broken bones books and stories free download online pdf in Marathi

तुटलेल्या पारंब्या

तुटलेल्या पारंब्या

- नागेश पदमन.

--------------------------------------------------------------
मोबाईल कर्कश्श आवाजात केकाटायला लागतो. पहाटेचे चार वाजलेले असतात. मी अलार्म बंद करतो. बायकोला उठवतो. ती लगबगीने उठते. आंघोळ करुन स्वयंपाकाला लागते. पाचला कुकरची पहिली शिट्टी होते. किचन कट्ट्यावर ठेवलेला चहा संपवून मी नानुला आवाज देतो. तो फक्त या कुशीवरून त्या कुशीवर वळतो. सवापाचला बाथरूम मधून बाहेर पडून मी नानूला हाताला धरून उठवतो. तो डोळे चोळत कुरकुरत बाथरूम मध्ये घुसतो. साडेपाचला तो बाथरूम मधून बाहेर पडेपर्यंत माझी ऑफिसची बॅग आणि त्याचं दुसरीच दप्तर मी तयार केलेलं असतं.. किचन कट्ट्यावर तिघांचे तीन टिफीन तयार असतात. ज्याचे त्याचे टिफीन ज्याच्या त्याच्या बॅग मध्ये मी कोंबतो. मी शुजमध्ये पाय कोंबता कोंबता नानुच्या टायची गाठ मारतो. तो पर्यंत तिने दुधाचा ग्लास त्याच्या तोंडाला लावलेला असतो दूध संपवत संपवत त्याने त्याचा शर्ट त्याच्या चड्डी मध्ये कोंबलेला असतो. सहाला आम्ही तिघेही बाहेर पडतो. लैच लाऊन मी चावी खिशात ठेवतो.. बायको तिच्या पर्स मध्ये चावी आहे का ते चेक करते. नानुला कामवालीच्या घरी ड्रॉप करून आम्ही दोघांनीही सहा पस्तीसची फास्ट पकडलेली असते.

संध्याकाळी सात पस्तीसला लोकल प्लॅटफॉर्मवर थांबते. विहिरीवरची मोटर चालू केल्यावर पाईप मधून पाण्याचे फवारे पसरत जावेत तशी माणसं प्लॅटफॉर्म वर पसरत जातात. खांद्यावरची बॅग सावरत मी प्लॅटफॉर्म च्या बाहेर पाय ओढत निघतो. घामेजलेल्या माणसांच्या शरीराच्या गर्दीतून माझं घामेजलेल शरीर घुसळत मी पुढं पुढं सरकत राहतो. तिनं सांगितलेल्या किराण्याच्या दोन चार वस्तू पिशवीत कोंबून मी स्वतःला शेअर रिक्षात कोंबून घेतो. आर्ध्या तासापूर्वीच्या माणसांच्या घामेजल्या गर्दी मधून याच रस्त्यावरून भाजी आणि कामवालीच्या घरून नानुला सोबत घेऊन बायकोने घर गाठलेल असतं.
दहाव्या मजल्यावरच्या साडेपाचशे स्क्वेअर फुटाच्या वन बी एच के फ्लॅटचे हप्ते अन या साडेपाच फुटी देहाचे रोजच्या दोन वेळचे हप्ते चुकवण्यासाठी दिवसाचे तेरा तास मरत राहायचं.
बाकी सगळं ठीक आहे! ऑफिस एकदम चकाचक आहे. महिन्यातून आठवडाभर फिरती असते. हां! त्यावेळेला बायको पोराची काळजी वाटते. वाटत - नानू आजारी पडला तर ती एकटी कसं सगळं मॅनेज करेल किंवा तीच आजारी पडली तर काय...? पण नोकरी करायची तर एवढी रिस्क तर घ्यावीच लागणार. हां ! टार्गेटचं टेन्शन असतं, पण तेवढं चालायचंच. गावी असतो तर शेणा-मातीत राबाव लागलं असतं. माझ्या भवांडांच आयुष्य शेणामातीनच बरबटून गेलंय.
शेती करणारा माझा चुलत भाऊ कधी मधी माझ्याकडे येतो तेव्हा माझ्या चकाकणाऱ्या शूज कडे, ब्रँडेड कपड्यांकडे नुसता पाहत राहतो. तेव्हा त्याच्या त्या नजरेत आसुया असते, कौतुक असत, अभिमान असतो की आणखीन काय असत मला नाही सांगता येणार पण त्यावेळी मी, मला खूप नशीबवान वाटायला लागतो.

रात्री आठ वाजता मी थकून घरी जातो. नानू दिवसभराच्या गमती-जमती मला सांगण्याचा प्रयत्न करतो, माझे कान अन् डोकं दोन्ही बंद झालय हे कळल्यावर तो मम्मीकडे जातो ती स्वयंपाक करत असते मग नानू टिव्ही पहात अभ्यास करत बसतो, किंवा अभ्यास करत टिव्ही पाहत बसतो.

