्ट्रीमिंग ऍप वर बघतो आम्ही सिनेमे.कधी जायचंच झालं तर जयदीप चा मोठा भाऊ येतो आमच्या कडे मगच आम्ही दोघं एकावेळी बाहेर पडू शकतो नाहीतर शक्यच नाही",जाई

"फारच बंदीस्त आयुष्य झालं ग",बिल्वा

"हो न काय करणार आलीया भोगासी दुसरं काय,दिवसभराची मोलकरीण ठेवलीय पण तिच्यावर भरोसा ठेवून बाहेर जाता येत नाही न बराच वेळ",जाई

"बरोबर आहे",ईशा

"आपण बघायचा का एखादा सिनेमा,मला तर हॉरर सिनेमे आवडतात कधीकधी बघायला",तिलोत्तमा

"नको ग बाई, झोपच लागत नाही मला मग सारखे कुठले न कुठले आवाज येत राहतात",ईशा

"मला तर बरेचदा बिपीन बाहेरगावी गेल्यावर एकटं च राहायचं असते या घरात तेव्हा मला ते भयानक दृश्य आठवत राहतात,म्हणून नकोच",बिल्वा

"मला तर हॉरर असं नाव घेतलं तरी अंगावर काटा येतो,हा बघ सरसरून काटा आला अंगावर",जाई

"धन्य धन्य तुमची भित्र्या भागूबायांनो,काही बघू नाही आपण हॉरर फिल्म,एखादा साधा सिनेमा तरी बघायचा का?",तिलोत्तमा तिघींना कोपरापासून हात जोडत म्हणाली.

"होs s s",बिल्वा,ईशा आणि जाई तिघीही एका सुरात म्हणाल्या.

मग सर्वानुमते ठरवून चौघींनीही एक मस्त मराठी सिनेमा बघितला.

"चला ग झोपू आता,उद्या सकाळी मस्त वॉक ला जाऊ ,मग आवरून ठरवल्याप्रमाणे बाहेरच जेवण,शॉपिंग आणि एक छान नाटक बघून घरी येऊ.",ईशा असं म्हणताच तिघींनाही माना डोलावल्या.

रात्री मधेच उठून ईशा व जाई हळूहळू खुसफुसत गप्पा मारू लागल्या.

"व्वा मस्त गाऊन घेतलाय तू,कुठून घेतला ग,मलाही असाच घ्यायचाय",जाई इशाला म्हणाली.

"अग तुळशीबागेतून घेतला मागच्या आठवड्यात, छान आहे न फक्त पाचशे रुपयात",इशा उत्साहाने म्हणाली.

तेवढ्यात तिलोत्तमा ची झोप चाळवली व ती म्हणाली,"
कोणते खलबतं सुरू आहेत ग इतक्या रात्री तुमचे"

"काही नाही ग गाऊन बद्दल बोलत होतो,पण फार हळू बोलत होतो आम्ही तरी तुला ऐकू आलं?",जाई

"अरे पण, ही वेळ आहे का गाऊन वर बोलायची? नुकताच दीपिकाची नजर चुकवून रणवीर आलाच होता स्वप्नात तेवढ्यात ऐकलं त्याने तुमचं गाऊन-गाऊन आणि गेला न तो उलटपावली दात खाऊन. व्वा बिल्वा सारखीच शीघ्र कवी झाली मी गाऊन दात खाऊन",तिलोत्तमा हसत म्हणाली

"ही बिल्वा पहा न काय गाढ झोपलीय एवढं आपण बोलतोय पण काही परिणाम झाला नाही हिच्या झोपेवर ",ईशा

"फायनली झोपा आता सगळ्या उठू नका सकाळ होईपर्यंत आता सगळे डिस्कशन्स सकाळी",तिलोत्तमा हात जोडत म्हणाली.

ठरवल्याप्रमाणे चौघीजणींनी बाहेरच जेवण केलं,शॉपिंग केलं,नाटक बघितलं, आणि घरी यायला निघाल्या रस्त्यातच त्यांना बांधकामावर मजुरांचे मुलं खेळताना दिसले,त्यांना बघताच चौघींनीही केलेल्या शॉपिंग मधून त्यांना खेळणे चॉकलेट्स काही कपडे दिले.

रात्री चौघींनाही पट्कन झोप लागली,जाग आली ती पक्ष्यांच्या सुमधुर कलरवाने, कितीही उशिरा उठायचं ठरवूनही त्यांना लवकरच जाग आली आणि चौघींनाही ताजेतवाने वाटू लागले.

"व्वा काय रम्य पहाट आहे,कोकिळेचा आवाज किती मधुर वाटतोय",ईशा म्हणाली.

