Naad Pawlancha - Sawantwadi to Naldurg journey books and stories free download online pdf in Marathi

नाद पावलांचा - सावंतवाडी ते नळदुर्ग प्रवास

नाद पावलांचा- सावंतवाडी ते नळदुर्ग प्रवास

जूनची ३ तारीख भर उन्हाळा..सूर्य आग ओकतोय आणि आम्ही चारजण...नळदुर्ग बघायला बाहेर पडलो. आमच कोणतही ठोस नियोजन नव्हते.कुणकेरी हायस्कूलचे आंबेस्करसर, मुननकरसर त्यांचा तरूण मुलगा धर्मेश व मी सकाळी साडेसहाला बाहेर पडलो.दाणोलीला साटममहाराजांना नमस्कार करून आंबोली घाट पार केला..आंबोलीची गर्द हिरवीदरी अजुनही सूर्यकिरणाच्या प्रतिक्षेत होती.
प्रवासात आम्ही निपाणीच्या वरच्या माळावर नाष्ट्यासाठी थांबलो.मी नाष्ट्या येण्याची वाट बघत होतो तेवड्यात..
" बाळा राणे..." अशी हाक ऐकू आली.समोर वाडीतला पंजक धुरी सहकुटुंब आलेला दिसला. वाडीत भेट होत नाही पण इथ मात्र समोरा - समोर उभे होतो.थोडी गंमत वाटली.नाष्टा घेता-घेता ठरल की निपाणी चिक्कोडी मार्गे विजापूरला जायच. तिथून मग अक्कलकोट नंतर नळदुर्ग व वाटेतली ठिकाण बघत जायच. निपाणीतून उजव्या बाजूला वळत आम्ही सरळ चिक्कोडी रस्ता पकडला . हमरस्ता छान होता. दोन्ही बाजूला ऊसाची व द्राक्षाची शेते.चढ -उतार नसलेला सरळ रस्ता .विशीतला धर्मेश सुरक्षित गाडी चालवत होता.

निपाणीनंतर रस्त्याच्या कडेला दिसणारे मराठी बोर्ड हळहळू कमी होत गेले.चिक्कोडी पर्यंत क्वचित मराठी बोर्ड दिसत होते. चिक्कोडीत पॅरॅलिलीसवर उपचार करणार्या डाॅ .कुंबार यांच्या दवाखान्याजवळ अनेक गाड्या लागलेल्या दिसल्या.सिंधुदुर्गातूनही लोक तिथे जातात.चिक्कोडीच्या पुढे रस्त्याच्या दुतर्फा नजरेच्या टप्प्यापर्यंत दिसणारी मोकळी पण मशागत केलेली सपाट शेते..
शेतात एखाद दुसर निंबाच झाड. तृषार्त माती पावसाची चातकचोचीने वाट पाहत होती.मध्येच कुठेतरी शेतात छोटस घर....समोर झाडाच्या सावलीत बसलेली गुर ...एखादी बकरी..सभोवार टळटळीत ऊन.वाटेत बागलकोट जिल्हातील..मुधोळ संस्थान लागले इथले कुत्रे ( मुधोळ हाऊंड) हे प्रसिद्ध आहेत.छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यदलात त्यांनी महत्वाची कामगीरी बजावली होती.ते पन्नास किलोमीटर सलग धावू शकतात.हुंगण्याची त्यांची शक्ती अफाट असते.सुमारे तीन किलोमीटरवरील वास ते पकडू शकतात.सुमारे सव्वा एक वाजता आम्ही विजापुरात पोहचलो.

