Shree Datt Avtar - 9 in Marathi Spiritual Stories by Vrishali Gotkhindikar books and stories PDF | श्री दत्त अवतार भाग ९

श्री दत्त अवतार भाग ९

श्री दत्त अवतार भाग ९

श्रीदत्तात्रेयांचे असंख्य शिष्य असून त्यांनी सर्वांवर त्यांच्या पात्रतेनुसार कृपा केली आहे. त्यांच्या शिष्यांमध्ये ब्राह्मण, क्षत्रियांपासून अगदी अंत्यजापर्यंत सर्व वर्गाच्या शिष्यांचा समावेश आहे.

या प्रत्येक शिष्याचे जीवन म्हणजे एक स्वतंत्र अवतार कथा होईल. प्रत्येक दत्तभक्ताने त्यांच्या प्रमुख शिष्यांची माहिती करून घेतली पाहिजे. कारण श्रीदत्तात्रेयांना त्यांनी ज्या पद्धतीने आणि निष्ठेने प्रसन्न करून घेतले त्यावरून साधकाला त्याच्या दत्तसाधनेसाठी उत्तम मार्गदर्शन मिळू शकेल.

श्रीदत्तात्रेय अवतार निर्गुण आणि निराकार असला तरी श्रीदत्त संप्रदाय सगुणोपासक आणि गुरुभक्तिप्रधान आहे. याचबरोबर योगमार्ग, हटयोग, कठोर अनुष्ठाने आणि आत्मक्लेश याही परंपरा दत्त संप्रदायामध्ये प्रचलित आहेत. सगुण भक्ती आणि उपासना ही दत्त संप्रदायाची मध्यवर्ती भूमिका आहे.

गुरुपरंपरेला महत्त्व असूनही दत्त संप्रदायामध्ये श्रीदत्तात्रेयांनाच गुरू मानले आहे. त्यामुळे त्यांच्या किंवा त्यांच्या अवताराच्या मूर्तीचे किंवा पादुकांचे पूजन प्रामुख्याने केले जाते.

शुद्ध आचार, सर्वाभूती परमेश्वर, सर्वाविषयी प्रेम, नामस्मरण, योग, ध्यान, नि:स्वार्थी आचरण यातूनच आत्मोन्नत्ती आणि मुक्तीची वाट शोधता येते हे दत्त संप्रदायाचे मत आहे.

श्रीदत्त संप्रदायामध्ये विविध पंथ आणि परंपरा प्रचलित आहेत. त्याचबरोबर कलियुगामध्ये अनेक संतांच्या माध्यमातून श्रीदत्तात्रेयांचे कार्य झाले असून अशा संतांचेही शिष्य आणि परंपरा निर्माण झाल्या आहेत.

एकूण सोळा अवतार दत्तात्रेयांनी घेतले असे भाविक मानतात.

दत्तसांप्रदायिक श्रीपादवल्लभांना व नृसिंह सरस्वतींना इतिहासकाळातील अनुक्रमे पहिले आणि दुसरे अवतार मानतात.

दासोपंतांच्या परंपरेत दासोपंतांना सतरावा अवतार मानण्यात येते.

इतकेच नव्हे, तर अक्कलकोटच्या स्वामीमहाराजांची आणि माणिकप्रभूंचीही दत्तावतारातच गणना होते.

श्री गुरुदेव दत्तात्रयांचे सोळा अवतार खालीलप्रमाणे;

१) योगिराज

ब्रम्हदेवाचे मानसपुत्र 'अत्रि' हे पुत्र प्राप्तीसाठी पत्नीसह हिमालयात कठोर तपश्चर्या करीत होते.

त्यांच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन साक्षात भगवान कार्तिक प्रकट झाले.

दत्तात्रेयांचा हा अवतार 'योगिराज' म्हणून प्रसिद्ध आहे.

त्यांनी योगमार्गाचा पुरस्कार करुन लोकांना सुखी केले.

म्हणून वरील नाव पडले.

श्री ब्रम्हदेवांनी या सृष्टीची निर्मिती केली खरी पण या विश्वाच्या निर्मितीनंतर सर्व जीवांना त्यांच्या पूर्वीच्या कर्मांप्रमाणे जे दुःख सहन करावे लागते हे पाहून ब्रह्मदेव चिंतित झाले आणि म्हणून ते विश्वाच्या प्रभूला श्रीविष्णु यांना शरण आले.