पहाटे चारचा आलार्म लाऊन आम्ही रात्री आकरा वाजता झोपून जातो.

मी स्वप्नात पाहतो शहराच्या या टोका पासून त्या टोकापर्यंत एक लांबच लांब दोरखंड बांधलेला आहे. घड्याळ बनलेला माझा देह त्या दोरखंडावरून तोल सावरत चालतो आहे. खाली खोलच खोल आ वासून पसरलेली काळोखी दरी! माझ्या हातात एक लांबलचक काठी आहे जिच्यावर माझ्या ऑफिसच नाव कोरलेल आहे. ओझं वाटत असलं तरी मी ती काठी फेकून देऊ शकत नाही कारण तिच्यामुळेच माझा तोल सावरला जातोय.

मी घामाघुम होऊन जागा होतो. पहाटेचे तीन वाजलेत. उठायला अजून एक तास अवधी आहे. मी झोपी जाण्याचा प्रयत्न करतो, पण झोप लागत नाही.

माझं बालपण माझ्या डोळ्यासमोर तराळायला लागतं.
मोठा चौसोपी वाडा, मध्ये सारवलेल मोठं आंगण त्याच्या मधोमध तुळशी वृंदावन. आई-आबा आजी-आजोबा काका-काकू माझी सख्खी बहिण आणि दोन चुलत भाऊ अशा दहा लोकांचं कुटुंब! आम्ही सगळे एकत्र राहत असू. भावंड चुलत असली तरी आमच्यात सक्ख - चुलत असं काही नव्हतच. एकच घर आणि आमचं एक कुटुंब! कुणाला दुखलं खुपल तर बाकीचे नऊ जण दिमतीला उभे असत.

आबा सकाळी लवकर उठायचे. गोठा साफ करायचे, जनावरांना वैरण पाणी करून आंघोळीला जायचे. तोवर बंड्याकाका आंघोळ करून यायचा. दूध काढायचं काम त्याच्याकडे असायचं. आबांची आंघोळ होईस्तो नानाआजोबांची देवपूजा हरी-पाठावर आलेली असायची. आईने बनवलेला चहा झाला की आजी आम्हा पोरांना उठवून चादरी - वाकळीच्या घड्या घालून रचून ठेवायची. तोवर काकू आंघोळ करून आईला स्वयंपाकाला मदतीला यायची. मग आम्हा पोरांना आजी तिच्या खरबरीत हातांनी खसाखसा घासून एक एक करून न्हाणीघरातून बाहेर काढत असे. जेवण करून डबे घेऊन आम्ही चौघेजण रमत गमत शाळेत जात असू. संध्याकाळी शाळा सुटल्यावर लांबलेल्या सावल्यांच्या पावलावर पावल टाकत आम्ही घरी परतत असू. आबा, बंड्याकाका पण त्याचवेळेस शेतावरून येऊन चहा पित गप्पा मारत बसलेले असायचे. आम्ही पोरं हातपाय धुवून दूध पिऊन जे खेळायला सटकायचो ते पार अंधार पडल्यावरच घरी परतायचो. त्यानंतर शुभंकरोती आणि तासभर अभ्यास हा आजीच्या कडक शिस्तिखाली व्हायचा. इतरवेळी खूप प्रेमळ असणाऱ्या आजीमध्ये या दोन तासात येवढा कडकपणा कुठून येतं असे हा एक तिचा पांडुरंगच जाणे. . चहा घेऊन आबा आणि बंड्याकाका बाहेर जायचे. नानाआजोबा चार वाजताच चहा घेऊन ग्रामपंचायतीच्या ऑफिसात गेलेले असायचे.
संध्याकाळी आबांचा कट्टा म्हणजे गावातला वडाचा पार ! गावातल हे वडाचं झाड खूप पुरातन होत म्हणे. त्याला फुटलेल्या पारंब्या हे त्याचं एक एक उपकुटुंबच जणू ! मुख्य वडाचा घेर एवढा मोठ्ठा होता की आम्ही चौघे भावंड एकमेकांच्या हाताला धरून त्या झाडाला घेरून उभे राहिलो तरी कमीच पडत असू. त्याच्या भोवती मोठा कट्टा बांधला होता. संध्याकाळी गावातली सगळी मोठी माणसं त्या कट्ट्यावर गप्पा मारत बसत असतं. मग पान तंबाखूच्या देवाण घेवाणीबरोबरच गल्ली पासून ते दिल्लीपर्यंतच्या राजकारणावर गप्पा झडत. बंड्याकाका क्वचितच कट्ट्यावर असायचा. तो आणि त्याचे मित्र तालमीत जायचे.
रात्री आम्ही सर्व जण मिळून जेवायला बसायचो.. रात्री जेवणं झाल्यावर आबा, बंड्याकाका आणि नाना पान लावत लावत कसली तरी चर्चा करायचे . मग तिघही पान खाऊन मंदिरात जायचे. या तिघांचही एक ओपन सिक्रेट होतं. हे तिघेही तंबाखू खायचे पण एकमेकांसमोर कधीच नाही. मंदिरात भजन असे किंवा पोथी लावलेली असे. मला आठवतं, ज्ञानेश्वरी, जय-विजय किंवा एकनाथी भागवत अशी कुठली तरी पोथी असायची त्यावेळी आजी बरोबर आम्ही पोरही देवळात जात असू.