विजापुर- हे सध्याचे जिल्हा ठिकाण. इतिहास प्रसिद्ध स्थळ.आदिलशाहाची राजधानी....सहाजिकच मुस्लिम वस्ती जास्त. पडझड झालेले वाडे..दर्गे...मस्जिद..मिनार यांनी भरलेले..इतिहासाच्या खुणा अंगावर मिरवणारे शहर.विजापूर व महाराष्ट्र यांचा इतिहास एकमेकांशी जोडला गेला आहे.खर म्हणजे विजापूरात प्रवेश केला तेव्हा मला थोडा विषाद वाटला. शिवपूर्व कालापासून या विजापूरने व त्यांच्या सरदारांनी महाराष्ट्रावर प्रचंड जुलूम... केले...लूटालूट ..जाळपोळ..स्त्रीयांवर अत्याचार..देवळांची तोडफोड...काय केल नाही त्यांनी? पुढे छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजीमहाराज यांनी आदिलशाही जवळपास नष्ट केली होती. शहरात प्रवेश करताच काही वेळातच आदिलशाहाचा भग्न वाडा व त्या समोरच चौकात छत्रपती शिवाजीमहाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा दिसला व मन अभिमानाने भरून आले. त्याच्या पुढच्याच चौकांमध्ये डाॅ. बाबासाहेब आंबेडकर..महात्मा ज्योतीराव फुले यांचे सुबक पुतळे दिसले. काळाचा हा महिमा होता. दुपारचे जेवण गोदावरी ह्या उडपी हाॅटेलमध्ये केल.पुन्हा मोर्चा गोलघुमटाच्या दिशेने वळवला.जी.पी.एस.नावाचा वाठाड्या सोबत होता.
गाडी पार्क केली .


.एवड्यात एक टांगेवाला लगबगीने समोर आला.
" विजापुर देखना है...?" त्याने विचारले.



त्याने बाराशे सांगितले. सर म्हणाले " आठसौ देंगे."
तो पहिल्या मिनिटाला तयार झाला. ( प्रवासात काहीतरी अक्कलखाती घालवाव लागत.)
टांगवाला अस्सल विजापुरी नमुना होता.टांगा त्या गर्दीतून हाकता-हाकता तो बडबड करत होता.आंबेस्करसर त्याला मध्येच एखादा प्रश्न विचारत होते. काही वर्षांपूर्वी विजापुरात सहाशे टांगे होते पण आता फक्त साठ टांगे आहेत. टांग्यात बसून फिरणे ही सुध्दा एक गंमत आहे.त्याने आम्हाला भल्यामोठ्या दरग्यांकडे नेले. दोन भव्य ..गोलाकार घुमट असलेल्या इमारती दिसल्या.त्यांच बांधकाम जबरदस्त होत.आत दोन सजवलेल्या कबरी होत्या.बाजूलाच तुलनेत लहान दोन इमारती होत्या .समोरच्या हिरवळीवर व सावलीत काही लोक चटय्या टाकून झोपा काढत होते.दुपारी तिथे बहुधा अन्नछत्र असत.
" यहां कौनसी भी मन्नत मांगो...चालीस दिनमे पुरी होती है." टांगेवाला परत परत सांगत होता.
तिथून टांगा आदिलशाहाच्या वाड्याकडे वळवला.
मोडकळीस आलेली तटबंदी...ढासळलेले बुरूज ..बाहेरून दिसले.
" यहां पचास टन की तोफ है.लोगां तोफ देखने आते है.३६० हाथी...३६० घोडे..३६० बैलगाडीयाॅ और उससे भी जादा लोंगा तोफ खिंचने लागते थे!" टांगेवाल्याने माहिती पुरवली.
" ३६० ही क्यों?" इति..आंबेस्करसर.
" इतनी बडी तोफ है..तो लगेंगेही ना?" त्याचा प्रतिप्रश्न.
आम्ही मुख्य दरवाजातून आत शिरलो उजवीकडे ती अवाढव्य तोफ दिसली.तोफेचा पुढचा गोलाकार व्यास एवडा मोठा होता की गोळयाने एखाद शहरही उध्वस्त झाल असत.ती पूर्ण पोलदी होती व गेल्या चारशे वर्षात जराही गंजली नव्हती. इथेच आदिलशाहाचा दरबार भरत असावा.इथूनच बडी बेगमसमोर अफजलखानने आपली भव्य छाती फुगवत. दर्पोक्ती केली होती.
'चड्या घोड्यानिशी त्या शिवाजीला जिंदा वा मुर्दा घेवून येतो.'
माझ्या डोळ्यासमोर सारा प्रसंग उभा राहिला.