(मी स्वत:ला समर्पित करतो - शरण आलो आहे) अशी प्रार्थना केली.

सृष्टीच्या कल्याणासाठी श्रीहरी विष्णू ब्रह्मदेव यांच्यासमोर प्रकट झाले.

त्यांनी ब्रम्हदेवांना योग आणि आत्मतत्त्वाचे ज्ञान करून त्यांना चिंतामुक्त केले आणि मनःशांती देऊन त्याचा प्रचार करण्यास उद्युक्त केले.

"दत्तोsहम् दत्तोsहम्" चा जप करणार्यांनाही समान फळ मिळेल असा आशिर्वादही दिला. हा अवतार कार्तिक शुद्ध पौर्णिमेला, कृत्तिका नक्षत्रावर बुधवारी, पहिल्या प्रहरी, सूर्योदयाच्या वेळी झाला.

या अवताराने योगाचा (योग म्हणजे संपूर्ण अष्टांग योग / युज् म्हणजे स्वतःला परमेश्वराशी जोडणे ) प्रचार केला, म्हणून त्याला 'योगेश्वर' किंवा 'योगीराज' म्हणून ओळखले जाते. ह्या अवतारात श्रींचे स्वरूप सर्वात आकर्षक, नाजूक आणि स्फटिकासारखे ज्योतिर्मय आणि बर्फासारखे शुभ्र होते.

हा अवतार एकमुखी चतुर्भुज व प्रत्यक्ष विष्णूप्रमाणेच होता.

श्री दत्ता अत्रिमुनि व महासती अनुसया यांच्या उदरी त्रिगुणात्मक त्रैमूर्तीच्या रुपाने आर्विर्भूत झाले.
अत्रिमुनीच्या घरी जन्माला आले म्हणून त्यांना आत्रेय हे नांव मिळाले.

दत्त व आत्रेय ही दोन्ही नावे एकत्र करुन लोक त्यांना दत्तात्रेय या एकाच नावाने ओळखू लागले.

'दत्तोsहम्' प्रबोधकाय || श्रीकृष्णा जगदीश्वरा ||

योगेश्वरावताराय || दत्तात्रेयाय नमो नम: ||

"दत्तोsहम्" या मंत्राचा उपदेश करणाऱ्या (मी स्वतःला देतो म्हणजे माझे सर्वस्व तुझ्या चरणी अर्पण करतो - ही समर्पणाची भावनाच भक्तिमध्ये सर्वात महत्वाची आहे. तरच भक्त सद्गुरूकृपेस प्राप्त होतो.) श्रीकृष्णस्वरूप संपूर्ण जगाचे ईश्वर असणाऱ्या, योगीराज अवतार धारण करणाऱ्या, श्रीदत्तात्रेयांना माझा नमस्कार असो.
२) अत्रिवरद

श्री दत्तात्रेय यांचा दुसरा अवतार अत्रिवरद या नावाने वर्णलेला आहे.

अत्रिमु‍नि जन्माला आल्यानंतर यथाकाली ब्रम्हदेवाने त्यांना आज्ञा केली की, तुम्ही गृहस्थाश्रम स्विकारुन पित्रृऋणातून मुक्त व्हावे.

वडिलांची आज्ञा ऐकून अत्रिमु‍निनी गृहस्थाश्रम स्वीकारला.

आपल्या वंशामुळे लोककल्याणाचेही काम व्हावे अशी त्यांची मनिषा होती.

ते विद्वान होते; त्यामुळे आपल्या पोटी असा पुत्र यावा जो सर्व तीन लोकामध्ये प्रसिद्ध होईल आणि लोकांच्या आयुष्यातील सर्वोच्च ध्येय साध्य करण्यासाठी मार्गदर्शन करेल या हेतूने त्यांनी ऋष्य पर्वतावर तीव्र तपश्चर्या केली.

त्यांच्या तपश्चर्येचे तेज एवढे प्रखर होते की त्याची झळ तीनही लोकांना पोहोचू लागली आणि सर्व जीवसृष्टी अस्वस्थ झाली . तेव्हा सर्व देव आणि ऋषी-मुनींनी ब्रह्मा, विष्णु आणि महेश यांना विनवणी केली. मग ब्रह्मदेव हंसावर, श्री विष्णु गरुडावर आणि भगवान जाश्र्वनीळ नंदीवर आरूढ झाले आणि ऋषी अत्रीसमोर हजर झाले व त्यांनी अत्रीऋषींना तपातून जागे केले.