पुढं आईच्या आजारपणात बंड्याकाका नको म्हणत असताना आबांनी शेतीची वाटणी केली आणि स्वत:च्या वाट्याची शेती विकून टाकली. बहिण तिच्या घरी नांदायला गेली. मला मुंबईला नोकरी लागली एक एक करत घरातली सगळी मोठी माणसं संपत गेली.

बंड्याकाका गावीच असतो. आता तो थकलाय. पण समाधानी आहे. दोन्ही पोरांची वेळेवर लग्न झाली, घर व्यवस्थित सांभाळणाऱ्या सूना मिळाल्या. दोघांनाही दोन दोन पोरं झाली. पोरा नातवांनी भरलेल्या घरात म्हातारा म्हातारी आनंदात आहेत.
बंड्याकाकाचा मोठा मुलगा शेती करतो. दारात ट्रॅक्टर उभा झालाय! धाकटा गावातल्याच शेतकरी पतसंस्थेमध्ये मॅनेजर कम क्लार्क आहे. दोघंही एकत्रच राहतात. दोघांची चार पोरं गावातल्याच शाळेत शिकतात. कुणाला दुखलं खूपल तर बाकीचे नऊजण दिमतीला उभे असतात.


मी मुंबईला नोकरीला लागल्यावर मला आयुष्याची इतिकर्तव्यता झाल्यासारखं वाटलं होत. माझ्या सर्व भावंडात सर्वांच्या पुढं निघून गेलेला मी एक यशस्वी महान पुरुष आहे अशी माझी स्वतः विषयीची भावना होती. गावीच राहून गेलेली माझी भावंड अपयशी आहेत, तुटपुंज्या मिळकतीवर त्यांना संसाराचा गाडा हाकावा लागतो, शेणामातीत राबावं लागतं. मी ज्या सुखसोयी उपभोगतो त्या त्यांना पाहायलाही मिळत नाहीत, मला त्यांची कीव वाटत असे.
पण आता इतक्या वर्षानंतर मी विचार करतो की, गाव सोडून मुंबईला येऊन आयुष्यात मी असं काय कमावलं...? ज्या सुखसोयींच्या फुशारकीने मी हवेत असतो त्यांचा आनंद घ्यायला माझा म्हणून माझ्याजवळ किती वेळ ऑफिसने शिल्लक ठेवलेला असतो? आणि समजा वेळ काढलाच तर त्या उपभोगण्यासाठी खरंच माझा खिसा तेवढा मोठा आहे? आणि जे आहे ते मिळवण्यासाठी अन् टिकवण्यासाठी जी उरस्फोड करावी लागतेय तो सौदा खरंच फायद्याचा ठरलाय? प्रश्न, प्रश्न, प्रश्न...! अन् त्या प्रश्नात गटांगळ्या खात भिरभिरणारं कर्जाऊ आयुष्य! झगमगीत कचकडी दूनियेतलं झगमगीत कचकडी आयुष्य...!!!

बरं गावातच राहून माझ्या भावंडांनी आयुष्यात काय गमावलं...??? उलट त्यांचं कुटुंब त्यांच्या सोबत तरी आहे. हॉटेलिंग अन् ब्रँडेड कपड्यापेक्षा हे सुख खूप मोठं असतं. वेळेवर सल्ला द्यायला, चुकल तर सावरायला, दुखलं खुपलं तर काळजी घ्यायला, संकटात पाठीशी उभं राहायला आपली माणसं आपल्या आजूबाजूला असणं, यापेक्षा मोठं भाग्य अजून ते कोणतं?
त्यांचा भक्कम वड त्यांच्या पारंब्याना घट्ट धरून उभा आहे.

अनोळखी शहरात अनोळखी गर्दीत अधांतरी लटकत नाहीत ते.! वडापासून तुटलेल्या पारंब्याना ना स्वतंत्र झाड म्हणून मान असतो ना फांदी म्हणून स्थान असतं.


मी तळमळत कुस बदलतो.

मोबाईल कर्कश्श आवाजात केकाटायला लागतो. चार वाजलेले असतात. मी अलार्म बंद करतो. बायकोला उठवतो...



- नागेश पदमन/9158009272/8668306592