आपोआप मुठी वळल्या.इथून सिद्दी जोहर..फजलखान ,बहलोलखान...मराठी मुलुख नष्ट करायला प्रतिज्ञा करून बाहेर पडले होते .पण छत्रपतींनी व मावळ्यांनी त्यांची पार दुर्गती करून टाकली. मला या भग्न वाड्यात फिरताना आपण मराठी मावळा असल्याचा अभिमान वाटला.
" अब आदिलशाहाका स्विमींगपूल दिखाऊंगा."
गल्लींतून पडक्या इमारतीतून सुमारे एक -दोन किलोमीटरवर स्विमींगपूल( शाही स्नानगृह) होता.एका दगडी इमारतीच्या आत एक मोठा तलाव होता.स्वच्छ पाण्याने भरलेला अश्या त्या तलावात काही तरूण डुंबत होते.तलावाच्या दुसर्या तटाला पाण्याला लागूनच राणीमहल होता.
"यहाॅ उस तरफ गणपती विसर्जन होता है . ये पाणी कभी कम नही होता. महापालिकाके लोगांने इस फ्लो का पता लगानेकी कोशिश की आखिर हाथ टेक दिये."
खरच जून महिन्यातही या अवर्षनग्रस्त भागात तो तलाव पाण्याने शिगोशिग भरला होता. टांगा पुन्हा परतीच्या प्रवासाला निघाला...वाटेत चाळिसएक फुट उंच .गोलाकार चौघरी बुरूज दिसला.समोरून प्रशस्त व रूंद पायर्या होत्या.भर दुपारी कडक उन्हात वर चढण टाळल.
" आपको नांला चाहीये.?" मध्येच टांगेवाल्याने विचारले.
कुणालातरी वाटल असत तो नारळांबद्दल किंवा एखाद्या ऐतिहासिक नाल्याबद्दल बोलत होता.पण तो घोड्या पायाला मारल्या जाणार्या नालाबद्दल बोलत होता.
" दरवाजेपर नाल लगाया तो बरकत होगी.चुढैल ...भूत..करणी कुछ नही होगा."
अखेर त्याने एक नाल आमच्या गळ्यात मारलाच व तत्काळ पैसेही घेतले.
वाटेत फक्कड चहा झाला.कर्नाटकात दहा रूपयाच क्वाईन घेत नाही हे तिथे कळल. आम्ही पुन्हा सुप्रसिद्ध कुजबुजणारे सज्जे म्हणजे गोलघुमट व तिथल वस्तू संग्रहालय बघायला आलो.
गोलघमुट बघण्यासाठी २५ रू तर संग्रहालय बघण्यासाठी ५ रू आहे. आत पेन न्यायला बंदी आहे. गोलघुमट ही भव्य दिव्य व उंच अशी
इमारत आहे.कदाचित महाराष्ट्रतून लुटून आणलेल्या पैशांवर बांधली असेल. आत प्रवेश केल्यावर दिसतो तो शंभरएक फुट व्यासाचा गोलाकार फरशीबंद कमरा त्यात दोन थडगीवजा बांधकाम वर सुमारे शंभर फुटावर मोकळा गोल सज्जा..त्यावर भव्य गोल गुबंद..हे निर्माण करणार्या अभियंत्याला दाद द्यावी तेवडी थोडीच होती. उजव्या हाताकडच्या प्रवेशद्वारातून आम्ही वर चढायला सुरूवात केली.पाच फुटी गोल उंच मिनारातून सरळ ऊभ्या पायर्या गुरुत्वाकर्षणानाच्या विरूध्द दिशेने चढायला सुरूवात केली .काही पायर्या चढल्यावर दिशा बदलून डावीकडून तेवड्याच पायर्या चढायच.ये संपल की बाहेर एक मोकळा सज्जा विश्रांतीसाठी...अस करत करत कधी सज्जात बसत वरच्या घुमटात शिरलो. डोळे दिपून जावेत असा नजारा आत होता.दहा फूट रूंद गोलाकार मार्ग ...मध्ये दोनफूट रूंद कठडा....आणि मध्ये गोलाकार भलामोठा मोकळा भाग...तिथून खाली बघितल तर भिती वाटावी एवडी खोली. इथल्या वक्राकार भिंतीकडे तोंड करून कुजबुजल्यास सहा ते सात वेळा मोठ्याने प्रतिध्वनी ऐकू येतो. पण इथ येणारे तरूण...