अत्रींऋषींनी त्यांना वाकून नमस्कार केला आणि आश्चर्यचकित होऊन विचारले, "मी फक्त एकाच परमात्म्याची आराधना केली होती. कृपा करून आपण तिघे कोण आहात हे मला सांगावे जेणेकरून माझ्या चित्तास संतोष प्राप्त होईल."

तेव्हा त्रिदेव म्हणाले, "आपण जे लक्ष्य केले आहे त्या प्रमाणेच आम्ही आहोत.

आम्ही तीन रूपांत दिसतो; पण आम्ही एक आहोत.

माया (भ्रम) त्रिगुणात्मक आहे - सत्व, रज आणि तम. रज तत्वाने उत्पत्ती होते, सत्वगुणामुळे पालनपोषण व संरक्षण होते आणि तमोगुण संहारास कारणीभूत होतो.

या तीन शक्ती प्रमुख आहेत. परमात्म्यामध्ये या तिन्ही शक्ती विद्यमान आहेत आणि त्याचीच तीन स्वरूपे आम्ही आहोत परंतु तत्वतः आम्ही एकच आहोत." असे म्हणून तिघेही एकरूप झाले.

आता अत्री ऋषींच्या समोर परमेश्वराचे सोन्यासारखे तेजःपूंज रूप दिसत होते.

त्यांला तीन मुखे होती, सहा हात होते. सहा हातांमध्ये शंख, चक्र, त्रिशूळ, डमरू, पद्म, कमंडलू अशी आयुधे होती. ह्या सुंदर अवतारातील तीनही श्रीमुखांवर मंद हास्य होते.

देवाने या रूपात अत्रिऋषिंना "तुझी ईच्छा पूर्ण होईल" असे वरदान दिले म्हणूनच या अवतारला 'अत्रिवरद' म्हणून ओळखले जाते.

हा अवतार कार्तिक वद्य प्रतिपदा, रोहिणी नक्षत्रावर, गुरुवारी, पहिल्या प्रहरी आणि पहिला मुहूर्तावर झाला.

कार्तिक कृष्ण प्रतिपदा या मुहूर्तावर रोहिणी नक्षत्र आणि गुरुवार असता पहिल्या प्रहरातील पहिल्याच शुभ मुहूर्तावर हा दत्तात्रेयांचा दुसरा अवतार झाला

दत्तात्रेयांना स्वत:ला आयुधांची काही आवश्यकता नसली तरी भक्ताजनांच्या कल्याणासाठी त्यांनी आयूधे धारण केली आहेत.

ही आयुधे ब्रम्हा विष्णू महेश ह्या तिन्ही देवतांचे प्रतिके आहेत.

माला :- माला ही जपाकरीता धारण करावयाची असते.

कमंडलू :- संध्यादी ब्राम्हकर्म करण्यासाठी आवश्यक ते जल जवळ ठेवण्याकरिता कमंडलू धारण केला जातो.

त्रिशुळ व शंख :- स्वरक्षणासाठी अथवा निर्दालन करण्यासाठी धारण केली जातात.

शंख व डमरु :- आपल्या विशिष्ट नादाने आनंद देत असतो

या अत्रिवरदाचे रुप तप्त सुवर्णकांन्तीप्रमाणे तेजस्वी, हसतमुख व षङभुज होते.

रज, सत्व आणि तम हे मायेचे तीन गुण असले तरीही त्यांचे आत्मक म्हणजे मूळस्वरूप एकच होते .

रज-सत्व-तमात्मका ||त्रैमूर्ती परमेश्वरा ||

अत्रिवरदावताराय ||दत्तात्रेयाय नमो नम: ||

रज, सत्व आणि तम हे मायेचे तीन गुण असले तरीही त्यांचे आत्मक म्हणजे मूळस्वरूप एक असलेल्या, त्रैमूर्तीरूप परमेश्वराला, अत्रिवरद हा अवतार धारण करणाऱ्या श्री दत्तात्रेयांना माझा नमस्कार असो .क्रमशः

Rate & Review

Ulhas Hejib

Ulhas Hejib 2 weeks ago

R S

R S 2 years ago

Gunaji

Gunaji 3 years ago