"हो न ,खरा श्रीमंत आहे तो निसर्ग आणि त्या श्रीमंतीचा त्याला यत्किंचितही गर्व नाही,सर्व प्राणीमात्रांना भरभरून देत असतो तो निर्व्याजपणे",बिल्वा भारावून बोलत होती.

"रोजच्या घाईच्या आयुष्यात असं स्थैर्याने निसर्गाकडे बघायला उसंतच मिळत नाही आपल्याला",जाई

"मला तर अशा भल्या पहाटे उठून सायकलिंग करून,ट्रेकिंग करून प्रतापगडावर जायला आवडेल",तिलोत्तमा म्हणाली.

"फारच छान कल्पना आहे पण ते आपण पुन्हा भेटू तेव्हा करू,प्लॅनिंग करून, पण आज आपण इथून दहा किलोमीटर वर एका टेकडीवर देवीचं देऊळ आहे तिथे ट्रेकिंग पण करू शकतो आणि तिथपर्यंत सायकल वरही जाऊ शकतो,तिथे जवळच आमराई आहे तिथे आपण सोबत डबे घेऊन डबापार्टी पण करू शकतो,कशी वाटली आयडिया?", बिल्वा उत्साहात म्हणाली.

"एकदम जबरदस्त",तिघीही एकसुरात म्हणाल्या.

"पण चार सायकल्स मिळतील?",ईशा

"अगं चौकातच बघितल्या नाही का ओळीने लावलेल्या त्यावर जो QRcode असतो न त्याला आपल्या पेटीएम अकौंट मधून स्कॅन करायचं की झालं,आपल्या लहानपणी भाड्याने सायकल्स मिळायच्या किनई तसंच फक्त आधुनिक पद्धत एवढंच.",बिल्वा म्हणाली.

"चला मग लवकर आवरून निघू आपण",जाई

सगळ्याजणी पटापट आवरून डबे घेऊन सायकल्स वर निघाल्या. टेकडीपर्यंत पोचल्यावर सायकल्स ठेवून त्या ट्रेकिंग करून टेकडीवर चढल्या तिथे देवीचं प्रशस्त मंदिर होतं. चौघींनीही देवीचं दर्शन घेतलं.

"किती प्रसन्न वाटतेय न इथे,मन आणि मस्तिष्क एकदम शांत झाल्यासारखं वाटते.",जाई

"देवीची मूर्ती किती तेजस्वी आहे",तिलोत्तमा

"खरंय",ईशा, बिल्वा म्हणाल्या.

बराच वेळ मंदिरात शांतपणे बसल्यावर चौघीही जवळच्या बागेत डबा खायला गेल्या,जेवणं आटोपल्यावर,झाडाखाली थोडा विसावा घेतल्यावर,परत एकदा देवीचं दर्शन घेऊन त्या सायकलवरून बिल्वाच्या घरी परतल्या.

"व्वा बिल्वा फार छान वाटलं आपण सगळ्या तुझ्याघरी भेटलो,फारच मस्त गेले दोन दिवस",ईशा

"हो,आता परत-परत भेटत राहायचं असंच",बिल्वा

"नक्कीच,प्रत्येक दोन महिन्यात एक वीकेंड नक्कीच भेटू शकतो आपण",तिलोत्तमा

"मी पण नक्कीच ऍडजस्ट करेन दोन महिन्यात दोन दिवस काहीच हरकत नाही,जयदीप सांभाळून घेईल त्याच्या आईबाबांना आणि बहिणीला,भावाला पण मदतीला तो बोलवूच शकतो",जाई

"बिपीन केव्हा येणार आहे दौऱ्यावरून?",ईशा

"आजच येणार आहे थोडा उशीर होईल असा मेसेज आलाय त्याचा",बिल्वा

"ईशा,ओंकार आणि ओवीसाठी तू आणि तिलोत्तमा,अवधूत साठी तू हे चॉकलेट्स घेऊन जा,बिल्वा मावशीनं पाठवले सांग पोरांना",बिल्वा ने असं म्हणताच ईशा, तिलोत्तमा ने मान डोलावली.

"चला संध्याकाळ पर्यंत पोचलेलं बरं,अंधार पडण्याआधी,मी कॅब बुक करते ,ईशा च घर मध्येत आहे ती आधी उतरेल मग मी आणि तिलोत्तमा शेवटी उतरेल,त्यामुळे आम्ही एकाच कॅब मधून जातो.",जाई

"ओके,घरी पोचल्यावर व्हाट्सअप्प करा तिघीही जणी",बिल्वा

"हो नक्कीच",तिघीही म्हणाल्या.

एका तासात बिल्वाच्या व्हाट्सअप्प वर 3 मेसेजेस झळकले ‘reached home safely’

. ************