बायका..मुले अक्षरशः ओरड मारत होते.त्याचे प्रतिध्वनी उमटत होते...गोंगाट निर्माण झाला होता.त्यामुळे वास्तूच्या वैशिष्ठ्याची मस्करी केल्यागत वाटत होत. आम्ही पुन्हा त्या उभ्या पायर्या खाली उतरलो. पाय व मांड्या प्रचंड दुखत होते. तशातच वस्तू संग्रहालय बघितल.सहाव्या शतकापासूनच्या मुर्त्या..शिलालेख...स्तंभ..वस्तू तलवारी...इतिहास अभ्यासकानां चांगलीच पर्वणी होती. मुननकरसरांना गड किल्ले व पुरातन वस्तूंची आवड त्यामुळे ते प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक बघत होते.अखेर विजापूरला रामराम करून आम्ही सोलापूरच्या दिशेने निघालो.एक गोष्ट लक्ष वेधून घेत होती ती म्हणजे कर्नाटकातील माईलस्टोनवर फक्त कन्नड भाषाच होती...अगदी इंग्रजी पण नव्हती.आम्हा महाराष्ट्रीयनांना यातून बोध घेण्यासारखा आहे.
सायंकाळी पावणेसातला आम्ही अक्कलकोटला पोहचलो.वटपौर्णिमा असल्याने प्रचंड गर्दी होती.कसबस आम्ही भक्तनिवासाजवळ पोहोचलो.मी कारमधून पाय बाहेर ठेवला तोच कोसळलो.उजव्या पायाने बंड केल होते त्याने शरीराचा भार उचलायला नकार दिला.सरांनी मला झटकन धरलं. दहा मीटर अंतरावर मी पुन्हा दोनवेळा कोलमडलो.अपेक्षेप्रमाणे रूम मिळाली नाही.पण समर्थ कृपेने एक छानपैकी रूम दहा मिनिटाच्या अंतरावर मिळाली.नऊ वाजता दर्शनाला जायच होत.आंबेस्करसर म्हणाले तुम्ही आराम करा नाहीतर डाॅक्टरकडे जाऊया.पण मी जिद्दीने दर्शनाला गेलो.दोन्ही पाय दुखत होते.पायर्या उतरने किंवा चढणे जमत नव्हते. मधल्या वेळेत थोडा व्यायाम केला.अखेर पाऊणतास रांगेत राहून दर्शन
नळदुर्ग ---------------
रविवारी सकाळी (४मे२०२३) आम्ही लवकरच सर्व सोपस्कार आटोपले.कालच्या अनुभवाने आम्ही धडा घेतला होता.जे काही बघायचे ते बाराच्या आत, व सोबत पाणी पाहिजेच.आम्ही पार्किंगच्या ठिकाणी गेलो.सकाळी दर्शनासाठी मोठी रांग लागली होती.आम्ही चोळाप्पांच्या घरी गेलो.जिथे स्वामी समर्थ दीर्घकाळ राहिले होते. तिथेच समाधी मंदिर आहे.तिथेही गर्दी होती.चोळाप्पांच्या अंगणात असलेल्या ज्या कोरड्या विहिरीला समर्थानी पाणी आणल होत----
ती विहिर पाहिली.चोळाप्पांच्या घरात असलेल्या समर्थांच्या वस्तूंचे दर्शन घेतले व पुढचा प्रवास सुरू केला.अक्कलकोटातून इटकल मार्गे आम्हाला हैद्राबाद हायवे गाठायचा होता.पण मधला जोडरस्ता खुपच खराब होता.हा परीसर अवर्षणग्रस्त दिसत होता. तरीही बोअरवेलचा वापर करून ऊस..भाजीपाला लागवड केलेली दिसली.हा जवळपास ३८ कि.मी.पट्टा व आंबोली ते आजरा हा रस्ता सोडला तर पूर्ण प्रवासात आम्हाला रस्ते छान मिळाले.वाटेत एका तिठ्यावर दोन शाळकरी मुल उन्हात सुगंधित फुलांचे हार विकत होते.आंबेस्करसरांनी कार थांबवायला सांगितली.दोन्ही मुल कारच्या खिडकीतून आत डोकावली.
" हार घ्या...दादा "
सरांनी दोन हार घेतले.एक समोर असलेल्या गणपती समोर ठेवला तर दुसरा सीटच्या मागच्या बाजूला बांधला. खर तर हारांची गरजच नव्हती. पण एक शिक्षक म्हणून सरांची ही कृती बरच काही सांगून गेली.
हैद्राबाद हायवेवरून काहीकाळ प्रवास केल्यावर डाव्या बाजूला वळत आम्ही नळदुर्ग गाठला.आज तिथे बाजाराचा दिवस असल्याने धर्मेशला कसरत करतच किल्ला गाठावा लागला.गाडी पार्क केली.तिथेच समोर किल्ल्याची भिंत व खंदक दिसला. किल्ल्याचे प्रवेशद्वार आगळ-वेगळ वाटल.लाकडावर जाड लोखंडी पत्रा ठोकला होता त्यावर नक्षीकाम व अणुकुचीदार खिळे होते.आत प्रवेश केला..२५ रू.(प्रत्येकी) प्रवेश फी व पन्नास रू.गाडी पार्किंग फी भरली.हा भुईकोट किल्ला आहे .आम्ही चर्चा करत असताना तिथला एक प्रौढ मावळा म्हणाला.
" चुकीचे शब्द वापरू नका.ऐका किल्ल्यांचे प्रकार आहेत त्यात भुईकोट किल्ला, डोंगरी किल्ला किंवा गड, जलदुर्ग इत्यादि. "
मावळ्याच्या किल्ल्यासंदर्भात असलेल्या भावना समजून घेत मी मनातल्या मनात त्याला सलाम केला.
सुमारे तीन किलोमीटरच्या परीसरात पसरलेला आहे. महाराष्ट्रतला हा सर्वात मोठा भुईकोट किल्ला आहे. किल्ला बर्यापैकी सुस्थितित आहे. चालुक्य काळात हा बांधला गेला असावा.( स्थानिक लोक हा किल्ला महाभारतातल्या नळ राजाने बांधला अस सांगतात.)त्यानंतर बदामी राजवट, आदिलशहा..कुतुबशहा..मराठे...मुघल ..पुन्हा धनाजी जाधवांनी मुघल सेनापती झुल्फिकारखानचा पराभव करत जिंकला..अखेर इंग्रजांनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला.१८५७ चे बंड मोडून काढण्यासाठी निजामाने इंग्रजांना मदत केली त्याचे बक्षिस म्हणून हा किल्ला इंग्रजांनी निझामाला बक्षिस म्हणून दिला.
हा किल्ला अतिशय रहस्यमय आहे तंत्रज्ञान व विज्ञानाची सांगड घालून बांधलेला आहे.आम्ही इथले नर -मादी धबधबे बघायला आलो होतो.उलट -सुलट मार्ग असलेल्या प्रवेशद्वारातून आत गेलो.आत उजव्या बाजूला हत्तीखाना ( कोठार?) तर डाव्या बाजूला सुस्थितीत असलेली व वापरात असलेली मस्जिद. समोर हिरवळ त्यापलिकडे एक सुंदर बाग व पुन्हा एक सुस्थितीत असलेली बाग
त्यापलिकडे अगदी समोर विजापूरच्या चौघरीबुरूजासारखा बुरूज होता फरक एवडाच की इथे पायर्या मोठ्या व समोरून होत्या.दुसर्या बागेपासून दोनशे मीटरवर नर - मादी बुरूज व जलमहल होता.
बोरी नदिच पाणी वळवून ते किल्ल्याच्या तिन्ही बाजूला खंदकातून फिरवलय.पाण्याचा वापर संरक्षणासाठी केलाय असा हा भारतातला ऐकमेव किल्ला आहे.राहिली समोरची बाजू तिथे साठवलेल पाणी पाहिजे तेव्हा खंदकात सोडत.
आम्ही किल्ल्याचा परीसर पाहून झाल्यावर नर- मादी धबधब्यांच्या दिशेने मोर्चा वळवला. या किल्ल्याच ते रहस्यमय वैशिष्ट्य आहे.मधल्या मार्गातून पायर्या उतरून गेल की समोरच दृश्य विस्मयचकित करत.किल्ल्याची भिंत , नदीचा प्रवाह व समोरचा टेकडीवजा उंच भाग यामध्ये एक वीस फुटी रंद व पन्नास फूटाहून लांब अस भक्कम धरणवजा बांधकाम होत.समोर टेकडीच्या दिशेला अनेक बुरूज व मध्ये दगडी भिंत बांधली होती. धरणाच्या वरच्या बाजूने खाली सहा फूटावर दोन मोठे आऊटलेट पाण्यासाठी ठेवले होते.दोघांमध्ये साधारण पंधरा ते वीस फूट अंतर आहे.सध्या पाणी त्या धबधब्यांच्या थोड खाली होत.दोन धबधब्यांच्या मधल्या जागेत धरणाच्या भिंतीआत एक जलमहल आहे.आंबेस्करसर खाली उतरले होते पण अंतिम दरवाजा बंद होता.कमाल रचना होती.नदीचा मोठा प्रवाह सभोवार आणि त्यात महाल पण त्यापेक्षा आश्चर्यकारक म्हणजे पावसात पाण्याची लेव्हल वाढते तेव्हा दोन धबधबे प्रवाहित होतात. एका धबधब्यातून दुधासारख पांढरशुभ्र पाणी तर दुसर्या धबधब्यातून पोपटी -हिरवट पाणी येत व दोन्ही धबधब्यांच पाणी पुढे एकत्र होऊन पाणी नेहमीप्रमाणे दिसत.हे दरवर्षी घडत.पावसाळ्यात हे विलक्षण दृश्य बघण्यासाठी पर्यटक गर्दी करतात.प्रचंड वेगाने कोसळणारे पांढरशुभ्र फेसाळ पाणी त्याच वेळी दुसर्याबाजून पोपटीरंगाची प्रछन्न जलधारा
खाली झेपावते. ज्या बाजूला धबधबे कोसळतात ती खोल आहे.सध्या तिथे पाणी कमी आहे .या पाण्यात मोठाले मासे फिरताना दिसत होत. अलिकडेच्या बाजूला सध्या नदीत नौका विहार सुरू आहे.
दोन वेगवेगळ्या रंगाच्या धबधब्यांच रहस्य शोधण्याचा वैज्ञानिकांनी प्रयत्न केला.. पांढर्या धबधब्यांत ज्यावेळी पाणी शिरत तेव्हा आतल्या अंतर्वक्र भागावर जोरात आदळते व फेस तयार होतो व दुधाळ पाणी बाहेर पडते...तर पोपटी रंगाच्या धबधब्यांच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हिरव शैवाल आहे तिथे पाणी घुसळल जात व हिरवट पिवळा धबधबा तयार होतो.पण सर्वांनाच हा खुलासा पटेल अस नाही. काही असो पण हा विलक्षण रहस्यमय किल्ला अनेक लेखकांना आकर्षित करता झाला.या किल्ल्याच्या पाश्वभूमीवर काही मनोरंजक व रहस्यमय कादंबर्या लिहिल्या गेल्या. खर म्हणजे प्रत्येक किल्ल्याची...तिथल्या प्रत्येक दगडाची एक कथा एक गाथा व एक व्यथा असते. ती कळली तर किल्ला व त्या किल्ल्याचा इतिहास कळतो.
परतीचा प्रवास आम्ही सोलापूर बायपास ..पंढरपूर..सांगली ..कोल्हापूर व आंबोलीमार्गे सावंतवाडी असा केला.वाटेत सुमारे अर्धा तास पावसाच शिडकावा झाला.गारवा निर्माण झाला. ऊन पावसाचा पाठशिवणीचा खेळ थोडी रंगत निर्माण करून गेला.पण गड कोटांच्या साथीने जागवलेले हे दोन दिवस कायम लक्षात राहतील हे नक्की.
समाधान वाटल.

------*--------*--------*---------*--------*---
बाळकृष्ण सखाराम राणे .
सावंतवाडी.